श्वास घेणं ही माणसाची नैसर्गिक आणि सहज होणारी प्रक्रिया आहे, पण जेव्हा हा हक्काचा श्वास फुप्फुसात अडकू लागतो आणि प्रत्येक श्वासासाठी शरीराला झटावं लागतं, तेव्हा आपलं जगणं किती कठीण होत असेल याची कल्पनाही करवत नाही.
अनेकदा आपण ज्या गोष्टी आनंदाने खातो किंवा जी मोकळी हवा आपल्याला घेता येते, तीच हवा नकळतपणे आपल्या फुप्फुसांची राखरांगोळी करत असते. आपल्या याच अनभिज्ञतेमुळे एका दुर्मीळ पण अत्यंत जीवघेण्या आजाराचा जन्म होतो, ज्याला वैद्यकीय भाषेत ‘ब्रॉन्किओलायटिस ऑब्लिटेरन्स’ (Bronchiolitis Obliterans) आणि सर्वसामान्यांच्या भाषेत त्याला ‘पॉपकॉर्न लंग’ म्हटलं जातं. हा आजार जितका दुर्मीळ आहे, तितकाच तो भयानक आणि अपरिवर्तनीय आहे; म्हणून वेळीच याची लक्षणं ओळखून काळजी घेणे हाच यातून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे.
पॉपकॉर्न नाव कसं पडलं?
सर्वसामान्यांमध्ये एक मोठा गैरसमज आढळतो की पॉपकॉर्न खाल्ल्याने हा आजार होतो, पण तसे अजिबात नाही. हा आजार पॉपकॉर्न खाण्यामुळे नाही, तर काही विशिष्ट रासायनिक वायू (chemical vapour), सुगंधी घटक (flavour agent) किंवा विषारी धूर (toxic fumes) श्वासाद्वारे शरीरात गेल्यामुळे हा आजार होतो. या आजाराची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला २००० च्या दशकाच्या सुरुवातीला जावे लागेल.
अमेरिकेतील एका मायक्रोवेव्ह पॉपकॉर्न कारखान्यात काम करणाऱ्या काही कामगारांना अचानक श्वसनाचा गंभीर त्रास सुरू झाला. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता एक धक्कादायक गोष्ट समोर आली. पॉपकॉर्नला बटरचा गंध आणि चव देण्यासाठी डायसिटिल (Diacetyl) नावाचे केमिकल वापरले जात होते. या केमिकलची वाफ सतत श्वासावाटे शरीरात जात असल्यामुळे या कर्मचाऱ्यांची फुप्फुसे पूर्णपणे निकामी झाली होती. या घटनेनंतर जागतिक स्तरावर या आजाराला ‘पॉपकॉर्न लंग’ असे नाव पडले.
फुप्फुसांची रचना आणि ‘पॉपकॉर्न लंग’:
आपल्या फुप्फुसांचे मुख्य कार्य म्हणजे हवेतील ऑक्सिजन शरीरात पोहोचवणे आणि शरीरातील कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणे. आपण जेव्हा श्वास घेतो, तेव्हा हवा मोठ्या श्वासनलिकेतून पुढे वाहत जाऊन फुप्फुसातील अतिशय लहान आणि नाजूक श्वसनमार्गांपर्यंत पोहोचते, ज्यांना ‘ब्राँकिओलस’ (bronchioles) म्हटले जाते. हे ‘ब्राँकिओलस’ झाडाच्या छोट्या फांद्यांसारखे असतात.
पॉपकॉर्न लंग या आजारात नेमके याच नाजूक ‘ब्राँकिओलस’वर परिणाम होतो. जेव्हा एखादी व्यक्ती डायसिटिल किंवा तत्सम विषारी वायू श्वासावाटे आत घेते, तेव्हा हे केमिकल्स ‘ब्राँकिओलस’च्या आतील नाजूक आवरणाला गंभीर इजा पोहोचवतात. आपले शरीर या इजेवर स्वतःहून ‘हीलिंग’ प्रक्रिया सुरू करते. मात्र, या रासायनिक इजेची जखम भरताना तिथे मोठ्या प्रमाणावर ‘स्कार टिशू’प्रमाणे कडक थर किंवा फायब्रोसिस तयार होतो. या कडक ‘स्कार टिशूज’मुळे हे अत्यंत लहान श्वसनमार्ग आकुंचन पावतात, अरुंद होतात किंवा काही वेळा पूर्णपणे बंद होतात. परिणामी, हवा फुप्फुसातच अडकून पडते आणि शरीराला पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही.
