What Happens in the Brain During Deep Sleep?: रात्र गडद होत जाते, शरीर थकलेलं असतं आणि डोळ्यांवर झोप हलकेच आपलं साम्राज्य गाजवू लागते. पण त्या शांततेच्या आड मेंदू मात्र आपलं काम करत असतो. आपण विसावलेले असतो, पण मेंदू मात्र अथकपणे कार्यरत असतो. काही क्षणांपूर्वीच्या चिंता, आठवणी, विचार सगळं कुठेतरी खोलवर साठवलं जात असतं. झोपेच्या प्रत्येक श्वासाबरोबर शरीर स्वतःला नव्याने उभं करतं, मन पुन्हा ताजं होतं.
एक तृतीयांश आयुष्य झोपेतचं जातं…
माणसाचं जवळपास एक तृतीयांश आयुष्य झोपेतचं जातं, असं असलं तरीही माणूस गाढ झोपेत असताना नेमकं घडतं काय, याविषयी आजही उत्सुकता आहे. झोप ही केवळ शरीर आणि मेंदू बंद पडण्याची अवस्था आहे, असाच विश्वास १९ व्या शतकांपर्यंत शास्त्रज्ञांमध्ये होता. परंतु, संशोधनात हे स्पष्ट झालं आहे की, झोप ही निष्क्रिय अवस्था नसून मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अत्यावश्यक अवस्था आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील न्यूरोलॉजिस्ट आणि झोप तज्ज्ञ डॉ. मार्क वू यांच्या मते, झोपेतही मेंदू अत्यंत सक्रिय असतो आणि स्मरणशक्ती, मनःस्थिती आणि एकूण आरोग्यावर प्रभाव टाकणाऱ्या महत्त्वाच्या प्रक्रिया पार पाडतो.
टप्प्यांनुसार झोपेची विभागणी
मानवी झोपेचे चक्र चार मुख्य टप्प्यात विभागले जाते, असे तज्ज्ञ सांगतात. या टप्प्यांची रात्रभर पुनरावृत्ती होत असते. पहिल्या तीन टप्प्यांना ‘नॉन-रॅपिड आय मूव्हमेंट’ (non-REM) झोप म्हणतात, तर चौथा टप्पा म्हणजे REM झोप, या टप्प्यांचा संबंध स्वप्नांशी सर्वाधिक असतो. नॉन-REM झोपेच्या पहिल्या टप्प्यात मेंदू आणि शरीर जागृत अवस्थेकडून विश्रांतीकडे सरकू लागतात. मेंदूची क्रियाशीलता कमी होते, स्नायू सैल होतात आणि काही वेळा हलक्या झटक्यांसारख्या आकस्मिक हालचाली जाणवू शकतात.
माहितीवर प्रक्रिया करणारा टप्पा
दुसऱ्या टप्प्यात शरीराचे तापमान किंचित कमी होते, श्वसन आणि हृदयाची गती मंदावते. मेंदूतील लहरी अजून संथ होतात, पण अधूनमधून काही जलद विद्युतक्रियांचे क्षण दिसतात. त्याच वेळी मेंदू माहितीवर प्रक्रिया करून ती माहिती साठवण्याचं काम करत असतो.

तिसरा टप्पा म्हणजे गाढ झोपेचा टप्पा असतो. या अवस्थेत शरीर पूर्णपणे सैल होते, हृदयाची गती, श्वसन आणि मेंदूची क्रियाशीलता अत्यंत कमी असते. हा टप्पा शरीरातील दुरुस्ती आणि उपचार प्रक्रियांसाठी तसेच सकाळी ताजेतवाने वाटण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.
शेवटचा टप्पा म्हणजे REM झोप, हा टप्पा झोप लागल्यानंतर साधारण ९० मिनिटांनी सुरू होतो. सुरुवातीला हा टप्पा केवळ १० मिनिटांचा असतो, पण प्रत्येक चक्रानंतर त्याचा कालावधी वाढत जातो. REM झोपेदरम्यान डोळे पापण्यांच्या खाली जलद हालचाल करतात, श्वसन वेगवान होते आणि हृदयगती व रक्तदाब पुन्हा जवळजवळ जागृत अवस्थेच्या पातळीवर पोहोचतात. या टप्प्यातच सर्वाधिक स्वप्नं पडतात. विशेष म्हणजे, वयानुसार माणसाच्या REM झोपेचा कालावधी हळूहळू कमी होत जातो.
