Indias chip based E passports भारताबाहेर प्रवास करायचा असल्यास प्रत्येकाला पासपोर्टची आवश्यकता असते. पासपोर्ट तयार करण्याची प्रक्रिया थोडी लांबलचक आणि किचकट असते. मात्र, आता भारतात ई-पासपोर्ट सेवा लाँच करण्यात आली असून ही प्रक्रिया आणि भारतीयांचा विदेशातील प्रवास आणखी सोपा होणार आहे. प्रवाशांची ओळख सुरक्षित राहण्यासाठी आणि पासपोर्टचा गैरवापर होऊ नये म्हणून सरकारने ई-पासपोर्ट सेवा सुरू केली आहे, त्यामुळे आता ई-पासपोर्ट कागदी पासपोर्टची जागा घेणार आहे.

हे नवीन पासपोर्ट सेवा कार्यक्रम २.० अंतर्गत पायलट प्रोग्रामचा भाग आहेत. हा कार्यक्रम १ एप्रिल २०२४ रोजी अधिकृतपणे सुरू करण्यात आला, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. ई-पासपोर्ट सध्या देशभरातील निवडक शहरांमध्ये जारी केले जात आहेत. येत्या काही महिन्यांत संपूर्ण देशभरात ई-पासपोर्ट दिले जाणार आहेत. ई-पासपोर्ट म्हणजे काय? ते महत्त्वाचे का आहे? त्याचा फायदा भारतीयांना कसा होणार? त्याविषयी जाणून घेऊयात.

ई-पासपोर्ट म्हणजे काय?

ई-पासपोर्ट एका अँटेना आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) चिपसह येतात. हे पासपोर्ट कागदी आणि इलेक्ट्रॉनिक पासपोर्टचा एक एकत्रित प्रकार आहे, जे एका विशेष इनलेमध्ये एकत्रित केले जातात. पासपोर्टवरील चिपमध्ये पासपोर्टधारकाची वैयक्तिक आणि बायोमेट्रिक माहिती असते. या चिपमध्ये प्रवाशाचा बायोमेट्रिक आणि वैयक्तिक डेटा सुरक्षितपणे संग्रहित करतात. त्यामध्ये चेहऱ्याचे फोटो, बोटांचे ठसे, नाव, जन्मतारीख आणि पासपोर्ट क्रमांक यांचा समावेश असतो. ही सर्व माहिती एन्क्रिप्टेड असून बेसिक अॅक्सेस कंट्रोल (बीएसी), पॅसिव्ह ऑथेंटिकेशन (पीए) आणि एक्स्टेंडेड अॅक्सेस कंट्रोल (ईएसी)सारख्या जागतिक सुरक्षा प्रोटोकॉलद्वारे संरक्षित आहे, त्यामुळे पासपोर्टचा चुकीचा वापर करणे किंवा त्याबरोबर छेडछाड करणे, ज्यामुळे डेटामध्ये छेडछाड करणे कठीण होते. कोणता पासपोर्ट पारंपरिक आणि कोणता पासपोर्ट हा बायोमेट्रिक आहे, हे शोधणे फार सोपे आहे. ई-पासपोर्टवर छापलेले एक विशिष्ट सोनेरी रंगाचे चिन्ह आहे, जे त्याला पारंपरिक पासपोर्टपेक्षा वेगळे करते.

(छायाचित्र-फायनान्शियल एक्सप्रेस)

ई-पासपोर्टचा फायदा काय?

बायोमेट्रिक ई-पासपोर्ट अत्यंत सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यातील डिजिटल स्वाक्षरी आणि एन्क्रिप्शनमुळे डेटामध्ये कोणतीही अदलाबदल होणे किंवा छेडछाड करणे शक्य नाही. रिअलटाइम ओळख प्रमाणीकरण सक्षम करणाऱ्या एम्बेडेड चिप असणाऱ्या या ई-गेट्सवर स्वयंचलित, संपर्करहित इमिग्रेशन तपासणीची सोय मिळते, त्यामुळे रांगेत अडकून राहावे लागणार नाही. क्लिअरन्स लवकर होईल आणि प्रवाशांनाही अधिक सोयीस्कर अनुभव मिळेल.

पासपोर्ट डेटा संरक्षणातही यामुळे अनेक सुधारणा होतील. जसे की, सीमा तपासणीदरम्यान बनावट पासपोर्टच्या घटनांची शक्यता कमी होईल. तसेच या तंत्रज्ञानामुळे भारत आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO) मानकांशी जुळवून घेत आहे. कारण अशा सुविधा अनेक देश आपल्या नागरिकांना देऊ करत आहे. आतापर्यंत अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, ब्राझील, फ्रान्स, इटली आणि जपानसह १२० हून अधिक देशांनी चिप-आधारित बायोमेट्रिक पासपोर्ट आणले आहेत आणि भारत आता अधिकृतपणे त्यात सामील होत आहे.

कोणती पासपोर्ट सेवा केंद्रे ई-पासपोर्ट देत आहेत?

भारतात पहिल्या टप्प्यात १३ शहरांमध्ये ई-पासपोर्ट जारी केले जात आहेत. या शहरांमध्ये नागपूर, भुवनेश्वर, जम्मू, गोवा, शिमला, रायपूर, अमृतसर, जयपूर, चेन्नई, हैदराबाद, सुरत, रांची आणि दिल्ली या शहरांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली आहे की, ही केवळ एक सुरुवात आहे. २०२५ च्या मध्यापर्यंत देशभरातील सर्व पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये ही प्रक्रिया विस्तारण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ असा की, देशभरातील सर्वच केंद्रांवर लवकरच ई-पासपोर्ट मिळतील. तामिळनाडूमध्ये अधिकृतपणे ही प्रक्रिया ३ मार्च २०२५ रोजी सुरू झाली, चेन्नईतील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयातदेखील ई-पासपोर्ट जारी केले गेले. मुख्य म्हणजे, २२ मार्चपर्यंत राज्यात २०,७२९ ई-पासपोर्ट जारी करण्यात आले.

ई-पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा?

ई-पासपोर्टसाठी अर्ज करणे अतिशय सोपे आहे. नियमित पासपोर्टप्रमाणेच ई-पासपोर्टसाठीदेखील अर्ज करावा लागतो. अर्जाची प्रक्रिया जवळ-जवळ सारखीच आहे. सर्वात आधी पासपोर्ट सेवा पोर्टलला भेट द्या आणि आवश्यक माहिती भरा, त्यासाठी लागणारा शुल्क भरा आणि तुमच्या जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) किंवा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (पीओपीएसके) येथे अपॉइंटमेंट बुक करा. तुमच्या अपॉइंटमेंटदरम्यान, तुमचा फोटो आणि बोटांचे ठसे यांसारखा बायोमेट्रिक डेटा गोळा केला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्व ई-पासपोर्ट नाशिकमधील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये छापले जातात आणि त्यात चिप्स बसवल्या जातात. यातून हे सुनिश्चित होते की, उत्पादन प्रक्रिया देशाच्या आत व्यवस्थापित केली जाते आणि मेक इन इंडिया उपक्रमाला पाठिंबाही मिळतो. हेदेखील लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, सर्वांकडे ई-पासपोर्ट असावाच हे महत्त्वाचे नाही. विद्यमान पासपोर्ट त्यांच्या मुदतीपर्यंत वैध राहतील.