डॉ. देवदत्त पोखरकर
Gauriche Hat Ranhalad: उन्हाने तापलेल्या, भेगाळलेल्या धरणीवर पावसाच्या सरी कोसळतात. चिंब झालेली धरणी जणू चमत्कार घडवते. निर्जीव भासणाऱ्या मातीतून पाचूचे हिरवे कोंब डोकावू लागतात. पाहता पाहता उजाड माळरानावर गवताचे हिरवेगार गालिचे पसरतात. त्या गालिच्यावर रंगीबेरंगी चिमुकल्या रानफुलांनी जणू नाजूक नक्षी काढलेली असते. या हिरवाईत “गौरीचे हात” म्हणजेच रानहळद ही एक नाजूक वनस्पती अगदी शांतपणे, कोणताही गाजावाजा न करता उमलते; पण आपलं अस्तित्वही ठळकपणे जाणवून देते.

हातासम फुलोरा गौरीचा

गौरी-गणपतीच्या आगमनाच्या सुमारास रानहळदीची फुलं उमलतात. फुलोऱ्याची रचना पाहिली, तर ती हातांसारखी भासते. जणू देवी गौरी आशीर्वाद देण्यासाठी हात पुढे करते आहे. म्हणूनच कोकणात आणि इतर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रानहळदीच्या फुलांचा वापर गौरी-गणपतीच्या पूजेत केला जातो. हा केवळ श्रद्धेचा भाग नाही, तर निसर्गाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचं प्रतीक आहे.

आल्याचं कुळ हिचं

वनस्पतीशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं, तर रानहळद ही आल्याच्या कुळातील (Zingiberaceae) वनस्पती आहे. पश्चिम घाटात रानहळदीच्या कितीतरी प्रजाती आढळतात. त्यापैकी Curcuma aromatica (कस्तुरी हळद) आणि Curcuma pseudomontana (हिल टर्मरिक किंवा गौरीचे हात) या प्रमुख आहेत. “गौरीचे हात” म्हणून ओळखला जाणारा फुलोरा प्रामुख्याने Curcuma pseudomontana या प्रजातीशी संबंधित आहे.

मोसमी दर्शन मोहक

ही कंदधारी (Rhizomatous) वनस्पती आहे. तिचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जमिनीखाली असलेलं खोड, ज्याला आपण कंद किंवा Rhizome म्हणतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही वनस्पती पूर्णपणे जमिनीखाली सुप्त अवस्थेत (Dormant Phase) असते. पहिल्या पावसाने माती ओलसर झाली की त्या कंदातून नवीन कोंब बाहेर पडतो. यालाच Seasonal Emergence म्हणजे ऋतूनुसार होणारं प्रकटीकरण असं म्हणतात. मुळात, या वनस्पतीचं संपूर्ण जीवनचक्रच पावसावर अवलंबून असतं.

Curcuma Aromatica रानहळद
रानहळद (Image- Wikimedia commons)

फुलोऱ्या आत उमले फूल

रानहळदीची पानं साधी, लांबट आणि हिरवीगार असतात. पण तिचं खरं सौंदर्य तिच्या फुलोऱ्यात दिसतं. हा फुलोरा अनेकदा पानांच्या आधीच जमिनीच्या जवळ नजरेस येतो. त्यात असलेले रंगीत ब्रॅक्ट्स (Bracts) असतात, ज्यांना आपण फूल समजतो, ती प्रत्यक्षात रूपांतरित पानं असतात. खरं फूल या ब्रॅक्ट्सच्या आत दडलेलं असतं. हे तिचं महत्त्वाचं वनस्पतीशास्त्रीय वैशिष्ट्य ठरतं. ही रचना परागीभवनासाठी (Pollination) अत्यंत उपयुक्त असते. रंगीत ब्रॅक्ट्स कीटकांना आकर्षित करतात आणि त्या माध्यमातून वनस्पतीची पुनरुत्पत्ती (Reproduction) घडते. म्हणजेच, निसर्गातलं सौंदर्य हे केवळ दिसण्यासाठी नसतं; त्यामागे एक ठोस कार्यकारणभावही
दडलेला असतो.

