Jimbu Herb: नेपाळमध्ये एक सुप्रसिद्ध म्हण आहे – “दाल भात पॉवर, २४ अवर!” तिथल्या प्रत्येक घरात रोज खाल्ल्या जाणाऱ्या साध्या वरण-भाताच्या थाळीला नेपाळी संस्कृतीत अमूल्य स्थान आहे. डोंगर दऱ्यांच्या कठीण प्रदेशात ट्रेकिंग करणे ओझी वाहून नेणे किंवा कष्टाचे काम करण्याची ऊर्जा त्यांना या ‘दाल-भाता’च्या थाळीतूनच मिळते, असा तिथल्या लोकांचा ठाम विश्वास आहे. 

पण तुम्हाला माहित आहे का? या साध्या वरणाला एक वेगळीच सुगंधी आणि अप्रतिम चव देणारी हिमालयातील ही गुप्त वनस्पती आता एक मोठ्या वन्यजीव क्रांतीचे कारण ठरत आहे. ‘जिम्बू’ नावाचे हे सुगंधी गवत केवळ जेवणाची चवच वाढवत नाही, तर हिमालयातील दुर्मिळ आणि संकटग्रस्त हिमबिबट्यांचे प्राण वाचवण्यासाठी आणि स्थानिक शेतकऱ्यांचे नशीब बदलण्यासाठी एक वरदान ठरत आहे!  

काय आहे हे जिम्बू?

जिम्बू ही हिमालयाच्या ४,००० मीटर उंचीवर आढळणारी लसूण किंवा कांद्याच्या पातीसारखी दिसणारी एक सुगंधी वनस्पती आहे.  

नेपाळमधील डाळीला खरी चव या जिम्बूमुळेच येते. हे सुगंधी गवत आधी तुपात किंवा तेलात परतून (फोडणी देऊन) उकळत्या डाळीवर सोडले जाते, ज्यामुळे डाळीला एक वेगळाच खमंग सुटतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत लोक हे गवत गोळा करण्यासाठी हिमालयाच्या अत्यंत धोकादायक आणि उभ्या कड्यांवर जात असत. 

पर्यावरण आणि उपजीविका तज्ज्ञ शैलेंद्र थकाली यांच्या मते, “जेव्‍हा जेव्‍हा आपण दाल भात बद्दल बोलतो, तेव्‍हा डोंगराळ भागातील थकाली समुदायाने तयार केलेली ‘थकाली आवृत्ती’ सर्वात प्रसिद्ध आहे. आणि या थकाली दाल भातला त्याची अनोखी चव आणि सुवास जिम्बूमुळेच मिळतो.”

जिम्बूच्या शेतीमुळे हिमबिबट्यांचे प्राण कसे वाचत आहेत?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, एका मसाल्याच्या वनस्पतीचा आणि हिमालयातील हिंस्त्र हिमबिबट्याचा काय संबंध? तर यामागे निसर्गाचे एक अनोखे गणित आहे: 

ब्लू शीप आणि जिम्बूचा वास: हिमालयात राहणारे ‘ब्लू शीप’ हे प्राणी शेतकऱ्यांची पिके नष्ट करायचे. पण, जिम्बू या वनस्पतीचा वास अत्यंत उग्र आणि तिखट असतो, जो या निळ्या मेंढ्यांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे जिम्बूच्या शेताजवळ या मेंढ्या फिरकतही नाहीत.

हिमबिबट्यांचे अन्नाचा शोध: हे ‘ब्लू शीप’ हिमबिबट्यांचे मुख्य अन्न आहेत. जेव्हा मेंढ्या मानवी वस्त्यांकडे आणि पिकांकडे येणे बंद करतात, तेव्हा त्यांच्या मागे-मागे येणारे हिमबिबट्या देखील मानवी वस्त्यांपासून दूर राहतात.

