Blackout Challenge Social Media Trend : करोना महामारीच्या काळात प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल किंवा लॅपटॉप दिसायला लागला. शाळाच ऑनलाइन असल्यामुळे लहान मुलांसाठी ही उपकरणे जणू हक्काचीच झाली. त्यादरम्यानच्या काळात अनेकांना मोबाईलवर गेम खेळण्याचे जणू व्यसनच लागले. महामारी संपल्यानंतरही लहान मुलांवरील डिजिटल उपकरणांचा प्रभाव तसाच राहिला. परिणामी समाजमाध्यमांवर व्हायरल होणाऱ्या जीवघेण्या ट्रेंड्सने निष्पाप मुलांचे बळी घेतले. असाच काहीसा प्रकार अमेरिकेच्या टेक्सास शहरात घडला. टिकटॉकवरील ब्लॅकआऊट चॅलेंज खेळताना एका नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेने जगभरातील पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेमका हा जीवघेणा ट्रेंड आहे तरी काय? त्याविषयीचा हा आढावा…

नेमके काय आहे प्रकरण?

टेक्सास शहरात राहणारी जॅकलिन कर्टिस ही नऊ वर्षीय चिमुकली घरासमोरील अंगणात बेशुद्धावस्थेत आढळून आली. तिच्या गळ्याभोवती एक दोरी गुंडाळलेली होती. ही बाब लक्षात येताच पालकांनी तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर जॅकलिनला मृत घोषित केले. वैद्यकीय अहवालात तिचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. जॅकलिन सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ‘ब्लॅकआऊट चॅलेंज’ पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत होती. हा धोकादायक ट्रेंड लहान मुलांमध्ये पसरत असून, यापूर्वीही त्याने अगदी पाच वर्षांच्या मुलांचाही जीव गेला असल्याचे सांगितले जात आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर जॅकलिनचे वडील कर्टिस ब्लॅकवेल यांनी सोशल मीडियाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. मुलांच्या हातात मोबाईल दिल्यानंतर ते सुरुवातीला अगदी सुरक्षित (किड-फ्रेंडली) व्हिडीओ पाहत असतात; पण त्यानंतर या प्लॅटफॉर्म्सचे ‘अल्गोरिदम’ त्यांना पूर्णपणे वेगळे आणि धोकादायक कंटेंट दाखवू लागते. त्यामुळेच मुलांच्या हातात मोबाईल देताना पालकांनी काळजी घ्यायला हवी, असे त्यांनी ‘सीबीएस न्यूज’ला सांगितले.

काय आहे ब्लॅकआऊट चॅलेंज?

‘ब्लॅकआऊट चॅलेंज’हा सोशल मीडियावर पसरलेला एक अत्यंत जीवघेणा आणि धोकादायक प्रकार आहे. त्याला ‘चोकिंग गेम’ किंवा ‘पास-आऊट चॅलेंज’ असेही म्हटले जाते. या आव्हानामध्ये सहभागी होणारी व्यक्ती जाणीवपूर्वक स्वतःचा गळा आवळते किंवा श्वास रोखून धरते. मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा थांबवून बेशुद्ध पडण्यापूर्वी मिळणारी एक विशिष्ट प्रकारची ‘धुंदी’ अनुभवण्याचा प्रयत्न त्यामार्फत केला जातो. हा धोकादायक प्रकार तसा अनेक दशकांपासून अस्तित्वात आहे. मात्र, आता सोशल मीडिया अल्गोरिदममुळे तो लाखो लहान मुलांपर्यंत आणि तरुणांपर्यंत पोहोचत आहे. विशेषत: मोबाईलवर गेम खेळणाऱ्या लहान मुलांच्या फीडमध्ये वारंवार ब्लॅकआऊट चॅलेंजचे व्हिडीओ दाखवले जातात. परिणामी जीवघेण्या जोखमीची कल्पना येत नसल्याने अनेक जण त्यातील स्टंट कुतूहलापोटी करून पाहतात.

