West Asia War and India Energy Security Analysis: पश्चिम आशियात यु्द्ध सुरू असल्याने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाजांची वाहतूक थांबली आहे. त्याचा परिणाम भारताच्या खनिज तेल, लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG), लिक्विफाइड नॅच्युरल गॅस (LNG) पुरवठ्यावर झाला आहे. भारत खनिज तेलाची आयात पश्चिम आशियासह जगातील इतर भागांमधून करतो. परंतु, एलपीजी व एलएनजी पुरवठ्यासाठी भारताला पश्चिम आशियावर सर्वाधिक अवलंबून राहावे लागते. त्यामुळे सर्वाधिक फटका भारताला होणाऱ्या एलपीजी व एलएनजी पुरवठ्याला बसला आहे. एलपीजी, एलएनजी म्हणजे नेमकं काय, त्यांची निर्मिती कशी होते? त्यांचा वापर कुठे व कसा केला जातो, हे अगदी सोप्या शब्दांत जाणून घेऊयात.
LPG, LNG साठी भारताचे पश्चिम आशियावरील अवलंबित्व किती?
भारत पश्चिम आशियातून ६० टक्के एलपीजी आयात करतो. त्यातील ९० टक्के एलपीजी हा होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे भारतात येतो. त्यामुळे भारताला होणारा सध्या जवळपास ५४ टक्के एलपीजी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे सरकारने चिंता व्यक्त करत उद्योग व व्यावसायिक क्षेत्रातील एलपीजी वापरावर निर्बंध घातले आहेत. घरगुती स्वयंपाकासाठी एलपीजी कमी पडू नये म्हणून सरकारने हे पाऊल उचलले आहे.
होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्याचा सर्वाधिक फटका LNG, PNG पुरवठ्यावर का?
होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्याने भारतातील नैसर्गिक वायू पुरवठ्यावर देखील परिणाम झाला आहे. सरकारने व्यावसायिक व औद्योगिक नैसर्गिक वायूच्या वापरावर बंधने घातली आहेत. नैसर्गिक वायूचा वापर घरांमध्ये जो गॅस पाइपने पुरवला जातो त्यात केला जातो. त्याला पीएनजी (PNG – पाइप्ड नॅच्युरल गॅस) म्हणतात. तर नैसर्गिक गॅसचा वापर सीएनजी (CNG- कम्प्रेस्ड नॅच्युरल गॅस) म्हणून वाहनांमध्येही केला जातो. घरातील स्वयंपाक व वाहनांना लागणारा सीएनजी कमी पडू नये असे धोरण सरकारने आखले आहे. भारताला लागणारा ५५ ते ६० टक्के एलएनजी पश्चिम आशियातून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आयात केला जातो. सध्या भारताला लागणारा ३० टक्के एलएनजी पुरवठा खंडित झाला आहे. शक्य असल्यास एलपीजी सिलिंडर ऐवजी पाइपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या गॅसचा वापर करावा असे आवाहन केंद्र सरकारने नागरिकांना केले आहे.
LPG म्हणजे नेमकं काय? तो कसा तयार होते?
एलपीजी व एलएनजी हे दोन्ही हायड्रोकार्बन गॅसेस आहेत. दोन्ही द्रव (liquid) स्वरूपात असतात. या दोन्ही गॅसेसची केमिस्ट्री, उत्पादन प्रक्रिया, वाहतुकीची पद्धत आणि डिलिव्हरी मात्र वेगळी आहे. एलपीजी हे एक गॅस स्वरूपातील इंधन आहे. एलपीजी मध्ये प्रोपेन आणि ब्यूटेन हे घटक असतात. खनिज तेल व नैसर्गिक वायूवर प्रक्रिया केल्यानंतर त्यातून प्रोपेन व ब्यूटेन मिळते. त्यापासून एलपीजी तयार केला जातो. एलपीजी हा द्रव स्वरूपात साठवून ठेवला जातो. एलपीजीचा वापर कुकिंग (स्वयंपाक) व हिटिंगसाठी (गरम करण्यासाठी) केला जातो. काही वाहनांमध्ये इंधन म्हणून एलपीजी वापरले जाते. तसेच औद्योगिक क्षेत्रातही याचा वापर केला जातो. एलपीजीची घनता त्याच्या गॅसिअस व्होलूमच्या १/२६० असते.
LNG म्हणजे नेमकं काय? तो कसा तयार होतो?