मानव-वन्यजीव संघर्ष संपला: पूर्वी हिमबिबट्या गावाजवळ येऊन शेतकऱ्यांच्या शेळ्या-मेंढ्या किंवा याक मारून टाकायचे. काही वेळा एकाच रात्रीत ५०-६० पाळीव प्राणी मारले गेल्यामुळे संतप्त झालेले शेतकरी सूड भावनेने या दुर्मिळ हिमबिबट्यांना विष देऊन किंवा मारून टाकायचे. आता जिम्बूमुळे हिमबिबट्या गावाकडे येत नसल्याने त्यांची शिकार पूर्णपणे थांबली आहे!

या प्रकल्पाचे मुख्य संशोधक शैलेंद्र थकाली यांनी एक अतिशय मार्मिक वाक्य म्हटले आहे,

“जर आपल्याला हिमबिबट्यांचे रक्षण करायचे असेल, तर आधी तिथल्या शेतकऱ्यांच्या पाकिटाचे (आर्थिक स्थितीचे) रक्षण करावे लागेल.”

वन्यजीव संवर्धन शास्त्रज्ञ कमल थापा यांनीही याला दुजोरा दिला आहे, त्यांच्या मते:

“हिमबिबट्यांच्या संवर्धनासाठी आर्थिक संधी देणारा आणि समुदायाच्या नेतृत्वाखाली चालणारा ‘जिम्बू शेती’ हा एक उत्तम आदर्श ठरू शकतो.”

दुर्गम गावाची ‘लॉटरी’: बंपर कमाई!

नेपाळच्या तिबेट सीमेला लागून असलेल्या मनांग जिल्ह्यातील ‘फू’ नावाच्या दुर्गम गावातील ३७ कुटुंबांनी ‘माउंटेन स्पिरिट’ या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने जिम्बूची पद्धतशीर शेती सुरू केली आहे. 

३ ते ४ वेळा पीक: हे गवत वर्षातून ३ ते ४ वेळा कापणीला येते. झाड उपटून न टाकता फक्त त्याची पाती कापली जाते.

बंपर कमाई: बटाटा किंवा बार्ली पिकवून तिथल्या शेतकऱ्यांना फारसे पैसे मिळत नव्हते. पण जिम्बूची किंमत काठमांडूच्या बाजारपेठेत २,५०० ते ३,००० नेपाळी रुपये प्रति किलो एवढी प्रचंड आहे.

१२ दशलक्ष रुपयांचा नफा: या प्रायोगिक शेतीतून वर्षाला तब्बल १ कोटी २० लाख नेपाळी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे, जे या दुर्गम भागातील लोकांसाठी एका लॉटरीपेक्षा कमी नाही.

अन्न मानववंशशास्त्रज्ञ बिंती गुरुंग म्हणतात, “आर्थिक क्षेत्रात पारंपरिक ज्ञानाचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. स्थानिक लोकांना आर्थिक विकास आणि व्यापारी धोरणांमध्ये समाविष्ट करून घेतल्यास, ते ज्या नैसर्गिक जगात राहतात त्याचे संवर्धन करण्यासाठी एक महत्त्वाचे उदाहरण समोर येईल, जे केवळ आत्तासाठीच नाही तर पुढील अनेक पिढ्यांसाठी फायदेशीर ठरेल.”

यापुढे आव्हान काय?

जरी हा प्रकल्प ‘निसर्ग आणि माणूस’ दोघांसाठी फायदेशीर ठरत असला, तरी हिमालयाच्या १३,००० फूट उंचीवर शेतीसाठी पाण्याचे पाईप्स, प्लास्टिक टनेल आणि कुंपणाचे सामान पाठीवर वाहणी नेणे अत्यंत कठीण आहे. तसेच, मधले दलाल शेतकऱ्यांकडून स्वस्तात जिम्बू खरेदी करून शहरात महाग विकतात. त्यामुळे या स्थानिक उत्पादनाला स्वतःचा ‘ब्रँड’ मिळवून देणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडणे हे पुढील मोठे आव्हान आहे.

जिम्बूच्या या अनोख्या शेतीने हे सिद्ध करून दाखवले आहे की, निसर्गाचे रक्षण आणि मानवाचा आर्थिक विकास हातात हात घालून पुढे जाऊ शकतात!