Analysis of India Food Grain Stock 2026 amid West Asia conflict: पश्चिम आशियात सध्या युद्ध सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतात अन्नधान्याचा साठा किती आहे? अन्नधान्य भारतात महाग होऊ शकते का? ते जाणून घेऊयात. करोना महामारीच्या वेळी २०२० मध्ये सरकारी गोदामांमध्ये गहू व तांदूळ साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होता. मार्च ते मे दरम्यान रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादन घेतले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी पुढील दोन वर्षे सलग रब्बी हंगामात चांगले उत्पादन घेतले. करोना महामारीच्या वेळी अन्नधान्य टंचाई भारतात नव्हती. आता पश्चिम आशियात यु्द्ध सुरू आहे. जागतिक पातळीवर कच्चे तेल व नैसर्गिक वायूच्या किंमतीत वाढ झाली आहे. खत निर्मितीत आखाती देश कोणती भूमिका बजावतात? भारतात गहू, तांदूळ साठा किती आहे? तो पुरेल का? ते जाणून घेऊयात.
भारतात गहू, तांदूळ साठा किती?
अमेरिका व इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर प्रथम हल्ला केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी १ मार्च रोजी भारताकडे किती गहू व तांदूळ आहे याची आकडेवारी जाहीर झाली होती. १ मार्च रोजी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया व राज्य सरकारांच्या गोदामांमध्ये एकूण २३.६ दशलक्ष टन गहू, तर ३६.५ दशलक्ष टन तांदूळ उपलब्ध असल्याचे समोर आले. मागील दोन वर्षांच्या तुलनेत गव्हाचा साठा यावर्षी भारताकडे अधिक आहे. (खालील तक्ता पाहा)

भारतात २०२५ मध्ये मान्सून चांगला झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी गहू, मका, हरभरा, मसूर डाळ, मोहरी तसेच कांदे-बटाटे यांची लागवड मोठ्या क्षेत्रफळावर केली होती. “या महिन्यात ‘वेस्टर्न डिस्टर्बन्सेस’मुळे पाऊस झाला आहे. त्यामुळे वातावरणात थोडा गारवा पसरला आहे. यामुळे गव्हाच्या पिकाला फायदा होईल. गव्हाच्या दाण्यांचा आकार व वजन वाढीसाठी पोषक वातावरण झाले आहे. त्यामुळे उत्पादन चांगले होईल”, असे नवी दिल्लीतील इंडियन अॅग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्य शास्त्रज्ञ राजवीर यादव म्हणाले. गव्हाची कापणी झाल्यानंतर एप्रिलच्या मध्यात उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात गहू बाजारात येईल, असेही ते म्हणाले.
मोहरीचे हार्वेस्टिंग साधारणपणे फेब्रुवारी ते मार्चच्या मध्यापर्यंत होते. यंदा अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने मोहरी उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच मोहरीच्या उत्पादनासाठी हवामान थंड हवे. यंदा हवामानात मोहरीसाठी आवश्यक असलेला गारवा नव्हता, त्यामुळे मोहरी, जिरा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे जोधपूर (राजस्थान) येथील साऊथ एशिया बायोटेक्नोलॉजी सेंटरचे संचालक भगिरथ चौधरी म्हणाले.
आग्रा जवळील खंडौली येथील बटाटा उत्पादक शेतकरी व कोल्ड स्टोरेजचे मालक दुंगर सिंग यांनी बटाटा तसेच इतर जमिनीखाली उगवणाऱ्या पिकांबद्दल (बटाटे, रताळे, मुळा, इतर) माहिती दिली. ते म्हणाले, यंदा ८ ते १० टक्के लागवड वाढली आहे. पण उत्पादन मागच्या वर्षी जितके झाले तितकेच यावर्षी होण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये रब्बी हंगामात मक्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. एप्रिलच्या मध्यामध्ये मका बाजारात दाखल होईल. प्रति एकर चार ते साडे चार टन मक्याचे उत्पादन बिहारमध्ये होते, अशी माहिती रेगाल रिसोर्सेस लिमिटेडचे संचालक अनिल किशोरेपुरिया यांनी दिली. करोना महामारी वेळी भारताकडे जसे विपूल प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध होते, तसेच आता पश्चिम आशियात युद्धाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध आहे. भारतात साखर उत्पादनही सरासरी होण्याचा अंदाज आहे.

