Surge in killings of husbands in India राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. राजस्थानमध्ये घडलेल्या या घटनेत आणि गेल्या वर्षी मेघालयात घडलेल्या हत्याप्रकरणात साम्य आहे. राजस्थानमधील आशिष आणि अंजू हे नवविवाहित जोडपे फिरण्यासाठी बाहेर पडले असता एका वाहनाने त्यांना धडक दिली. आशिषचा जागीच मृत्यू झाला, तर अंजूने दागिने लुटले गेल्याचा आणि तिला रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सोडण्यात आल्याचा दावा केला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नवविवाहित पत्नी अंजू आणि तिचा सात वर्षांपासूनचा प्रियकर संजू यांनी ही हत्या अपघातासारखी वाटावी यासाठी कट रचला होता. संध्याकाळी फिरताना वाहनाने धडक दिल्याची तक्रार अंजूने केली होती, मात्र आशीषच्या जखमा गळा दाबल्याचे दर्शवत असल्याचे पोलिसांना आढळले. अलीकडे अशा घटनांचे प्रमाण वाढत असल्याचे बातम्यांमधून स्पष्ट दिसून येते. गेल्या काही वर्षांत अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडल्या आहेत, ज्यांनी लोकांना हादरवून सोडले आहे. संपूर्ण भारतात २०२५ मध्ये तर अशा भीषण हत्यांची मालिका पाहायला मिळाली आहे. या घटनांमध्ये वाढ का होत आहे? त्याविषयी मानसोपचार तज्ज्ञ काय सांगतात? जाणून घेऊयात…
अलीकडील हत्या प्रकरणे
राजस्थानमध्ये घडलेली घटना गेल्या वर्षी मेघालयात घडलेल्या एका हत्येसारखी आहे. मेघालयमध्ये राजा आणि सोनम रघुवंशी हे जोडपे हनिमूनला गेले होते. काही दिवसांनी पती राजा रघुवंशी मेघालयाच्या जंगलात मृतावस्थेत आढळला. तपासात असे समोर आले की, सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाह याच्याबरोबर पतीची हत्या करण्याचा बेत आखला होता. त्यांनी हनिमूनदरम्यान राजाला मारण्याचे ठरवले आणि त्याला अपघाताचे स्वरूप दिले.
मेरठमधील अशाच एका घटनेत सौरभ राजपूतचे तुकडे करून ते निळ्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून सिमेंटमध्ये गाडले गेले. मुख्य म्हणजे त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर हे सगळं घडताना तिथे उपस्थित होते. बिजनौरमध्ये एका व्यक्तीचा गळा दाबून त्याला मारण्यात आले. या प्रकरणातही पत्नीच्या प्रियकराने पतीची हत्या केली. अशा अनेक घटना गेल्या काही काळात घडल्या आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) २०२२ च्या अहवालानुसार, भारतात २०२२ मध्ये झालेल्या हत्येच्या कारणांमध्ये ‘प्रेमसंबंध’ हे तिसरे सर्वात मोठे कारण होते. अहवालानुसार, त्या वर्षी हत्येच्या प्रकरणांमागे पहिले कारण वाद, तर दुसरे कारण वैयक्तिक वैर होते.
मानसिक आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात?
मॅक्स हेल्थकेअरच्या मानसिक आरोग्य आणि वर्तन विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. समीर मल्होत्रा म्हणाले, “वाढती अनैतिकता, भावनिक दुर्लक्ष आणि विवाहबाह्य संबंध आदींचे प्रमाण वाढत आहेत. जेव्हा जोडपे माझ्याकडे थेरपीसाठी येतात, तेव्हा नाते अशा टप्प्यावर पोहोचलेले असते जिथून परत एकत्र बांधले जाणे अशक्य असते.” आता केवळ महिलाच येत नाहीत, तर अनेक पुरुष रडत येतात. काहीजण आत्महत्येचा प्रयत्न करतात. यातील काही पुरुष पूर्णपणे हतबल झालेले किंवा कायदेशीर कारवाईच्या धमक्या मिळालेले असतात. ते कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, ऑफिसमध्ये त्यांना भावनिक त्रास होतो,” असेही डॉ. समीर मल्होत्रा म्हणाले.
