Supreme Court Hearing on Brain Death Process : एखाद्या व्यक्तीला ‘ब्रेन डेड’ घोषित करण्यासाठी ईईजी आणि एंजियोग्राम यांसारख्या चाचण्यांची आवश्यकता आहे का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान मंगळवारी उपस्थित केला. याबाबत एम्स रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे मत विचारात घेतले जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. केरळमधील डॉक्टर एस. गणपती यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायमूर्तींच्या द्विसदस्यीय खंडपीठाने ही भूमिका मांडली. ‘ब्रेन डेड’ घोषित करण्याच्या प्रक्रियेत कथित गैरप्रकार होत असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. त्याशिवाय ब्रेन डेड निश्चित करण्यासाठी वापरली जाणारी सध्याची ‘अप्निया टेस्ट’ काही प्रमाणात व्यक्तीनिष्ठ असू शकते. तसेच, या चाचणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे कायद्याने बंधनकारक असूनही अनेकदा त्याचे पालन केले जात नाही, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ब्रेन डेड म्हणजे नेमके काय? त्यासाठी कोणती प्रक्रिया पाळली जाते? त्याविषयीचा हा आढावा…
ब्रेन डेड म्हणजे नेमके काय?
वैद्यकीय भाषेत ‘ब्रेन डेड’ हा शब्द वारंवार वापरला जातो; पण सर्वसामान्यांसाठी ही संकल्पना आजही काहीशी गुंतागुंतीची आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रक्रियेवर तज्ज्ञांचे मत मागवल्यानंतर त्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ‘ब्रेन डेड’ ही एक अशी स्थिती आहे, जिथून रुग्ण पुन्हा कधीही शुद्धीवर येऊ शकत नाही. यामध्ये मेंदूची सर्व कार्ये पूर्णपणे थांबलेली असतात. अगदी मेंदूच्या देठाद्वारे नियंत्रित केल्या जाणाऱ्या श्वासोच्छवासासारख्या नैसर्गिक क्रियाही बंद होतात. अशा रुग्णांना व्हेंटिलेटरसारख्या कृत्रिम यंत्रणेच्या आधारे जिवंत ठेवले जाते. त्यांचा श्वास आणि रक्ताभिसरणाची प्रक्रिया मशीनच्या मदतीने सुरू असते. प्रामुख्याने भीषण रस्ते अपघात किंवा उंचावरून पडल्यामुळे मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने ही स्थिती ओढावते. तांत्रिकदृष्ट्या हा मृत्यूच असतो आणि अशा रुग्णाला पुन्हा जिवंत करणे अशक्य असते.
ब्रेन डेड घोषित करण्याची प्रक्रिया काय?
एखाद्या रुग्णाला ब्रेन डेड घोषित करणे ही अत्यंत संवेदनशील आणि कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यासाठी भारताच्या ‘नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’ या सर्वोच्च संस्थेने कडक मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. नियमांनुसार, कोणत्याही रुग्णाला ब्रेन डेड घोषित करण्यासाठी चार सदस्यांचे एक वैद्यकीय बोर्ड असणे अनिवार्य आहे. त्यामध्ये संबंधित रुग्णालयाचे प्रभारी प्रमुख, रुग्णावर उपचार करणारा मुख्य डॉक्टर आणि प्रशासनाकडून नियुक्ती झालेला आणखी एक तज्ज्ञ डॉक्टर यांचा समावेश असतो. रुग्णाच्या मेंदूची कार्यक्षमता पूर्णपणे आणि कायमस्वरूपी थांबली आहे का, याची खात्री करण्यासाठी हे पथक १२ तासांच्या अंतराने दोन वेळा रुग्णाची सखोल तपासणी करते. काही प्रकरणांमध्ये ही खात्री करण्यासाठी तीन वेळाही तपासणी केली जाते. ब्रेन डेड घोषित करण्यापूर्वी डॉक्टरांना रुग्णाची ही स्थिती कोणत्या आजारामुळे किंवा अपघातामुळे झाली, याचीही तपासणी करावी लागते. अल्कोहोलचे सेवन, अमली पदार्थांचा वापर, शरीराचे तापमान अत्यंत कमी होणे, चयापचयाचे असंतुलन बिघडणे यांसारखी कारणे असतील तर संबंधित रुग्णाला ब्रेन डेड घोषित करता येत नाही.
रुग्णांच्या शरीराची कशी तपासणी केली जाते?
