डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी तेथील बेकायदा स्थलांतरितांबाबत कडक धोरण अवलंबिले आहे. विविध देशांतून अमेरिकेत ‘घुसलेल्यां’ना विमानांमध्ये बसवून त्या-त्या देशांत सोडले जात आहे. १०४ भारतीय बेकायदा स्थलांरितांना घेऊन आलेले अमेरिकेचे लष्करी विमान बुधवारी अमृतसरला उतरले. भारतातून होणाऱ्या या घुसखोरीच्या मार्गाला ‘डंकी रूट’ म्हटले जाते… याचा अर्थ काय, या शब्दाचा उगम कसा झाला, या मार्गाने घुसखोरी कशी होते, याची कारणे आणि त्यात असलेले धोके कोणते, याविषयी…. ‘डंकी रूट’ म्हणजे काय? भारत, पाकिस्तान, बांगलादेश या दक्षिण आशियाई देशांमधून अमेरिका, कॅनडा किंवा युरोपमध्ये त्या देशाची परवानगी न घेता (म्हणजे व्हिसा नसताना) घुसखोरी करण्यासाठी जे मार्ग वापरले जातात, त्यासाठी बोलीभाषेमध्ये ‘डंकी’ हा शब्द वापरला जातो. हे मार्ग अर्थातच अनधिकृत आणि त्यामुळेच धोकादायक असतात. या शब्दाचा उगम हा ‘डाँकी’ या इंग्रजी शब्दाचा अपभ्रंश असावा, अशी शक्यता आहे. पंजाबी आणि अन्य काही उत्तर भारतीय भाषांमध्ये विशेषत: हा शब्द वापरला जातो. गाढव ज्याप्रमाणे कुंपणावरून उड्या मारून जाते, त्याप्रमाणे एका देशातून दुसऱ्या देशात उड्या मारत, लपत-छपन इच्छित स्थळी पोहोचायचे असल्यामुळे या अनधिकृत मार्गांना ‘डंकी’ हा शब्दप्रयोग रूढ झाला असावा. जंगल, वाळवंट, समुद्र, डोंगरदऱ्या यासारख्या अवघड मार्गांनी हा प्रवास होत असल्याने त्यात अनेक धोके असतात.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

यामागील कारणे काय ?

‘डंकी मार्गा’ने विकसित देशांमध्ये जाण्याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे अर्थातच बेरोजगारी. आपल्या देशात चांगली नोकरी किंवा व्यवसायाची सधी असेल, तर एवढा धोका पत्करून, घरदार सोडून कुणीही असे दुसऱ्या देशात घुसणार नाही. अमेरिका आणि युरोपमधील बहुतांश देशांचा व्यावसायिक व्हिसा मिळणे ही अत्यंत कठीण बाब असते. एकतर तुम्ही त्या देशात उपयोगाचे आहात, हे सिद्ध करावे लागते शिवाय व्हिसा मिळविण्याची प्रक्रियाही किचकट असते. या विकसित देशांची स्थलांतराची धोरणेही अत्यंत कडक असतात. त्यामुळे रोजगाराच्या शोधात आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत अनेक तरूण ‘डंकी’ मार्गाचा वापर करतात. अवैध मार्गाने लोकांना परदेशात पाठविणाऱ्या एजंट आणि दलालांचे जाळे विकसनशील देशांमध्ये असते. अनेकदा तरुणांना खोटी आश्वासने देऊन त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून त्यांना या धोकादायक मार्गावर ढकलले जाते.

‘डंकी मार्गा’वर नेमके धोके काय?

वर म्हटल्याप्रमाणे हे मार्ग वाळवंट, समुद्र आणि जंगलांमधून जातात. हा प्रवास अत्यंत जीवघेणा असतो. अनेक किलोमीटर पायी जावे लागते. अन्न-पाण्याची टंचाई असते. काही वेळा छोट्या बोटी, तराफा यातून धोकादायक समुद्र ओलांडावे लागतात. हा झाला नैसर्गिक धोका. मात्र अशा पद्धतीने एखाद्या देशात घुसताना सीमा सुरक्षा दलांच्या हाती लागलेल्यांना प्रचंड छळाला सामोरे जावे लागते. अटक, खटल्याशिवाय अनेक महिने कोठडी, मानसिक आणि शारीरिक छळ, अत्याचार सहन करावे लागतात. यामध्ये महिला आणि लहान मुलांचे तर अधिकच हाल होतात. काही वेळा या ‘डंकीं’ना गुलामासारखी वागणूक दिली जाते. अनधिकृतरित्या प्रवास करीत असल्यामुळे या लोकांकडे आपल्या देशाशी संपर्क करण्याचेही कोणते साधन उपलब्ध नसते. त्यामुळे दाद मागायची कुणाकडे, हाच प्रश्न असतो.

हे रोखण्याचा कायदेशीर मार्ग काय?

कॅनडा आणि अमेरिकेने अनधिकृत स्थलांतरे रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्था आणि कायदेशीर प्रक्रिया अधिक कडक केल्या आहेत. युरोपीय महासंघातील अनेक देश अलिकडे ‘डंकीं’ची पाठवणी करण्याचे धोरण अवलंबू लागले आहेत. भारत, पाकिस्तान, बांगलादेश येथे अर्थातच अशा पद्धतीने लोकांना परदेशात पाठविणाऱ्या दलालीविरोधात कायदे आहेत. मात्र यातील कोणतेच कायदेशीर मार्ग फारसे उपयोगी पडत नाहीत. कायद्यातून पळवाटा काढत, सुरक्षा यंत्रणांची नजर चुकवून लाखो लोक युरोप-अमेरिकेत घुसखोरी करतात.

चित्रपटाविषयी…

२०२३ साली ‘डंकी’ याच नावाच्या चित्रपटात असा धोकादायक प्रवास करणाऱ्यांचे कथानक वापरण्यात आले आहे. राजकुमार हिरानी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून शाहरूख खान, तापसी पन्नू, विकी कौशल यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. लंडनमध्ये जाऊन पैसे कमवायचे आणि चांगले आयुष्य जगायचे असे स्वप्न उराशी बाळगून ‘डंकी रूट’ने तेथे गेलेल्या चार मित्रांची ही कथा आहे. या मार्गावर त्यांना आलेल्या अडचणी, धोके, एजंटांचे जाळे, जंगली श्वापदांची दहशत, खराब हवामानाशी सामना, उपासमार याचा सामना या टोळक्याला करावा लागतो. त्यांच्याबरोबर असलेल्या काही जणांना आपला जीवही गमवावा लागतो. शेवटी आपण दलालांच्या सापळ्यात अडकलो आहोत, हे त्यांच्या लक्षात येते मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

‘डंकी रूट’ हा परदेशात जाऊन डॉलर-पौंड-युरो कमाविण्याचा ‘शॉर्टकट’ नाही, तर मृत्यूचा सापळा आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. योग्य शिक्षण, कष्ट आणि कायदेशीर मार्गाने स्थलांतर हेच दीर्घकाळ टिकणारे पर्याय असल्याचा संदेश हा चित्रपट देतो.

amol.paranjpe@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is donkey route reasons for using it and the risks involved to reach america print exp zws