हवाना सिंड्रोम म्हणून ओळखला जाणारा रहस्यमयी आजार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. डोकेदुखी, चक्कर येणे आणि मानसिक अस्वस्थता यांसारख्या तीव्र लक्षणांचा समावेश असलेल्या या आजाराने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. हवाना सिंड्रोमच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी नॉर्वेमधील एका शास्त्रज्ञाने २०२४ मध्ये स्वतःवरच एक गुप्त चाचणी केली; पण हा प्रयोग त्यांच्या अंगाशी आला आहे. या आजाराने चक्क शास्त्रज्ञाच्या मेंदूला दुखापत केली आहे. या पार्श्वभूमीवर काय आहे हवाना सिंड्रोम? त्याची नेमकी लक्षणे कोणती? शास्त्रज्ञाच्या मेंदूला दुखापत कशामुळे झाली? त्याविषयीचा हा आढावा…

काय आहे हवाना सिंड्रोम?

हवाना सिंड्रोम हा अचानक उद्भवणाऱ्या आणि अद्याप न उलगडलेल्या मेंदूशी संबंधित लक्षणांचा आजार असल्याचा दावा केला जातो. या गूढ आजाराची पहिली घटना २०१६ मध्ये क्युबाची राजधानी हवाना येथील अमेरिकन दूतावासात समोर आली. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अचानक गोंधळून टाकणारी आणि विचारक्षमतेवर परिणाम करणारी तीव्र लक्षणे जाणवत असल्याची तक्रार केली होती. क्यूबाच्या राजधानीत हा आजार आढळून आलेल्या या आजाराला ‘हवाना सिंड्रोम’, असे नाव देण्यात आले. आतापर्यंत १५ पेक्षा जास्त देशांमधील अमेरिकन सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हवाना सिंड्रोमच्या त्रासाची तक्रार केली आहे.

हवाना सिंड्रोमची लक्षणे कोणती?

वैद्यकीय तज्ज्ञांनी अद्याप हवाना सिंड्रोमला अधिकृत आजार म्हणून मान्यता दिलेली नाही. मात्र, प्रभावित कर्मचाऱ्यांना भरपाई देण्यासाठी अमेरिकन सरकारकडून विशेष उपक्रम राबवले जात असल्याचे जिओ न्यूजने आपल्या वृत्तात नमूद केले आहे. संशोधकांच्या मते, अचानक तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, विसर पडणे व ऐकू न येणे या लक्षणांमागे ताणतणावाशी संबंधित समस्या किंवा पर्यावरणीय घटक कारणीभूत असू शकतात. आतापर्यंत वैज्ञानिकांना हवाना सिंड्रोमचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा सापडलेला नाही. अमेरिकन सरकारने या आजाराला अधिकृतपणे उलगडा न होणारा आजार म्हणून संबोधले आहे. अनेकांनी हवाना सिंड्रोम अनैसर्गिक असल्याचा दावा केला असून, तो हवेतून लहरी सोडणाऱ्या उपकरणांमार्फत तयार केला जात असल्याचे म्हटले आहे.

आणखी वाचा : भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडणार? शाहपूर कांडी धरणामुळे पाकिस्तानची चिंता का वाढली?

शास्त्रज्ञाच्या मेंदूला कशी दुखापत झाली?

एका नॉर्वेजियन शास्त्रज्ञाने हवाना सिंड्रोमची संकल्पना खोटी ठरविण्यासाठी स्वतःवरच एका घातक शस्त्राची चाचणी केली. हवेतून लहरी सोडणारी उपकरणे माणसासाठी घातक नसतात, असे त्यांना सिद्ध करायचे होते. चाचणीनंतर त्यांना नेमकी तीच लक्षणे जाणवू लागली, जी जगभरातील अमेरिकन राजदूतांना ‘हवाना सिंड्रोम’दरम्यान जाणवली होती. या उपकरणाच्या चाचणीदरम्यान संबंधित शास्त्रज्ञालाच हवानाच्या गूढ आजाराची लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर नॉर्वे सरकारने या प्रकरणाची माहिती अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएला दिली होती. मात्र, तज्ज्ञांच्या मते या शास्त्रज्ञाची लक्षणे ही हवाना सिंड्रोमच्या मूळ लक्षणांशी पूर्णपणे जुळणारी नव्हती, असे द वॉशिंग्टन पोस्टने आपल्या वृत्तात म्हटले आहे. या प्रयोगाशी परिचित असलेल्या सूत्रांनी सांगितले की, हवेतून लहरी सोडणारी उपकरणे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात हे या प्रयोगामुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अमेरिकेचे शत्रू देश अशा प्रकारची घातक ऊर्जा शस्त्रे विकसित करत असावेत, या दाव्याला आता आणखीनच बळकटी मिळाली आहे.

