What is Lipstick Index Know Detail in Marathi recession in america nail polish sell increased | Loksatta

Premium

विश्लेषण: ‘लिपस्टिक’, ‘अंडरवेअर’, ‘नेलपॉलिश’.. फॅशन नव्हे, आर्थिक मंदीचे निर्देशक; अर्थतज्ज्ञांनीही केलंय मान्य!

What Is Lipstick Index: गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेत स्वस्त दरातल्या लिपस्टिकची विक्री वाढली आहे. त्यामुळे २००१ साली लियोनार्ड लॉडर यांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार आर्थिक मंदीची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.

विश्लेषण: ‘लिपस्टिक’, ‘अंडरवेअर’, ‘नेलपॉलिश’.. फॅशन नव्हे, आर्थिक मंदीचे निर्देशक; अर्थतज्ज्ञांनीही केलंय मान्य!
'लिपस्टिक', 'अंडरवेअर', 'नेलपॉलिश'.. फॅशन नव्हे, आर्थिक मंदीचे निर्देशक!

Lipstick Index: महिलांनी नखांना लावलेली नेलपॉलिश किंवा ओठांना लावलेली लिपस्टिक ही फॅशन स्टाईल किंवा काहींच्या सवयीचा भाग अशी सर्वमान्य समजूत आहे. नव्हे, हा आता बहुतांश महिलांच्या रोजच्या सवयीचा एक भाग झाला आहे. दुसरीकडे अंडरवेअर किंवा दुसऱ्या शब्दांत अंतर्वस्त्र हा तसा वैयक्तिक सोयीचा भाग असल्यामुळे त्यावर सहसा चर्चा होत नाही. पण या गोष्टींबाबतचे हे सर्व प्रचलित समज बाजूला सारत या गोष्टी म्हणजे आर्थिक मंदीच्या निर्देशक असल्याचं गेल्या १०० वर्षांत घडलेल्या काही घटनांमुळे समोर आलं आहे. त्या त्या काळात अनेक अर्थतज्ज्ञांनी या गृहीतकावर आधारित त्यांचे विश्लेषणात्मक सिद्धांतही मांडले. बराच काळ हे सिद्धांत सर्वमान्यही झाले. कालांतराने त्यांना विरोध करणारे सिद्धांत आले खरे, पण अजूनही या गोष्टींच्या किमतींविषयी जेव्हा चर्चा होते, तेव्हा आर्थिक मंदी किंवा वृद्धीची चर्चा व्हायला लागते.

लोकसत्ताची ही बातमी वाचण्यासाठी साइन-इन करा
YouTube Poster

आत्ता पुन्हा चर्चा का?

आर्थिक मंदी म्हटलं की सर्वात आधी त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचं दिसतं. नंतर बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जांचे व्याजदर, रिझर्व्ह बँकेचा रेपोरेट, बाजारपेठेतील महागाई वगैरे सर्वच गोष्टींवर त्याचा परिणाम झाल्याचं दिसतं. पण लिपस्टिक, नेलपॉलिशसंदर्भात काही अर्थतज्ज्ञांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार पुन्हा एकदा अमेरिकेत आर्थिक मंदीचे वारे वाहू लागल्याचं मानलं जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेत स्वस्त दरातल्या लिपस्टिकची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. त्यामुळे २००१ साली लियोनार्ड लॉडर यांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार आर्थिक मंदीची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.

काय होता लॉडर यांचा सिद्धांत?

खरंतर १९३०च्या दशकातच या प्रकारच्या चर्चांना आणि अंदाज बांधायला सुरुवात झाली होती. पण २००१मध्ये अमेरिकेत आलेल्या आर्थिक मंदीची जगभर चर्चा झाली होती. काही प्रमाणात त्याची झळ इतर देशांनाही बसली होती. पण त्याचवेळी अमेरिकेत लिपस्टिकची विक्री तुफान वाढली होती. लियोनार्ड लॉडर यांच्यामते लिपस्टिकची विक्री आणि अर्थव्यवस्थेची वृद्धी यांच्यात व्यस्त प्रमाण आहे. जर बाजारपेठेत स्वस्तातल्या कॉस्मेटिक वस्तूंची विक्री वाढली, तर आर्थिक मंदी हळूहळू बाजारात पसरत असल्याचं मानलं जातं.

विश्लषण : इस्लाममध्ये मद्यप्राशन ‘हराम’, मुस्लीम राष्ट्रांमध्ये मद्यासंंबंधीचे नियम काय?

काय आहे लिपस्टिक इंडेक्स?

