“ऑफिसची हवा तुमचा मेकअप खराब करत आहे…”, “ऑफिसच्या हवेमुळे तुमची त्वचा कोरडी पडत आहे…”, “ऑफिसच्या वातावरणाने तुम्हाला प्रचंड थकवा येत आहे…”
जर तुम्ही सोशल मीडियाचा नियमित वापर करत असाल, तर गेल्या काही दिवसांत इन्स्टाग्राम किंवा टिकटॉकवर या धाटणीचे अनेक व्हिडिओ तुमच्या नजरेस पडले असतील. सध्या जगभरात आणि भारतातही नोकरदार वर्गामध्ये ‘ऑफिस एअर’ (Office Air) नावाचा एक नवा ट्रेंड प्रचंड व्हायरल होत आहे. दिवसभरात १० ते १२ तास ऑफिसच्या बंद वातावरणात घालवल्यानंतर, दिवसाच्या शेवटी माणूस कमालीचा थकलेला, निस्तेज आणि चेहऱ्यावरील तेज हरवून बसलेला दिसतो, या अनुभवाला नेटीझन्सनी ‘ऑफिस एअर’ असे नाव दिले आहे.
अनेक सोशल मीडिया क्रिएटर्सनी ऑफिसला जाण्यापूर्वीचा आपला ताजातवाना चेहरा आणि ऑफिस सुटल्यानंतरचा निस्तेज चेहर्याचे ‘side-by-side’ व्हिडिओ शेअर केले आहेत. दुपारपर्यंत मेकअप पूर्णपणे निघून जाणे, केस तेलकट किंवा चपटे होणे, डोळे थकलेले दिसणे आणि त्वचा निस्तेज (Dehydrated) होणे, या समस्यांनी अनेक तरुण हैराण झाले आहेत. हा केवळ एक सोशल मीडिया ट्रेंड आहे की, यामागे काही वैद्यकीय कारणे आहेत? बंगळुरू येथील प्रसिद्ध ‘एस्टेर आरव्ही हॉस्पिटल’च्या तज्ज्ञ डॉक्टरांनी यामागचे धक्कादायक सत्य समोर आणले आहे.
अस्वच्छ हवा: थकवा, डोकेदुखी आणि ‘ब्रेन फॉग’चे मुख्य कारण
ऑफिसमध्ये काम करताना दुपारनंतर अचानक डोकेदुखी सुरू होणे, एकाग्रता भंग पावणे, डोळ्यांची जळजळ आणि मानसिक थकवा (याला वैद्यकीय भाषेत ‘ब्रेन फॉग’ म्हणतात) जाणवणे, हा अनेकांचा रोजचा अनुभव आहे. ‘एस्टेर आरव्ही हॉस्पिटल’चे प्रमुख सल्लागार (Internal Medicine) डॉ. अरविंद एस. एन. यांनी स्पष्ट केले की, या सर्व समस्यांमागे ऑफिसमधील इनडोअर हवेचा खालावलेला दर्जा (Poor Indoor Air Quality) हे मुख्य कारण आहे.
“बहुतांश आधुनिक ऑफिसेस चारी बाजूंनी पूर्णपणे बंद (Sealed) असतात. तिथे बाहेरची ताजी हवा येण्याचे प्रमाण अत्यंत मर्यादित असते. अशा वातावरणात कालांतराने कार्बन डायऑक्साइड (CO2), धूळ, ॲलर्जन्स आणि ऑफिसमधील फर्निचर व क्लिनिंग प्रॉडक्ट्समधून निघणारे घातक वायू (VOCs) साठून राहतात.”
डॉ. अरविंद पुढे म्हणाले की, एकाच पॅक मीटिंग रूममध्ये जेव्हा अनेक लोक एकत्र बसतात, तेव्हा कार्बन डायऑक्साइडची पातळी झपाट्याने वाढते. यामुळे मेंदूची कार्यक्षमता मंदावते, कर्मचाऱ्यांना सुस्ती येते आणि ते मानसिकदृष्ट्या थकतात.
बंद एसी केबिन: विषाणू आणि संसर्गाचे हॉटस्पॉट!
कमी वायुविजन (Poor Ventilation) असलेल्या या बंद क्युबिकल्समध्ये केवळ थकवाच येत नाही, तर आजारी पडण्याचा धोकाही कैक पटीने वाढतो. जेव्हा कोणी खोकते, शिंकते किंवा फक्त श्वास घेते, तेव्हा हवेत पसरणारे विषाणूंचे अत्यंत सूक्ष्म बारीक द्रव (Liquid) किंवा घन (Solid) कण (Aerosols) ताजी हवा नसल्यामुळे बराच वेळ तिथेच तरंगत राहतात.
विशेषतः ऑफिसमधील कॅफेटेरिया, कॉन्फरन्स रूम्स आणि लिफ्ट यांसारख्या सामायिक जागांमध्ये इन्फ्लूएंझा, सामान्य सर्दी आणि इतर संसर्गजन्य आजार वेगाने पसरतात. हवेचा प्रवाह कमकुवत असल्याने आतील आर्द्रता वाढते, परिणामी याचा श्वसनसंस्थेवर ताण येतो आणि शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यावर उपाय म्हणून कंपन्यांनी सेंट्रलाइज्ड एसीची (HVAC) नियमित देखभाल करणे, HEPA फिल्टरयुक्त एअर प्युरिफायर वापरणे आणि ताजी हवा आत येईल अशी व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे.