हवेतून लहरी सोडणारी उपकरणे

हवाना सिंड्रोमसाठी कारणीभूत ठरणारे एक रहस्यमय उपकरण अमेरिकन सरकारने गुपचूप खरेदी केल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या कार्यकाळाच्या अखेरीस अमेरिकेच्या ‘होमलँड सिक्युरिटी इन्व्हेस्टिगेशन’ या संस्थेने कोट्यवधी रुपये खर्च करून हे यंत्र मिळवल्याचा दावा केला जात आहे. या उपकरणाद्वारे हवेत सोडल्या जाणाऱ्या लहरी मानवी मेंदूवर गंभीर परिणाम करतात, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. अमेरिकन सरकारला या गुप्त यंत्राबद्दल माहिती कशी मिळाली आणि त्यांनी ते कोणाकडून विकत घेतले, हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

मादुरो यांना पकडण्यासाठी गुप्त यंत्राचा वापर?

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडण्यासाठी अमेरिकन सैनिकांनी याच गुप्त यंत्राचा वापर केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मादुरो यांच्या एका अंगरक्षकाने नाव न सांगण्याच्या अटीवर वॉशिंग्टन पोस्टला त्याबाबतची माहिती दिली आहे. अमेरिकन सैन्याने वापरलेल्या एका विचित्र आवाजाच्या उपकरणाने मादुरो यांचे सुरक्षा रक्षक जागेवरच कोसळले. त्यांच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येत होते आणि काही वेळ ते हालचालही करू शकले नाहीत, असे वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. यादरम्यान नॉर्वेच्या शास्त्रज्ञाने बनवलेले यंत्र आणि अमेरिकेने गुप्तपणे खरेदी केलेले यंत्र यात मोठा फरक असल्याचे समोर आले आहे. अहवालानुसार, नॉर्वेच्या शास्त्रज्ञाने हे यंत्र गोपनीय माहिती वापरून विकसित केले असावे. याचाच अर्थ ते परदेशी सरकारकडून चोरलेल्या डिझाइन किंवा साहित्यावर तयार केले आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : ब्लॅक बॉक्स खरंच नष्ट होऊ शकतो का? अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ कसे उलगडणार?

अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांचे मत काय?

हवाना सिंड्रोमच्या प्रकरणांमध्ये अमेरिकेच्या काही माजी अधिकारी आणि पीडितांनी रशियाकडे संशयाची सुई वळवली आहे. कारण- रशियाकडून दीर्घकाळापासून या तंत्रज्ञानावर संशोधन सुरू असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, आतापर्यंत याबाबत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. रशियानेही अमेरिकेच्या आरोपांचे वारंवार खंडन केले आहे. जानेवारी २०२२ मध्ये अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अंतरिम अहवालात हवाना सिंड्रोमसाठी कोणतेही परदेशी राष्ट्र जबाबदार असण्याची शक्यता कमी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. २०२१ मध्ये भारत दौऱ्यावर असलेल्या अमेरिकन अधिकाऱ्यानेही आपल्याला हवाना सिंड्रोमची लक्षणे जाणवत असल्याची तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर नॉर्वेमधील एका शास्त्रज्ञाने हवाना सिंड्रोमचा छडा लावण्यासाठी स्वतःवरच गुप्त चाचणी केल्याने हा आजार मानवनिर्मित असल्याची चर्चा रंगली आहे.