अमेरिकेची संस्था हिंडेनबर्गने अदाणी समूहावर केलेल्या आरोपानंतर आता ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांच्याबाबतही मोठा आरोप केला आहे. जॅक डॉर्सी सहसंस्थापक असलेल्या ब्लॉक इन्क (Bloc Inc) या कंपनीच्या बोगस व्यवहाराबाबत आपल्या नव्या अहवालात आरोप करण्यात आले आहेत. हिंडेनबर्गच्या या धक्क्यामुळे जॅक डॉर्सी यांचेदेखील अदाणीप्रमाणेच कोट्यवधीचे नुकसान झाले. गुरूवारी हिंडेनबर्गचा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर जॅक डॉर्सी यांच्या संपत्तीत एकाच दिवसात ५२.६ कोटी डॉलरची घट होऊन एकूण ११ टक्क्यांची घसरण झाली आहे. ब्लॉक इन्क कंपनीच्या कॅश अ‍ॅपने ग्राहकांची संख्या फुगवल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. दरम्यान ब्लॉक इन्कने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, हिंडेनबर्गच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे जाहीर केले आहे.

ब्लूम्बर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार (Bloomberg Billionaires Index) जॅक डॉर्सी यांची संपत्ती आता ११ टक्क्यांनी कमी होऊन ४.४ अब्ज डॉलरवर आली आहे. दरम्यान, हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल बाहेर आल्यानंतर ब्लॉकचे समभाग भांडवली बाजारात कोसळले. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज बंद होईपर्यंत ब्लॉकने या वर्षभरात केलेली समभागावरील सर्व कमाई गमावली आणि त्यांचे समभाग १५ टक्के घसरणीसह दिवसअखेर बंद झाले. ब्लॉक इन्कने सांगितले की, हिंडेनबर्गचा अहवाल चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे आम्ही यूएस सिक्युरिटीज नियामकांसोबत समन्वय साधून शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्गच्याविरोधात कायदेशीर कारवाई करू, अशी माहिती रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिली.

हे वाचा >> ‘हिंडेनबर्ग’चा एक अहवाल अन् अदाणींच्या संपत्तीत १९ टक्क्यांनी घट; जाणून घ्या किती आहे उद्योगपतींची मालमत्ता?

हिंडेनबर्गने २४ जानेवारी रोजी अदाणी समूहाच्या भांडवली बाजारातील व्यवहाराबाबत अहवाल सादर केला होता. त्यानंतर दोन महिन्यांनी ब्लॉक इन्कच्या व्यवहारावर प्रकाश टाकला आहे. अदाणी समूहाच्या विरोधात अहवाल आल्यानंतर अदाणी समूहाचे एक अब्ज कोटींचे नुकसान झाले होते.

ब्लॉक इन्कच्या विरोधात काय आरोप आहेत?

हिंडेनबर्गने ब्लॉक इन्कच्या कॅश अ‍ॅपवर आक्षेप घेतले आहेत. कॅश अ‍ॅप हे पी२पी (peer-to-peer) प्रकारेच मोबाईल अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप वापरकर्त्यांना पैसे पाठवणे, स्वीकारणे आणि गुंतवणूक करण्यासाठी मदत करते. फोर्ब्जच्या माहितीनुसार २०१३ मध्ये कॅश अ‍ॅप लाँच झाले होते. वेन्मो (Venmo) आणि पेपाल (PayPal) सारख्या मोबाईल अ‍ॅपलीकेशनसोबत कॅशची स्पर्धा होती. कॅश वित्तीय सेवा पुरविणारा एक मंच होता, ती बँक नाही. बँक पार्टनर्सच्या मदतीने हे अ‍ॅप बँकिंग सेवा आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून वित्तीय सेवा देत होते.

हिडेंनबर्गने दावा केला की, त्यांनी ब्लॉकच्या अनेक माजी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. या संवादातून लक्षात आले की, कॅश अ‍ॅपवरील ४० ते ७० टक्के खाती बनावट आहेत, ज्यामाध्यमातून फसवणूक झाली किंवा एकाच व्यक्तिशी जोडली गेलेली ही अतिरिक्त खाती होती.

सेक्स ट्रॅफिकिंगसाठी कॅश अ‍ॅपचा वापर?