शरीर झोपेचे नियमन कसे करते?
डॉ. वू यांच्या मते, झोपेवर दोन मुख्य शक्ती नियंत्रण ठेवतात; जैविक घड्याळ (सर्केडियन रीदम) आणि झोपेची गरज (स्लीप ड्राईव्ह).
सर्केडियन रीदम
सर्केडियन रीदम हे शरीराचं अंतर्गत घड्याळ असतं, हे घड्याळ प्रकाश आणि अंधारावर प्रतिक्रिया देणाऱ्या मेंदूतील पेशींच्या समूहाद्वारे नियंत्रित केलं जातं. या घड्याळामुळे रात्री मेलाटोनिन या झोप आणणाऱ्या हार्मोनचं स्रवण सुरू होतं आणि सकाळी प्रकाश पडताच ते थांबतं. जॉन्स हॉपकिन्सच्या अभ्यासानुसार, पूर्णपणे आंधळे असलेल्या लोकांना झोपेच्या समस्या अधिक जाणवतात कारण त्यांच्या मेंदूला प्रकाशातील या बदलांचा योग्य अंदाज घेता येत नाही.
थकव्याच्या अवस्थेत येणारी मायक्रोस्लीप
झोपेची गरज ही भुकेसारखीच कार्य करते. जितका जास्त वेळ तुम्ही जागे राहता, तितकी झोपेची इच्छा वाढत जाते. मात्र, भुकेप्रमाणे झोपेवर तुमचा ताबा राहत नाही. थकवा ठराविक मर्यादेपलीकडे गेल्यास शरीर जबरदस्तीने झोपू शकतं, अगदी दैनंदिन काम करतानाही किंवा वाहन चालवताना झोप येऊ शकते. अत्यंत थकव्याच्या अवस्थेत काही सेकंदांसाठी ‘मायक्रोस्लीप’ म्हणजेच अल्प झोपेचे क्षण येऊ शकतात आणि व्यक्तीला त्याची जाणीवही होत नाही. मात्र, दिवसभरानंतर घेतलेली लांब झोप (नॅप) ही नैसर्गिक झोपेचा दाब कमी करते, त्यामुळे रात्री झोप येणं कठीण होतं.
झोप मेंदूसाठी का महत्त्वाची?
ज्या रात्री झोप येत नाही, त्याच्या दिवशी अनेकांना सुस्त वाटतं. कारण झोपेचा मेंदूवर खोल परिणाम होतो. पुरेशी झोप ही मेंदूच्या लवचिकतेसाठी अत्यावश्यक असते. झोपेअभावी मेंदूला नवीन माहिती साठवणं आणि बौद्धिक कार्ये पार पाडणं कठीण जातं. गाढ झोपेदरम्यान मेंदू जागेपणी साचलेले विषारी घटक बाहेर टाकतो, त्यामुळे दीर्घकाळासाठी मेंदूचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते, असे तज्ज्ञ सांगतात.
…रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते
झोपेचा परिणाम फक्त मेंदूपर्यंत मर्यादित नसतो. झोपेची कमतरता नैराश्य, उच्च रक्तदाब, मायग्रेन आणि झटके (seizures) यांसारख्या आजारांना वाढवू शकते. झोप न झाल्यास रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते, त्यामुळे शरीराला संसर्ग होण्याची शक्यता वाढते. याशिवाय, शरीरातील चयापचय प्रक्रियाही बिघडते इतकंच नव्हे, तर एकाच रात्रीची अपुरी झोप शरीराला तात्पुरत्या ‘प्री-डायबेटिक’ अवस्थेत ढकलू शकते.
डॉ. वू यांच्या सांगतात, “झोप असंख्य मार्गाने उत्तम आरोग्य राखण्यासाठी मदत करत.” मानसिक आरोग्य ते शारीरिक ऊर्जेचे पुनःसंचयन.. आपण झोपेत घालवलेले तास हे शरीर आणि मेंदू उत्तमरीत्या कार्यरत ठेवण्यासाठी सर्वात आवश्यक असतात.