या सिद्धांताच्या समर्थनासाठी अर्थतज्ज्ञांकडून वेगवेगळे दावे केले गेले. त्यापैकी सर्वाधिक चर्चेत आलेला दावा म्हणजे अर्थव्यवस्थेत मंदी आल्यानंतर महिला महागातल्या कॉस्मेटिक्सच्या वस्तू खरेदी करू शकत नाहीत. त्यांचा अधिकांश कल हा बचतीकडे असतो. त्यामुळेच महिलांकडून स्वस्तातल्या वस्तूंची खरेदी जास्त प्रमाणात केली जाते. लिपस्टिक ही सर्वात स्वस्त ब्युटी प्रोडक्ट्सपैकी एक मानली जाते. त्यामुळेच लिपस्टिकची खरेदी वाढली की अर्थव्यवस्थेत मंदी आल्याचं मानलं गेलं. यालाच लिपस्टिक इंडेक्स असं म्हटलं गेलं. पण एकीकडे आर्थिक मंदीच्या काळात लिपस्टिकची खरेदी वाढल्यातं दिसून आलं असलं, तरी अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्यानंतर ही खरेदी कमी होताना दिसली नाही. त्यामुळे हा तर्क सिद्ध होऊ शकला नसल्याची टीकाही केली गेली.

२००८मध्ये नेलपॉलिशची झाली चर्चा!

२००८मध्ये अमेरिकेत आलेल्या आर्थिक मंदीनं तर जागतिक अर्थव्यवस्थेचं कंबरडंच मोडून ठेवलं होतं. पण यावेळी लिपस्टिकपाठोपाठ नेलपॉलिशचीही विक्री जोमाने झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे नेलपॉलिशही आर्थिक मंदीच्या निर्देशांकामध्ये गणली जाऊ लागली. यावेळी रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदीमुळे मोठं आर्थिक संकट उभं राहिल्याचं पाहायला मिळालं होतं.

लिपस्टिक इंडेक्स आहे तरी काय? वाचा सविस्तर!

५० वर्ष मागे गेल्यास १९७०मध्ये अर्थव्यवस्थेतील मंदीसाठी अंडरवेअरच्या विक्रीला निर्देशक मानलं गेलं होतं. ७० च्या दशकात एलन ग्रीनस्पेननं बाजारपेठेत अंडरवेअरची विक्री घटल्यास, त्याला आर्थिक मंदीचं निर्देशक मानलं होतं. यासाठी त्यानं केलेला दावा असा होता, की जेव्हा बाजारात अंडरवेअरची विक्री मोठ्या प्रमाणावर घटते, तेव्हा ते आर्थिक मंदीचं द्योतक असतं. कारण, ग्राहक अंडरवेअरसारखी गोष्ट खरेदी करणंही टाळत असल्याचं यातून स्पष्ट होतं. अशा काळात अतिशय गरजेच्या गोष्टींवरच खर्च केला जातो.

करोना काळात डिओची विक्री वाढली!

करोना काळात आख्खं जगच थांबल्यामुळे जगभरातल्या अर्थव्यवस्था कोलमडून पडल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या काळातही डिओ किंवा परफ्यूमची विक्री वाढल्याचं दिसून आलं. एका आकडेवारीनुसार २०२१मध्ये या वस्तूंच्या विक्रीत तब्बल ४५ टक्क्यांनी वाढ झाली. लोकांचं उत्पन्न घटल्यामुळे महागड्या वस्तूंची खरेदी घटली आणि परफ्यूम, डिओसारख्या गोष्टींवर भागवण्याकडे लोकांचा कल दिसून आला. असाही दावा केला गेला, की या काळात तोंडावर मास्क लावायचा असल्यामुळे लिपस्टिकची खरेदी मंदावली होती, मात्र त्याचवेळी नेलपॉलिशची खरेदी वाढल्याचं दिसून आलं.

विश्लेषण: भारताच्या परराष्ट्र खात्यापर्यंत पोहोचलं ‘हनीट्रॅप’चं जाळं; लोकांना कसं केलं जातं हनीट्रॅप? हेरगिरीसाठी कसा होतो वापर?

१९३०च्या दशकाहती असंच चित्र दिसलं होतं. १९२९ आणि १९३३मध्येदेखील अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं होतं. या काळात बाजारपेठेत मेकअपच्या सामानाची विक्री वाढली होती. त्याहीवेळी लोकांकडून फक्त गरजेच्या आणि स्वस्तातल्या वस्तूंवरच खर्च केला जात असल्याचा दावा काही अर्थतज्ज्ञांनी केला होता.

अमेरिकेत पुन्हा वाढलीये लिपस्टिकची विक्री!

अमेरिका आणि युक्रेनमधील युद्धामुळे थेट जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. त्यात महागाईमुळे सर्वच देशांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. काही देशांमधील स्थानिक घटकांमुळे महागाई उग्र रूप धारण करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर युरोप आणि अमेरिका या देशांमध्ये स्वस्त दरातील लिपस्टिकची विक्री वाढू लागल्यामुळे अर्थतज्ज्ञांप्रमाणेच जागतिक पातळीवरही चिंता वाढू लागली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-11-2022 at 09:00 IST
Next Story
विश्लेषण: मुंबई-गोवा महामार्गाचे काम का रखडले?