What does my poop type mean: आपण दिवसभरात काय खातो, किती पाणी पितो, किती वेळ व्यायाम करतो यावर आपल्या पूर्ण शरीराचं व्यवस्थापन अवलंबित असतं. स्मार्टवॉचवर १० हजार पावलं मोजणारे आपण, स्वतःच्या शरीराने रोज सकाळी दिलेला बायो-फीडबॅक मात्र एका सेकंदात फ्लश करून टाकतो! सकाळी पोट व्यवस्थित साफ झालं की अख्खा दिवस कसा हलका आणि प्रसन्न जातो, हे वेगळं सांगायची काही गरज नाही. पण, तेच जर सकाळी घाईगडबडीच्या वेळेत टॉयलेटमध्ये १० मिनिटांच्या वर बसून राहावं लागलं तर दिवसभर होणारी चिडचिड ठरलेली! तुमचं शरीर दररोज सकाळी एक मोफत ‘हेल्थ रिपोर्ट’ तयार करत असतं आणि ती असते तुमची विष्ठा. तुमचं शरीर किती तंदुरुस्त आहे हे ओळखण्यासाठी जगभरातील डॉक्टर्स एका अत्यंत अचूक साधनाचा आधार घेतात, ते म्हणजे ‘ब्रिस्टल स्टूल चार्ट’ (bristol stool chart).

ब्रिस्टल स्टूल चार्ट म्हणजे नेमकं काय?

१९९७ मध्ये ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टलचे संशोधक डॉ. स्टीफन जे. लुईस आणि डॉ. केनेथ डब्ल्यू. हिटन यांनी हा चार्ट विकसित केला. या अभ्यासामागील वैज्ञानिक आधार स्पष्ट करताना या संशोधकांनी नमूद केलं होतं की, “विष्ठेचा आकार आणि पोत हे अन्न पचनसंस्थेत किती काळ थांबतं (Intestinal Transit Time) याचं थेट मोजमाप असतं. विष्ठेची घनता आतड्यांची हालचाल आणि रुग्णाचा आहार अचूकपणे दर्शवते.”

अन्न मोठ्या आतड्यातून किती वेगाने किंवा किती संथ गतीने पुढे सरकतं, यावरून विष्ठेचा आकार आणि प्रकार ठरतो. अन्न आतड्यात जितक्या वेळ थांबेल, तितके त्यातील पाणी आतडे शोषून घेतात आणि विष्ठा कडक होते, त्यामुळे अनेकदा आपल्याला जर विष्ठा होत नसेल किंवा कडक होत असेल तर भरपूर पाणी प्यायला सांगितलं जातं.

या चार्टमध्ये विष्ठेचे ७ प्रकार सांगितले आहेत:

बद्धकोष्ठता आणि संथ पचनक्रिया

  • प्रकार १ : सुटे, कडक खडे हे तीव्र बद्धकोष्ठतेचं (Severe Constipation) लक्षण आहे. हे खडे बाहेर टाकताना खूप जोर लावावा लागतो आणि वेदना होतात. याचा अर्थ अन्न आतड्यांमध्ये गरजेपेक्षा खूप जास्त वेळ अडकून पडलं होतं.
  • प्रकार २ : एकमेकांना चिकटलेल्या सुक्या खड्यांचा खडबडीत, जाडसर गोळा. हे देखील बद्धकोष्ठतेचं लक्षण आहे. शरीरात पाण्याची कमतरता आणि आहारात फायबरचा अभाव असल्यावर असा प्रकार दिसून येतो.

सुदृढ पचनाचा ‘गोल्डन स्टँडर्ड’

  • प्रकार ३ : हलके तडे गेलेल्या पिकलेल्या केळ्यासारखी विष्ठा असते. हे सामान्य आणि निरोगी पचनाचं लक्षण आहे. अशी विष्ठा शरीराबाहेर टाकताना त्रास होत नाही.
  • प्रकार ४ : गुळगुळीत, मऊ, सापासारखी किंवा केळ्यासारखी विष्ठा. हा पचनसंस्थेचा सर्वांत आदर्श प्रकार मानला जातो. पोटाची हालचाल अगदी योग्य गतीने सुरू आहे आणि शरीरात पाण्याचं संतुलन उत्तम आहे, हे यावरून स्पष्ट होतं.

अतिसार आणि वेगवान पचन

  • प्रकार ५ : मऊ भाताच्या गोळ्यासारखे पण कडा स्पष्ट असलेली विष्ठा. हे पचन काहीसं जलद गतीने होत असल्याचं दर्शवतं. सहसा आहारात विद्रव्य फायबर (Soluble Fiber) कमी असल्यास किंवा दिवसातून २-३ वेळा पोट साफ होत असल्यास असा प्रकार दिसू शकतो.
  • प्रकार ६ : पातळ, विस्कळीत, दलदलीसारखे तुकडे हा सौम्य अतिसाराचा (Mild Diarrhea) प्रकार आहे. आतड्यांमध्ये जळजळ, अपचन किंवा एखाद्या अन्नाची ॲलर्जी यामुळे पचनसंस्थेने पाणी व्यवस्थित शोषून घेतलेलं नसतं.
  • प्रकार ७ : पूर्णपणे पाण्यासारखा पातळ द्रव. हा तीव्र जुलाब/अतिसार आहे. अन्न किंवा पाण्याचा संसर्ग (Infection), विषबाधा किंवा गंभीर पचनविकारांमुळे असं घडतं. यामध्ये शरीरातील पाणी वेगाने कमी होतं.
ब्रिस्टल स्टूल चार्ट: विष्ठेचे १ ते ७ प्रकार आणि त्यांचे स्वरूप दर्शवणारी वैद्यकीय मार्गदर्शिका

विष्ठा जास्त वेळ पोटात राहणं योग्य आहे का?