आणखी वाचा : Cognitive Shuffling : मेंदूला शांत करून झोप आणणारे हे खास तंत्र तुम्हाला माहितीये का? संशोधन काय सांगते?

‘ब्लॅकआऊट चॅलेंज’ जीवघेणे का ठरते?

‘ब्लॅकआऊट चॅलेंज’ या आव्हानामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीने आपला श्वास रोखल्यानंतर अवघ्या काही सेकंदांत त्याची शुद्ध हरपते. एकदा का मूल बेशुद्ध पडले की, गळ्याभोवती असलेला फास किंवा श्वास रोखणारी वस्तू त्याला स्वतःहून काढणे शक्य नसते. परिणामी ऑक्सिजन न मिळाल्यास अवघ्या काही मिनिटांत त्या व्यक्तीचा मेंदू निकामी होण्याचा धोका वाढतो. ऑक्सिजनचा पुरवठा दीर्घकाळ खंडित राहिल्यास काही वेळातच मृत्यूही होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पालकांनी आपापल्या मुलांच्या ऑनलाइन हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवणे आणि त्यांना अशा धोकादायक ट्रेंड्सबाबत जागरूक करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मृत्यूचा आकडा काय सांगतो?

‘ब्लॅकआऊट’ किंवा ‘चोकिंग गेम’ हा प्रकार किती प्राणघातक आहे, हे नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते, स्मार्टफोनच्या युगापूर्वी म्हणजे १९९५ ते २००७ या काळात ६ ते १९ वयोगटातील ८२ मुलांचा ‘चोकिंग गेम’मुळे मृत्यू झाला होता. अलीकडील आकडेवारीनुसार, ‘ब्लॅकआऊट चॅलेंज’मुळे सुमारे ८० मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या मृत्यूंमध्ये बहुतेक लहान मुले आणि किशोरवयीनांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. २०२२ मध्ये केवळ १८ महिन्यांच्या कालावधीत किमान २० मुलांचा या चॅलेंजचे आव्हान पेलण्याचा प्रयत्न करताना मृत्यू झाला.त्यापैकी १५ मुले १२ वर्षे किंवा त्याहून कमी वयाची होती, असे ‘ब्लूमबर्ग बिझनेस वीक’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे. काही सामाजिक संस्थांच्या मते, प्रत्यक्ष मृतांचा आकडा यापेक्षा कितीतरी जास्त असू शकतो. कारण- अनेक प्रकरणांमध्ये या मृत्यूंचे वर्गीकरण फक्त आत्महत्या म्हणून केले जाते. प्रत्यक्षात मात्र ते या जीवघेण्या सोशल मीडिया चॅलेंजचा बळी ठरलेले असतात.

हेही वाचा : सोन्याचे दागिने आणि गाड्या विकून इराणला मदत; जम्मू-काश्मीरमध्ये नेमकं चाललंय तरी काय?

‘ब्लॅकआऊट चॅलेंज’ प्रकरणांवरून वाद

‘ब्लॅकआऊट चॅलेंज’मुळे आपल्या मुलांचा बळी गेल्याचा आरोप करीत अनेक पालकांनी ‘टिकटॉक’ विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. या खटल्यांमधून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पीडित मुलांच्या फोनच्या फॉरेन्सिक तपासणीत असे दिसून आले आहे की, मृत्यूपूर्वी त्यांनी ‘टिकटॉक’वर तासन् तास ‘ब्लॅकआऊट चॅलेंज’चे व्हिडीओ पाहिले होते. दुसरीकडे ‘टिकटॉक’ने आपल्या बाजूने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ‘ब्लॅकआऊट चॅलेंज’ ट्रेंड होत असल्याचा कोणताही पुरावा नाही. तसेच, अशा शब्दांचा शोध घेण्यावर त्यांनी बंदी घातली आहे. त्याशिवाय नियमांचे उल्लंघन करणारा आशयही काढून टाकण्यात आला आहे. सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक गोष्ट सुरक्षित नसते, हे पालकांनी मुलांना समजावून सांगायला हवे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.