एसी त्वचा आणि टाळूचे आरोग्य कसे हिरावून घेतो?
‘ऑफिस एअर’चा सर्वात मोठा फटका आपल्या सौंदर्याला आणि त्वचेला बसतो. सौंदर्यशास्त्र आणि त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. सुनील कुमार प्रभू यांनी यावर सविस्तर प्रकाश टाकला आहे.
१. स्कीन बॅरियर (Skin Barrier) कमकुवत होणे
एसीच्या सततच्या वापरामुळे हवेतील ओलावा पूर्णपणे शोषला जातो. अशा कोरड्या हवेत तासनतास बसल्यामुळे त्वचेतील नैसर्गिक पाणी झपाट्याने कमी होते. परिणामी, त्वचा ओढल्यासारखी वाटणे, कोरडी पडणे, खाज सुटणे आणि चेहऱ्यावर पांढरे पापुद्रे येणे या समस्या उद्भवतात. दीर्घकाळ असे राहिल्यास त्वचेचे संरक्षक कवच (Skin Barrier) कमकुवत होते, ज्यामुळे त्वचेची लवचिकता कमी होऊन अकाली सुरकुत्या आणि फाईन लाइन्स (Fine Lines) दिसू लागतात. यामुळेच तरुण वयातही चेहरा अकाली वृद्ध दिसू लागतो.
२. एक्झिमा आणि रोसेसियाचा भडका
ज्यांची त्वचा आधीच संवेदनशील आहे किंवा ज्यांना एक्झिमा आणि रोसेसिया (Rosacea) सारखे त्वचेचे आजार आहेत, त्यांच्यासाठी ऑफिसची हवा शाप ठरू शकते. बाहेरील कडक ऊन आणि ऑफिसमधील थंड हवा यांमधील सततच्या तापमानातील बदलांमुळे चेहऱ्यावर लालसरपणा आणि सूज वाढते. यात कॉम्प्युटर स्क्रीनचा सततचा प्रकाश (Blue Light) आणि कामाचा ताण आगीत तेल ओतण्याचे काम करतात.
३. केसांचे नुकसान आणि कोंडा
फक्त त्वचाच नाही, तर टाळूची (Scalp) त्वचाही एसीमुळे कोरडी पडते. यामुळे टाळूला खाज सुटते आणि कोंड्याची (Dandruff) समस्या गंभीर रूप धारण करते. केस गळण्याचे प्रमाण वाढते.
‘ऑफिस एअर’पासून स्वतःचा बचाव कसा करावा?
डॉ. सुनील कुमार प्रभू यांच्या मते, बहुतांश नोकरदार केवळ हलके मॉइश्चरायझर वापरण्याची चूक करतात, जे ताप्तुरते फायदेशीर ठरते. एसीच्या कोरड्या हवेचा सामना करण्यासाठी ‘बॅरियर-रिपेअर’ (Barrier-Repair) करणाऱ्या स्कीनकेअर प्रॉडक्ट्सची गरज असते.
आपली त्वचा आणि आरोग्य टिकवण्यासाठी डॉक्टरांनी दिलेले काही कानमंत्र:
मॉइश्चरायझर खरेदी करताना त्यात सिरॅमाइड्स (Ceramides), हायड्रॉलिक ॲसिड (Hyaluronic Acid), ग्लिसरीन आणि नियासिनामाइड (Niacinamide) हे घटक आहेत की नाही हे तपासा. हे घटक त्वचेतील ओलावा लॉक करतात.
सनस्क्रीन अजिबात विसरू नका: अनेकांचा असा गैरसमज असतो की ऑफिसच्या आत सनस्क्रीनची काय गरज? परंतु, खिडक्यांमधून येणारी अतिनील किरणे (UV Rays) आणि लॅपटॉप स्क्रीनची ‘ब्लू लाईट’ यांपासून बचावासाठी इनडोअर सनस्क्रीन लावणे अनिवार्य आहे.
चहा-कॉफीचे अतिसेवन टाळून दिवसातून किमान ३ ते ४ लीटर पाणी प्या. डेस्कवर पाण्याचा टंबलर सतत भरलेला ठेवा.
ऑफिसमध्ये आल्यावर सारखा चेहरा धुवू नका, यामुळे त्वचा अधिक कोरडी होते. तसेच जास्त मेकअप (Heavy Makeup) तासनतास लावून ठेवणे टाळा.
‘ऑफिस एअर’ हा विषय केवळ सोशल मीडिया ट्रेंड नसून, आधुनिक कॉर्पोरेट जीवनशैलीचे ते एक कटू सत्य आहे. आपण कामाचे तास कमी करू शकत नाही, परंतु योग्य स्कीनकेअर रुटीन, भरपूर पाण्याचे सेवन, दर तासाला डेस्कवरून उठून थोडी हालचाल करणे आणि संतुलित आहार यांच्या जोरावर आपण आपल्या मेंदूचे आणि त्वचेचे आरोग्य नक्कीच राखू शकतो. शेवटी, तुमचे काम जितके महत्त्वाचे आहे, तितकेच तुमचे आरोग्यही महत्त्वाचे आहे!
