इस्रायल आणि सीरियामध्ये एका जमिनीवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. इराण समर्थक दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने शनिवारी इस्रायलवर मोठा हल्ला केला. हिजबुल्लाहने गोलान हाइट्समधील फुटबॉल मैदानावर प्राणघातक रॉकेट हल्ला केला, ज्यात १२ लहान मुलांनी आपले प्राण गमावले. मृतांमध्ये बहुतांश १० ते २० वर्षे वयोगटातील मुले आहेत. या हल्ल्यानंतर इस्त्रायल आणि सीरियातील युद्धाची शक्यता वाढली आहे. इस्रायलने या हल्ल्यासाठी हिजबुल्लाला जबाबदार धरले आणि सांगितले की, हे रॉकेट शेबा येथून डागण्यात आले होते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू अमेरिकेच्या दौर्यावर होते, त्यांना या हल्ल्याची बातमी कळताच ते आपल्या मायदेशी परतले. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी हमासने गाझावर रॉकेट डागून या युद्धाची सुरुवात केली होती, तेव्हापासूनचा हा सर्वात प्राणघातक हल्ला मानला जात आहे. गोलान हाइट्सवरून विवाद का पेटलाय? गोलान हाइट्सचे महत्त्व काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊ. इराण समर्थक दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने शनिवारी इस्रायलवर मोठा हल्ला केला. (छायाचित्र-रॉयटर्स) हेही वाचा : ‘Right to be Forgotten’वर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; काय आहे हा अधिकार?त्श्र्स त्याविषयी कायदा काय सांगतो? गोलान हाइट्स म्हणजे काय? गोलान हाइट्स दक्षिण-पश्चिम सीरियामधील एक खडकाळ पठार आहे. हा परिसर राजधानी दमास्कसपासून सुमारे ६० किमी अंतरावर आहे. महत्त्वाचे म्हणजे गोलान हाइट्सची जॉर्डन आणि लेबनॉनची सीमा आहे. अरबी भाषेत जावलान म्हणून ओळखले जाणारे गोलान हाइट्स, इस्रायलने १९६७ साली झालेल्या सहा दिवसांच्या युद्धाच्या सीरियाकडून ताब्यात घेतले. संघर्षाच्या वेळी बहुतेक सीरियन अरब रहिवासी या भागातून पळून गेले. १९७३ च्या अरब-इस्त्रायली युद्धात सीरियाने गोलान हाईट्स परत मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या हाती अपयश आले. त्यानंतर इस्रायल आणि सीरिया यांच्यात युद्धविराम करारावर स्वाक्षरी झाली आणि बहुतेक क्षेत्र इस्रायलच्या ताब्यात गेले. १९८१ मध्ये इस्रायलने गोलान हाइट्सला इस्रायलशी जोडले आणि गोलान हाइट्स कायदा पारित केला, ज्यानंतर या भागात इस्रायलचे कायदे, अधिकार क्षेत्र आणि प्रशासनाचा विस्तार करण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाने गोलान हाइट्सचा ताबा रद्दबातल घोषित केला आहे. सीरियानेही ते परत करण्याची मागणी सुरूच ठेवली आहे. परंतु, २०१९ मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, वॉशिंग्टन गोलान हाइट्सवरील इस्रायलच्या सार्वभौमत्वाला मान्यता देईल. या विधानाने अनेक वर्षांचे धोरण उलथून टाकले आणि सीरियाबरोबरच्या तणावात आणखी वाढ झाली, असे वृत्त 'सीएनएन'ने दिले. गोलान हाइट्समध्ये राहणारे 'ड्रुझ अरब' नक्की कोण आहेत? सध्या, गोलान हाइट्समध्ये सुमारे ४० हजार लोक राहतात, त्यापैकी निम्म्याहून अधिक लोक ड्रुझ अरब आहेत. पण, ड्रुझ नक्की कोण आहेत? ड्रुझ अरब हा एक अद्वितीय धार्मिक आणि वांशिक गट आहे. ते ११ व्या शतकातील परंपरेचे पालन करतात. त्यात इस्लाम, हिंदू धर्म आणि अगदी शास्त्रीय ग्रीक तत्त्वज्ञानाच्या घटकांचा समावेश आहे. त्यांच्या धर्मात धर्मांतराला परवानगी नाही, तसेच आंतरजातीय विवाहालाही मान्यता नाही. 'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, ड्रुझ नागरिक बशर अल-असद आणि त्यांचे वडील हाफेज अल-असद यांच्या राजवटीशी अनेक दशकांपासून एकनिष्ठ राहिले आहेत. जेव्हा इस्रायलने गोलानला समाविष्ट केले, तेव्हा ड्रुझना नागरिकत्वाचा पर्याय देण्यात आला, परंतु बहुतेकांनी हा पर्याय नाकारला आणि आजही ते स्वतःला सीरियन मानतात. सध्या २० हजारपेक्षा जास्त ड्रुझ गोलान हाइट्समध्ये राहतात. या भागात २०२७ पर्यंत इस्रायली नागरिकांची स्थायिक लोकसंख्या दुप्पट करण्याच्या योजनेवर २०२३ मध्ये, यूएन मानवाधिकार परिषदेने चिंता व्यक्त केली होती. