Diphallia Penile Duplication Rare Medical Case: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पाकिस्तानमधील एका बाळाच्या जन्माची पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या बाळाचा जन्म दोन लिंगांसह (penile duplication) झाला असून त्याला गुदद्वारही नव्हते. मात्र, ही घटना अलीकडची नसून २०२३ मधील आहे, हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. वैद्यकीय दृष्टिकोनातून ही अत्यंत दुर्मिळ जन्मजात विकृती असून, सुमारे सहा दशलक्ष बाळांपैकी एका बाळामध्ये अशी अवस्था आढळते. जगभरात आतापर्यंत अशा १००-१२० प्रकरणांचीच नोंद आहे.
डिफॅलिया म्हणजे काय?
डिफॅलिया (Diphallia) ही एक दुर्मिळ जन्मजात अवस्था आहे, ज्यामध्ये बाळाला दोन स्वतंत्र लिंग असतात. ही अवस्था पूर्ण (complete) किंवा अपूर्ण (incomplete) स्वरूपात असू शकते. बहुतांश प्रकरणांमध्ये ही स्थिती केवळ जननेंद्रियांपुरती मर्यादित नसून, इतर अवयवांमधील विकृतींसह आढळते. बहुतांश प्रकरणांमध्ये ही स्थिती जटिल मूत्रविज्ञान (urological), पचनसंस्था (gastrointestinal) किंवा गुदद्वाराशी संबंधित (anorectal) विकृतींसह आढळते. याविषयीचे संशोधन इंटरनॅशनल जर्नल ऑफ सर्जरी केस रिपोर्ट्समध्ये प्रकाशित झाले आहे.
पाकिस्तानातील बाळाची स्थिती काय होती?
पाकिस्तानात जन्माला आलेल्या बाळाची दोन्ही लिंगे आकाराने सामान्य दिसत होती तरी त्यापैकी एक दुसऱ्यापेक्षा सुमारे १ सेंटीमीटरने मोठे असल्याची माहिती शोध निबंधात नमूद करण्यात आलेली आहे. या बाळामध्ये दोन स्वतंत्र मूत्रमार्ग (urethral orifices) अस्तित्वात होते. दोन्ही लिंगांच्या अग्रभागाचा (glans) आकार सामान्य होता आणि मूत्रमार्गाचे छिद्र नेहमीच्या ठिकाणी होते. बाळाला एकच अंडकोश (scrotum) होता, ज्यावर मधोमध दोन रेषा (midline raphe) आणि विकसित झालेली त्वचा होती. तो दोन्ही छिद्रांमधून मूत्र विसर्जन करत होता. मूत्रसंस्थेच्या अल्ट्रासोनोग्राफीमध्ये दोन मूत्रनलिका (ureters) आणि अर्धविकसित एक मूत्राशय (single hemi bladder) आढळले.
उपचार कसे करण्यात आले?
बाळाला रुग्णालयात दाखल करून शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ‘सिग्मॉइड-डिव्हायडेड कोलोस्टॉमी’ करण्यात आली. शस्त्रक्रिये दरम्यान ‘कॉन्जेनिटल पाउच कोलन (प्रकार ४)’ ही जन्मजात विकृती आढळली,” असे संशोधनात म्हटले आहे. याशिवाय, डॉक्टरांनी कोलोनोस्कोपीच्या मदतीने एक कृत्रिम मार्ग तयार केला, ज्यामुळे बाळाला मलविसर्जन करता येऊ लागले.
एक दुर्मिळ जन्मजात विकृती
संशोधनात डिफॅलियाचे वर्णन एक दुर्मिळ जन्मजात विकृती म्हणून केले आहे. ज्यात दोन स्वतंत्र रचनात्मक व शारीरिकदृष्ट्या वेगवेगळी लिंग असतात. ही अवस्था विविध प्रकारच्या विकारांसह (spectrum of diseases) दिसू शकते, त्यामुळे उपचारासाठी अनेक तज्ज्ञांचा (multidisciplinary) समन्वित दृष्टिकोन आवश्यक असतो. पाकिस्तानातील प्रकरणात रुग्णाला डिफॅलियाबरोबर गुदद्वाराशी संबंधित विकृती (anorectal malformation) होती. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करून सिग्मॉइड कोलोस्टॉमी करण्यात आली, असेही संशोधनात नमूद करण्यात आले.
