What Happens When You Stop Drinking Alcohol : अनेकांच्या आयुष्यात मद्यपानाची सुरुवात आनंदाच्या क्षणाने किंवा मनावरचा ताण हलका करण्याच्या बहाण्याने होते; पण ही सवय कधी एका जीवघेण्या व्यसनात बदलते हे त्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला समजतच नाही. दारूच्या व्यसनापायी आजवर अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याच्या कथा महाराष्ट्रातील गावागावांत ऐकायला मिळतात. आज देशभरातील लाखो तरुण दारूच्या विळख्यात अडकल्याचे अनेक अहवाल सांगतात. या पार्श्वभूमीवर नियमित मद्यपान केल्याने काय होते? तसेच दारूचे व्यसन अचानक सोडल्यास शरीरात काय बदल होतात? त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…

नियमित मद्यपान केल्याने काय होते?

दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी काही महिला किंवा पुरुष रात्री मद्यपान करतात. त्याकडे तणाव कमी करण्याचे साधन म्हणूनही पाहिले जाते. मात्र, नियमित आणि दीर्घकाळ मद्यपान केल्यास त्याचे शरीराच्या प्रत्येक अवयवांवर नेमके काय परिणाम होतात, याची कल्पना अनेकांना नसते. दारू ही शरीरासाठी एका संथ विषासारखे काम करते आणि त्यामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगभरात दरवर्षी ३० लाखांहून अधिक लोकांचा दारूशी संबंधित कारणांमुळे मृत्यू होतो. भारतातही विशेषतः तरुण वर्गामध्ये दारूमुळे होणाऱ्या यकृताच्या आजारांची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मद्यामुळे अन्ननलिकेच्या पेशींचे नुकसान होऊन तिथे गाठी तयार होतात आणि मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा धोका वाढतो, त्यामुळे तरुणांसह महिलांनी मद्यपानापासून दूर राहावे, असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात.

महिनाभर दारू सोडल्यास काय होते?

तज्ज्ञांच्या मते, महिनाभर दारूचे सेवन बंद केल्यास झोपेची गुणवत्ता सुधारते, यकृतावरील ताण कमी होतो, रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते तसेच मानसिक एकाग्रता व स्पष्टता वाढू लागते. मद्यापानापासून दुरावा ठेवल्यास शरीरावर तसेच मनावरही सकारात्मक परिणाम दिसून येतात, त्यामुळे आरोग्यदायी जीवनशैलीसाठी मद्यपान कमी करणे किंवा पूर्णपणे बंद करणे हा प्रभावी पर्याय ठरू शकतो. मद्यपान बंद केल्यानंतर शरीरात दिसणाऱ्या सुरुवातीच्या बदलांपैकी एक म्हणजे शरीरातील पाण्याचे संतुलन सुधारते. दारू हे लघवीचे प्रमाण वाढवणारे पेय असल्याने त्यामुळे शरीरातील पाणी आणि महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट्स वेगाने कमी होतात. दारू बंद केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच अनेकांना पोटाचा फुगीरपणा कमी झाल्याचे जाणवते, डोकेदुखी थांबते, पचनक्रिया सुधारते आणि ऊर्जेची पातळीही स्थिर राहते.

दारू सोडल्यास झोपेची गुणवत्ता सुधारते

दारू सोडल्यानंतर सर्वात पहिला आणि ठळकपणे जाणवणारा फायदा म्हणजे झोपेची गुणवत्ता झपाट्याने सुधारते. मद्यपानामुळे झोप पटकन लागते, मात्र ते झोपेच्या ‘आरईएम’ टप्प्यात अडथळा निर्माण करते. झोप ही स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी, भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मानसिक थकवा दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. संशोधनानुसार, मद्यपान टाळल्यास झोपेची गुणवत्ता सुधारते आणि सकाळी उठल्यावर माणसाला अधिक ताजेतवान आणि फ्रेश वाटते. फरिदाबाद येथील अमृता रुग्णालयातील औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय रैना सांगतात की, मद्यपानापासून ३० दिवस दूर राहिल्यास उत्तम झोप लागते, रक्तदाब नियंत्रित होतो, यकृताचे कार्य सुधारते, पचनक्रिया चांगली होते आणि एकंदरीत शरीरात अधिक ऊर्जा निर्माण होते.

दारू सोडल्यास यकृतात काय बदल होतात?

