नागपूरमधील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयातील आफ्रिकन सफारीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे लवकरच या प्राणीसंग्रहालयात आफ्रिकेतील वन्यप्राणी पर्यटकांना पाहता येणार आहेत. परंतु या प्रकल्पास पर्यटकांचा प्रतिसाद किती मिळेल, याविषयी…
प्रकल्पाची पार्श्वभूमी काय?
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयातील भारतीय सफारीचे काम पूर्ण होऊन चार वर्षांपूर्वीच ती सुरू करण्यात आली. २६ जानेवारी २०२१ ला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भारतीय सफारीचे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात आफ्रिकन सफारीचे काम सुरू करण्यात येणार आहे. यात आफ्रिकन सफारीसोबत सफारी प्लाझा व इतर बाबींचा समावेश आहे. आफ्रिकन सफारीतील संपूर्ण बांधकामाची जबाबदारी नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (इंडिया) लिमिटेड (एनबीसीसी) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी या कामाच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून ५१७.७६ कोटी रकमेस शासनाकडून मंजुरी देण्यात आली. दरम्यान, २८ डिसेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील आयोजित बैठकीत आफ्रिकन सफारीचे बांधकाम एनबीसीसीमार्फत करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तर २५ मार्च २०२५ रोजी गोरेवाडा प्राणीसंग्रहालय लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सामंजस्य समयलेखात सुधारणा करून मंजुरी प्रदान करण्यात आली. चार एप्रिल २०२५ रोजी हा आराखडा शासन मान्यतेसाठी सादर करण्यात आला. तर एक जुलैला सामंजस्य करार करण्यात आला.
आफ्रिकन सफारीत कोणते प्राणी?
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयातील आफ्रिकन सफारीत पर्यटकांना आफ्रिकेत आढळणाऱ्या काही प्राण्यांचे दर्शन घडेल. या सफारीत वेगवेगळे विभाग करण्यात आले आहेत. बेटांवरील प्राणीदर्शन या विभागात ठिपकेदार तरस, पांढराशिंगी गेंडा, पाटस मंकी, रेड रिव्हर हॉग, आफ्रिकन सिंह, चिंपांझी, हमाड्रायस बबून, चित्ता हे प्राणी असणार आहेत. मोकळ्या परिसरात मुक्तपणे वावरणाऱ्या प्राण्यांमध्ये शहामृग, पाणघोडा, इम्पाला हरीण, जेम्स बॉक, कॉमन ईलंड, ब्लू विल्डबीस्ट, जिराफ, बर्चेल्स झेब्रा, कुडू हे प्राणी असणार आहेत. याशिवाय मिरकीट, आफ्रिकन रानकुत्रा, बँडेड मुंगूस असे अनेक प्राणी आफ्रिकन सफारीमध्ये पर्यटकांना पाहता येणार आहेत.
आफ्रिकन सफारीचे प्रारूप काय?
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात आफ्रिकन सफारी आणि प्रवेशद्वारावर प्लाझा विकसित करण्यात येणार आहे. या प्राणीसंग्रहालयातील सुमारे ६३ हेक्टर जागेवर आफ्रिकन सफारी विकसित करण्यात येणार आहे. आफ्रिकन सफारीत सुमारे २२ आफ्रिकन प्रजातींचा समावेश असणार आहे. तसेच प्रवेशद्वाराचेही काम करण्यात येणार आहे. सुमारे २८५ कोटींचा हा प्रकल्प असून ही कामे १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही आफ्रिकन सफारी पूर्णत्वास गेल्यानंतर नागपूर हे प्राणीसंग्रहालय पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाणार असून, पर्यावरण जागरूकता व जैवविविधतेचे संवर्धन यास चालना मिळणार आहे. सिंगापूरमधील तज्ञांच्या मदतीने तयार केलेल्या या मास्टर प्लॅनचे उद्दिष्ट प्राणीसंग्रहालयात आफ्रिकन सवाना लँडस्केप तयार करणे आहे.
गोरेवाड्यातील भारतीय सफारीत काय?
भारतीय सफारी आणि जंगल सफारी यांचा अनुभव घेता येतो. भारतीय सफारीमध्ये वाघ, बिबट्या, अस्वल आणि इतर तृणाहारी प्राणी आहेत. भारतीय सफारीतील २५ हेक्टरच्या बिबट सफारीत सात बिबटे आहेत. मानवांनी व्यापलेल्या निकृष्ट जंगलाच्या लँडस्केपवर आधारित ही बिबट सफारी आहे. २५ हेक्टरची अस्वल सफारी नैसर्गिक सवाना आणि पानझडीच्या जंगलाच्या लँडस्केपवर आधारित आहे. २५ हेक्टरच्या व्याघ्रसफारीत ‘राजकुमार’ आणि ‘ली’ या वाघ आणि वाघिणीचे हमखास दर्शन होते. भारतीय जंगलाच्या संकल्पनेवर आधारित ही व्याघ्रसफारी आहे. जंगल आणि नैसर्गिक पाणवठ्यावर आधारित तृणभक्षी प्राण्यांची सफारी ही ४० हेक्टरमध्ये आहे. याठिकाणी मणिपूरमधील शांगाई हरिण, पांढरे काळवीट यासह भारतीय हरिणदेखील आहेत. एका तासात याठिकाणी जंगल सफारीसारखाचा अनुभव येतो. भारतीय सफारीसाठी पर्यटकांना वातानुकूलित आणि वातानुकूलित नसलेल्या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात आणखी काय?
गोरेवाड्यात भारतातील पहिली आफ्रिकन संकल्पना असलेली सफारी असेल. ही सफारी आफ्रिकेतील नैसर्गिक सवाना अधिवासाप्रमाणे असणार आहे. या संकल्पनेमुळे पर्यटकांना वाहनाच्या दोन्ही बाजूला एकाच वेळी तृणभक्षी आणि मांसभाक्षी प्राणी पाहता येतील. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात रात्र सफारीची पण संकल्पना आहे. सूर्यास्तापासून ते मध्यरात्रीपर्यंत याठिकाणी प्राणी पाहता येणार आहेत. वन्यप्राण्यांचे दिवसाचे आणि रात्रीचे वर्तन वेगळे असते. त्यामुळे त्यांना नैसर्गिक अवस्थेत पाहता येईल. याठिकाणी पुरातत्त्वीय थीम पार्कदेखील असणार आहे. गोरेवाडा हे पुरातत्त्वीयदृष्ट्या महत्त्वाच्या मेगालिथिक दगडी वर्तुळांसाठी प्रसिद्ध आहे. या प्राचीन वास्तू ४०० ते २०० इसवीसनपूर्व काळातील आहेत. प्रिहिस्टोरिक ॲनिमल (डायनासोर थीम) पार्क याठिकाणी उभारण्यात येणार आहे. मध्य भारतात सापडलेल्या वनस्पती आणि प्राण्यांचे अनेक जीवाश्मदेखील या भागात प्रदर्शित केले जाऊ शकतात. एक्झॉस्टिक एविअरी आणि रेलफॉरेस्ट थीम पार्क याठिकाणी उभारण्यात येणार आहे. यात उष्णकटिबंधीय प्रदेशातील सुंदर आणि रंगीबेरंगी पक्षी असतील.
rakhi.chavhan@expressindia.com