यासोबतच हिंडेनबर्गने आरोप केला की, ब्लॉकने आपल्या वापरकर्त्यांसमोर दिशाभूल करणारी आकडेवारी सादर केली. अ‍ॅपवर सक्रीय असलेल्या व्यवहाराची चुकीची माहिती प्रसारीत करण्यात आली. कॅश अ‍ॅपवर नेमके किती लोकांची खरी खाती आहेत, याची माहिती ब्लॉकने आपल्या गुंतवणूकदारांना द्यावी, असेही हिंडेनबर्गने आपल्या अहवालात म्हटले आहे. तसेच कॅशचा वापर गुन्हेगारी स्वरुपाच्या कामांसाठी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ज्यामध्ये सेक्स ट्रॅफिकिंग सारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा >> “हिंडेनबर्ग भारतात असतं तर UAPA लागला असता” असदुद्दीन ओवैसी यांचं लोकसभेत टीकास्त्र

यूएसमध्ये सेक्स ट्रॅफिकिंगसाठी आतापर्यंत कॅश अ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर झाला, असा धक्कादायक खुलासा हिंडेनबर्गने केला आहे. कॅशच्या माध्यमातून कशाप्रकारे सेक्स ट्रॅफिकिंगला वाव मिळाला याबाबत सामाजिक न्याय विभागाकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलांच्या तस्करीसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे आहेत. ज्यामध्ये कॅश अ‍ॅपवर जेव्हा एखादे खाते फसवणूक किंवा कायद्याने बंदी असलेले प्रकार करत होते, तेव्हा ब्लॉककडून फक्त संबंधित खाते ब्लॅकलिस्ट करण्यात येत होते. खाते वापरणाऱ्या व्यक्तीवर कायमची बंदी घालण्यात येत नव्हती. याचा परिणाम असा झाला की, ब्लॅकलिस्टेड वापरकर्ते ही सामान्य बाब झाली. ज्याबद्दल असे म्हटले जाते की, हिप-हॉप गाण्यात रॅपर्सनीही या ब्लॅकलिस्टेड वापरकर्त्यांवर गाणी बनविली.

याव्यतिरिक्त, हिंडेनबर्गच्या संशोधनात असेही समोर आले की, फसवणूक करणाऱ्या खात्याची पाठराखण केल्यामुळे करोना महामारीच्या काळात ब्लॉकच्या समभागाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली. सहसंस्थापक डॉर्सी आणि जेम्स मॅककेल्वी यांनी एकत्रितपणे एक बिलियन समभागांची याकाळात विक्री केली. मुख्य वित्तीय अधिकारी अमृता अहुजा आणि कॅश अ‍ॅपच्या प्रमुख मॅनेजर ब्रायन ग्रासादोनिया यांनी देखील काही दशलक्ष डॉलर किंमतीच्या समभागाची विक्री केली.

डीए डेविड्सन आणि कंपनीचे ज्येष्ठ विश्लेषक क्रिस्तोफर ब्रेंडलर यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना हिंडेनबर्गच्या संशोधन अहवालाबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “कॅश अ‍ॅपवर फसवणूक, बोगस खाती, चुकीच्या नावाने खाती उघडणे अशा प्रकारचे आरोप झालेले आहेत. मला या आरोपबाबत शंका वाटते. या सर्व प्रकाराला कंपनीकडून परवानगी मिळाली असेल, असे मला वाटत नाही. अहवालात जे आरोप झाले, त्याबाबत काही पुरावे सादर करण्यात आलेले आहेत का? त्यावरूनच समजते की, अहवालात त्रुटी आहेत.”

रॉयटर्सने हिंडेनबर्ग अहवालातील काही निरीक्षणांची नोंद केली आहे. मागच्यावर्षीपासून आर्थिक मंदीची चाहूल लागल्यामुळे ब्लॉकची डोकेदुखी वाढली होती. त्यांच्या समभागाच्या किंमती घसरत होत्या आणि खर्च वाढत होते. शिवाय, ब्लॉकच्या महसूलाचा मोठा भाग क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारातून येत होता. क्रिप्टोकरन्सी उद्योग बुडाल्यामुळेही ब्लॉकला फटका बसला.