शिवडी-वरळी उन्नत रस्त्या प्रकल्पासाठी १२५ वर्षांच्या जुन्या पुलाचे पाडकाम करत त्या जागी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) नवीन द्विस्तरीय पूल बांधण्यात येणार आहे. त्यानुसार २५ एप्रिलला प्रभादेवी पूल बंद करत पाडकामास सुरुवात केली जाणार होती. पण पूल बंद झालाच नाही, पण दुसरीकडे प्रभादेवी द्विस्तरीय पुलाच्या कामात बाधित होणार्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा तिढा निर्माण झाला आहे. तेव्हा नेमका हा तिढा काय आहे याचा हा आढावा…
शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्प
शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्प ४.५ किमीचा असून याची रुंदी १७ मीटर अशी आहे. शिवडी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडून सुरू होऊन हार्बर स्थानकाजवळ मध्य आणि पश्चिम मार्ग पार करून सेनापती बापट मार्ग, जगनाथ भातणकर मार्ग, कामगार नगर १ आणि २, अॅनी बेझंट मार्ग पार करून नारायण हर्डीकर मार्ग येथे येऊन संपणार आहे. हा मार्ग जमिनीपासून १५ ते २७ मीटर इतका उंच आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी १०५१.८६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जानेवारी २०२१ मध्ये उन्नत रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून मे. जे. कुमार या कंत्राटदाराच्या माध्यमातून काम सुरू आहे. हा उन्नत रस्ता आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या प्रकल्पाअंतर्गत प्रभादेवी पुलाचे पाडकाम करत त्या जागी द्विस्तरीय पूल उभारण्याच्या कामास विलंब होत आहे. पुनर्वसनाच्या प्रश्नामुळे पुलाचे काम अडकले होते. आता हा प्रश्न आणखी गंभीर बनला आहे.
प्रभादेवी उड्डाणपुलाचे महत्त्व
दक्षिण मुंबईतील वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा उड्डाणपूल म्हणजे प्रभादेवी (एल्फिन्स्टन) उड्डाणपूल. प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकाला जोडणारा हा पूल डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाकडे जातो. तर परळमधील महत्त्वाच्या अशा टाटा रुग्णालय, केईएम रुग्णालय आणि वाडिया रुग्णालयाकडे जाण्यासाठीही रेल्वे प्रवाशांना, पादचाऱ्यांना तसेच वाहनचालक-प्रवाशांना याच पुलाचा वापर करावा लागतो. हा पूल दादरसारख्या महत्त्वाच्या ठिकाणालाही जोडतो. त्यामुळे वाहतूकीच्या दृष्टीने हा पूल महत्त्वाचा आहे. या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे तो ब्रिटिशकालीन असून या पुलाचे आयुर्मान १२५ वर्षाहून अधिक असल्याचे सांगितले जाते. १८५३ ते १८६० दरम्यान मुंबईचे गव्हर्नर असलेल्या लाॅर्ड एल्फिन्स्टन यांच्या नावावरून पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानकाचे नाव एल्फिन्स्टन रोड असे ठेवण्यात आले होते. याच नावामुळे या स्थानकावरील पुलाला एल्फिन्स्टन पूल नाव पडले. मात्र नुकतेच एल्फिन्स्टन स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी स्थानक करण्यात आल्याने पुलाचे नावही बदलले आहे. आता स्थानक आणि पूल प्रभादेवी नावाने ओळखले जात आहे.
पुलाचे पाडकाम का?
उन्नत रस्ता मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गाला जोडणाऱ्या प्रभादेवी पुलाला ओलांडून वरून पुढे जाणार आहे. अशा वेळी प्रभादेवी पुलाची दुरवस्था झाली असून पूल धोकादायक झाला आहे. त्यामुळे पुलाची पुनर्बांधणी करणे आवश्यक ठरते. पुनर्बांधणीची जबाबदारी एमएमआरडीएने घेतली. या पुलाच्या जागी नवीन द्विस्तरीय पूल उभारला जाणार आहे. हा द्विस्तरीय पूल १३२ मीटर लांबीचा आणि २७ मीटर उंचीचा असेल. प्रत्येकी दोन मार्गिकांचा द्विस्तरीय पूल असून सध्याच्या पुलाच्या जागी होणाऱ्या पहिल्या स्तरावरून स्थानिक वाहतूक सुरू राहणार आहे. तर त्यावरील स्तरावरून अटलसेतूकडे जाणारी वाहतूक सुरू राहणार आहे. स्थानिक वाहतुकीसाठी पुलाच्या पहिल्या स्तराच्या दोन्ही टोकांना जोडरस्ता (अॅप्रोच रोड) असणार आहे. १५६ मीटरचा एक जोडरस्ता परळला जाणार असून २०९ मीटरचा जोडरस्ता वरळीच्या दिशेने जाईल. दरम्यान या द्विस्तरीय पुलाच्या बांधकासाठी अंदाजे १६८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
पाडकाम का रखडले?