एलएनजी हा एक प्रकारे नैसर्गिक वायू आहे. एलएनजीलाच नैसर्गिक वायू देखील म्हणता येऊ शकते. मिथेन हा त्यातील मुख्य घटक असतो. वजा १६० अंश सेल्सिअस तापमानात मिथेनला थंड केल्यानंतर त्याचे रूपांतर द्रव स्वरूपात होते. त्यालाच एलएनजी म्हणतात. एलएनजीचा थेट वापर करता येत नाही. रेल्वे, जहाज आणि जड वाहनांमध्ये एलएनजीचा वापर केला जातो. ज्या ठिकाणी पाइपने नैसर्गिक वायू पोहोचवता येत नाही, त्या ठिकाणी समुद्रामार्गे नैसर्गिक वायू पोहोचवण्यासाठी त्याला एलएनजी मध्ये रूपांतरीत केले जाते. समुद्रामार्गे वाहतूक करून नेण्यासाठी नैसर्गिक वायूला एलएनजीमध्ये रूपांतरीत केले जाते. एलएनजीची घनता त्याच्या गॅसिअस व्होलूमच्या १/६०० असते.
LNG चा वापर कुठे केला जातो?
एलएनजीला क्रायोजेनिक टँकमध्ये साठवून ठेवावे लागते. त्याला हाताळण्यासाठी कुशल कामगारांची आवश्यकता असते. एलएनजीचा वापर करण्यासाठी त्याला पुन्हा नैसर्गिक वायूत रूपांतरीत करावे लागते. एलएनजीतून रूपांतरीत केलेल्या नैसर्गिक वायूचा वापर स्वयंपाकासाठी, वाहतुकीचे इंधन, औद्योगिक इंधन, रिफायनरी, खते, पावर प्लांट आणि पेट्रोकेमिकल्समध्ये केला जातो. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, नैसर्गिक वायू ज्या ठिकाणी वाहून नेणे शक्य नसते, त्या ठिकाणी नेण्यासाठी त्याला एलएनजी मध्ये रूपांतरीत केले जाते. नियोजित ठिकाणी एलएनजी पोहोचवल्यानंतर त्याला पुन्हा नैसर्गिक वायूत रूपांतरीत करून त्याचा वापर केला जातो.
LNG चेच PNG आणि CNG त रूपांतर होते का?
एलएनजीची वाहतूक विशेष क्रायोजेनिक जहाजांमधून केली जाते. ती जहाजे एलएनजी रिगॅसिफिकेशन टर्मिनल्सवर येऊन थांबतात. तिथे एलएनजीला पुन्हा नैसर्गिक वायूत रूपांतरित केले जाते. त्यानंतर नैसर्गिक वायूला मुख्यत: पाइपलाइनमार्गे घराघरांमध्ये पोहोचवले जाते. या वायूचा वापर स्वयंपाकासाठी केला जातो. हा वायू पाइपमार्गे पुरवला जातो त्यामुळे त्याला पीएनजी असे म्हणतात. नैसर्गिक वायूचा वापर वाहनांमध्ये इंधन म्हणून केला जातो. हा नैसर्गिक वायू गॅस स्टेशनवरून दिला जातो. तो गॅस स्टेशनवर कम्प्रेस करून साठवला जातो. त्यामुळे त्याला सीएनजी (कम्प्रेस्ड नॅच्युरल गॅस) असे म्हणतात. दरम्यान, एलएनजी उद्योगांना देखील पाइपलाइन मार्फत पुरवला जातो.
LPG विरूद्ध PNG, काय फायदेशीर?
एलपीजी हा सिलिंडरमध्ये सहजपणे साठवून ठेवता येतो. त्यामुळे सिलिंडरमधील एलपीजीची वाहतूक करणे सोपे जाते. त्यामुळे एलपीजी कोणत्याही भागांत सहज उपलब्ध होतो. एलपीजीसाठी फक्त प्रेशराइज्ड सिलिंडर्सची आवश्यकता असते. एलपीजी प्रमाणे एलएनजीची साठवणूक करणे शक्य नसते. त्याला फक्त द्रव अवस्थेतच साठवता येते.
एलपीजी पेक्षा पीएनजी वापरण्यास सहज सोपा असतो. पीएनजी हा पाइपलाइनद्वारे थेट घरात येतो. पीएनजी हा अत्यंत हलका वायू असतो. एलपीजी हा जड वायू असतो. त्याची गळती झाल्यानंतर तो हवेत साठत जातो. त्यामुळे मोठा धोका निर्माण होतो. तर पीएनजी हा हलका वायू असतो. तो हवेतून दूर वर पसरतो. हवेत साठून राहत नाही. त्यामुळे धोका कमी असतो.
