“Never born, never died, only visited this planet from December 11, 1931, to January 19, 1990.”- Osho’s epitaph at the OIMR
आजही ओशो या नावाभोवती असलेले वलय अनेकांना आकर्षित करते. कदाचित नव्या पिढीला ओशो नेमके कोण, हे माहीत नसले तरी सोशल मीडियावर त्यांचे वायरल होणारे मेसेजेस, फोटो, कोट्स यांच्या माध्यमातून त्यांची ओळख नक्कीच आहे. १९ जानेवारी १९९० मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या कारणाविषयी अनेक तर्कवितर्क असले तरी तत्त्वज्ञान आणि अध्यात्मिक जगतात प्रसिद्ध असलेल्या या व्यक्तीविषयी जाणून घेणं नक्कीच महत्त्वाचं ठरतं. २००२ साली द न्यू यॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने पुण्यातील ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट (OIMR) संदर्भात एक बातमी प्रसिद्ध केली. या बातमीत पहिल्यांदा डी-ओशोआयझेशन (de-Oshoization) हा शब्दप्रयोग करण्यात आला होता.
खरंतर पुण्यातील OIMR ची स्थापना खुद्द ओशो यांनीच केली होती. सुरुवातीला हा आश्रम रजनिश आश्रम म्हणून प्रसिद्ध होता. नंतर ओशो कम्यून म्हणून ओळखला गेला. अखेरीस ध्यान-रिसॉर्ट म्हणून या स्थळाचे रूप पूर्णतः बदलले, असे द न्यू यॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटले होते. इतकंच नाही तर या बातमीत २००० च्या सुमारास झालेल्या एका बदलाचाही उल्लेख केला आहे. या काळात आश्रमाच्या प्रवेशद्वारांवर आणि परिसरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे व संन्याशाचे स्वागत करणारी ओशो (भगवान रजनीश) यांची शेकडो छायाचित्रे काढून टाकण्यात आली. त्या जागी त्यांच्या स्वाक्षऱ्या अगदी साध्या स्वरूपाच्या फ्रेममध्ये लावण्यात आल्या. त्यामुळे अनेक अनुयायांसाठी ओशो यांच्या निधनानंतर झालेल्या असंख्य सूक्ष्म बदलांपैकी हा बदल सर्वांत ठळक आणि निर्विवादपणे परिवर्तनाचे प्रतीक ठरला. शिवाय ओशो यांचा मृत्युदिन उत्सव स्वरूपात साजरा करणेही थांबण्यात आले. OIMR मध्ये हा दिवस पूर्वी नियमितपणे साजरा केला जात असे. ही प्रथा बंद झाल्यामुळे पुणे कम्यूनबाहेरील विविध अनुयायी गटांमध्ये अस्वस्थतेची भावना अधिकच वाढली. आजही हे रिसॉर्ट नव्याने घडते आहे, शिवाय नव्या वादांना आमंत्रण देत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ओशोनंतर ३६ वर्षांनी त्यांचा वारसा किती टिकून आहे यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप.
पुणेः आध्यात्मिकदृष्ट्या विश्वाचे केंद्र
ओशो यांचा जन्म ११ डिसेंबर १९३१ रोजी मध्य प्रदेशातील कुचवाडा येथे झाला. त्यांचे मूळ नाव चंद्रमोहन जैन होते. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांना ज्ञानप्राप्ती झाल्याचे सांगितले जाते, त्यानंतरच त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात झाली. तत्त्वज्ञान या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला. आधी ते आचार्य रजनीश म्हणून तर नंतर भगवान श्री रजनीश म्हणून प्रसिद्ध झाले. सूफीमत, ताओवाद, झेन इत्यादी विचारप्रवाहांचा संगम त्यांच्या शिकवणीत दिसतो. ध्यान, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि लैंगिक वासनेतून मुक्तता यांवर त्यांनी विशेष भर दिला. २१ मार्च १९७४ रोजी त्यांनी पुण्यात आपला पहिला आश्रम स्थापन केला आणि पुण्याला आध्यात्मिकदृष्ट्या विश्वाचे केंद्र असे संबोधले. त्यामुळे पुण्याच्या रस्त्यांवर भगवी वस्त्र परिधान करून वावरणारे परदेशी संन्यासी दिसू लागले, यावरून वादही झाले. तत्कालीन रुढीवादी कॅन्टोन्मेंट भागात हे चित्र १९८१ पर्यंत टिकले. त्यानंतर रजनीश अमेरिकेत गेले.
