Cancer prevention पूर्वी कर्करोग (कॅन्सर) वयोवृद्धांमध्ये आढळायाचा. मात्र, आता हा आजार तरुणाईलाही गाठतोय. कर्करोग म्हटलं की, जनजागृती, प्रतिबंध व वेळेत निदान यांवर विशेष भर दिला जातो. सार्वजनिक मोहिमांद्वारे जीवनशैलीतील बदल आणि नियमित तपासणीचे महत्त्वही सांगितले जाते. मात्र, डॉक्टर कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी स्वतःचे रक्षण कसे करतात, हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

कर्करोग किती शांतपणे शरीरात पाय पसरतो, हे डॉक्टरांनी जवळून पाहिलेले असते. त्यामुळेच ते टाळता येण्याजोगा धोका शक्य तितका कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. अहमदाबादच्या नारायणा हॉस्पिटल येथील कन्सल्टंट हेमॅटोलॉजिस्ट डॉक्टर आभा दुबे आणि मुंबई येथील नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल येथील कन्सल्टंट–पेडियाट्रिक ऑन्कोलॉजी, हेमॅटो-ऑन्कोलॉजी व बीएमटी डॉक्टर क्रिती हेगडे यांनी स्वतः कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी त्या कोणत्या सवयी अवलंबतात आणि कोणती खबरदारी घेतात, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे

‘फर्स्टपोस्ट’शी बोलताना डॉ. दुबे यांनी झोपेच्या महत्त्वावर भर दिला. त्या म्हणतात, “आजाराला रोखण्यासाठी रोजच्या सवयीत बदल करणे महत्त्वाचे आहे. कामाचा दिवस कितीही व्यापाचा असला तरी हालचाल किंवा व्यायाम हा नित्यक्रमाचा भाग असावा. कामाचे तास जास्त आहेत म्हणून विश्रांतीची गरज संपत नाही.” दुसरीकडे डॉ. हेगडे म्हणतात, “डॉक्टर जीवनशैलीत अचानक मोठे बदल करण्यापेक्षा रोजच्या छोट्या सवयींना जास्त महत्त्व देतात. रुग्णालयातील शिफ्टमुळे हे आव्हानात्मक असते; पण अशक्य नाही,” असे त्या सांगतात.

छोट्या बदलांचे महत्त्व

डॉ. हेगडे सांगतात की, लहान गोष्टी मोठे बदल घडवतात. “शक्य असेल तिथे बसण्याऐवजी उभे राहणे, जवळच्या अंतरासाठी गाडीऐवजी चालत जाणे आणि वारंवार झोपेशी तडजोड न करणे महत्त्वाचे आहे. झोप कमी घेणे ही काही अभिमानास्पद बाब नाही. त्यामुळे शरीराची स्वतःची दुरुस्ती करण्याची क्षमता कमी होते, हे लक्षात घेतले पाहिजे.”

सकस आहार आणि त्याचे परिणाम

डॉक्टरांनाही चटपटीत खाण्याची इच्छा होते; पण आहाराशी संबंधित कर्करोग जवळून पाहिल्यामुळे त्यांचा अन्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन सजग असतो. डॉक्टरांच्या आहारात संतुलन आणि सातत्य असते. डॉ. हेगडे पुढे, “आम्हाला याची जाणीव असते की, आपण अधूनमधून काय खातो यापेक्षा रोज काय खातो याला जास्त महत्त्व आहे. जेवणाला आपण चांगले किंवा वाईट म्हणत नाही, तर विचारपूर्वक निर्णय घेतो. जसे की पॅकेज्ड आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ कमीत कमी खाणे, घाईघाईत न जेवता सावकाश जेवणे, आहारात फळे, भाज्या व घरच्या जेवणाचा समावेश करणे आणि मद्यापान टाळणे महत्त्वाचे आहे,” असेही सांगतात.

नियमित तपासणी

डॉ. हेगडे यांच्या मते, “डॉक्टरांना माहीत असते की, अनेक प्रकारचे कर्करोग कोणत्याही वेदनेशिवाय किंवा इशाऱ्याशिवाय शांतपणे शरीरात पसरतात.” त्या पुढे म्हणतात, “मॅमोग्राम, गर्भाशयाच्या मुखाची तपासणी, कोलोनोस्कोपी, तोंडाची तपासणी आम्ही नियमितपणे करून घेतो. कधीकधी कामामुळे या गोष्टी करणे कठीण होते, पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात नाही. हाच आग्रह आम्ही आमच्या कुटुंबातील सदस्यांकडेही करतो.”

लक्षणांकडे दुर्लक्ष धोक्याचे

डॉ. हेगडे स्पष्टपणे सांगतात की, अनेक रुग्ण आपल्या शरीरातील बदलांकडे दुर्लक्ष करतात. ‘मला वाटलं आपोआप बरं होईल,’ अशी त्यांची भावना असते. हे डॉक्टरांनी वारंवार ऐकलेले असते. त्यामुळे ते स्वतःच्या शरीरातील बदलांकडे दुर्लक्ष करत नाहीत. दीर्घकाळ खोकला, विनाकारण थकवा, रक्तस्राव किंवा न जाणारी गाठ या गोष्टींकडे ते गांभीर्याने घेतात. “लक्षणे दिसली की, घाबरून न जाता त्याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. आयुष्य कितीही व्यग्र आणि जबाबदाऱ्यांचे ओझे असले तरी शरीर जे सांगतेय ते ऐकणे गरजेचे आहे,” असे त्या सांगतात.

तणावाकडे दुर्लक्षही धोक्याचे

तणाव ही आज अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र, दीर्घकाळ तणाव राहिल्यास शरीराचे काय नुकसान होते याची डॉक्टरांना पूर्ण कल्पना असते. “दीर्घकालीन तणावाचा संबंध इन्फ्लमेशन, हार्मोनल असंतुलन, अपुरी झोप व कमकुवत प्रतिकारशक्ती यांच्याशी असतो,” असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यांच्या मते, रोजचा हलका व्यायाम किंवा वीकेंडला एखादा छंद जोपासणे या गोष्टी चैनीच्या नसून, त्या संरक्षण प्रदान करणाऱ्या ठरू शकतात.

वैद्यकीय क्षेत्रातून मिळणारा सर्वांत कठीण धडा म्हणजे सर्वच प्रकारचे कर्करोग टाळता येत नाहीत. आनुवंशिकता, पर्यावरण आदींची त्यात भूमिका मोठी असते. डॉ. हेगडे सांगतात, “डॉक्टर रोज या वास्तवाबरोबर जगतात; पण वास्तव स्वीकारणे म्हणजे हतबल होणे नव्हे, तर अधिक सजग होणे होय.” एकूणच डॉक्टर स्वतःचे शरीर, वेळ आणि छोटे निर्णय यांकडे लक्ष देतात.