Bunker Buster Bomb इराण-इस्रायल संघर्ष वाढत चालला आहे. दोन्ही बाजूंनी होणाऱ्या हल्ल्यांमुळे वातावरण चिघळले आहे आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये इराणमध्ये किमान २२४ लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तेहरानचे उच्च लष्करी कमांडर, अणुशास्त्रज्ञ आणि नागरिकांचा समावेश आहे. तसेच इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार इराणच्या हल्ल्यात किमान २४ लोकांचा मृत्यू झाला आहे.

इस्रायल सातत्याने इराणमधील लष्करी तळांना लक्ष्य करत आहे. इस्रायलला इराणमधील सर्व आण्विक केंद्रे नष्ट करायची आहेत. त्यासाठी इस्रायलला अमेरिका निर्मित GBU-57A/B मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर (MOP) बंकर बस्टर बॉम्ब हवा आहे. हा बॉम्ब जमिनीच्या आत शिरून लक्ष्यावर हल्ला करण्यास सक्षम आहे. काय आहे बंकर बस्टर बॉम्ब? हा बॉम्ब किती शक्तिशाली? इस्रायलला या बॉम्बची गरज का आहे? त्याविषयी जाणून घेऊया.

इराण-इस्रायल संघर्ष वाढत चालला आहे. दोन्ही बाजूंनी होणाऱ्या हल्ल्यांमुळे वातावरण चिघळले आहे. (छायाचित्र-रॉयटर्स )

काय आहे बंकर बस्टर बॉम्ब?

  • GBU-57A/B मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर म्हणजेच बंकर बस्टर बॉम्बची रचना बोईंगने केली आहे.
  • त्यानंतर अमेरिकन हवाई दलाने हा बॉम्ब तयार केला आहे.
  • हा बॉम्ब अमेरिकन हवाई दलाकडे असणारा सर्वात शक्तिशाली नॉन-न्यूक्लियर बॉम्ब असल्याचे म्हटले जाते. जीपीएसचा वापर करून हा बॉम्ब लक्ष्यावर अचूक मारा करतो.
  • हा बॉम्ब जमिनीखाली खोलवर शत्रूच्या बंकरवर मारा करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
  • बॉम्ब डिझाइन करण्याचे काम २००० च्या दशकाच्या सुरुवातीला सुरू झाले होते.

नॉर्थ्रोप ग्रुमन आणि लॉकहीड मार्टिन यांच्या अंतर्गत हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता, मात्र आर्थिक आणि तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प रद्द करण्यात आला. २००३ मध्ये अमेरिकेने इराकवर हल्ला केला आणि त्यानंतर या प्रकल्पात पुन्हा रस निर्माण झाला. याचे कारण म्हणजे, इराकवर हल्ला केल्यानंतर अमेरिकन सैन्य त्यांचे बंकर फोडण्यात अयशस्वी ठरत होते. हा प्रकल्प डिफेन्स थ्रेट रिडक्शन एजन्सी (डिटीआरए) अंतर्गत पुन्हा सुरू करण्यात आला. ‘डिटीआरए’ने एअर फोर्स रिसर्च लॅबोरेटरीबरोबर मिळून २००४ मध्ये सुरुवातीच्या चाचण्या केल्या. GBU/57B च्या पहिल्या स्टॅटिक डिटोनेशन चाचण्या २००७ मध्ये घेण्यात आल्या. न्यू मेक्सिकोमधील व्हाईट सँड्स मिसाईल रेंजमध्ये या बॉम्बची चाचणी करण्यात आली. २००८ ते २०१० पर्यंत B-52 आणि B-2 बॉम्बर्समधून वारंवार बॉम्ब टाकण्यात आला. हा प्रकल्प २०११ मध्ये, अमेरिकन हवाई दलाकडे सोपवण्यात आला.

बॉम्बची तांत्रिक वैशिष्ट्ये काय?