ब्रेन डेड घोषित करण्यापूर्वी डॉक्टरांचे पथक संबंधित रुग्णाच्या शरीरातील नैसर्गिक क्रियांची तपासणी करतात. रुग्णाचे डोळे प्रकाशाला प्रतिसाद देतात का, मान फिरवल्यावर त्याच्या डोळ्यांची हालचाल होते का, वेदनांना काही प्रतिसाद मिळतो का, घशातील हालचाली सुरू आहेत का, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, व्हेंटिलेटर काढल्यावर रुग्ण स्वतःहून श्वास घेतो का, याची तपासणी केली जाते. नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयाच्या न्यूरोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. मंजरी त्रिपाठी यांनी सांगितले की, ब्रेन डेड घोषित करण्यापूर्वी आम्ही कायद्याने ठरवून दिलेल्या अत्यंत कडक नियमांचे पालन करतो. सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विविध ‘बेडसाईड’ चाचण्या पुरेशा आहेत, त्यामध्ये ईईजी किंवा एंजियोग्रामसारख्या चाचण्या अनिवार्य करण्यात आलेल्या नाहीत.
ईईजी आणि एंजियोग्राम म्हणजे काय?
ईईजी ही चाचणी मेंदूमधील विद्युत संकेत तपासण्यासाठी केली जाते. यामध्ये रुग्णाच्या डोक्यावर लहान इलेक्ट्रोड्स लावून त्याच्या मेंदूची क्रियाशीलता मोजली जाते. जर रुग्ण ब्रेन डेड अवस्थेत असेल, तर या चाचणीत मेंदूमध्ये कोणतीही विद्युत हालचाल नसल्याचे दिसून येते. एंजियोग्राम ही चाचणी मात्र मेंदूकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहाची तपासणी करते. त्यात विशिष्ट ‘डाय’ (रंगद्रव्य) आणि क्ष-किरणांचा वापर करून रुग्णाच्या मेंदूतील रक्तप्रवाहाची तपासणी केली जाते. जर रुग्ण ‘ब्रेन डेड’ असेल, तर मेंदूला होणारा रक्तपुरवठा पूर्णपणे थांबल्याचे या चाचणीतून स्पष्ट होते. सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बेडसाईड चाचण्या करून ब्रेन डेडचा अंदाज लावता येतो, मात्र ईईजी आणि एंजियोग्राम यांसारख्या चाचण्या त्याचे अंतिम निर्णायक पुरावे ठरू शकतात.
नवीन चाचण्यांच्या वापरातील अडचणी काय?
ब्रेन डेडसाठी निर्णायक पुरावे ठरणाऱ्या ईईजी आणि एंजियोग्राम या चाचण्या अचूक असल्या तरी त्या सगळीकडे बंधनकारक करण्यात काही व्यावहारिक अडचणी आहेत. तज्ज्ञांच्या मते, ईईजी आणि एंजियोग्रामची सुविधा केवळ मोठ्या किंवा सुपर-स्पेशालिटी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असते. जर या चाचण्या अनिवार्य केल्या, तर निमशहरी किंवा ग्रामीण भागातील रुग्णालयांना ब्रेन डेड घोषित करणे कठीण होऊ शकते. परिणामी आधीच कमी असलेले मृतांच्या अवयवदानाचे प्रमाण आणखीनच घटू शकते. त्याशिवाय या चाचण्यांच्या सुविधा प्रामुख्याने मोठ्या, तृतीय स्तरावरील आणि सुपर-स्पेशालिटी रुग्णालयांमध्येच उपलब्ध असतात. देशभरातील अनेक लहान रुग्णालयांमध्येही अवयव प्रत्यारोपण किंवा अवयव संकलन केंद्रे आहेत.
ब्रेन डेड प्रमाणपत्र देण्यातील आव्हाने
केवळ तांत्रिक चाचण्याच नव्हे, तर डॉक्टरांमधील माहिती आणि प्रशिक्षणाचा अभाव हेदेखील ब्रेन डेड घोषित न करण्यामागचे एक मोठे आव्हान आहे. ‘एम्स’च्या डॉक्टरांनी केलेल्या एका अभ्यासानुसार, ५० टक्क्यांपेक्षा जास्त डॉक्टरांना (ज्यात न्यूरोसर्जन आणि क्रिटिकल केअर तज्ज्ञांचा समावेश आहे) त्यांच्या पदवी शिक्षणादरम्यान ‘ब्रेन डेड’ प्रमाणिकरणाचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण मिळाले नव्हते. याशिवाय, रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या पदव्युत्तर डॉक्टरांच्या प्रशिक्षणातही सातत्य नसल्याचे आढळले. सुमारे तीन-चतुर्थांश डॉक्टर रुग्णालयांमध्ये कार्यरत असूनही त्यापैकी केवळ १० टक्के डॉक्टरांनाच नियमितपणे ब्रेन डेथ प्रमाणाचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे अभ्यासातून समोर आले, तर एक-तृतीयांशहून अधिक डॉक्टरांनी त्यांच्या संस्थांमध्ये यासाठी ठराविक अभ्यासक्रमच नसल्याचे स्पष्ट केले. एकंदरीत ‘ब्रेन डेड’ प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तांत्रिक चाचण्यांबरोबरच डॉक्टरांचे योग्य प्रशिक्षण आणि निमशहरी भागातील आरोग्य सुविधांचा विकास करणे हे मोठे आव्हान सरकारसमोर असणार आहे.