प्रभादेवी पुलाच्या पाडकामासाठी मागील कित्येक महिन्यांपासून मुंबई वाहतूक पोलिसांची परवानगी घेण्याचा प्रयत्न एमएमआरडीएकडून सुरू होता. मात्र हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने तो बंद झाल्यास अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार असल्याने परवानगी मिळण्यास विलंब होत होता. मात्र अखेर २५ एप्रिल पासून पुढील २० महिन्यांसाठी पूल बंद करत पाडकाम करण्यासाठी आणि नवीन पुलाची उभारणी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी परवानगी दिली. त्यानुसार २५ एप्रिलला रात्री ९ वाजता पूल बंद केला जाणार होता. पण या पुलाच्या कामात बाधित होणार्या १९ इमारतींतील रहिवाशांनी रस्त्यावर उतरत आंदोलन करत पूल बंद होऊ दिला नाही. परिणामी पाडकाम रखडले.
१९ इमारती बाधित?
उन्नत रस्त्याअंतर्गत बांधण्यात येणार्या द्विस्तरीय पुलाच्या कामासाठी प्रभादेवी पुलालगतच्या १९ इमारती बाधित होणार आहेत. त्या इमारतींतील रहिवाशांचे पुनर्वसन इतरत्र केले जाणार होते. मात्र रहिवाशांनी तिथल्या तिथेच पुनर्वसन करण्याची मागणी उचलून धरली. रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नसल्यानेच द्विस्तरीय पुलाच्या आणि परिणामी उन्नत रस्त्याच्या कामास विलंब होत आहे. त्यामुळे एमएमआरडीएचा प्रयत्न हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा आहे. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने द्विस्तरीय पुलाच्या संरेखनात बदल करत १९ पैकी १७ इमारती बाधित होण्यापासून वाचविल्या. तर दोन इमारती मात्र यात बाधित होणार आहेत. या दोन रहिवाशांनीही तिथल्या तिथेच पुनर्वसनाची मागणीची मागणी केली आहे.
तिढा वाढला?
प्रभादेवी पुलाच्या कामात दोन इमारती बाधित होणार असल्या तरी पुलाच्या कामामुळे उर्वरित १७ इमारतींनाही धोका पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरसकट १९ इमारतींचा पुनर्विकास करत सर्व रहिवाशांचे प्रभादेवीतच पुनर्वसन करण्याची मागणी रहिवाशांनी उचलली. ही मागणी सरकारने मान्य केली आहे. त्यानुसार एमएमआरडीए १९ इमारतींचा पुनर्विकास करणार आहे. तर दोन इमारतीतील रहिवाशांना कुर्ल्यात तात्पुरते संक्रमण शिबिराचे गाळे दिले जाणार आहे. पण रहिवाशांनी कुर्ल्यात जाण्यास स्पष्ट नकार दिला. तर १७ इमारतीतील रहिवाशांनीही दोन इमारतीतील रहिवाशांना पाठिंबा दिला आहे. इतकेच नव्हे तर सरकार जोपर्यंत १९ इमारतींचा पुनर्विकास तिथल्या तिथे करण्याबाबतचे लेखी आश्वासन दिले जात नाही, जोपर्यंत प्रभादेवीतच दोन इमारतीतील रहिवाशांना संक्रमण शिबिराचे गाळे दिले जात नाहीत तोपर्यंत पूल बंद होऊ दिला जाणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता पुलाचे पाडकाम रखडले असून पुनर्वसनाचा तिढा निर्माण झाला आहे. दरम्यान या रहिवाशांना २५ ते एक कोटी १० लाखांपर्यंतची नुकसान भरपाई देण्याची तयारीही एमएमआरडीएने दर्शवली होती. मात्र हा पर्यायही रहिवाशांनी धुडकावून लावला आहे. त्यामुळे आता हा तिढा एमएमआरडीए कसा आणि कधी सोडवणार हा प्रश्न आहे.