नाही, विष्ठा जास्त वेळ पोटात राहिली तर घातक ठरू शकते. काही लोक पोट साफ न होण्याची समस्या हलक्यात घेतात. पण पोटामध्ये विष्ठा साचून राहणं संपूर्ण शरीरासाठी विषारी ठरू शकते. क्लीव्हलँड क्लिनिकच्या प्रख्यात गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. ख्रिस्टीन ली (Dr. Christine Lee) याविषयी हेल्थ एसेन्शियल्स या पॉडकास्ट वर बोलत असताना अत्यंत स्पष्ट इशारा देतात:

“पोटात मलमूत्र साचून राहणं कोणाच्याच आरोग्यासाठी चांगलं नसतं. यामुळे बद्धकोष्ठता, आतड्यांना सूज येणे (Diverticular issues) आणि हानिकारक बॅक्टेरियाची अनियंत्रित वाढ होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. शरीराने तयार केलेला टाकाऊ कचरा वेळेवर बाहेर पडणेच गरजेचे आहे. आतड्यांचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि आहारात चोथायुक्त (High-Fiber) पदार्थांचा समावेश करणे हीच खरी गुरुकिल्ली आहे.”

डॉक्टर्स या चार्टचा वापर कसा करतात?

डॉक्टरांना आपण आपल्या विष्ठेच्या स्वरूपाचं वर्णन करणं बहुतेकांची संकोचाची बाब असते. ब्रिस्टल स्टूल चार्टमुळे रुग्ण फक्त त्या प्रकाराकडे बोट दाखवून डॉक्टरांना खरी स्थिती समजावून सांगू शकतात. याशिवाय, आयबीएस (Irritable Bowel Syndrome – IBS) चे नेमके निदान करण्यासाठी हा चार्ट अत्यंत उपयुक्त ठरतो:

  • IBS-C (Constipation): रुग्णाला सातत्याने प्रकार १ आणि २ चा त्रास होतो.
  • IBS-D (Diarrhea): रुग्णाला वारंवार प्रकार ६ आणि ७ ची समस्या जाणवते.
  • IBS-M (Mixed): कधी बद्धकोष्ठता तर कधी अचानक जुलाब अशी दोन्ही लक्षणे आलटून-पालटून दिसतात.

पचनक्रिया पुन्हा रूळावर आणण्यासाठी काय करावे?

कडक विष्ठा (प्रकार १ आणि २) असल्यास:

  • पाण्याचं प्रमाण वाढवा (दिवसाला किमान २.५ ते ३ लिटर पाणी).
  • आहारात हिरव्या पालेभाज्या, फळं, ओट्स, चिया सीड्स आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा (जे अन्न पचायला सोपं आहे ते खावं)
  • एकाच जागी तासनतास बसणं टाळा; रोज किमान ३० मिनिटं वेगाने चाला.

पातळ विष्ठा (प्रकार ५, ६ आणि ७) असल्यास:

  • अतिमसालेदार, तेलकट आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळा.
  • ओआरएस (ORS), ताक किंवा नारळ पाणी प्या, जेणेकरून शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकेल.
  • ताणतणाव कमी करा, कारण मानसिक ताणाचा आतड्यांच्या हालचालींवर थेट परिणाम होतो.

धोक्याची घंटा : डॉक्टरांना कधी दाखवावं?

एखाद्या दिवशी खाण्यात बदल झाल्यामुळे विष्ठेचा प्रकार बदलणं अगदी साधारण गोष्ट आहे. पण, जर खालील लक्षणं दिसत असतील तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • मलप्रवृत्तीत सतत २ ते ३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ अनियमितता राहणं.
  • विष्ठेतून रक्त पडणं किंवा विष्ठेचा रंग डांबरासारखा काळा दिसणं.
  • अचानक आणि विनाकारण वजन घटणं.
  • रात्री झोपेत पोटदुखीमुळे किंवा शौचास जाण्यासाठी जाग येणं.

आपले शरीर आतल्या आत कसं काम करत आहे याची पूर्वसूचना देणारी विष्ठा ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, त्यामुळे संकोच बाजूला ठेवून स्वतःच्या पोटाच्या आरोग्याकडे लक्ष देणं ही निरोगी आयुष्याची पहिली पायरी आहे.

विष्ठेच्या वेळेबाबतीत असलेला गैरसमज:

जर तुम्हाला रोज दिवसातून दोन वेळा शौच होत असेल तर त्यात काही घाबरण्याचं कारण नाही. प्रत्येकाचं शरीर वेगळ्या पद्धतीने काम करत असतं. काहीजणांच्या बाबतीत त्यांची पचनसंस्था (metabolism) उत्तम असल्याकारणाने दिवसातून दोनदा शौचाला जायला लागणं यात काही गैर नाही!