खतांची अवस्था काय ?
भारतात मागील वर्षी १९ मार्च रोजी युरिया खताचा साठा ५.५ दशलक्ष टन, डि-अम्मोनियम फोस्फेट खताचा १.२ दशलक्ष टन होता. तोच साठा या वर्षी १९ मार्च २०२६ रोजी युरियाचा ६.१ दशलक्ष टन तर डि-अम्मोनियम फोस्फेट खताचा २.४ दशलक्ष टन आहे. त्यामुळे युरिया व डि-अम्मोनियम खतांचा साठा सध्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु, हे खत तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या घटकांचा पुरवठा मात्र विस्कळीत झाला आहे. भारतात जून पासून खरीप हंगाम सुरू होईल. त्यावेळी खतांची आवश्यकता अधिक असेल. पश्चिम आशियातील युद्धामुळे खत निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या घटकांच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने आगामी काळात खत टंचाईचा सामना करावा लागू शकतो.
गल्फ को-ओपरेशन कौन्सिल मध्ये सहभागी असलेले देश भारताला युरिया व डीएपी खताचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करतात. खत निर्मितीसाठी आवश्यक असलेले लिक्विफाइड नॅच्युरल गॅस (एलएनजी), अम्मोनिया आणि सल्फर हे घटक आखाती देशांकडून भारतात आयात केले जातात. दरम्यान, पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यानंतर खत निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या घटकांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. भारताला दरवर्षी ४० दशलक्ष टन युरियाची, १० दशलक्ष टन डीएपीची, १४ दशलक्ष टन कॉम्प्लेक्स खतांची आणि ५ दशलक्ष टन एसएसपी खताची आवश्यकता असते. या खतांच्या पुरवठा साखळीवर युद्धाने परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारने या खत उत्पादनासाठी आवश्यक ती पाऊले उचलायला हवीत, असे या क्षेत्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.
कीटकनाशकांची काय परिस्थिती?
खतांच्या माध्यमातून पिकांना आवश्यक असलेले न्यूट्रियंट्स म्हणजेच पोषके मिळतात. याशिवाय पिकांना काही केमिकल्सची (रसायनांची) आवश्यकता असते. पीक उत्पादनात घट करणाऱ्या कीड, रोग आणि तणांपासून संरक्षण करण्यासाठी पिकांना कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशकांची गरज असते. ते बनवण्यासाठी लागणारे नाप्था हे रसायन लागते. एकूण ५५ टक्के नाप्था रसायन पश्चिम आशियातून जगभरात पोहोचवले जाते. त्याची निर्मिती कच्च्या तेलाच्या रिफायनरीतून होते. त्याची वाहतूक मुख्यत: होर्मुझ सामुद्रधुनीतून होते.
दरम्यान, पश्चिम आशियातून होणारा नाप्थाचा पुरवठा विस्कळीत झाल्यास चीनकडून तयार करण्यात येत असलेल्या इसोप्रोपिलामाइनच्या किंमतीत वाढ होईल. इसोप्रोपिलामाइनचा वापर करून कीटकनाशकांची निर्मिती करता येते. त्यामुळे एकूणच कीटकनाशकांच्या किंमती वाढतील. दरम्यान, पश्चिम आशियातील युद्धामुळे शेतकऱ्यांना शेती करणे महाग झाल्यानंतर त्याचा परिणाम अन्नधान्य, फळभाज्यांच्या किंमतीवर होईल का? हे येत्या काळात पाहायला मिळेल.