तज्ज्ञांच्या मते, दारू बंद केल्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यापासून यकृतामध्ये सुधारणेची लक्षणे दिसू लागतात. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या इन्स्टिट्यूट फॉर लिव्हर अँड डायजेस्टिव्ह हेल्थ यांनी केलेल्या नव्या संशोधनानुसार, केवळ एक महिना मद्यपानापासून दूर राहिल्यास यकृतातील चरबी कमी होण्यास मदत होते आणि इन्सुलिन संवेदनशीलतेत सुधारणा दिसून येते. भारतात ही बाब विशेष महत्त्वाची मानली जात आहे, कारण विविध अभ्यासांनुसार देशातील मोठ्या प्रमाणातील प्रौढ नागरिकांमध्ये फॅटी लिव्हर या आजाराचा धोका वाढत आहे. यकृत हा शरीरातील सर्वाधिक पुनर्बांधणी क्षमता असलेला अवयव आहे, त्यामुळे नियमित मद्यपानामुळे झालेल्या काही प्रमाणातील नुकसानीची भरपाई करण्याची संधी यकृताला मिळते. मद्यपानाचे प्रमाण कमी करणे किंवा पूर्णपणे बंद करणे हे यकृताच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

दारू सोडल्यानंतर हृदयालाही होतो फायदा

दारूचे सेवन बंद केल्याने केवळ यकृतालाच नव्हे, तर हृदयाच्या आरोग्यालाही मोठा फायदा होतो असे तज्ज्ञांचे मत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या आकडेवारीनुसार, भारतातील जवळपास प्रत्येक चार प्रौढांपैकी एक व्यक्ती उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहे. हा आजार दीर्घकालीन गंभीर आरोग्य समस्यांचा धोका वाढवू शकतो. मद्यपान कमी करणे यासारखे छोटे जीवनशैलीतील बदलही हृदयविकाराचा धोका कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात. दारू सोडल्यानंतर अनेकांना जाणवणारा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे वजन नियंत्रणात येते. अल्कोहोलमध्ये प्रति ग्रॅम सात कॅलरीज असतात. चरबीनंतर सर्वाधिक कॅलरीज देणारा हा घटक असून त्यामध्ये आवश्यक पोषक तत्त्वांचा अभाव असतो, त्यामुळे दारूमधून शरीरात मोठ्या प्रमाणात ‘लपलेल्या’ कॅलरीज जातात. मद्यपान बंद केल्यास एकूण कॅलरीचे सेवन कमी होते आणि हळूहळू वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. काही लोकांमध्ये दारू सोडल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रणात राहते, तसेच भूक अचानक वाढणे किंवा कमी होणे यांसारख्या समस्या कमी झाल्याचेही दिसून येते.

अचानक दारू सोडल्यावर काय होते?

तज्ज्ञांच्या मते, दारू सोडण्याचे आरोग्याला अनेक फायदे असले तरी वर्षानुवर्षे अतिमद्यपान करणाऱ्यांनी अचानक दारू पिणे पूर्णपणे बंद करणे नेहमीच सुरक्षित नसते. दीर्घकाळ मोठ्या प्रमाणात मद्यपान करणाऱ्या किंवा अल्कोहोलवर अवलंबून असलेल्या व्यक्तींमध्ये अचानक दारू सोडल्यास ‘अल्कोहोल विड्रॉवल सिंड्रोम’ उद्भवू शकतो. त्यामध्ये तीव्र चिंता वाटणे, हात-पाय थरथरणे, प्रचंड घाम येणे, उलट्या होणे आणि झोप न येणे अशी लक्षणे दिसतात. त्याशिवाय काही गंभीर प्रकरणांमध्ये फिट्स येणे, भास होणे किंवा ‘डिलिरियम ट्रेमेन्स’ सारखी जीवघेणी परिस्थिती निर्माण होऊ शकते. दारूचे व्यसन असलेल्या व्यक्तींमध्ये शेवटचा पेग घेतल्यानंतर काही तासांच्या आतच ही लक्षणे दिसू शकतात, त्यामुळे दारूचे गंभीर व्यसन असणाऱ्या व्यक्तींनी अचानक मद्यपान बंद करण्यापूर्वी डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घ्यावा, असे डॉ. संजय रैना यांनी म्हटले आहे. अल्कोहोल विड्रॉवल कधीकधी अत्यंत धोकादायक ठरू शकते आणि त्यासाठी वैद्यकीय देखरेखीची गरज भासू शकते. जर दारू अनेक वर्षांपासून तुमच्या रोजच्या आयुष्याचा भाग असेल, तर ती सोडण्यासाठी डॉक्टरांच्या मदतीने एक सुरक्षित प्लॅन तयार करणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे, असेही डॉ. रैना यांनी स्पष्ट केले.