त्वचेच्या आरोग्याची रक्षक

रानहळदीच्या काही प्रजातींच्या कंदांमध्ये Curcumin सारखे जैविक घटक आढळतात. विशेषतः कस्तुरी हळद (Curcuma aromatica) त्वचेसाठी उपयुक्त मानली जाते. ती त्वचेचा रंग सुधारण्यासाठी, मुरुम कमी करण्यासाठी आणि त्वचेचं आरोग्य टिकवण्यासाठी पारंपरिक पद्धतीने वापरली जाते. तिच्यामध्ये दाह-विरोधी (Anti- inflammatory), जिवाणू-विरोधी (Antibacterial) आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म
आढळतात. उटणं, फेस पॅक, बॉडी स्क्रब आणि नैसर्गिक औषधांमध्ये तिचा वापर केला जातो.

हे प्रतीक कशाचं?

धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं, तर “गौरीचे हात” ही केवळ वनस्पती राहात नाही; ती एक प्रतीक ठरते. आपण गौरीला समृद्धी, पावित्र्य आणि मातृत्वाचं रूप मानतो. पावसाळ्यात कोरड्या जमिनीतून नवजीवन फुलणं आपल्याला शक्तीची जाणीव करून देतं. गावाकडे अजूनही रानहळदीच्या या फुलांचा गौरीपूजेत वापर केला जातो. यामागे निसर्ग आणि दैवत्व यांना वेगळं न पाहण्याचा एक खोल विचार आहे. जे निसर्गात आहे, तेच दैवी आहे, ही त्यामागची भावना आहे.

रानहळदीवर माणसाचाच घाला

मात्र आता रानहळदीला आधार देणारी जंगलं कमी नष्ट केली जात आहेत, माळरानं नाहीशी होत आहेत. विशेषतः ही पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ वनस्पती आहे. तिचा अधिवास मर्यादित असूनही तिच्या अस्तित्वाचं मोल विसरलं जातंय. फूल समजून वनस्पतीच्या पुनरुत्पादनासाठी महत्त्वाचा असलेला फुलोरा खुडला जातोय. विकासाच्या नावाखाली निसर्गाचं संतुलन बिघडवण्याचं चुकीचं काम आपण करत आहोत. गेल्या काही वर्षांत “गौरीचे हात” या फुलोऱ्यांची मोठ्या प्रमाणावर तोड झालेली आहे. एकेकाळी सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यांवर आणि पठारांवर गुलाबी रंगाची उधळण करणारी ही वनस्पती आता अनेक ठिकाणी विरळ होत चालली आहे.

संवर्धन का महत्त्वाचं ?

रानहळदीच्या बाबतीत बोलायचं तर, श्रद्धा आणि संवर्धन यांचा समतोल राखणं ही काळाची गरज आहे. देवाला अर्पण करण्यासाठी असलेली निसर्गाची एखादी दुर्मीळ देणगीच नष्ट होऊ लागली, तर त्या कृतीचा पुनर्विचार व्हायला हवा आहे. निसर्गाचं रक्षण हेच खऱ्या अर्थाने दैवत्वाचा सन्मान करणं आहे. “गौरीचे हात” ही वनस्पती सौंदर्य, विज्ञान, संस्कृती आणि श्रद्धा यांचा अनोखा संगम आहे. कदाचित म्हणूनच निसर्गात बहरणारी प्रत्येक गोष्ट क्षणभंगुर असली, तरी तिचं महत्त्व चिरंतन असतं, याचीच जणू ही फुलं आपल्याला आठवण करून देत असतात.

हीच खरी श्रद्धा

पुढच्या वेळी एखाद्या डोंगरमाथ्यावर उमललेले “गौरीचे हात” दिसले, तर त्यांना तोडण्याऐवजी त्यांचं सौंदर्य डोळ्यात साठवून घ्या. कारण त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात जपणं हीच खरी पूजा आणि खरी श्रद्धा आहे.