India-America Connect Initiative गूगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारतात सुरू असलेल्या एआय इम्पॅक्ट समिटमध्ये मोठी घोषणा केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये वेगाने विस्तारत आहे. भारत, अमेरिका आणि दक्षिण गोलार्धातील मोठ्या भागांमधील डेटा ट्रॅफिकच्या विस्ताराच्या उद्देशाने आता गूगलने जागतिक डिजिटल पायाभूत सुविधा कार्यक्रम सुरू केला आहे. इंडिया-अमेरिका कनेक्ट इनिशिएटिव्ह असे अधिकृत नाव असलेल्या या प्रकाल्पात सुंदर पिचाई भारतात पुढील पाच वर्षे १५ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे १.२५ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. हा प्रकल्प काय? सुंदर पिचाई यांनी नक्की काय घोषणा केली? या प्रकल्पाचा भारताला कसा फायदा होणार? जाणून घेऊयात….

पिचाई यांनी काय घोषणा केली?

नवी दिल्लीतील कार्यक्रमात पिचाई यांनी ‘इंडिया-अमेरिका कनेक्ट इनिशिएटिव्ह’ची ओळख करून दिली. भारत, अमेरिका आणि दक्षिण गोलार्धातील अनेक आंतरराष्ट्रीय ठिकाणांदरम्यान एआय कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले, “आज आम्ही ‘इंडिया-अमेरिका कनेक्ट इनिशिएटिव्ह’ची घोषणा करत आहोत. हा प्रकल्प भारत आणि अमेरिका तसेच दक्षिण गोलार्धातील अनेक ठिकाणांदरम्यान एआय कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी नवीन सब-सी (सागरी) केबल मार्ग प्रदान करेल.

या उपक्रमामुळे निर्माण होणाऱ्या संधींसाठी आपण कौशल्य विकासातही गुंतवणूक केली पाहिजे, त्यामुळेच आम्ही आमचे सर्वात महत्त्वाकांक्षी कौशल्य कार्यक्रम येथे जाहीर करत आहोत असे ते म्हणाले. यामध्ये “नवीन ‘गूगल एआय प्रोफेशनल सर्टिफिकेट’ प्रोग्रामचाही समावेश आहे.” भारतातील भाषिक विविधता, विस्तृत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि मोठ्या प्रमाणावरील वापरकर्त्यांची संख्या यांसारख्या संरचनात्मक घटकांमुळे भारत नव्या डिजिटल नवोपक्रमासाठी योग्य असल्याचेही त्यांनी म्हटले. ते म्हणाले, “एआयने विविध भाषा आणि स्थानिक संदर्भांमध्ये काम केले पाहिजे. लोकांनी ज्यावर विश्वास ठेवावा असे प्रत्यक्ष लाभ त्यातून मिळाले पाहिजेत. जेव्हा तंत्रज्ञान पारदर्शक, जबाबदार आणि परिणामांवर आधारित असते, तेव्हाच विश्वास वाढतो.”

‘इंडिया-अमेरिका कनेक्ट इनिशिएटिव्ह’ नक्की काय आहे?

‘इंडिया-अमेरिका कनेक्ट इनिशिएटिव्ह’ हा एक जागतिक डिजिटल पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा उद्देश भारत, अमेरिका, आफ्रिका, आशिया-पॅसिफिक आणि दक्षिण गोलार्धातील अनेक क्षेत्रांदरम्यान हाय-कॅपॅसिटी डेटा नेटवर्कचा विस्तार करणे आहे. हा प्रकल्प गूगलच्या पाच वर्षांत भारतात होणाऱ्या १५ अब्ज डॉलर्सच्या एआय इन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणुकीवर आधारित आहे. सबसी केबल्स (सागरी केबल्स), फायबर रूट आणि आंतरराष्ट्रीय केबल लँडिंग स्टेशन्सच्या माध्यमातून नेटवर्कची पोहोच आणि मजबुती सुधारण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे.

