Alpine Divorce viral video meaning: Threads आणि TikTok वर गेल्या काही दिवसांपासून Alpine Divorce (अल्पाईन डिव्होर्स) हा शब्द अचानक ट्रेंड होऊ लागला आहे. ट्रेक किंवा पर्वतीय सहलीदरम्यान एखाद्या व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या जोडिदाराने अचानक मागे सोडल्याच्या अनुभवाला सोशल मीडियावर Alpine Divorce असे म्हटले जातं.
ट्रेकदरम्यान जोडीदाराने मागे सोडल्याचा अनुभव
या चर्चेला सुरुवात एका व्हायरल TikTok व्हिडिओमुळे झाली. या व्हिडिओमध्ये एका महिलेने ट्रेकदरम्यान तिच्या डेटने तिला मागे सोडल्याचा अनुभव शेअर केला होता. त्यानंतर अनेक महिलांनी अशाच स्वरूपाचे अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आणि हा शब्द वेगाने चर्चेत आला. अर्थात, या सर्व घटनांची स्वतंत्र पडताळणी झालेली नाही. तरीही या ट्रेंडमुळे नातेसंबंध, सुरक्षितता आणि दुर्गम परिसरातील जोखीम याविषयी महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर या लेखात Alpine Divorce या संज्ञेचा अर्थ, तिचा साहित्यिक उगम, सोशल मीडियावरील ट्रेंड आणि प्रत्यक्ष घटनांच्या संदर्भात या विषयाचे संशोधनात्मक विश्लेषण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Alpine Divorce (अल्पाईन डिव्होर्स) म्हणजे काय?
Alpine Divorce किंवा अल्पाईन डिव्होर्स ही कोणतीही औपचारिक वैद्यकीय, कायदेशीर किंवा मानसशास्त्रीय निदान असलेली संज्ञा नाही. सोशल मीडियावर प्रचलित झालेली ही एक अनौपचारिक संज्ञा आहे. ट्रेक किंवा पर्वतीय सहलीदरम्यान एखाद्या व्यक्तीने आपल्या जोडीदाराला दुर्गम किंवा धोकादायक परिसरात मुद्दाम किंवा निष्काळजीपणे मागे सोडल्याच्या अनुभवाला सोशल मीडियावर Alpine Divorce असे म्हटले जाते.
रूपकात्मक संज्ञा
अशा परिस्थितीत मागे राहिलेल्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, कारण पर्वतीय किंवा निर्जन परिसरात मदत मिळणे कठीण असते. त्यामुळे अल्पाईन डिव्होर्स ही संज्ञा प्रत्यक्ष घटस्फोट असा अर्थ व्यक्त करत नाही; तर ती केवळ सोशल मीडियावर प्रचलित झालेली एक रूपकात्मक आणि चर्चेत आलेली संज्ञा आहे.
An Alpine Divorce संकल्पनेचा साहित्यिक उगम
Alpine Divorce या संज्ञेचा वापर १८९३ मधील स्कॉटिश-कॅनेडियन लेखक Robert Barr यांच्या An Alpine Divorce या लघुकथेत केलेला आढळतो. उपलब्ध साहित्यिक नोंदींनुसार ही कथा १८९३ साली प्रकाशित झाली होती. या कथानकात स्वित्झर्लंडमधील Swiss Alps परिसरातील प्रवासाच्या पार्श्वभूमीवर वैवाहिक नात्यातील तणाव आणि हिंसेचा संदर्भ व्यंगात्मक पद्धतीने मांडण्यात आला आहे. आज सोशल मीडियावर वापरला जाणारा Alpine Divorce हा शब्दप्रयोग याच लघुकथेतून घेण्यात आला आहे. त्यामुळे या संज्ञेकडे केवळ सोशल मीडिया ट्रेंड म्हणून न पाहता तिचा साहित्यिक आणि सांस्कृतिक संदर्भदेखील लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते.
Alpine Divorce हा फक्त सोशल-मीडिया ‘मेम’ आहे की, धोकादायक संबंधवर्तनाचा संकेत?