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात असे नमूद केले आहे की, गोलानमधील ड्रुझसमोर प्रदेशात जेव्हा जमीन आणि पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा इस्रायलच्या भेदभावपूर्ण धोरणांचा सामना करावा लागतो. ड्रुझ नेते असेही नोंदवतात की, त्यांना या भागातील द्वितीय श्रेणीतील नागरिकांसारखे वागवले जाते. गोलान इस्त्राईलसाठी महत्त्वाचे का आहे? सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इस्रायलसाठी गोलान हाइट्स महत्त्वाचे आहे. गोलान हाइट्स उंच भागावर आहे आणि हा भाग सीरियाकडे गेल्यास सुरक्षेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. कारण या देशाशी इस्रायलचे संबंध ताणले गेले आहेत. इस्त्रायलने असेही म्हटले आहे की, गोलान इस्रायलच्या हद्दीत असल्याने त्यांना इस्त्रायली शहरे आणि दमास्कसदरम्यान बफर झोन तयार करण्यास मदत होते. 'तेल अवीव'ने म्हटले आहे की, सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांचा मित्र इराण, इस्रायलवर हल्ले करण्यासाठी सीरियाच्या बाजूने लढण्यास इच्छुक आहे. १९७४ च्या युद्धविराम करारानंतर, ४०० चौरस किलोमीटरचा एक बफर झोनदेखील तयार करण्यात आला आहे; ज्यामध्ये कोणत्याही बाजूचे नागरिक प्रवेश करू शकत नाही. युनायटेड नेशन्स डिसेंगेजमेंट ऑब्झर्व्हर फोर्स (UNDOF) आणि युनायटेड नेशन्स ट्रूस सुपरव्हिजन ऑर्गनायझेशन (UNTSO) चे या भागात कॅम्प आहेत. गोलन हाइट्स हे जॉर्डन नदीला पाणी पोहोचवणार्या बन्याससारख्या महत्त्वपूर्ण जलस्रोतांचेही घर आहे. या खडतर प्रदेशात पाणी हे प्रमुख स्त्रोत आहे. शिवाय, गोलान येथे इस्रायलचे एकमेव स्की रिसॉर्ट आहे. शनिवारी झालेल्या हल्ल्यात नक्की काय घडले? शनिवारी (२७ जुलै), गोलान हाइट्समधील माजदल शम्स शहरातील फुटबॉल मैदानावर रॉकेट सोडण्यात आले. या हल्ल्यात १२ लहान मुलांचा मृत्यू झाला, तर इतर ३० जण जखमी झाले. हा हल्ला लेबनीज हिजबुल्लाहने घडवून आणल्याचे गुप्तचरांनी उघड केले असल्याचे इस्रायल आणि अमेरिकेने म्हटले आहे. यूएस नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या प्रवक्त्या ॲड्रिन वॉटसन यांनी सांगितले की, “हे त्यांचे रॉकेट होते आणि त्यांच्या नियंत्रणाखालील भागातून सोडले गेले होते, त्याचा सर्वत्र निषेध व्हायला हवा.” इस्रायलचे लष्करी प्रवक्ते डॅनियल हगारी यांनीही सांगितले की, “निष्पाप मुलांच्या हत्येसाठी हिजबुल्ला जबाबदार आहे. आम्ही हिजबुल्लाह विरुद्ध प्रत्युत्तराची तयारी करू, आम्ही कारवाई करू," असेही ते म्हणाले. हल्ल्याच्या ठिकाणाहून बोलताना हगारी म्हणाले, “हिजबुल्लाहने उडवलेले रॉकेट हे इराणी रॉकेट होते; ज्यामध्ये ५० किलो वॉरहेड होते. या मॉडेलची मालकी केवळ हिजबुल्लाकडे आहे. या हल्ल्यात आज १२ तरुण मुले आणि मुलींचा मृत्यू झाला आहे. इस्रायल युद्ध पुकारणार? हिजबुल्लाहने या हल्ल्याचे आरोप फेटाळले आहेत. त्यांनी एका निवेदनात विविध मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे केलेले आरोप स्पष्टपणे नाकारले. “इस्लामिक रेझिस्टन्सचा या घटनेशी कोणताही संबंध नाही,” असे त्यांच्या लष्करी शाखेने सांगितले. या हल्ल्यामुळे तणाव वाढला आहे. पंतप्रधान नेत्यानाहू यांनी शपथ घेतली की इस्रायल हल्ल्याचा बदला घेऊ. त्यांनी इस्रायलमधील ड्रुझ समुदायाच्या नेत्याला सांगितले की, “हिजबुल्लाला खूप मोठी किंमत मोजावी लागेल, त्यांनी ज्याचा विचार केला नसेल त्यांना ते भोगावे लागेल," असे त्यांच्या कार्यालयातील एका निवेदनात म्हटले आहे. हेही वाचा : स्वयंपाक घरातील भांड्यांमधून पसरतोय जीवघेणा आजार; काय आहे ‘टेफ्लॉन फ्लू’? त्याची लक्षणे आणि उपाय काय? गोलानवर शोककळा रविवारी, या हल्ल्यात प्राण गमावलेल्या १२ मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याने गोलानवर शोककळा पसरली होती. 'बीबीसी'ने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या ठिकाणी रॉकेटचा हल्ला झाला, त्या ठिकाणी काळा झेंडा लावण्यात आला आहे. मजदल शम्सच्या संपूर्ण शहरावर हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका रहिवाशाने 'द गार्डियन'ला सांगितल्याप्रमाणे: “काय घडले ते कोणीही समजू शकले नाही. आम्ही यापूर्वी असे काहीही पाहिले नाही.” या हल्ल्यामुळे या भागात भीती पसरली आहे. इस्रायली वृत्तपत्र 'हॅरेट्झ'चे लेखक गिडॉन लेव्ही यांनी चेतावणी दिली की, आता गोष्टी खरोखर नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात. “पुढे काय होईल हे आम्हाला माहीत नाही. सर्वच गोष्टींबाबत खूप अनिश्चितता आहे. येणारे तास निर्णायक असतील,” असे त्यांनी 'अल जझीरा'ला सांगितले.