देवदत्त पोखरकर, वनस्पतीतज्ज्ञ
What Are Carnivorous Plants?: निसर्ग हा विविधतेने नटलेला आहे. आपण सामान्यतः वनस्पतींना ‘स्वयंपोषी’ शांत आणि स्थिर सजीव मानतो, हे सजीव सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. परंतु, याच निसर्गात काही अशा विलक्षण वनस्पती आहेत, ज्यांनी जगण्यासाठी चक्क ‘शिकार’ करण्याचा मार्ग निवडला आहे. कीटक, लहान बेडूक आणि गोगलगायींना फस्त करणाऱ्या या वनस्पतींना मांसाहारी किंवा कीटकभक्षी (Carnivorous Plants) वनस्पती म्हणतात. निसर्गात कोणताही बदल कारणाशिवाय घडत नाही. या वनस्पती प्रामुख्याने डोंगररांगा, दलदलीचे प्रदेश आणि अतिवृष्टीच्या भागात आढळतात. अतिवृष्टीमुळे जमिनीतील नायट्रोजन, फॉस्फरस आणि महत्त्वाची खनिजे वाहून जातात. वनस्पतींना प्रथिनांच्या निर्मितीसाठी नायट्रोजनची नितांत गरज असते. जमिनीतून तो मिळेनासा झाल्यावर या वनस्पतींनी तो कीटकांच्या शरीरातून मिळवण्याची क्षमता विकसित केली. या वनस्पती इतर झाडांप्रमाणे प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis) करतातच, पण कीटक हे त्यांच्यासाठी ‘मल्टिव्हिटॅमिन’सारखे काम करतात.

मांसाहारी वनस्पती आपल्या शिकारीला पकडण्यासाठी विविध प्रकारच्या सापळ्यांचा वापर करतात:

  • पिटफॉल ट्रॅप (Pitfall Trap): पानांचा आकार कलशासारखा (घटासारखा) असतो. त्याच्या तळाशी पाचक रस असतो. (उदा. घटपर्णी)
  • फ्लायपेपर ट्रॅप (Flypaper Trap): पानांवर केसांसारख्या ग्रंथी असतात त्यातून अत्यंत चिकट द्रव (Mucilage) बाहेर पडतो. (उदा. ड्रॉसेरा)
  • स्नॅप ट्रॅप (Snap Trap): कीटक बसताच पानांची दोन दले झटक्यात बंद होतात. (उदा. व्हीनस फ्लायट्रॅप)
  • ब्लॅडर ट्रॅप (Bladder Trap): पाण्यात वाढणाऱ्या या वनस्पतींकडे सूक्ष्म पिशव्या असतात, ज्या व्हॅक्यूम क्लीनरप्रमाणे कीटकांना आत ओढतात. (उदा. युट्रिक्युलॅरिया)
  • लॉबस्टर-पॉट ट्रॅप (Lobster-pot Trap): कीटकांना एका विशिष्ट बोगद्यात ओढले जाते, जिथून त्यांना बाहेर पडणे अशक्य असते. (उदा. जेनलिसिया) जेव्हा एखादा कीटक सापळ्यात अडकतो, तेव्हा वनस्पतींच्या ग्रंथींमधून पाचक रस (Digestive Enzymes) स्त्रवला जातो. यामध्ये पेप्सिन (Pepsin) सारखी विकरे असतात जी कीटकाच्या शरीरातील प्रथिनांचे विघटन करतात. हे विघटन होऊन तयार झालेली नायट्रोजनयुक्त संयुगे वनस्पती शोषून घेतात. ही प्रक्रिया एखाद्या प्राण्याने अन्न पचवण्यासारखीच असते.

जगात या वनस्पतींच्या सुमारे ६२५ प्रजाती आहेत, त्यापैकी ५० भारतात आढळतात.

भारतातील प्रमुख मांसाहारी वनस्पती:

१. नेपेंथीस खासियाना (Nepenthes khasiana) – ‘मेघालयाचा कलश’ / कलशपर्णी/ घटपर्णी

  • ही भारतातील एकमेव ‘पिचर प्लांट’ (घटपर्णी) प्रजाती आहे. ही वनस्पती केवळ मेघालयातील खासी, जैंतिया आणि गारो टेकड्यांच्या विशिष्ट भागातच आढळते.
  • रचना: या वनस्पतीचे पान एका कलशाच्या आकारात रूपांतरित झालेले असते. या कलशावर एक नैसर्गिक ‘झाकण’ असते. अनेकांना वाटते की, हे झाकण शिकार पकडण्यासाठी बंद होते, पण प्रत्यक्षात ते पावसाचे पाणी कलशात जाऊन पाचक रस पातळ होऊ नये म्हणून असते.
  • शिकार करण्याची पद्धत: कलशाच्या तोंडाशी अत्यंत सुवासिक मकरंद (Nectar) असतो. कीटक याच्या मोहाने तिथे येतात आणि निसरड्या कडांमुळे थेट आत पडतात. कलशाच्या तळाशी असलेल्या पाचक द्रवात बुडून त्यांचा मृत्यू होतो.
  • संवर्धन स्थिती: स्थानिक भाषेत हिला ‘मेमंग-कोकसी’ (भूताची टोपली) म्हणतात. अति-संकलन आणि अधिवास नष्ट झाल्यामुळे ही वनस्पती आता ‘लुप्तप्राय’ (Endangered) श्रेणीत आहे.
Nepenthes khasiana
Nepenthes khasiana