Alpine Divorce या संज्ञेशी संबंधित सर्व ऑनलाइन दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही. तरीही या चर्चेमुळे एक महत्त्वाचा प्रश्न पुढे येतो; दुर्गम किंवा धोकादायक वातावरणात जोडीदाराला मागे सोडणे हे गंभीर असंवेदनशील वर्तन ठरते का?
काही तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या कृतींकडे केवळ सोशल-मीडिया ट्रेंड म्हणून पाहता येत नाही. प्रसंगी त्याकडे negligence (निष्काळजीपणा), abandonment (जाणीवपूर्वक सोडून देणे) किंवा व्यापक अर्थाने intimate partner violence (IPV) या चौकटीतून पाहणे आवश्यक असते.
Centers for Disease Control and Prevention (CDC) ने नमूद केल्याप्रमाणे, intimate partner violence म्हणजे रोमँटिक नात्यातील गैरवर्तन किंवा आक्रमकता यामध्ये शारीरिक हिंसा, लैंगिक हिंसा, छुप्या पद्धतीने पाहात राहणे, नजर ठेवणे आणि शारीरिक आक्रमकता- हिंसा यांचा समावेश होतो. शारीरिक आक्रमकतेमध्ये जोडीदारावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा उद्देश असलेले किंवा जोडीदारावर मानसिक दबाव आणणारे वर्तनही समाविष्ट असते.
Coercive Control या चौकटीत Alpine Divorce कसे समजावे?
काही तज्ज्ञांच्या मते, Alpine Divorce म्हणून वर्णन केल्या जाणाऱ्या काही घटनांकडे coercive control या संकल्पनेच्या चौकटीतूनही पाहता येऊ शकते. ऑस्ट्रेलियन महाअधिवक्ता विभागानुसार coercive control म्हणजे एखाद्या व्यक्तीवर सातत्याने अत्याचारी पद्धतीने नियंत्रण मिळवण्याचा केलेला प्रयत्न; त्यामुळे त्या व्यक्तीचे स्वातंत्र्य, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता हळूहळू कमी होत जाते.
या नियंत्रणाच्या स्वरूपात भीती निर्माण करणे, अपमान करणे, सामाजिक किंवा भौतिकदृष्ट्या विलगीकरण, मानसिक दबाव टाकणे आणि व्यक्तीची स्वायत्तता (autonomy) हिरावून घेणे यांसारख्या वर्तनांचा समावेश होऊ शकतो. अर्थात, प्रत्येक Alpine Divorceची कथा ही coercive control चाच भाग आहे, असे म्हणणे योग्य नाही. मात्र काही प्रकरणांमध्ये दुर्गम किंवा धोकादायक परिसरात जोडीदाराला जाणीवपूर्वक असुरक्षित परिस्थितीत सोडणे हे power, domination, intimidation किंवा reckless disregard असू शकते.
पडताळलेले प्रकरण: ऑस्ट्रियातील Großglockner केस
Alpine Divorce ही संज्ञा सोशल मीडियावर ट्रेंड झाली असली, तरी अशा प्रकारच्या घटनांचे वास्तवातील उदाहरणही समोर आले आहे. फेब्रुवारी २०२६ मधील वृत्तानुसार, ऑस्ट्रियातील एका न्यायालयाने Thomas P या गिर्यारोहकाला आपल्या मैत्रिणीच्या मृत्यूसंदर्भात अतिनिष्काळजीपणे सदोष मनुष्यवधास ( gross negligence manslaughter) कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले. The Guardian आणि Associated Press च्या वृत्तांनुसार, जानेवारी २०२५ मध्ये ऑस्ट्रियाच्या सर्वोच्च पर्वत Großglockner जवळ अत्यंत प्रतिकूल हवामानात तो आपल्या जोडीदाराला मागे सोडून पुढे गेला. त्या वेळी ती अत्यंत थकलेली होती आणि hypothermia च्या लक्षणांनी त्रस्त असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात न्यायालयाने त्याला निलंबित तुरुंगवास (suspended sentence) आणि दंडाची शिक्षा सुनावली. Alpine Divorce संदर्भातील चर्चांमध्ये या घटनेचा वारंवार उल्लेख केला जातो, कारण येथे पर्वतीय परिसरात जोडीदाराला मागे सोडण्याचा मुद्दा केवळ सोशल मीडियावरील कथनापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष न्यायालयीन तपासणीचा विषय ठरला होता.