ही अवस्था का होते?
डॉ. श्रेय श्रीवास्तव (एमडी, इंटरनल मेडिसिन), शारदा हॉस्पिटल यांनीही याला दुजोरा देत इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले होते की, डिफॅलियाचे (penile duplication (PD), diphallic terata किंवा diphallasparatus असेही म्हटले जाते) नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. याबरोबरच आढळणाऱ्या इतर विकृती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, त्यामुळे यामागे एकच ठोस कारण सांगणे कठीण आहे. मात्र, गर्भाच्या सुरुवातीच्या विकास टप्प्यात गर्भधारणेच्या तिसऱ्या ते सहाव्या आठवड्यादरम्यान क्लोएकल मेंब्रेनच्या (cloacal membrane) द्विगुणीकरणामुळे ही अवस्था निर्माण होत असावी.
इतर कोणत्या विकृतींसोबत संबंध?
दरम्यान, मणिपाल हॉस्पिटल, व्हाईटफिल्ड (बंगळुरू) येथील युरोलॉजी सल्लागार डॉ. श्रीनिवास आर. पी. यांनी सांगितले की, संबंधित इतर विकृती ओळखण्यासाठी सखोल तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. “दुहेरी लिंगाबरोबर अनेकदा इतर विकृतीही आढळतात, जसे की दुहेरी मूत्रमार्ग, मूत्राशय, मूत्रसंस्था तसेच पचनसंस्थेतील दोष. काही प्रकरणांमध्ये मोठ्या आतड्याचे (colon) द्विगुणीकरण किंवा वाढ (dilation) देखील दिसून येते. त्यामुळे संपूर्ण तपासणी करून आवश्यक ते उपचार किंवा शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते,” असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. श्रीनिवास यांनी हेही नमूद केले की, “दुहेरी लिंग ही अवस्था पालकांना किंवा सर्वसामान्यांना धक्कादायक वाटू शकते. मात्र, जर बाळाला व्यवस्थित मूत्रविसर्जन करता येत असेल, तर ती तातडीची आपत्कालीन स्थिती मानली जात नाही.”
उपचारपद्धती
संशोधनानुसार अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये उपचारपद्धती ही रुग्णाच्या वैयक्तिक स्थितीनुसार ठरवावी लागते, कारण प्रत्येक प्रकरणात विकृतींचे स्वरूप आणि तीव्रता वेगवेगळी असू शकते. डॉ. श्रेय श्रीवास्तव यांनीही याला दुजोरा देत सांगितले की, सुरुवातीस सखोल विश्लेषण करून उपचार सुरू केले जातात. यात वैद्यकीय तसेच नैतिक बाबींचा विचार केला जातो आणि सामान्यतः कार्यक्षम (non-functioning) नसलेले लिंग शस्त्रक्रियेने काढून टाकणे (surgical excision) हा उपचाराचा भाग असतो.
डॉ. श्रीनिवास आर. पी. यांच्या मते, बाळाचे वजन वाढल्यानंतर आणि काही महिन्यांनी त्याची प्रकृती स्थिर झाल्यावर, डॉक्टर सविस्तर तपासणी करून पुढील निर्णय घेतात.
कोणता मूत्रमार्ग (urethra) काढून टाकायचा?/कोणते मूत्राशय (bladder) ठेवायचे किंवा काढायचे?
ते पुढे स्पष्ट करतात की, “बहुतेक वेळा दोन्ही मूत्राशय दीर्घकाळासाठी कार्यक्षम नसतात. त्यामुळे एक मूत्राशय आणि एक मूत्रमार्ग काढून टाकणे आवश्यक ठरते, ज्यामुळे दोन्ही मूत्रपिंड (kidneys) एका सामान्य मूत्राशयाशी जोडले जातात. यामुळे मूत्रसंस्था पुन्हा सामान्य स्थितीत येते. याशिवाय, कमी विकसित आणि लहान लिंग काढून टाकणेही आवश्यक असते.”
वरील प्रकरणात, शस्त्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती स्थिर होती. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आणि पुढील तपासणीसाठी (follow-up) बोलावण्यात आले, असे शोध निबंधात नमूद करण्यात आले आहे.
