पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयाची तुलना काही प्रमाणात उत्तर प्रदेशात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबरोबर काही प्रमाणात करता येईल. भाजपने येथे पूर्वीच्या १० जागांवरून थेट ७१ पर्यंत मजल मारली. परिणामी केंद्रात स्वबळावर सरकार स्थापन करणे भाजपला शक्य झाले. तीच बाब पश्चिम बंगालची आहे. अशक्यप्राय वाटणारा आणि पक्षासाठी वैचारिकदृष्ट्या महत्त्वाचा असा विजय पश्चिम बंगाल विधानसभेत भाजपने खेचून आणला. त्यात महत्त्वाचा वाटा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उत्तम रणनीतीचा असला तरी, विधानसभेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनीही अहोरात्र मेहनत केली. त्यामुळेच आपसूकच मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आले. सत्तेत आल्यावर जे काही निर्णय त्यांनी घेतले आहेत त्याची राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू आहे.
पक्षांतर ते मुख्यमंत्री
तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय अशी सुवेंदू यांची ओळख. नंदीग्राम मतदारसंघातून २०१६, २०२१ आणि २०२६ असे सलग तीन वेळा ते विजयी झाले. यापूर्वी २००५ मध्येही ते आमदार होते. तर २००९ व २०१४ मध्ये तमलूक मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते. थोडक्यात ५५ वर्षीय सुवेंदू अधिकारी यांच्या पाठिशी निवडणुकीच्या राजकारणाचा मोठा अनुभव आहे. याखेरीज २०१६ ते २० या कालावधीत राज्य मंत्रिमंडळात जलसंपदा व वाहतूक अशी खातीही सांभाळली. कांती नगरपालिकेत काँग्रेसचे नगरसेवक म्हणून १९९५ मध्ये त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.
नंदीग्राममध्ये २००७ मध्ये जमीन अधिग्रहणाविरोधातील आंदोलनातून त्यांचे नेतृत्व बहरले. राज्यातील डाव्या पक्षांच्या आघाडी सरकारविरोधात हा संघर्ष होता. यातून तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाचा विश्वास सुवेंदू यांनी संपादन केला. पक्षात त्यांना खासदारकी, आमदार तसेच मंत्रिपदे मिळाली. ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्याशी असलेल्या वादातून सुवेंदू यांनी डिसेंबर २०२० मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले जाते.
पक्षांतरानंतर सहा वर्षांच्या कालावधीतच पक्षाने त्यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली. अर्थात त्यामागे सुवेंदू यांनी राज्य सरकारविरोधात केलेला रस्त्यावरचा संघर्ष आणि हिंदुत्वाची आक्रमक भूमिका यामुळे भाजप श्रेष्ठींनी त्यांच्याच पारड्यात मुख्यमंत्रीपदासाठी वजन टाकले. दुसरे कोणते नावही चर्चेत नव्हते. भाजपमध्ये मुख्यमंत्री निवडताना अनेकदा धक्कातंत्राचा अवलंब केला जातो. भलतेच नाव पुढे येते.
पक्षाच्या भूमिकेत समरस
भाजपमध्ये पक्ष संघटनेतील मोठे पद किंवा मुख्यमंत्रीपद शक्यतो पक्षाची वैचारिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला दिले जाते. अर्थात अलिकडे यात बदल झाला आहे. कारण आसाममध्ये हेमंत बिस्व सरमा हे मूळचे काँग्रेसचे. त्यांच्याकडे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद दिले. बिहारमध्येही परिवाराबाहेरचे सम्राट चौधरी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्यात आले. आणखीही काही उदाहरणे आहेत.
पश्चिम बंगालमध्येही सुवेंदू अधिकारी यांच्यासारख्या पक्षात सहा वर्षांपूर्वी आलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आले. पक्षापुढे हेच एकमेव नाव होते. विरोधी पक्षनेते म्हणून पाच वर्षे सभागृहात आणि बाहेरदेखील संघर्ष केला. नंतर निवडणूक प्रचारात शेकडो सभा, रोड शोच्या माध्यमातून त्यांनी तृणमूल सरकारविरोधात जनजागृती केली. हिंदुत्वाची भूमिका ठामपणे मांडली. मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी यांना सलग दोनदा पराभूत करण्याचा पराक्रमही केला.
पहिल्यांदा २०२१ मध्ये नंदीग्राम या मतदारसंघात तर २०२६ मध्ये भवानीपूर या ममतांच्या घरच्या मतदारसंघात त्यांना नमवले. राज्यात तीस टक्क्यांच्या आसपास मुस्लीम समुदाय आहे. सुवेंदू यांनी प्रचारात आक्रमक भूमिका घेत प्रसंगी एखाद्या जुन्या भाजप नेत्यापेक्षाही प्रखर अशी हिंदुत्वाची भूमिका घेतली. त्यांच्या प्रचारसभांनाही प्रचंड गर्दी होती. निवडणुकीपूर्वी रामनवनीचा उत्सवही त्यांनी दणक्यात साजरा केला. तेथेच प्रचाराची दिशा स्पष्ट होत वातावरणनिर्मिती झाली.
आता सत्तेत आल्यावर राज्यात ईद निमित्त पूर्वीच्या दोन दिवसांऐवजी एकच दिवस सुटी जाहीर करण्यात आली. हिंदूंच्या पाठिंब्यावर विजयी झालो अशी प्रतिक्रिया त्यांनी नंदीग्राममध्ये विजय मिळवल्यावर दिली. ‘सबका साथ सबका विकास आणि सबका हिसाब’ ही त्यांची घोषणा आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील निर्णयांकडे लक्ष आहे. पश्चिम बंगाल सरकारने नव्या आदेशात घुसखोरांच्या स्थानबद्धतेसाठी तात्पुरती केंद्रे उभारण्याचे आदेश दिले आहेत. हा मुद्दा भाजपने प्रचारात केंद्रस्थानी ठेवला होता. पक्षाच्या स्थापनेपासून वैचारिक दृष्ट्या भाजपसाठी हा संवेदनशील मुद्दा आहे. हाच मुद्दा सुवेंदू यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे घेताच उचलला आहे. यातून पक्षात तुलनेत नवखे असले तरी मूळ विचारांशी बांधील असल्याचे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. यातून देशपातळीवर सुवेंदू यांचे नाव घेतले जात आहे.
अपेक्षांचे ओझे
पश्चिम बंगाल विधानसभेत पूर्वीच्या तीन जागांवरून २०२१ मध्ये केवळ तीन वरून ७७ जागांपर्यंत भाजपने मजल मारली होती. त्यामागे सुवेंदू यांची रणनीती कारणीभूत ठरली होती. तृणमूल काँग्रेसमधील काही नेत्यांना त्यांनी भाजपमध्ये आणले होते. राज्यात भाजपचे अस्तित्व केवळ उत्तर बंगालमध्ये होते. साधारण तीन ते पाच टक्के मिळत होती. मात्र नंतरच्या काळात प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेने तृणमूलचे प्रभावक्षेत्र असलेल्या कोलकाता शहर परिसरासह राज्यात अन्यत्र सुवेंदू यांनी भाजपला यश मिळवून दिले.
राज्यात विधानसभेच्या २९४ पैकी भाजपच्या दोनशेहून अधिक जागा आहेत. त्यामुळे सुवेंदू यांच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत. विशेषत: राज्यात उद्योगप्रधान वातावरण होण्यासाठी ठोस प्रयत्नांची अपेक्षा आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला तृणमूल काँग्रेस पराभवानंतर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार अशा वेळी निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करताना सुवेंदू यांच्या अनुभवाची कसोटी लागेल.
