पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जगातील शेअर बाजारांवर होत आहे. युद्धामुळे जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे भाव वाढले आहेत. तेलाचे भाव वाढल्याने महागाई वाढण्याची भीती असते. याच परिस्थितीचा परिणाम शेअर बाजारांवर झालेला दिसत आहे. इक्विटीमध्ये असलेली गुंतवणूक दररोज मोठ्या प्रमाणात काढून घेतली जात आहे. शेअर बाजारात अस्थिरता तसेच मंदीचे वातावरण असल्याने कंपन्यांनी त्यांचे निधी गोळा करण्याचे नियोजन पुढे ढकलल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचेच ताजे उदाहरण म्हणजे फिनटेक कंपनी ‘फोनपे’ (PhonePe)ने ‘आयपीओ’ (IPO) पुढे ढकलला आहे. जगातील अशांततेचा परिणाम भांडवली बाजारावर झाला आहे.
पश्चिम आशियातील युद्धाचा ‘आयपीओ’वर परिणाम कसा झाला?
पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे भाव वाढले आहेत. कच्च्या तेलाच्या एका बॅरलचे किंमत १०० डॉलरपेक्षा अधिक झाली आहे. तेलाच्या किंमतीत वाढ झाली की महागाई वाढण्याची भीती असते. अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे गुंतवणूकदार त्यांची इक्विटीतील गुंतवणूक काढून घेण्यास सुरूवात करतात. १ मार्चपासून परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून ६६ हजार कोटींची गुंतवणूक काढून घेतली आहे.
युद्ध सुरू झाल्यापासून भारतीय शेअर बाजाराची नऊ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणुकीचे मूल्य घटले आहे. तसेच गुंतवणूकदारांचा विश्वासही कमी झाला आहे. शेअर बाजारातील अस्वस्थता आणि दररोज होणारी शेअर्सची विक्री यामुळे काही शेअर्सचे दर ५२ आठवड्यांतील निचांकी आहेत. शेअर बाजारातील अस्थिरतेने कंपन्यांच्या आयपीओ नियोजनावर परिणाम केला आहे. शेअर बाजारात परिस्थिती सुधारण्याची कंपन्या वाट पाहत आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांनी त्यांचे आयपीओ पुढे ढकलले आहेत. दरम्यान, शेअर्स इश्यू करणाऱ्या कंपन्यांना अशा परिस्थितीत चांगली किंमत मिळत नाही. त्यांना कमी किंमतीत शेअर्स बाजारात आणावे लागतात. हे टाळण्यासाठी कंपन्यांनी निधी उभारणे पुढे ढकलल्याचे चित्र आहे.
‘फोनपे’ने आयपीओ पुढे का ढकलला?
जागतिक पातळीवरील तणाव व बाजारातील अस्थिरता या प्रमुख कारणांमुळे आयपीओ पुढे ढकलल्याचे कारण ‘फोनपे’ने दिले आहे. जागतिक भांडवली बाजार स्थिर झाल्यानंतर कंपनी आयपीओ आणण्याचे नियोजन करेल, असे ‘फोनपे’ने म्हटले आहे. ‘फोनपे’ला आयपीओच्या माध्यमातून जवळपास १३ हजार कोटी रूपये गोळा करायचे होते. मोठ्या कंपन्यादेखील बाजार स्थिर होण्याची वाट पाहत आहेत. अनेक कंपन्यांनी त्यांचे आयपीओ प्लान्स पुढे ढकलले आहेत.
शेअर बाजार व आयपीओचा काय संबंध?
आयपीओ हे शेअर बाजाराच्या संवेदशीलतेवर अवलंबून असतात. शेअर बाजारात ज्यावेळी उत्साह असतो, त्यावेळी गुंतवणूकदार नवीन लिस्टिंग झालेल्या कंपन्यांमध्ये म्हणजेच आयपीओमध्ये गुंतवणूक करतात. नव्या कंपन्यांच्या आयपीओची त्यामुळे मागणी वाढते. कंपन्यांच्या आयपीओला जास्त किंमत मिळते. आयपीओ म्हणजे पहिल्यांदा कंपनी शेअर्स इश्यू करते. ती कंपनी शेअर बाजारावर नोंदवली जाते. तिचे शेअर्स शेअर बाजारात लिस्टेड होतात म्हणजे नोंद होतात.
आयपीओवरील परिणाम किती मोठा?
पश्चिम आशियातील युद्धाचा आयपीओवर मोठा परिणाम झाला आहे. सगळ्याच क्षेत्रांमधील कंपन्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. आर्थिक सेवा पुरवणाऱ्या कंपन्या, उत्पादन करणाऱ्या कंपन्या, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी मागील वर्षी आयपीओच्या माध्यमातून २.६५ लाख कोटी रूपये जमा केले होते. त्यात एनएसई, एसबीआय म्युच्युअल फंड आणि जियो प्लॅटफॉर्म्स या कंपन्यांचा सहभाग होता. सध्या मीडियम आणि लार्ज आयपीओ स्थगित करण्यात आले आहेत. जवळपास १.४० लाख कोटींचे आयपीओ नियंत्रकांची मंजूरी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. तर १.२५ लाख कोटींच्या आयपीओंना मंजूरी मिळाली आहे. बाजारातील परिस्थिती सुधारण्याची वाट कंपन्या पाहत आहेत. शेअर बाजारात सध्या असलेल्या परिस्थितीत सुधारणा न झाल्यास त्याचा परिणाम कंपन्यांच्या निधी गोळा करण्यावर होईल. तसेच रोजगार निर्मितीवर देखील वाईट परिणाम होईल.
फोनपेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काय म्हणाले?
एका निवेदनात फोनपेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक समीर निगम म्हणाले, “आम्हाला आशा आहे की प्रभावित क्षेत्रांमध्ये (इराण-इस्रायल युद्ध) लवकरच शांतता प्रस्थापित होईल आणि भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध होण्याच्या आमच्या निर्धारावर आम्ही ठाम आहोत.” वॉलमार्टचा पाठिंबा असलेल्या या कंपनीने सांगितले की, जागतिक भांडवली बाजारात काही प्रमाणात स्थिरता परतल्यानंतरच ते शेअर बाजारात सूचिबद्ध होण्याची (आयपीओ आणण्याची) प्रक्रिया पुन्हा सुरू करतील.
पश्चिम आशियातील युद्धाने जगात अस्वस्थता
पश्चिम आशियात युद्ध सुरू होऊन आता तीन आठवडे झाले आहेत. अमेरिका व इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ला करत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या केली. त्यानंतर इराणने प्रत्युत्तरात आखातातील आजूबाजूच्या देशांवर हल्ले चढवले. आखाती देशांमधील फक्त अमेरिकेच्या सैन्य तळांवर हल्ले केल्याचे इराणकडून सांगण्यात आले. दरम्यान, इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. या सामुद्रधुनीतून जगात होणाऱ्या एकूण तेल पुरवठ्यापैकी २० टक्के तेलाची वाहतूक होते. हा मार्ग बंद झाल्याने कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