२. ड्रॉसेरा (Drosera)- ‘विखारी दवबिंदू / दवपूर्णी

  • महाराष्ट्रातील पश्चिम घाटात, विशेषतः सातारा जिल्ह्यातील कास पठारावर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात या वनस्पतींचे राज्य असते.
  • प्रजातींचे वैविध्य:
    • दवबिंदू (Drosera indica): ही वनस्पती दिसायला गवतासारखी असते. हिची पाने लांब तंतूंसारखी असून त्यावर चिकट बिंदू असतात.
    • ड्रॉसेरा बर्मानी (Drosera burmannii): ही वनस्पती जमिनीला घट्ट पकडून एका चक्राकार (Rosette) आकारात वाढते. लालसर रंगाची ही वनस्पती एखाद्या लहान फुलासारखी दिसते.
  • शिकार करण्याची पद्धत: यांच्या पानांवर केसांसारख्या ग्रंथी असतात, ज्यांच्या टोकावर डिंकासारखा चिकट द्रव असतो. सूर्यप्रकाशात हे थेंब हिऱ्यासारखे चमकतात, ज्याला कीटक दवबिंदू समजून बसतात. एकदा कीटक चिटकला की, हे ‘केस’ हळूहळू आत वळतात आणि कीटकाला चारी बाजूंनी जखडून टाकतात.
Drosera
Drosera

३. युट्रिक्युलॅरिया (Utricularia)- पापणी/ सीतेची आसवे -‘निळा गालिचा आणि सूक्ष्म शिकार’

कास पठारावर दिसणारा जो विलोभनीय निळ्या फुलांचा गालिचा पर्यटकांना भुरळ घालतो, तो म्हणजे ‘सीतेची आसवे’ (Utricularia purpurascens). दिसायला अत्यंत नाजूक असणारी ही वनस्पती प्रत्यक्षात एक कुशल शिकारी आहे.
सूक्ष्म शिकारी: युट्रिक्युलॅरियाची शिकार करण्याची यंत्रणा जमिनीच्या खाली किंवा पाण्याखाली असते. यांच्या मुळांजवळ अत्यंत लहान ‘ब्लॅडर्स’ (Bladders) किंवा पिशव्या असतात.

Utricularia
Utricularia


व्हॅक्यूम टेक्नॉलॉजी: या पिशव्यांच्या तोंडावर काही संवेदी केस असतात. पाण्यात पोहणारा छोटा कीटक किंवा अळी या केसाला स्पर्श करताच पिशवीचे तोंड उघडते. पिशवीत असलेल्या निर्वात पोकळीमुळे आजूबाजूचे पाणी आणि तो कीटक वेगाने (एका सेकंदाच्या हजारव्या भागात) आत ओढला जातो.
विस्मयकारक तथ्य: ही वनस्पती इतकी वेगाने शिकार करते की, ती उघड्या डोळ्यांनी पाहणे अशक्य असते. कास पठारावरील ही निळी फुले म्हणजे या वनस्पतींच्या पुनरुत्पादनाचा भाग आहेत, तर त्यांचे मुख्य ‘कार्य’ जमिनीखालील ओलसर भागात सुरू असते.

मांसाहारी वनस्पतीचे उपयोग:

  • नैसर्गिक कीटक नियंत्रण: माश्या, डास आणि कोळी यांचा नायनाट करून घरातील कीड कमी करतात.
  • हवा शुद्धीकरण: हवेतील विषारी घटक शोषून ऑक्सिजनची पातळी वाढवतात.
  • औषधी गुणधर्म: दवबिंदू (Drosera sp) सारख्या वनस्पतींचा वापर पारंपारिक औषधांमध्ये केला जातो.
  • शोभेची वनस्पती: त्यांच्या आगळ्यावेगळ्या रूपामुळे त्या बागेचे सौंदर्य वाढवतात.
  • अभ्यास व संशोधन: उत्क्रांती आणि नैसर्गिक अनुकूलन शिकण्यासाठी या वनस्पती महत्त्वाच्या आहेत.

धोके व संवर्धन:

आज प्रदूषण, शहरीकरण आणि पर्यटनामुळे या वनस्पतींचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. विशेषतः मेघालयातील घटपर्णी आता दुर्मिळ होत चालली आहे. मांसाहारी वनस्पती हे निसर्गाच्या अनुकूलन क्षमतेचे (Adaptation) उत्तम उदाहरण आहेत. या अद्भुत वनस्पतींचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.