डॉक्टर सांगतात, जेव्हा लोक दुसऱ्याची हत्या करण्याचा निर्णय घेतात तेव्हा तो नेहमीच रागाच्या भरात घेतलेला नसतो. कधीकधी हे पूर्णपणे नियोजित असते. डॉ. मल्होत्रा यांनी पुढे सांगितले, “काहींसाठी याचे कारण दीर्घकाळापासून असलेला राग, नैराश्य आणि दुर्लक्ष असते. इतरांसाठी याचे कारण क्रूरता, मानसिक विकृती असते. अशा लोकांमध्ये पश्चात्तापाची भावना पूर्णपणे नाहीशी झालेली असते.” तज्ज्ञांनी असेही स्पष्ट केले की, जेव्हा कोणी जोडीदाराची हत्या करून मृतदेह लपवते, तेव्हा त्यांच्यासाठी हे त्या व्यक्तीचे अस्तित्व पुसून टाकण्याची त्यांची मानसिकता दर्शवते.
या कृती केवळ भीतीपोटी नसतात. त्यांनी सांगितले की, संबंधित व्यक्ती मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची, तो पिशवीत कसा भरायचा, ओळखू न येण्याइतपत कसा जाळायचा याचे बारकाईने नियोजन करू शकते. हे आता केवळ रागाच्या भरात केलेले गुन्हे राहिलेले नाहीत, असेही ते स्पष्ट करतात. मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट राशी सहाय यांनाही याच गोष्टी निदर्शनात आल्या. त्या म्हणाल्या, “अशा हत्या अनेकदा मानसिक आघात, भावनिक दुर्लक्ष किंवा स्वतःच्या अस्तित्वाचा एक परिणाम असतात. हे अचानक घडत नाही. अशा गोष्टी साचत जातात आणि मग त्याचा स्फोट होतो.”
राशी सहाय हिंसेपूर्वीच्या चार धोक्यांविषयी सांगतात, ज्याला त्या ‘फोर डी’ म्हणतात:
१. डेन्जर (धोका) – ती व्यक्ती स्वतःला किंवा दुसऱ्या व्यक्तीला दुखापत करू शकते.
२. डेव्हियन्स (विचलन) – त्यांना सामाजिक भान राहत नाही.
३. डिस्पांक्शन (अकार्यक्षमता) – ते सामान्यपणे वागण्यास सक्षम नसतात.
४. डिस्ट्रेस (दुःख/वेदना) – त्यांना तीव्र वेदना होत असतात, ज्या ते शब्दांत मांडू शकत नाहीत किंवा त्यातून सुटू शकत नाहीत.
हे इशारे स्पष्ट असूनही, फार कमी लोक त्यांना गांभीर्याने घेतात, असे त्या सांगतात.
लोक आपल्या जोडीदाराची हत्या का करत आहेत?
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. कृती भार्गव म्हणाल्या की, एखाद्याला हिंसा करण्यास प्रवृत्त करणारी गोष्ट साधी असते. “त्यांच्यानुसार समोरच्याला शिक्षा देण्यातून त्यांना समाधान मिळते. जोडीदारापासून वेगळे होण्यासाठी भावनिक प्रगल्भता लागते आणि ती बहुतेकांकडे नसते.” अनेक लोकांना हिंसा हाच न्याय वाटतो, असेही त्या सांगतात. “पत्नीने स्वातंत्र्य मिळवणे असो किंवा पतीचा विश्वासघात असो, यामुळे त्यांना धक्का बसतो. मग ती गोष्ट त्यांच्यासाठी अपमान आणि बदल्याची होत जाते,” असे त्या स्पष्ट करतात.
डॉ. भार्गव यांनी स्पष्ट केले की, पुरुष आणि स्त्रिया यांची हत्या करण्याची कारणे वेगवेगळी असतात. साधारणपणे पुरुष सत्ता, हक्क आणि अपमानासाठी हत्या करतात. स्त्रिया जेव्हा स्वतःला धोक्यात समजतात, हताश होतात किंवा वर्षानुवर्षे अत्याचार सहन करतात तेव्हा हत्या करतात.” तरीही समाज पिडीत पुरुषांकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष करतो. ज्या पुरुषांचा बंद दाराआड भावनिकदृष्ट्या छळ होतो, ते मूकपणे हा छळ सहन करत असतात.
डॉ. सहाय म्हणाल्या, “जोडप्यांचे समुपदेशन केले पाहिजे, पण ते दंडात्मक नसून आश्वासक असणे महत्त्वाचे आहे. डॉ. मल्होत्रा म्हणाले, “आपल्याला लोकांना केवळ गणित आणि विज्ञान नाही, तर भावनिक नियंत्रण शिकवण्याची गरज आहे. सध्या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या कौशल्यांची मोठी पोकळी निर्माण झाली आहे.” डॉ. मल्होत्रा म्हणाले, “लोक आता ऐकून घेत नाहीत, ते समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. नाती आता भावनिक राहिली नसून ती व्यवहारासारखी झाली आहेत.”