अमेरिकेतील रजनीशपुरम
रजनीश यांनी अमेरिकेत गेल्यावर ओरेगॉन राज्यात अँटेलोप शहरापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर रजनीशपुरम ही वसाहत स्थापन केली. नेटफ्लिक्सवरील ‘Wild Wild Country’ या माहितीपटात अमेरिकेतील वास्तव्यात त्यांचा स्थानिक रहिवाशांशी झालेला संघर्ष, ९३ रोल्स-रॉयस गाड्यांचा गाजलेला ताफा, अँटेलोप शहराचा ताबा अशा अनेक वादग्रस्त घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांमुळे ओशो यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि १९८५ साली त्यांना अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले. यानंतर ओशो भारतात परतले आणि ४ जानेवारी १९८७ रोजी पुण्यातील अत्यंत प्रतिष्ठित कोरेगाव पार्क परिसरात आश्रमाची पुनर्स्थापना केली, ते मृत्यूपर्यंत तिथेच होते.
मृत्यूनंतरचे वाद
ओशो आश्रमाशी संबंधित वाद फक्त अमेरिकेपुरते मर्यादित नव्हते; नंतरही अनेक अंतर्गत वादही उफाळून आले. ओशो कम्यूनभोवतीचे वाद त्यांच्या मृत्यूनंतर थांबले नाहीत. १९९९-२००० च्या सुमारास मुख्य अनुयायांचा एक मोठा गट ओशो कम्यूनपासून वेगळा झाला. त्यांनी स्वतःची स्वतंत्र केंद्रे स्थापन केली. काहींनी नवी दिल्लीतील ओशो केंद्र अधिक बळकट केले, तर काहींनी धरमशालासारख्या ठिकाणी नवी केंद्रे सुरू केली. या गटांनी ओशो यांच्या वैचारिक संपत्तीच्या होणाऱ्या नुकसानावर प्रखर टीका केली. कम्यूनमधील विविध वादग्रस्त बाबींना त्यांनी विरोध केला.
प्रसिद्ध वाद
- झ्युरिचस्थित ओशो इंटरनॅशनल फाउंडेशन (OIF) आणि दिल्लीस्थित ओशो फ्रेंड्स इंटरनॅशनल यांच्यात OSHO या नावाच्या ट्रेडमार्कवरून संघर्षही झाला. २००९ साली OIF ला या नावावरील विशेष हक्क गमवावे लागले.
- २०१३ साली ओशो यांच्या मृत्यूनंतर तब्बल २३ वर्षांनी एक कथित वारसाहक्क पत्र समोर आले. या पत्रात त्यांच्या मालमत्ता आणि बौद्धिक हक्कांचा लाभार्थी म्हणून एका स्विस ट्रस्टचे नाव होते. भारतातील फॉरेन्सिक तपासणीतही हा दावा बनावट असल्याचे सिद्ध झाले.
- एकेकाळी ओशो आश्रमात ओशो माळा घालणे अनिवार्य मानले जात होते. नंतर मात्र ओशो यांचे छायाचित्र असलेली माळ घालणाऱ्या काही अनुयायांना कम्यूनमध्ये प्रवेश नाकारण्यात आला, हा एक मोठा वादाचा मुद्दा ठरला.
- डिजिटल सेन्सॉरशिपचे आरोपही पुढे आले. ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनवर (OIF) आरोप झाले की, त्यांनी बाहेरील ओशो गटांची फेसबुक पेजेस कॉपीराइट उल्लंघनाचे कारण देऊन काढून टाकली. अनेक अनुयायांच्या मते, ही ऑनलाइन नियंत्रणाची पद्धत आजही सुरू आहे.
- अलीकडचा मोठा वाद २०२३ मध्ये झाला. कोविड काळात आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचे कारण देत, आश्रमाच्या सुमारे तीन एकर क्षेत्रफळाचे दोन भूखंड १०७ कोटी रुपयांना उद्योगपती राजीव बजाज यांना विकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शिष्य योगेश ठक्कर यांनी या व्यवहाराविरोधात याचिका दाखल केली. त्यानंतर २०२३ साली डिसेंबर महिन्यात धर्मादाय आयुक्तांनी ही जमीनविक्री स्थगित केली.
नेमके आरोप काय?
Who Killed Osho या पुस्तकाचे लेखक अभय वैद्य सांगतात की, तार्किकदृष्ट्या पुणे कम्यून हे ओशो चळवळीचे जागतिक केंद्र असायला हवे होते, पण प्रत्यक्षात ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनचे (OIF) मुख्यालय झ्युरिच (स्वित्झर्लंड) येथे आहे. वैद्य यांच्या मते, झ्युरिचमधील ही संस्था न्यूयॉर्कमधील मार्केटिंग ऑफिसमार्फत ओशो आणि पुणे कम्यूनशी संबंधित सर्व कॉपीराइट्स आणि ट्रेडमार्क्स नियंत्रित करते. स्वामी चैतन्य कीर्ती हे ओशो टाइम्स (हिंदी) मासिकाचे संपादक होते. २००० साली ते कम्यून सोडून गेले. ओशो टाइम्स मासिकही लवकरच बंद पडले. या मासिकाच्या मुखपृष्ठावर नेहमी ओशो यांचा फोटो असायचा. ते सांगतात, १९९८ पर्यंत टीव्हीवर ओशो यांची प्रवचने दाखवली जात होती. त्यानंतर कॉपीराइट्स झ्युरिच आणि अमेरिकेत नोंदणीकृत असल्याने गेल्या सुमारे २८ वर्षांत टीव्हीवर ओशो दिसलेच नाहीत. त्यामुळे नव्या पिढीला ओशो पाहण्याची संधी मिळाली नाही. आता ओशो सोशल मीडिया आणि यूट्यूबवर पुन्हा दिसत असले तरी, OIF झ्युरिच बाहेरील ओशो गटांची फेसबुक खाती निष्क्रिय करत असल्याचा आरोप कीर्ती करतात.
