scorecardresearch

विश्लेषण : द्रमुक ‘सूर्य’ तळपला, भाजपचा उगवला! काय सांगतात तमिळनाडू पालिका निकाल?

– संतोष प्रधान तमिळनाडूत झालेल्या महानगरपालिका, नगरपालिका आणि पंचायत निवडणुकांमध्ये राज्यातील सत्ताधारी द्रमुक पक्षाने घवघवीत यश मिळविले. नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकने राज्याची सत्ता हस्तगत केली होती. यापाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये द्रमुकचा ‘उगवता सूर्य’ (निवडणूक चिन्ह) तळपला आहे. या यशाने मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन हे राजकीयदृष्ट्या अधिक मजबूत झाले. सर्व २१ महानगरपालिकांमध्ये द्रमुकला […]

Tamil Nadu Urban Local Body Election Results
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये द्रमुकचा ‘उगवता सूर्य’ (निवडणूक चिन्ह) तळपला आहे. (फोटो पीटीआयवरुन साभार)

– संतोष प्रधान

तमिळनाडूत झालेल्या महानगरपालिका, नगरपालिका आणि पंचायत निवडणुकांमध्ये राज्यातील सत्ताधारी द्रमुक पक्षाने घवघवीत यश मिळविले. नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकने राज्याची सत्ता हस्तगत केली होती. यापाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये द्रमुकचा ‘उगवता सूर्य’ (निवडणूक चिन्ह) तळपला आहे. या यशाने मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन हे राजकीयदृष्ट्या अधिक मजबूत झाले. सर्व २१ महानगरपालिकांमध्ये द्रमुकला सत्ता मिळाली. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत पश्चिम तमिळनाडूत अण्णा द्रमुकने आपले वर्चस्व कायम राखले होते. कोईम्बतूरमध्ये दहाही जागा अण्णा द्रमुकने जिंकल्या होत्या. या वेळी मात्र पश्चिम तमिळनाडूत द्रमुकला विजय प्राप्त झाला. याचे अधिक समाधान द्रमुक नेतृत्वाला आहे. तमिळनाडूत भाजपला अद्याप फार काही विस्तार करता आलेला नव्हता. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत राज्याच्या सर्व भागांमध्ये भाजपला यश मिळाले. द्रमुक व अण्णा द्रमुकनंतर भाजप तिसऱ्या क्रमांकावर आला. भाजपसाठी हा निकाल भविष्याच्या दृष्टीने निश्चितच महत्त्वाचा आहे.

द्रमुकसाठी या विजयाचे महत्त्व काय?

तमिळनाडूत द्रमुक व अण्णा द्रमुकमध्ये आलटून-पालटून राज्याची सत्ता मिळविण्याची परंपरा पडली होती. परंतु २०१६ मध्ये ही परंपरा जयललिता यांनी खंडित केली होती. जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर तमिळनाडूच्या राजकारणात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. ही पोकळी आता स्टॅलिन यांनी भरून काढली आहे. अण्णा द्रमुकमध्ये माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि माजी उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्यात धुसफूस सुरू झाली. अण्णा द्रमुकचा जनाधार ओसरला. द्रमुकने संधी मिळताच पक्षाचा पाया विस्तारला. मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या नेतृत्वावर या निकालाने शिक्कामोर्तब झाले. २०१९ची लोकसभा निवडणूक, २०२१ची विधानसभा तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये द्रमुकला विजय मिळाल्याने स्टॅलिन हे लोकप्रिय नेते म्हणून पुढे आले आहेत.

या निकालाचे वैशिष्ट काय?