या प्रकल्पाचा भाग म्हणून गूगलने तीन नवीन सागरी केबल कॉरिडॉर विकसित करण्याचे वचन दिले आहे. हे केबल कॉरिडॉर भारताला थेट सिंगापूर, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाशी जोडतील. त्याचबरोबर अमेरिका आणि भारत यांच्यातील क्षमता वाढवण्यासाठी चार धोरणात्मक फायबर-ऑप्टिक मार्गही तयार केले जाणार आहेत. हे मार्ग क्लाउड कॉम्प्युटिंग आणि एआय वर्कलोडशी संबंधित मोठ्या प्रमाणावरील डेटा प्रवाहासाठी उपयुक्त ठरतील. त्यासाठी हाय-बँडविड्थ आणि लो-लेटन्सी कनेक्शनची आवश्यकता असते.

विशाखापट्टणम ठरणार नवीन ‘गेटवे’

प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर विशाखापट्टणम (विझाग) येथे नवीन आंतरराष्ट्रीय सबसी गेटवे तयार करण्यात येणार आहे. भारताची आंतरराष्ट्रीय केबल लँडिंग क्षमता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. गूगल विशाखापट्टणम आणि चेन्नईला जोडणारा थेट फायबर-ऑप्टिक मार्ग विकसित करत आहे, ज्याचा विस्तार आफ्रिकेपर्यंत करण्यात येईल. हा मार्ग ‘इक्वियानो’ आणि ‘नुवेम’ सबसी केबल सिस्टमशी जोडला जाईल.

याबरोबरच विशाखापट्टणम आणि सिंगापूर दरम्यान एक वेगळा मार्ग तयार केला जात आहे. ‘बोसन’ आणि ‘ताबुआ’ सबसी केबल सिस्टमशी जोडल्यानंतर, हा मार्ग ऑस्ट्रेलियामार्गे अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीला भारताच्या पूर्व किनारपट्टीशी जोडणारा दक्षिण पॅसिफिक डिजिटल कॉरिडॉर तयार करेल. लवकरच विशाखापट्टणम एक प्रमुख आंतरराष्ट्रीय लँडिंग हब म्हणून ओळखले जाणार आहे. भारताच्या सबसी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भौगोलिक विविधता आणण्यासाठी आणि देशाच्या आंतरराष्ट्रीय डेटा लिंक्सना मजबूत करण्यासाठी हे मार्ग तयार केले गेले आहेत. गूगलच्या मते, पूर्व किनारपट्टीवर नवीन गेटवे जोडल्यामुळे १०० कोटींहून अधिक लोकसंख्येसाठी नेटवर्क कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि डिजिटल विश्वासार्हता वाढेल.

भारताची पश्चिम किनारपट्टी कनेक्टिव्हिटी

गूगल मुंबई आणि पश्चिम ऑस्ट्रेलिया दरम्यान थेट फायबर-ऑप्टिक मार्ग तयार करत आहे. हा मार्ग ‘तलेलिंक’ आणि ‘होनोमोआना’सबसी केबल सिस्टमशी जोडला जाईल, त्यामुळे ऑस्ट्रेलियामार्गे अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीला भारताशी जोडणारा दक्षिण पॅसिफिक कॉरिडॉर तयार होईल. हा पश्चिम किनारपट्टीचा मार्ग सध्याच्या सबसी इन्फ्रास्ट्रक्चरला पूरक ठरेल. त्यामध्ये ‘ब्लू’, ‘रमन’ आणि ‘सोल’ केबल सिस्टमचा समावेश आहे. हे केबल सिस्टम एकत्रितपणे अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीपासून रेड सीमधून मुंबईपर्यंत डेटा कॉरिडॉर तयार करतात.

एआयसाठी या पायाभूत सुविधांचे महत्त्व काय?

गूगलने म्हटले आहे की, सबसी कनेक्टिव्हिटीचा विस्तार केल्याने सेवेची विश्वासार्हता आणि परवडणारी क्षमता सुधारते, तसेच उत्पादकता आणि आर्थिक वाढीस मदत होते. जुने सागरी व्यापारी मार्ग आता डिजिटल व्यापार मार्गांमध्ये बदलले जात आहेत. वेगवान डेटा एक्स्चेंजच्या माध्यमातून अर्थव्यवस्थांना जवळ आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे कंपनीने म्हटले आहे.