Tipu Sultan Controversy टिपू सुलतान हा विषय पुन्हा एकदा महाराष्ट्रात गाजतो आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान समकक्ष असले पाहिजेत या आशयाचं विधान केलं आणि हा वाद सुरु झाला. सपकाळ यांच्या विरोधात पुण्यात भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पोलिसात तक्रार केली आहे. मालेगाव महापालिकेत महापौरांनी त्यांच्या कक्षात टिपू सुलतानचा फोटो लावल्याने हा वाद सुरु झाला. हा संपूर्ण वाद काय? कोण काय म्हणालं हे जाणून घेऊ.
काँग्रेस भवनाच्या समोर हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेची जाळपोळ
टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करण्यात आल्याने भाजपाने आणि हिंदुत्ववादी संघटनांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. पुण्यातल्या काँग्रेस भवनाच्या समोर उतरत भाजपा कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. या वेळी आंदोलनकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ आणि टिपू सुलतान यांच्या प्रतिमांवर काळा रंग ओतला आणि त्यांचे पोस्टर आणि बॅनर जाळले. मालेगावत इस्लाम पार्टीच्या शेखर नसरीन खालिद महापौर झाल्या आहेत. त्यांनी त्यांच्या कक्षात टिपू सुलतानचा फोटो लावल्याने राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती. त्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी जी तुलना केली त्यामुळे त्या वक्तव्याला वादाची फोडणी बसली.
हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले होते?
मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांनी आपल्या कार्यालयीन कक्षात लावलेल्या टिपू सुलतानच्या प्रतिमेबद्धल विचारणा केली असता; “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता. टिपू सुलतान एक शौर्य गाजवणारे योद्धे, भूमिपुत्र होऊन गेले असे सांगून त्यांनी विखारी विषारी विचारणा जवळ केली नाही. त्यामुळे शौर्याचे लक्षण म्हणून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघायला पाहिजे.” असं विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं होतं. ज्याचे पडसाद राज्यभरात उमटले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया नेमकी काय?
छत्रपती शिवाजी महाराज यांची टिपू सुलतानशी तुलना खपवून घेतली जाणार नाही. टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे अतिशय निंदनीय आहे. काँग्रेसला लाज वाटायला पाहिजे, अशा तीव्र शब्दात फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात प्रसारमाध्यमासोबत बोलत होते. त्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानाबाबत विचारले असता जोडे चाटण्याची ही पद्धत जन्मात पाहिली नाही, असे सांगितले. ते म्हणाले, छत्रपती शिवरायांनी मोगलांच्या जोखडातून सामान्य माणसाला मुक्त केले. त्याचवेळी हजारो, लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतानची तुलना करून दोघांनाही सारखाच सन्मान देणे म्हणणे म्हणजे जोडे चाटणे या जन्मात बघितले नाही. हे खपवून घेतले जाणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं त्यावर संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे.
टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट का खेळता?-संजय राऊत
देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतानचा विषय काढला. त्याचं उदात्तीकरण वगैरे म्हणाले. पाकिस्तान टिपू सुलतनला नायक मानतं, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तसा पाकिस्तानमधे टिपू सुलतान नायक आहे. त्या पाकिस्तानबरोबर जर भारत क्रिकेट खेळत असेल तर देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या इतर नेत्यांनी त्याचा निषेध केला पाहिजे. पाकिस्तानमधे टिपू सुलतानवर धडे आहेत, पुतळे आहेत. त्यांच्यासाठी तो योद्धा आहे. असं असेल तर मग देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रभक्ती उचबंळून वर आली आहे तर मग त्यांनी पाकिस्तानसह क्रिकेट खेळणार नाही हे सांगितलं पाहिजे पण हे सांगणार नाहीत कारण ते ढोंगी लोक आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानसह क्रिकेट नको हे एक तरी भाजपाचा माणूस सांगतो आहे का? जो पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानतो, हिरो मानतो, योद्धा मानतो त्याच्याबरोबर क्रिकेट कसं खेळू शकता? असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी काय म्हटलं आहे ते बघू. आधी धमक्या कुणी दिल्या आहेत? भाजपानेच ना मग पाकिस्तानबरोबर क्रिकेट कसं चालतं? असे प्रश्नही राऊत यांनी विचारले आहेत.
मालेगावच्या उपमहापौरांचं म्हणणं काय आहे?
दरम्यान मालेगावचे उपमहापौर निहाल अहमद यांच्या कार्यालयात टिपू सुलतानची प्रतिमा लावण्यात आली. त्यांचं म्हणणं आहे की १८ व्या शतकातील मैसूरचे शासक टिपू सुलतानचा फोटो माझ्या कार्यालयात राहणार. आमच्या ऑफिसमध्ये कुणाचा फोटो लावायचा याचा निर्णय आम्ही घेऊ. ज्यावर आता आचार्य भोसलेंनी असं म्हटलं की महानगरपालिका ही एक सार्वजनिक संस्था आहे. या ठिकाणी कुठल्या प्रतिमा असाव्यात आणि कुठल्या नाही हे ठरवलं पाहिजे. अशा कुठल्याही प्रतिमा इथे नकोत ज्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होईल.
सपकाळ यांनी माफी मागावी, मनसेची मागणी
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानाशी केली. ही अत्यंत निंदनीय बाब आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचा तीव्र निषेध नोंदवत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राची आणि शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी.
टिपू सुलतान इंग्रजांशी लढला होता-ओवैसी
दरम्यान असदुद्दीन ओवैसी यांनीही टिपू सुलतानबाबत काँग्रेसकडून आलेल्या वक्तव्याबाबत भाष्य केलं आहे. “टिपू सुलतान इंग्रजांशी लढताना शहीद झाला. टिपू सुलतानने तुरुंगात बसून तुमच्या वीर सावरकरांसारखं इंग्रजांना लव्ह लेटर्स लिहिली नाहीत. टिपू सुलतानने तलवार उचलली आणि इंग्रजांपासून आपला देश स्वतंत्र करण्यासाठी लढाईत शहीद झाला. इंग्रजांना टिपू सुलतानची एवढी भीती होती की दीड तास त्याचा मृतदेह पडून होता. इंग्रजांची फौज आजूबाजूला होती, पण तरीही त्याच्या मृतदेहाजवळ कोणीही जात नव्हतं. कारण त्यांना देखील भीती होती की अचानक उठला तर काय?”, असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.