GBU-57A/B मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनिट्रेटरचे वजन सुमारे १४,००० किलो आहे, म्हणजेच हे वजन सुमारे दोन आफ्रिकन हत्ती इतके असल्याचा अंदाज आहे. या बॉम्बची लांबी सुमारे २०.५ फूट आणि त्याचा व्यास ३१.५ इंच आहे. त्यातील वॉरहेडमध्ये AFX-757 आणि PBXN-114 स्फोटकांचा समावेश आहे. त्याचे वजन सुमारे २,५०० किलोग्राम आहे. बॉम्बच्या भेदक क्षमतेबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. काहींनी असे नमूद केले आहे की, हा बॉम्ब २०० फूट काँक्रीटला छेदू शकतो, तर काहींचे म्हणणे आहे की बॉम्ब ६० मीटर काँक्रीट तसेच ४० मीटर खडकाळ भागाला छेदू शकतो. या बॉम्बचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील स्मार्ट फ्यूज बॉम्बचा लगेच स्फोट होत नाही. जमिनीखाली शिरल्यानंतरच या बॉम्बचा स्फोट होतो.

अमेरिका या बॉम्बसाठी एका नवीन स्मार्ट फ्यूजवर काम करत असल्याचे म्हटले जाते, परंतु अद्याप त्याविषयीची कोणतीही माहिती नाही. हा बॉम्ब लक्ष्य शोधण्यासाठी आणि लॉक करण्यासाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम/इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टम (GPS/INS)चा वापर करतो. ते काही मीटरच्या आत अचूक असल्याचे म्हटले जाते. GBU-57A/B मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनिट्रेटर केवळ B-2 बॉम्बर्सद्वारेच लाँच केले जाऊ शकते. तज्ज्ञांचे असे सांगणे आहे की, हे बॉम्ब त्यांच्या वजनामुळे इतर विमानांनी वाहून नेण्यासाठी खूप जड असतात. अमेरिकी सैन्यासाठी ही एक समस्या आहे, कारण त्यांच्याकडे केवळ १९ B-2 बॉम्बर्स आहेत. B-2 एकाच वेळी दोन बॉम्ब वाहून नेऊ शकते. मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनिट्रेटरचे पाच प्रकार आहे, त्यातीलच एक प्रकार म्हणजे GBU-57F/B.

इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिका GBU-57 चा वापर करणार का?

सध्या फक्त अमेरिकेकडे GBU-57 आणि B-2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर दोन्ही आहेत. B-2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर हे बॉम्ब वाहून नेण्यास सक्षम असलेले एकमेव विमान आहे. इस्रायलकडे अचूक हल्ला करण्यासाठी लष्करी कौशल्य आणि हवाई क्षमता आहे, परंतु त्यांच्याकडे या विशिष्ट युद्धसामग्रीचा अभाव आहे. अमेरिकेतील मिसूरी येथील व्हाईटमन एअर फोर्स बेसवर असलेल्या B-2 स्टेल्थ बॉम्बरची चाचणी करण्यात आली आहे. त्यानुसार हे विमान दोन GBU-57 बॉम्ब वाहून नेण्यास सक्षम आहे. परंतु, याचा वापर झाल्यास परिस्थिती विकोपाला जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलच्या कारवायांना पाठिंबा दर्शविला आहे आणि इराणला इशारा दिला आहे, परंतु त्यांनी GBU-57 वापरण्याची जाहीर घोषणा केलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फोर्डोसारख्या अणुसुविधेवर या हल्याचे काय परिणाम होणार?

अणुसुविधेवर हल्ला करणे केवळ लष्करासाठीच नव्हे तर नागरी सुरक्षितता, पर्यावरण आणि जागतिक अणुप्रसार नियमांना मोठे धोके निर्माण करण्यासारखे आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (आयएईए)ने अशा कृतींविरुद्ध स्पष्ट इशारा दिला आहे. १३ जून रोजी जारी केलेल्या निवेदनात, ‘आयएईए’चे महासंचालक राफेल मारियानो ग्रोसी म्हणाले, “अशा हल्ल्यांचे अणुसुरक्षा, सुरक्षा, तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेवर गंभीर परिणाम होतात.”