– भक्ती बिसुरे 
वेग हा सध्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. या वेगवान जगण्याचा भाग असलेल्या अनेक गोष्टीही त्यामुळे जगण्याच्या वेगाशी स्पर्धा करणाऱ्या आहेत. फास्ट फूड, फास्ट स्पीड इंटरनेट पाठोपाठ आता काळ आहे फास्ट फॅशनचा. फास्ट फॅशन म्हणजे नेमके आहे तरी काय, फास्ट फॅशनचा पर्यावरणाच्या ऱ्हासाशी संबंध काय आणि कसा आहे, याबाबत हे विश्लेषण.  

फास्ट फॅशन म्हणजे काय?

land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन

बॉलिवूड किंवा हॉलिवूडमधील तारेतारकांनी किंवा लोकप्रिय क्रीडापटूंनी वापरलेले कपडे आणि ॲक्सेसरीज यांबाबत सर्वसामान्यांना प्रचंड आकर्षण असते. इन्स्टाग्रामसारख्या सोशल मिडियावरील व्यासपीठांमुळे कपडे आणि ॲक्सेसरीजचे ब्रॅंड, वैशिष्ट्ये अशा अनेक गोष्टी सर्वसामान्यांच्या ज्ञानात भर घालत असतात. त्यातूनच तसे कपडे किंवा ॲक्सेसरीज वापरून बघण्याचा मोहही अनेकांना होतो. नेमकी हीच नस ओळखून हुबेहूब डिझायनर कपड्यांसारखे कपडे पण स्वस्तात बनवून ते विक्रीला काढण्याची अहमहमिका सध्या फॅशन जगतात दिसून येत आहे. ग्राहकांनी फॅशनच्या जगातील प्रत्येक नवा ट्रेंड अनुसरावा या स्पर्धेतून जन्माला आलेल्या फॅशनला फास्ट फॅशन असे म्हणतात. या फॅशन प्रकारातील ट्रेंड जेवढ्या वेगाने येतात तेवढ्याच वेगाने विरतातही.

फास्ट फॅशनची सुरुवात कशी झाली?

फॅशन जगतातील माहितीनुसार सन १८०० पूर्वी फॅशन आतासारखी वेगवान नव्हती. लोकर, कातडे यांसारख्या गोष्टी स्वतः कमावणे, त्यांना वापरयोग्य करणे आणि त्यापासून कपड्यांची निर्मिती करणे हे अवघड होते. त्यामुळे आतासारखी फास्ट फॅशन त्या काळात अस्तित्वात असणे शक्य नव्हते. मात्र, औद्योगिक क्रांतीने हे चित्र बदलण्यास हातभार लावला. शिवणयंत्रांसारखे शोध लागले. कापड तयार करणेही स्वस्त, वेगवान आणि सहजसाध्य झाले. त्यातून जगभरामध्ये फॅशन हा उद्योग म्हणून उभा राहिला आणि त्यातून फॅशन अधिकाधिक वेगवान होत गेली. १९६० आणि ७० च्या दशकात अधिकाधिक तरुण मंडळी फॅशन जगतात प्रयोग करण्यासाठी दाखल होऊ लागली. त्यानंतर वेशभूषा ही अभिव्यक्तीचा भाग बनत गेल्याचे दिसून येण्यास सुरुवात झाली.

फास्ट फॅशन कशी ओळखावी?

मोठमोठ्या फॅशन शोजमधून दिसणाऱ्या वेशभूषा क्षणार्धात जेव्हा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध होतात तेव्हा ते फास्ट फॅशनचा भाग आहेत हे ओळखावे. सर्वसाधारणपणे फास्ट फॅशन प्रकारातील कपडे बनवण्यासाठी फारसे दर्जेदार कापड वापरले जात नाही. त्यामुळे काही मोजक्या वापरांनंतर हे कपडे विटतात. त्यातून ग्राहक ते फेकून देतात आणि नव्या फास्ट फॅशन उत्पादनांची खरेदी करतात. फास्ट फॅशन ट्रेंड्सची विक्री करणाऱ्या मॉल, दुकानांमध्ये सहसा सातत्याने नव्या कलेक्शन्सची भर पडत असते. या कलेक्शनमध्ये उपलब्ध कपडे कमी असतात. त्यामुळे कलेक्शन बाजारात आल्या-आल्या त्याची खरेदी केली नाही तर आपल्याला ते कपडे कधीच मिळणार नाहीत या दडपणाखाली अशा कपडे किंवा ट्रेंड्सवर ग्राहकांच्या उड्या पडतात.

फास्ट फॅशन वाईट का?

फॅशन जगतातील वेगाशी जुळवून घेण्यासाठी नवे ट्रेंड बाजारात आणण्याची स्पर्धा जीवघेणी आहे. त्यातूनच मग पर्यावरण संवर्धन किंवा संरक्षणाचे नियम धाब्यावर बसवून कपड्यांची निर्मिती केली जाते. स्वस्तातले रंग, रसायनांच्या वापरामुळे जगभरातील पाण्याचे स्रोत दूषित होत आहेत. स्वस्तातले कापड हाही या स्पर्धेतला एक प्रमुख घटक आहे. पॉलिस्टरसारखे कापड हे फास्ट फॅशन उद्योगात प्रामुख्याने वापरले जाते. त्याच्या निर्मितीत जीवाश्म इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्यातून तापमान वाढीला हातभार लागतो. पॉलिस्टर हे मायक्रोफायबर्स निर्माण करते. त्यामुळे ते धुतल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती होते. ज्या वेगाने नवे कपडे तयार होतात आणि विकले जातात त्याच वेगाने ग्राहक जुने कपडे फेकून देतात. त्यातून कपड्यांचा कचरा ही समस्या जगभरामध्ये आ वासून उभी राहत आहे. चामडे म्हणजेच लेदर हा फॅशन जगतातील लोकप्रिय ट्रेंड आहें. त्याच्या निर्मितीतही मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च होते, त्यामुळे तापमान वाढीस हातभारच लागतो. 

आपण काय करू शकतो?

कमीतकमी कपडे खरेदी करुन त्यांचा जास्तीत जास्त वापर, पुनर्वापर करणे हा फास्ट फॅशनला आळा घालण्याचा एक पर्याय असू शकतो. फास्ट फॅशनला रोखण्यासाठी काय करावे यावर ब्रिटिश डिझायनर व्हिव्हियन वेस्टवुड – ‘बाय लेस, चूज वेल ॲण्ड मेक इट लास्ट’ असा पर्याय सुचवतो. वापरातील कपड्यांचा पुनर्वापर करत राहणे या यावरील सर्वांत सोपा मार्ग आहे. भारतात अलिकडेच फास्ट फॅशन फोफावत असली तरी मुळात कपडे दीर्घकाळ वापरणे आणि त्यांचा पुनर्वापर करत राहणे हा आपल्या संस्कृतीचाच भाग आहे. आता फास्ट फॅशन नाकारण्याचा नवा ट्रेंड येत आहे. नवी पिढी फास्ट फॅशन नाकारण्याचे आवाहन करण्यासाठी सोशल मिडियाचा वापर करत आहे. शक्यतो कपडे फाटेपयर्यंत त्यांचा वापर करणे, अधिकाधिक नैसर्गिक धागे आणि रंग यांचा वापर करुन तयार झालेले कपडे विकत घेणे आणि घालणे आणि त्या-त्या कपड्यांच्या व्यवस्थापनाबाबत (मेंटेनन्स) ब्रॅण्डकडून करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करणे हा फास्ट फॅशनचा प्रवाह रोखण्यातील आपला खारीचा वाटा ठरू शकतो.