अभय वैद्य आणि स्वामी चैतन्य कीर्ती दोघांचे म्हणणे आहे की;
- कम्यूनमध्ये ओशो यांची छायाचित्रे नाहीत
- संकेतस्थळ किंवा साहित्यामध्ये ‘समाधी’ असा शब्द वापरला जात नाही
- जयंती आणि पुण्यतिथीचे कार्यक्रम बंद झाले आहेत
- रोज येणाऱ्या साधकांची संख्या कमी झाली आहे
- मालमत्ता विक्रीचे प्रयत्न सुरू आहेत
त्यांच्या मते, हे सर्व बदल ओशो यांच्या मूळ विस्ताराच्या दृष्टीकोनाच्या विरोधात आहेत. याच प्रक्रियेसाठी, न्यू यॉर्क टाइम्सने पूर्वी वापरलेला de-Oshoization (डी-ओशोआयझेशन) हा शब्द पुन्हा वापरला जात आहे. काही अनुयायांच्या मते, आजचे रिसॉर्ट ओशो यांच्या मूळ विचारांपासून तुटलेले वाटते, तर काहींनी तर त्याला थेट ‘हेल्थ क्लब’ असे संबोधले आहे.
नवे बदल
कम्यूनची रचना वास्तुविशारद हफीज कॉन्ट्रॅक्टर यांनी डिझाइन केलेली आहे. ते सुमारे ४० एकर परिसरात पसरलेले असून त्यात सुशोभित उद्याने, आधुनिक सभागृहे, जलतरण तलाव आणि कॅफे आहेत. कम्यूनचे संकेतस्थळही त्याचे सादरीकरण ‘रिसॉर्ट’ म्हणूनच करते. Osho International Meditation Resort (OIMR) च्या प्रवक्त्या मा साधना या बदलांचे समर्थन करताना सांगतात की, ओशो भूतकाळाशी चिकटून राहण्याऐवजी तो मोडण्यावर भर देत होते आणि त्यांची दृष्टी ‘नवा पुरुष आणि नवी स्त्री’ घडवण्याची होती. त्यांच्या मते, OIMR हे नव्या मानवाचे संवर्धन केंद्र असून येथे जात, धर्म किंवा राष्ट्रीयत्वाचा भेद नाही; जगभरातून लोक ध्यान, उपचार आणि विश्रांतीसाठी इथे येतात, विशेषतः तरुण आणि मध्यमवयीन लोक अल्पकालीन रिट्रीटसाठी येतात. हे ठिकाण ‘आनंदाचे केंद्र’ असून, कम्यूनमधील लोकांना हे बदल समजतात, मात्र बाहेरून टीका करणाऱ्यांना ते समजत नाहीत, असे त्या ठामपणे सांगतात.
आजही Osho यांच्याविषयीची उत्सुकता कायम आहे. त्यांची डायनॅमिक ध्यानपद्धती, ऑडिओ-व्हिडिओ प्रवचने आणि पुस्तके सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, पुण्यातील कम्यूनच्या मल्टिव्हर्सिटीतील विविध अभ्यासक्रमांनाही चांगला प्रतिसाद मिळतो. जगभरातील ओशो केंद्रांमध्ये सामूहिक ध्यान, कार्यशाळा आणि २१ मार्च रोजी साजरे होणारे जन्म-मृत्यू-बोधप्राप्ती दिन हे त्यांच्या उत्सव आणि ध्यान यांच्या अनोख्या संगमाची आठवण करून देतात. पुण्यात मोठे उत्सव आता वर्षातून दोनदाच होत असले, तरी तंत्र, झेन, सूफीमत आणि ध्यानाधारित उपचार आजही लोकांना आकर्षित करतात. कोविडनंतर भेट देणाऱ्यांची संख्या पुन्हा वाढत असून, मागील वर्षी ती सुमारे १८ टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले जाते. तरीही, अनेकांसाठी हे ठिकाण आजही अप्राप्य आणि वादांनी वेढलेले आहे.