Gabby Petito प्रकरणाचा संदर्भ
Gabby Petito प्रकरण Alpine Divorce या संकल्पनेच्या नेमक्या अर्थात बसत नसले, तरी या चर्चेत त्याचा अनेकदा उल्लेख केला जातो. कारण या घटनेत केवळ ट्रेकदरम्यान जोडीदाराला मागे सोडण्याचा प्रश्न नव्हता, तर ते एक गंभीर खूनाचे homicide investigation प्रकरण होते. तरीही सार्वजनिक चर्चांमध्ये हे प्रकरण दुर्गम परिसरातील सुरक्षितता, intimate partner violence (IPV) आणि स्त्रियांच्या सुरक्षेबाबतच्या चिंतेशी जोडले जाते.
FBI च्या तपासानुसार, १९ सप्टेंबर २०२१ रोजी Wyoming राज्यातील Spread Creek Dispersed Camping Area येथे Gabby Petito चे अवशेष सापडले. Teton County Coroner यांच्या रिपोर्टनुसार तिचा मृत्यू डोके आणि मानेवरील गंभीर जखमा तसेच गळा आवळल्यामुळे झाला होता.
पोलिसी तपासानुसार या प्रकरणात तिचा बॉयफ्रेंड Brian Laundrie मुख्य संशयित होता. FBI च्या अंतिम अहवालात Laundrie व्यतिरिक्त इतर कोणी थेट सहभागी असल्याचे पुरावे आढळले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
Bear vs Man debate
Alpine Divorce या ट्रेंडची चर्चा सुरू झाल्यानंतर काही सोशल मीडिया पोस्टमध्ये Bear vs Man debate चा संदर्भही दिला जात आहे. २०२४ मध्ये व्हायरल झालेल्या या चर्चेत महिलांना जंगलात अनोळखी पुरुषापेक्षा अस्वलाची भेट होणे अधिक सुरक्षित वाटते का असा प्रश्न विचारण्यात आला होता आणि अनेक महिलांनी अस्वल हा पर्याय निवडल्याचे दिसले. या प्रतिक्रियांमधून दुर्गम किंवा असुरक्षित ठिकाणी महिलांना वाटणारी असुरक्षितता आणि नातेसंबंधातील विश्वासाचा प्रश्न पुढे आला. त्यामुळेच ट्रेक किंवा पर्वतीय सहलीदरम्यान जोडीदाराने मागे सोडल्याच्या अनुभवांशी संबंधित Alpine Divorce हा ट्रेंडही महिलांच्या सुरक्षिततेच्या व्यापक चर्चेशी जोडला जात आहे.
संशोधनात्मक आकलन: व्हायरल संज्ञेपासून सामाजिक विश्लेषणापर्यंत
- Alpine Divorce ही औपचारिक शास्त्रीय संज्ञा नसली तरी तिच्या व्हायरलतेमुळे काही महत्त्वाचे सामाजिक प्रश्न समोर येतात.
- पहिला मुद्दा म्हणजे outdoor recreation किंवा साहसी उपक्रमांमध्ये कौशल्यातील तफावत, वेग, निर्णयक्षमता आणि जोखीम घेण्याची प्रवृत्ती यांमुळे नातेसंबंधातील सत्ता-संतुलन (power dynamics) बदलू शकते का?
- दुसरा मुद्दा म्हणजे दुर्गम किंवा धोकादायक नैसर्गिक परिसरात जोडीदारावरचे अवलंबित्त्व आणि वाढते. अशा ठिकाणी एखाद्या व्यक्तीची सुरक्षितता अनेकदा तिच्या जोडीदारावर अवलंबून असते.
