भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात काम करणाऱ्या एका चालकाला दिल्ली पोलिसांनी कथित हेरगिरी प्रकरणी शुक्रवारी अटक केली आहे. हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकून या चालकाने काही लोकांना गोपनीय माहिती पुरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा चालक पाकिस्तानात गोपनीय माहिती पुरवत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या चालकाची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्लेषण: कधी राजकीय मध्यस्थ, कधी सायबर तज्ज्ञ, कधी ‘हनिट्रॅप’… नागपुरातील महाठग अजित पारसे आहे तरी कोण?

हनीट्रॅप म्हणजे काय?

रोमॅन्टिक किंवा लैंगिक संबंधाचा वापर करून गोपनीय माहिती मिळवण्याच्या पद्धतीला हनीट्रॅप म्हणतात. या गैरप्रकारातून मिळवलेल्या माहितीचा वापर आर्थिक घोटाळ्यांसाठी, राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथवा देशांमध्ये हेरगिरी करण्यासाठी केला जातो. काही वेळा खंडणी किंवा ब्लॅकमेलिंगच्या उद्देशानेही हनीट्रॅप लावले जातात.

हेरगिरीसाठी हनीट्रॅपचा वापर

हनीट्रॅपचे सर्वात प्रसिद्ध प्रकरण म्हणजे पहिल्या महायुद्धातील माता हारी प्रकरण. मार्गारेथा गेरट्रुयडा मॅकलिओड ही एक डच नर्तक माता हारी नावाने प्रसिद्ध होती. ती जर्मनीची गुप्तहेर होती. इंटरसेप्टेड टेलिग्रामच्या आधारे तिला जर्मन गुप्तहेर म्हणून दोषी ठरवण्यात आले होते. हारीला स्पेनमधील जर्मन साहाय्यकाकडून हेरगिरी करण्यासाठी पैसे मिळत असल्याचे सिद्ध झाले होते. १९१७ मध्ये फ्रान्समध्ये तिला फाशीची शिक्षा देण्यात आली होती.

सोव्हिएत युनियनची सुरक्षा संस्था ‘केजीबी’ने हनीट्रॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. ‘स्पायक्लोपीडिया: द कॉम्प्रिहेन्सिव्ह हँडबुक ऑफ ईस्पीजन’ या पुस्तकात ब्रिटिश पत्रकार आणि इतिहासकार डोनाल्ड मॅककॉर्मिक यांनी हेरगिरीसाठी हनीट्रॅपच्या वापराबाबत माहिती दिली आहे. शीतयुद्धाच्या काळात “मोझ्नो गर्ल्स” किंवा “मोझनोस” नावाच्या महिला एजंट्सना परदेशी अधिकाऱ्यांना हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढून त्यांची हेरगिरी करण्यासाठी नेमण्यात आले होते.

विश्लेषण: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे नार्को चाचणीची चर्चा; देशातील परवानगीपूर्व पहिला प्रयोग कुठे, केव्हा आणि कसा झाला?

२००९ मध्ये ‘एमआय ५’ या ब्रिटिश ‘काउंटर-इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी एजन्सी’ने देशातील विविध वित्तीय संस्था, बँका आणि व्यवसायांना १४ पानांचे दस्ताऐवज वितरित केले होते. चिनी हेरगिरीच्या धोक्याविषयी या दस्तावेजांमध्ये माहिती देण्यात आली होती. चिनी हेरांकडून लैंगिक संबंधांचे आमिष दाखवून हेरगिरी केली जात असल्याचा या दस्तावेजांमध्ये उल्लेख होता.

१९६० साली मॉस्कोमधील ‘डेली टेलिग्राफ’साठी वार्ताहर म्हणून काम करणारे ब्रिटिश पत्रकार जेरेमी वोल्फेंडन यांचं हनीट्रॅप प्रकरणदेखील बरंच गाजलं होतं. परराष्ट्र मंत्रालयाकडून पाश्चात्य समुदायाची हेरगिरी करण्यासाठी हनीट्रॅपच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. आक्षेपार्ह फोटो सार्वजनिक करण्याचा धाक दाखवून त्यांना ब्लॅकमेल केले जात होते. या तणावपूर्ण परिस्थितीमुळे वोल्फेंडन दारुच्या आहारी गेले होते.

भारताच्या गुप्तहेर संघटनेचा अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात

भारताची गुप्तहेर संघटना ‘रॉ’चे के. वी. उन्नीक्रिष्णन यांना १९८० मध्ये एका महिलेने हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढले होते. ही महिला ‘सीआयए’ या अमेरिकेच्या गुप्हहेर संघटनेची सदस्य असल्याचे पुढे आले होते. ही महिला सध्या बंद पडलेल्या ‘पॅन अ‍ॅम’ एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस म्हणून काम करत होती. तेव्हा उन्नीक्रिष्णन ‘रॉ’च्या चेन्नई विभागाचे प्रमुख होते. ते तेव्हा ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम’ (एलटीटीई) या दहशतवादी संघटनेच्या एका प्रकरणावर काम करत होते.

विश्लेषण : मोदींनी इटलीच्या पंतप्रधानांना भेट म्हणून दिलेल्या स्कार्फची का होतेय चर्चा? ‘पाटण पटोला’ वस्त्राचे महत्त्व काय?

हनीट्रॅप प्रकरण पुढे आल्यानंतर उन्नीक्रिष्णन यांना १९८७ साली गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. भारत आणि श्रीलंका यांच्यात शांतता करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is honeytrap how it is used for spying explained rvs
First published on: 19-11-2022 at 13:58 IST