Quiet firing in IT companies अलीकडे खाजगी कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचे प्रमाण वाढले आहे. आयटी कंपन्यांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. त्यातच आता एक नवा ट्रेंड समोर आला आहे. या ट्रेंडचे नाव आहे ‘क्वाइट फायरिंग’ (Quiet Firing). तुमच्या अनेकदा लक्षात आले असेल की, कधीकधी ऑफिसमध्ये वरिष्ठ कर्मचारी आपल्याशी असणारा संवाद कमी करतात, तुमच्या ईमेलना उत्तरे मिळणे बंद होते, तुमच्याशिवाय मिटींग पार पडतात, तेव्हा तो निव्वळ योगायोग नसू शकतो. याकडे ‘क्वाइट फायरिंग’ म्हणजेच पद्धतशीरपणे बाहेर काढण्याच्या उद्देशाने केलेली एक जाणीवपूर्वक कृती म्हणून पाहिले जात आहे. ‘क्वाइट फायरिंग’ म्हणजे काय? कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यास कसे प्रवृत्त केले जात आहे? जाणून घेऊयात…

‘क्वाइट फायरिंग’ म्हणजे काय?

‘क्वाइट फायरिंग’मध्ये कर्मचाऱ्याला थेट कामावरून काढले जात नाही, तर हळूहळू काम सोडण्यास प्रवृत्त केले जाते. कामगिरीबद्दल औपचारिक चर्चा किंवा स्पष्ट निर्णय घेण्याऐवजी, व्यवस्थापक जबाबदाऱ्या, संधी, पाठिंबा आणि त्या कर्मचाऱ्याचे महत्त्व कमी करत नेतात. परिणामी कर्मचाऱ्याला तिथे काम करणे असह्य होते, शेवटी थकून आणि खचून गेलेला कर्मचारी स्वतःहून राजीनामा देतो.

टाळेबंदी (लेऑफ) किंवा थेट बडतर्फीसारखे हे प्रकार उघडपणे घडत नाहीत, यामध्ये कोणत्याही प्रकारचे लेखी स्पष्टीकरण दिले जात नाही. अलीकडच्या वर्षांत, विशेषतः आर्थिक अनिश्चितता, रिमोट वर्क (घरून काम) आणि कायदेशीर गुंतागूंत हाताळताना कंपन्यांमध्ये याकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे. थेट कामावरून काढल्यास नुकसान भरपाई, कागदपत्रे आणि कायदेशीर जोखीम असते. ‘क्वाइट फायरिंग’मध्ये या तिन्ही गोष्टी टाळल्या जातात.

याचे प्रमाण का वाढले?

गॅलपच्या ‘स्टेट ऑफ द ग्लोबल वर्कप्लेस’ (जून २०२४) अहवालानुसार, जगभरातील मोठ्या प्रमाणावरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या संस्थेकडून पाठिंबा मिळत नाही, ते स्वतःला भावनिकदृष्ट्या वेगळे समजतात. ‘क्वाइट फायरिंग’मध्ये अशी परिस्थिती निर्माण केली जाते. जसजसे काम विभागले जात आहे, तसतसे व्यवस्थापकांसाठी उघडपणे शत्रुत्व न दाखवता कर्मचाऱ्याकडे दुर्लक्ष करणे सोपे झाले आहे. संघर्षाची जागा आता शांततेने घेतली आहे, तर नेतृत्वाची जागा निष्क्रियतेने घेतल्याचे चित्र आहे, त्यामुळे जाणीव होईपर्यंत ‘क्वाइट फायरिंग’ सहज लक्षात येत नाही.

‘क्वाइट फायरिंग’ ही कालांतराने तयार झालेली एक पद्धत असते. ‘क्वाइट फायरिंग’मध्ये सकारात्मक किंवा सुधारात्मक दोन्ही प्रकारचे ‘फीडबॅक’ मिळणे बंद होतात, करिअरच्या प्रगतीबद्दलच्या चर्चा थांबतात. महत्त्वाचे प्रकल्प, बैठका किंवा निर्णय प्रक्रियेतील आपले मत गृहीत धरले जात नाही. संसाधने कमी केली जातात. कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय जबाबदाऱ्या दुसऱ्यांकडे सोपवल्या जातात आणि पगारवाढ थांबते. थोडक्यात सांगायचे तर कंपनी कर्मचाऱ्याला पगार देणे सुरू ठेवते, पण त्या कर्मचाऱ्याकडे कोणतीही वास्तविक भूमिका नसते. कंपनी कर्मचाऱ्याला थेट निरोप देत नाही, पण तो अत्यंत स्पष्ट असतो.

ही समस्या इतकी गंभीर का?

‘क्वाइट फायरिंग’ला केवळ एक ‘ट्रेंड’ म्हणणे म्हणजे त्याचे गांभीर्य कमी करण्यासारखे आहे. हा शब्द नवीन असला तरी हे वर्तन जुनेच आहे. पूर्वीच्या कामाच्या संस्कृतीत, प्रत्यक्ष उपस्थितीमुळे अशा प्रकारची टाळाटाळ करणे कठीण होते. आज रिमोट टीम्स आणि डिजिटल संवादाच्या माध्यमांमुळे एखाद्याला पद्धतशीरपणे बाजूला सारणे सोपे झाले आहे. यातील धोका असा आहे की, ‘क्वाइट फायरिंग’चे समर्थन व्यावहारिकता किंवा खर्च कपात म्हणून सहज केले जाऊ शकते. परंतु, प्रत्यक्षात संस्थेचा अंतर्गत ताण एखाद्या व्यक्तीवर लादण्याचा हा एक मार्ग आहे.

कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम काय?

कर्मचाऱ्यांसाठी ‘क्वाइट फायरिंग’ हे मानसिकदृष्ट्या अस्थिर करणारे असते. स्पष्टतेच्या अभावामुळे प्रतिसाद देणे, स्वतःत सुधारणा करणे किंवा स्वतःची बाजू मांडणे कठीण होते. आत्मविश्वास ढासळतो आणि खात्रीची जागा स्वतःबद्दलच्या शंकेने घेतली जाते. अनेकजण या शांततेला स्वतःचे अपयश मानू लागतात. सहकाऱ्यांच्याही हे लक्षात येते. जेव्हा ते एखाद्याबरोबर असे घडताना पाहतात, तेव्हा त्यांचाही विश्वास कमी होतो. ‘क्वाइट फायरिंग’चे दीर्घकालीन परिणाम गंभीर असतात. हे कामाच्या ठिकाणची मानसिक सुरक्षितता नष्ट करते, कंपनीची प्रतिष्ठा खराब करते आणि नैतिक नेतृत्वाचा अभाव दर्शवते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे संस्थेतील एक खोलवर असलेली समस्या उघड करते. अशा कंपन्यांमध्ये कठीण निर्णय घेण्याची किंवा परिस्थिती हाताळण्याची अक्षमता दिसून येते. ‘क्वाइट फायरिंग’ हा केवळ कामाच्या ठिकाणचा तात्पुरता ट्रेंड नाही, तर त्याचे गंभीर परिणाम कर्मचाऱ्यांवर होतात. आजच्या काळात जिथे कर्मचाऱ्यांचे कल्याण, पारदर्शकता आणि नैतिक व्यवस्थापन यावर अधिकाधिक चर्चा होत आहे, तिथे ‘क्वाइट फायरिंग’ अजूनही अस्तित्वात आहे.