scorecardresearch

Premium

विश्लेषण : ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणजे काय? कोणत्या नियमांमुळे यंदाची ‘आयपीएल’ स्पर्धा ठरणार वेगळी?

IPL च्या यंदाच्या हंगामात काही नवे नियम या चाहत्यांचे लक्ष वेधून घेणार आहेत

What is an 'Impact Player'?
वाचा सविस्तर विश्लेषण

अन्वय सावंत

यंदाची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा अनेक अर्थांनी वेगळी ठरणार आहे. ‘आयपीएल’ने भारतीय क्रिकेटचे रुपडे तर पालटलेच, शिवाय जगभरातील ट्वेन्टी-२० लीगना वेगळे महत्त्व मिळवून दिले. त्यामुळे या स्पर्धेकडे जगभरातील क्रिकेटरसिकांची नजर असते. आता यंदाच्या हंगामात काही नवे नियम या चाहत्यांचे लक्ष वेधून घेणार आहेत. हे नियम कोणते आणि त्यांचा सामन्यांच्या निकालांवर काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा.

‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणजे काय?

यंदाच्या हंगामातील सर्वांत मोठा नियमबदल म्हणजे ‘इम्पॅक्ट प्लेयर’. ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणजेच प्रभावी खेळाडूचा नियम सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकेल. या नियमानुसार, संघांना सामन्यादरम्यान परिस्थितीनुसार एक खेळाडू बदलण्याची परवानगी असेल. या नियमाचा गेल्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत सर्व प्रथम प्रयोग करण्यात आला होता.

‘इम्पॅक्ट प्लेयर’चा नियम कसा वापरला जाणार?

‘आयपीएल’ संघांना एका सामन्यात चार परदेशी खेळाडू खेळवण्याची मुभा असते. परंतु सामन्याच्या सुरुवातीला संघात तीनच परदेशी खेळाडूंना स्थान दिल्यास ‘प्रभावी खेळाडू’ म्हणून सामन्यादरम्यान चौथा परदेशी खेळाडू मैदानावर आणण्याची संघाला परवानगी असेल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत परदेशी खेळाडूंचा आकडा चारपेक्षा अधिक होऊ शकत नाही, असे ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले आहे. अन्यथा संघांना केवळ भारतीय खेळाडूची ‘प्रभावी खेळाडू’ म्हणून निवड करता येईल. कर्णधाराला प्रभावी खेळाडूचे नाव सांगावे लागेल. डावाच्या सुरुवातीला, षटकाच्या समाप्तीनंतर, फलंदाज बाद झाल्यास किंवा फलंदाजाला दुखापतीमुळे बाहेर जावे लागल्यास प्रभावी खेळाडूला मैदानावर येता येईल. प्रभावी खेळाडू उर्वरित सामना खेळेल आणि तो ज्या खेळाडूची जागा घेईल, त्या खेळाडूला पुन्हा सामन्यात भाग घेता येणार नाही. तसेच प्रभावी खेळाडू कर्णधारपदही भूषवू शकणार नाही.

नाणेफेकीच्या निकालानंतर अंतिम संघाच्या घोषणेचा नियम काय?

यंदाच्या हंगामात कर्णधारांना नाणेफेकीच्या निकालानंतर आपला अंतिम ११ जणांचा संघ जाहीर करण्याची मुभा असणार आहे. ‘‘नाणेफेक झाल्यानंतर प्रत्येक कर्णधाराने ११ खेळाडू आणि जास्तीत जास्त पाच बदली खेळाडूंची नावे सामनाधिकाऱ्यांना लिखित स्वरूपात देणे बंधनकारक आहे. तसेच ही नावे दिल्यानंतर किंवा सामना सुरू होण्यापूर्वी संघामध्ये बदल करायचा झाल्यास त्यासाठी प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराची परवानगी घेणे गरजेचे आहे,’’ असे हा नियम सांगतो. सामान्यत: दोन्ही संघांचे कर्णधार अंतिम ११ जणांची यादी घेऊन नाणेफेकीच्या वेळी मैदानावर येतात. परंतु यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये नवा प्रयोग केला जाणार आहे. आता कर्णधारांना नाणेफेकीचा कौल लागल्यानंतर आपले अंतिम ११ खेळाडू निवडता येणार आहे. त्यामुळे खेळपट्टी आणि परिस्थितीचा विचार करून सामना सुरू होण्यापूर्वी अखेरच्या क्षणीही त्यांना संघात बदल करता येणार आहे. हा नियम यंदाच्या दक्षिण आफ्रिकेतील ट्वेन्टी-२० लीगमध्ये वापरण्यात आला होता.

‘डीआरएस’चा आता अन्य निर्णयांसाठीही वापर?

संघांना आता मैदानावरील पंचांनी दिलेल्या ‘व्हाईड’ आणि ‘नो-बॉल’च्या निर्णयांनाही आव्हान देण्यासाठी पंच निर्णय आढावा प्रणाली म्हणजेच ‘डीआरएस’चा वापर करता येणार आहे. नुकत्याच झालेल्या महिला प्रीमियर लीगमध्ये या नियमाचा प्रथम अवलंब करण्यात आला होता. चुरशीच्या झालेल्या सामन्यांमध्ये हा नियम निर्णायक ठरल्याचे पाहायला मिळाले होते.

यष्टिरक्षकाच्या हालचालींवर निर्बंध का?

यंदा ‘आयपीएल’ सामन्यांमध्ये फलंदाजाने चेंडू मारण्यापूर्वी यष्टिरक्षकाला हालचाल करण्यावर निर्बंध असेल. या परिस्थितीत पंच त्या चेंडूला रद्द (डेड बॉल) घोषित करतील. त्यानंतर गोलंदाजीच्या बाजूला असलेले पंच दंड म्हणून फलंदाजी करणाऱ्या संघाला एक धावा किंवा आवश्यकता भासल्यास पाच धावा बहाल करतील.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 08:47 IST

संबंधित बातम्या