कोईम्बतूर, नम्मकल, सालेम, तिरपूर अशा औद्योगिक, व्यापारी केंद्र असलेल्या पश्चिम तमिळनाडूत अण्णा द्रमुकचा वर्षानुवर्षे प्रभाव. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत तमिळनाडूच्या अन्य भागांमध्ये पराभव झाला असला तरी पश्चिम तमिळनाडूत अण्णा द्रमुकला यश मिळाले होते. यामुळेच गेल्या वर्षी विधानसभेत द्रमुकला अगदी एकतर्फी यश मिळाले नव्हते. आता महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीत मात्र पश्चिम तमिळनाडूत अण्णा द्रमुकचा दारुण पराभव झाला. कोईम्बतूर महानगरपालिकेची सत्ता द्रमुकला मिळाली. पश्चिम तमिळनाडूचा अण्णा द्रमुकचा गड द्रमुकने सर केला याचे द्रमुकला अधिक समाधान आहे. द्रमुकने विधानसभेप्रमाणेच काँग्रेस, डावे पक्ष व छोट्या पक्षांबरोबर आघाडी कायम ठेवली होती. त्याचाही फायदा द्रमुकला झाला. चेन्नई महानगरपालिकेच्या २०० पैकी १७८ जागा द्रमुक आघाडीने जिंकल्या. यात द्रमुकचे संख्याबळ १५३ आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये द्रमुकने सत्तेचा गैरवापर केल्याचा अण्णा द्रमुकचा आरोप आहे. याचबरोबर राज्याच्या निवडणुकीत पश्चिम तमिळनाडू हा भाग अण्णा द्रमुकलाच साथ देईल, असा विश्वास अण्णा द्रमुकच्या नेत्यांनी व्यक्त केला.

भाजपसाठी हा निकाल महत्त्वाचा का?

दक्षिण भारतात पाया विस्तारण्याचा भाजपचा प्रयत्न असला तरी तमिळनाडूत अद्याप अपेक्षित यश मिळाले नव्हते. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकबरोबर युतीत भाजपचे चार आमदार निवडून आले होते. परंतु पक्षाची कामगिरी फार काही समाधानकारक नव्हती. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने स्वतंत्र कोंगनाडू राज्याची चर्चा सुरू केली. पश्चिम तमिळनाडूतील औद्योगिकदृष्ट्या सधन भागाचे स्वतंत्र राज्य करण्याची ही कल्पना. त्यावर द्रमुककडून विरोध सुरू झाला. शेवटी अशी काही योजना नाही हे भाजपला जाहीर करावे लागले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने अण्णा द्रमुकबरोबर युती करण्याचे टाळले व स्वबळावर ही निवडणूक लढविली. भाजपला राज्याच्या सर्व भागांत मर्यादित यश मिळाले असले तरी भाजपचा पाया विस्तारला आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी हा निकाल दिलासादायक आहे. चेन्नई महानगरपालिकेत भाजपने खाते उघडले. पश्चिम तमिळनाडूबरोबरच सर्व भागांमध्ये कमी-अधिक यश संपादन केले. राज्यात भाजपचे अस्तित्व सर्वच भागांत पहिल्यांदाच जाणवले. द्रमुक व अण्णा द्रमुकनंतर राज्यात भाजप हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असल्याचा दावा त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी केला. अण्णा द्रमुकचा जनाधार कमी होत असताना भाजपचा प्रभाव वाढणे हे बदलत्या समीकरणाची नांदी मानली जाते. आगामी  २०२६च्या विधानसभा निवडणुकीत भाजप हा प्रमुख राजकीय पक्ष असेल, असा दावाही भाजप नेत्यांनी केला आहे.

अण्णा द्रमुकपुढे खरे आव्हान

अण्णा द्रमुकचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. जयललिता यांच्या निधनानंतर पक्षात नेतृत्वाचा प्रश्न आहेच. माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी  यांच्या मर्यादा आहेत. जयललिता यांच्या तोडीचा किंवा करिश्मा असलेला नेता नाही. जयललिता यांची मैत्रीण शशिकला तुरुंगातून सुटका झाल्यापासून नेतृत्वावर डोळा ठेवून आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाला. दुसरीकडे भाजपचा पाया विस्तारत आहे. अण्णा द्रमुकसाठी तो खरा धोका आहे. 

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What does tamil nadu urban local body election results means for aiadmk and bjp scsg 91 print exp 0122

ताज्या बातम्या