धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावी कात टाकणार आहे. भविष्यात तेथे उभ्या राहणाऱ्या बहुमजली इमारती, वाढणारी लोकसंख्या, वर्दळ, रहदारी लक्षात घेता धारावीमधील वाहतूक व्यवस्था सबळ करण्याची नितांत गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने धारावीत ‘मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब’ अर्थात बहुद्देशीय वाहतूक केंद्र विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. धारावीतील हा प्रकल्प नेमका काय आहे आणि या प्रकल्पाची जबाबदारी कोणत्या सरकारी यंत्रणेकडे देण्यात आली आहे याचा हा आढावा…
धारावी पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात?
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचा कायापालट करण्याची संकल्पना पुढे आली. ही संकल्पना २००४ मध्ये कागदावर उतरली आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र २०२४ पर्यंत हा प्रकल्प प्रत्यक्ष मार्गी लागला नव्हता. आता मात्र या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) माध्यमातून पुनर्विकास मार्गी लावण्यात येत आहे, या प्रकल्पाचे कंत्राट अदानी समूहाला देण्यात आले आहे. रेल्वेच्या जागेवर घरे बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे नुकतीच डीआरपीने गणेश नगर, मेघवाडी झोपडपट्टीतील ५०५ झोपडीधारकांचे प्रारूप परिशिष्ट – २ प्रसिद्ध केले असून एकूणच आता पुनर्विकास वेग घेणार आहे. या पुनर्विकासाअंतर्गत पात्र झोपडीधारकांना ३५० चौरस फुटांची घरे देण्यात येणार आहेत. तर वरच्या मजल्यावरील आणि इतर अपात्र रहिवाशांना धारावीबाहेर विविध ठिकाणी भाडेतत्त्वावरील घरांच्या योजनेत समावून घेतले जाणार आहे. व्यावसायिकांचे धारावीतच पुनवर्सन केले जाणार आहे. गेल्या वर्षीपासून पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात झाली असून पुनर्विकासाचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. हा पुनर्विकास प्रकल्प १७ वर्षांमध्ये पूर्ण करणे बंधनकारक आहे. सात वर्षांमध्ये पुनर्वसित इमारतींचे बांधकाम पूर्ण करून रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. तर उर्वरित विक्री घटकांसह इतर कामे पूर्ण करण्यासाठी १० वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.
धारावीचा कायापालट?
अदानी समूहाच्या नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडने तयार केलेला धारावीच्या पुनर्विकासाचा आराखडा नुकताच सादर करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार धारावीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास केला जाणार आहे. धारावीच्या मध्यभागी एक मोठी खुली जागा तयार केली जाणार असून या जागेचा वापर सण-सभारंभ, कार्यक्रमांसाठी करता येणार आहे. तर मोठी, छोटी उद्याने, सार्वजनिक आणि हरित जागा विकसित केल्या जाणार आहेत. उपहारगृहे, कॅफे, बाजारपेठ आणि इतर सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. सायकल आणि पादचारी मार्ग बांधले जाणार आहेत. शाळा, आरोग्य सेवा, समुदाय केंद्र अशा सुविधांचाही यात समावेश आहे. व्यावसायिक संकुले बांधली जाणार असून लिव्ह-वर्क पद्धतीला प्राधान्य दिले जाणार आहे. मिठी नदीच्या काठाशी एक सुंदर धारावी प्रोमनेड तयार केले जाणार असून मरिन ड्राईव्हनंतर मुंबईतील सर्वात मोठा हा वाॅक वे असेल, असा दावा केला जात आहे. धारावीचा कायापालट करण्याच्या दृष्टीने आराखड्यात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत.
धारावीतील गर्दी वाढणार?
पुनर्विकासाच्या अनुषंगाने भविष्यात धारावीत राहणाऱ्यांची आणि धारावीत नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने येणार्यांची गर्दी वाढणार आहे. अशा वेळी धारावीतील अंतर्गत रस्ते, वाहतूक व्यवस्था अपुरी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. धारावी पुनर्विकासाअंतर्गत सुमारे २१ किमी लांबीचे नवीन रस्ते बांधण्यात येणार असून अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. दर १२५ मीटर अंतरावर एक जोडरस्ता उभारण्यात येणार आहे. तो विविध वसाहतींना एकमेकांशी जोडणार आहे. बांधण्यात येणारे नवीन रस्ते आणि रस्त्यांचे रुंदीकरण केले तरी धारावीत येण्या-जाण्यासाठी वाहतूक व्यवस्थेचे विविध पर्याय असणे आवश्यक आहे. धारावीत मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या (एमएमआर) कानाकोपऱ्यातून येणार्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहुद्देशीय वाहतूक व्यवस्थेद्वारे धारावी मुंबई, एमएमआरशी जोडणे आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेऊन धारावी पुनर्विकास आराखड्यात यासाठी एक महत्त्वपूर्ण तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार धारावीत मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब अर्थात बहुद्देशीय वाहतूक केंद्र विकसित करण्यात येणार आहे.
मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब म्हणजे काय?
धारावीत अंतर्गत रस्ते मजबूत करण्याचे काम धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत केले जाणार आहे. मात्र त्यानंतरही धारावीला मेट्रो, रेल्वे, बेस्ट आदी वाहतूक व्यवस्थेने जोडणे गरजेचे आहे. त्यामुळेच धारावीत बहुद्देशीय वाहतूक केंद्र विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या पुनर्विकास प्रकल्पात मेट्रो, रेल्वे, बेस्टसह अन्य वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून धारावीला मुंबई आणि एमएमआरशी जोडण्यात येणार आहे. भविष्यात ‘मेट्रो २ ब’, ‘मेट्रो ३’, ‘मेट्रो ८’ आणि ‘मेट्रो ११’ला धारावी जोडण्यात येणार आहे. तर बीकेसी बुलेट ट्रेन स्थानक, मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला थेट धारावीशी जोडण्यासाठी पर्सनल रॅपिड ट्रान्झिट नेटवर्कचा विस्तार केला जाणार आहे. बेस्टची वाहतूक व्यवस्थाही मजबूत केली जाणार आहे. धारावीत भविष्यात मेट्रो, रेल्वे, बेस्ट सेवा आणि इतर वाहतूक व्यवस्थेचे सर्व पर्याय उपलब्ध होणार असून धारावीत येणे-जाणे अधिक सोपे होणार आहे.
एमएमआरडीएवर जबाबदारी
धारावीत बहुद्देशीय वाहतूक केंद्र विकसित करण्याचा निर्णय धारावी पुनर्विकास आराखड्याअंतर्गत घेण्यात आला आहे. मात्र हे बहुद्देशीय वाहतूक केंद्र कोण विकसित करणार असा प्रश्न होता. गृहनिर्माण विभागाने याची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) सोपविण्यासंबंधीचा एक प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला होता. हा प्रस्ताव मान्य करून १८ जून रोजी सरकारने या प्रकल्पासाठी एमएमआरडीएची नोडल एजन्सी अर्थात समन्वय संस्था म्हणून नियुक्ती केली. त्यानुसार आता धारावीत बहुद्देशीय वाहतूक केंद्र कसे विकसित करण्याबाबतचा आराखडा एमएमआरडीए तयार करणार आहे. हा आराखडा अंतिम झाल्यानंतरच धारावीला मेट्रो, रेल्वे, बेस्ट आणि इतर वाहतूक व्यवस्थेने कसे जोडले जाणार हे स्पष्ट होणार आहे.