आजाराची मुख्य करणे आणि धोके:
- व्यावसायिक संपर्क:
मायक्रोवेव्ह पॉपकॉर्न कारखाने, फ्लेवरिंग मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आणि डायसिटिल उत्पन्न करणाऱ्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना याचा सर्वाधिक धोका आहे. ‘२,३-पेंटनेडिओन’ (2,3-pentanedione) सारखी इतर फ्लेव्हरिंग केमिकल्सही तितकीच घातक आहेत. - विषारी वायू आणि औद्योगिक धूर:
सलफर डायऑक्साईड, अमोनिया, क्लोरिन किंवा वेल्डिंगदरम्यान निघणारे धातूंचे विषारी धूर श्वासावाटे आत गेल्यानेही हा आजार होऊ शकतो. - गंभीर श्वसन संसर्ग:
काही वेळा विशिष्ट प्रकारचे गंभीर व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेकशन्स फुप्फुसांना इतकी हानी पोहोचवतात की त्याचे रूपांतर ‘ब्राँन्किओलायटिस ऑब्लिटेरन्स’मध्ये होते. - ऑटोइम्युन आजार आणि अवयव प्रत्यारोपण:
संधिवातासारख्या ऑटोइम्युन आजारामुळे किंवा फुप्फुस प्रत्यारोपण केल्यानंतर शरीराने ते फुप्फुस नाकारल्यास कॉम्प्लिकेशन्स म्हणून हा आजार उद्भवू शकतो. - वेपिंग:
अलीकडच्या काळात तरुण पिढीमध्ये वेपिंग आणि इ-सिगारेटचे फॅड प्रचंड वाढले आहे. अनेक ई-लिक्विड्स आणि एरोसोलमध्ये चव वाढवण्यासाठी याच फ्लेवरिंग केमिकल्सचा वापर केला जातो. अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) ने स्पष्ट केले आहे की, कारखान्यातील कामगारांमधील डायसिटिलचा थेट संबंध सिद्ध झाला असला तरी वेपिंगमुळे ‘पॉपकॉर्न लंग’ होण्याचा धोका अजूनही संशोधनाचा विषय आहे. मात्र, नॅशनल हार्ट, लंग आणि ब्लड इन्स्टिट्यूट (NHLBI) नुसार, फुप्फुसात कोणत्याही रासायनिक वाफा जाणे हे धोक्याचेच आहे आणि यामुळे फुप्फुसाचे कायमचे नुकसान होऊ शकते.
लक्षणे:
‘पॉपकॉर्न लंग’ची लक्षणे अत्यंत संथ गतीने सुरू होतात, ज्यामुळे अनेकदा रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करतात:
- सुरुवातीला फक्त कोरडा खोकला येणे किंवा चालताना, पायऱ्या चढताना थोडा दम लागणे अशी लक्षणे दिसतात. हळूहळू हा त्रास वाढत जातो.
- सतत आणि न थांबणारा कोरडा खोकला.
- श्वास घेताना शिटीसारखा आवाज येणे (Wheezing).
- छातीत सतत घट्टपणा किंवा दडपण जाणवणे.
- कसलेही शारीरिक श्रम न करता प्रचंड थकवा जाणवणे.
- वेगाने चालताना किंवा व्यायाम करताना श्वास पूर्णपणे कोंडणे.
वैद्यकीय सूचना:
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन – CDC आणि नॅशनल हार्ट, लंग, अँड ब्लड इन्स्टिट्यूट – NHLBI रिपोर्टनुसार, “पॉपकॉर्न लंगची लक्षणे बऱ्याचदा दमा (Asthma) किंवा सीओपीडी (COPD) सारख्या सर्वसामान्य आजारांशी मिळतीजुळती असतात, त्यामुळे अनेकदा याचे चुकीचे निदान (Misdiagnosis) होण्याची शक्यता दाट असते. जर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी केमिकल्सचा संपर्क होत असेल आणि श्वसनाचा त्रास बऱ्याच आठवड्यांपासून कमी होत नसेल, तर त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.”