- तिसरा मुद्दा म्हणजे ऑनलाइन माध्यमांवर महिलांनी शेअर केलेल्या अनुभवांना सुरुवातीला अतिशयोक्ती किंवा अविश्वसनीय म्हणून नाकारले जाण्याची प्रवृत्ती दिसली. अनेक मुख्य प्रवाहातील वृत्तस्रोतही नमूद करतात की या चर्चेतील अनेक कथने अजूनही unverified personal accounts आहेत.
- म्हणूनच या विषयावर लिहिताना केवळ सनसनाटीपणावर भर न देता risk communication, relationship safety आणि evidence hierarchy यांसारख्या घटकांना महत्त्व देणे आवश्यक ठरते. अशा दृष्टिकोनातूनच Alpine Divorce या ट्रेंडकडे पाहिल्यास सोशल मीडिया चर्चेच्या पलीकडे जाऊन त्यातील सामाजिक आणि सुरक्षिततेशी संबंधित मुद्दे अधिक स्पष्ट होतात.

बाह्य-सुरक्षेचा घटक: Ten Essentials
दुर्गम भागातील सुरक्षिततेविषयीच्या चर्चेत Leave No Trace संस्थेचे Ten Essentials हे तत्त्व महत्त्वाचे मानले जाते. संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोणतीही आउटडोअर ट्रिप किंवा ट्रेक करताना काही मूलभूत तयारी आवश्यक असते. यामध्ये navigation साधने (नकाशा किंवा कंपास), प्रकाशासाठी टॉर्च किंवा हेडलॅम्प, sun protection, first aid kit, आग पेटवण्याची साधने, repair kit, पुरेसे अन्न (nutrition), पाणी किंवा hydration, आणि emergency shelter यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो.
या तत्त्वामागील मुख्य कल्पना म्हणजे निसर्गात गेल्यावर प्रत्येक व्यक्तीने किमान काही प्रमाणात self-sufficiency (स्वावलंबन) राखणे आवश्यक आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने पूर्णपणे आपल्या जोडीदारावर किंवा सहकाऱ्यांवर अवलंबून राहू नये. दुर्गम किंवा धोकादायक परिसरात सुरक्षित राहण्यासाठी वैयक्तिक तयारी आणि स्वयंपूर्णता अत्यंत महत्त्वाची मानली जाते. याच कारणामुळे आउटडोअर सुरक्षिततेवरील चर्चा आणि Alpine Divorce या ट्रेंडमधील मुख्य मुद्दे एकमेकांशी जोडले जातात. कारण अशा परिस्थितीत योग्य तयारी आणि स्वावलंबन नसल्यास व्यक्ती अधिक असुरक्षित ठरू शकते.
Alpine Divorce ही सोशल मीडियावर व्हायरल झालेली एक अनौपचारिक संज्ञा असली, तरी तिच्या मागे एक गंभीर प्रश्न दडलेला आहे; धोकादायक किंवा दुर्गम परिसरात जोडीदाराला मागे सोडणे किती धोकादायक ठरू शकते? या ट्रेंडमुळे नातेसंबंधातील जबाबदारी, सुरक्षितता आणि परस्पर विश्वास यांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे कोणत्याही ट्रेक किंवा साहसी सहलीदरम्यान परस्परांची काळजी घेणे आणि वैयक्तिक तयारी ठेवणे ही सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते.
प्रमुख संज्ञा
- Alpine divorce: डोंगराळ/धोकादायक परिसरात पार्टनरला मागे सोडण्याच्या कृतीसाठी वापरली जाणारी अनौपचारिक सोशल-मीडिया संज्ञा.
- Intimate partner violence (IPV): रोमँटिक नात्यातील abuse किंवा aggression; यात physical, sexual, stalking आणि psychological aggression समाविष्ट असू शकतात.
- Coercive control: व्यक्तीचे स्वातंत्र्य, निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास कमी करण्यासाठी केलेले नमुनेबद्ध अत्याचारी नियंत्रण.
- Gross negligence manslaughter: अत्यंत निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूशी संबंधित फौजदारी जबाबदारीचा प्रकार- भारतात याला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा म्हटले जाते. ; ऑस्ट्रियातील २०२६च्या प्रकरणाच्या वृत्तांतात हा शब्दप्रयोग वापरला गेला.
