World Heart Day 2026: हार्ट अटॅक (हृदयविकाराचा झटका) येणे ही सध्याच्या काळातील एक अत्यंत गंभीर समस्या ठरली आहे. धावपळीचे जीवन, बिघडलेली जीवनशैली आणि वाढते प्रदूषण यांसारख्या अनेक कारणांमुळे हृदयविकाराचा धोका सातत्याने वाढत आहे. एवढेच नव्हे, तर कोणतीही पूर्वलक्षणे किंवा आजार नसताना एखादी तंदुरुस्त व्यक्ती चालता-बोलता अचानक कोसळते. सर्व वैद्यकीय चाचण्यांचे रिपोर्ट सामान्य असतानाही असे का घडले, असा प्रश्न मग निर्माण होतो. सामान्यतः महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण अधिक असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. मात्र, याला ‘स्कॅड’ (SCAD) ही स्थिती अपवाद ठरते. SCAD मुळे तरुण आणि मध्यमवयीन (३० किंवा ४० वर्षांच्या) महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे डॉक्टर नेमकं काय सांगतात? कोणती खबरदारी घ्यावी याचा घेतलेला हा आढावा.
महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका का वाढतो?
हृदयविकाराचा झटका (Heart Attack) म्हटला की, वाढलेले कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, लठ्ठपणा किंवा वाढते वय हीच कारणे आपल्या डोळ्यांसमोर येतात. त्यामुळे एखादी ३० किंवा ४० वर्षांची, नियमित व्यायाम करणारी आणि पूर्णपणे निरोगी दिसणारी महिला जेव्हा अचानक हृदयविकाराच्या झटक्याची बळी ठरते, तेव्हा आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. तरुण महिलांना पुरुषांच्या तुलनेत हृदयविकाराचा धोका कमी असतो, असाच समज आहे. यामागे महिलांच्या शरीरातील इस्ट्रोजेन (Estrogen) या संप्रेरकाची (Hormone) संरक्षणात्मक भूमिका असल्याचे मानले जाते. इस्ट्रोजेन हे रक्तवाहिन्यांचे आरोग्य जपणे आणि दाह (Inflammation) नियंत्रणात ठेवणे यासाठी मदत करते. परंतु, रजोनिवृत्तीनंतर (Menopause) त्याची पातळी घटल्याने महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढतो. परंतु, या पारंपरिक चौकटीत न बसणाऱ्या घटनांकडे आता संशोधकांचे लक्ष वेधले गेले आहे. कारण अनेक तरुण व मध्यमवयीन महिलांना कोणताही पारंपरिक धोका नसतानाही हार्ट अटॅक येत आहे. अशा प्रकरणांमागे ‘स्पॉन्टेनिअस कोरोनरी आर्टरी डिसेक्शन’ (Spontaneous Coronary Artery Dissection – SCAD) हे मुख्य कारण असू शकते.
हार्ट अटॅक कधी येतो?
सामान्यतः हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी धमन्यांमध्ये (Coronary Arteries) चरबी आणि कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थांचा थर म्हणजे ‘प्लाक’ (Plaque) साचतो. हा प्लाक फुटला किंवा खराब झाला, तर त्या ठिकाणी रक्ताची गुठळी तयार होते. या गुठळीमुळे रक्तप्रवाह थांबतो, हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन मिळत नाही आणि हार्ट अटॅक येतो.
SCAD-Spontaneous Coronary Artery Dissection म्हणजे नेमके काय?
SCAD मध्ये मात्र धमनी बंद होण्याचे कारण प्लाक किंवा कोलेस्ट्रॉल नसते. यामध्ये कोरोनरी धमनीच्या आतल्या भिंतीला अचानक चीर जाते किंवा तिचे थर एकमेकांपासून वेगळे होतात. या थरांमध्ये रक्त साचल्यामुळे आतून धमनीवर दाब निर्माण होतो आणि रक्त वाहण्याचा मार्ग अत्यंत अरुंद होतो. परिणामी, हृदयाला होणारा रक्त व ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होऊन हृदयविकाराचा झटका येतो. मेयो क्लिनिकच्या (Mayo Clinic) कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. राजीव गुलाटी यांनी सांगितले की, “सामान्य हार्ट अटॅकमध्ये रक्तवाहिनी कचरा साचल्यामुळे (कोलेस्ट्रॉल) बंद होते; तर SCAD मध्ये रक्तवाहिनीच्या भिंतीचा थर फाटून रक्त साचल्यामुळे ती आतून दाबली जाते (संदर्भ: द इंडियन एक्स्प्रेस).” थोडक्यात, दोन्ही घटनांचा अंतिम परिणाम हृदयाचा रक्तपुरवठा रोखणे हाच असला, तरी त्यामागची प्रक्रिया पूर्णपणे वेगळी आहे. म्हणूनच SCAD चे निदान आणि उपचारही पारंपरिक पद्धतींपेक्षा वेगळे असतात.
SCAD कडे संशोधकांचे लक्ष का वेधले गेले?
SCAD ही अत्यंत दुर्मीळ समस्या समजून दुर्लक्ष करण्यासारखी नक्कीच नाही. विशेषतः तरुण महिलांमधील हृदयविकाराचा विचार करताना तिचे महत्त्व अधिक वाढते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या (AHA) (२०२६) अहवालानुसार, रजोनिवृत्तीपूर्व (Pre-menopausal) महिलांमधील ‘अक्यूट कोरोनरी सिंड्रोम’मध्ये SCAD ही एक पुरेशी ओळख न झालेली पण गंभीर समस्या आहे. एम्स (AIIMS, दिल्ली) येथील कार्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. अंबुज रॉय यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, SCAD च्या रुग्णांमध्ये महिलांचे प्रमाण तब्बल ८० ते ९० टक्के आहे. ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांना येणाऱ्या हार्ट अटॅकमधील जवळपास एक-तृतीयांश (३३%) घटनांमागे SCAD हेच कारण असते. त्यामुळे एखादी महिला तरुण आहे, तंदुरुस्त आहे किंवा तिचे कोलेस्ट्रॉल सामान्य आहे, म्हणून तिला हार्ट अटॅक येऊच शकत नाही, हा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल.
SCAD प्रामुख्याने महिलांमध्येच का आढळतो?
हा SCAD संदर्भातील सर्वांत महत्त्वाचा आणि अद्याप पूर्णपणे न सुटलेला प्रश्न आहे. महिलांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याने स्त्री-संप्रेरके (Estrogen व Progesterone) आणि रक्तवाहिन्यांची रचना यांच्यातील संबंधांवर संशोधन सुरू आहे. संप्रेरकांमध्ये होणारे मोठे बदल रक्तवाहिनीची रचना आणि तिला मजबुती देणाऱ्या ‘कोलेजन’ (Collagen) या प्रथिनावर परिणाम करू शकतात. मात्र, ‘SCAD हा फक्त हार्मोन्समुळेच होतो’ असे सरसकट म्हणणे सध्याच्या वैद्यकीय पुराव्यांवरून योग्य ठरणार नाही. संप्रेरके हा या गुंतागुंतीच्या प्रक्रियेतील एक संभाव्य घटक असू शकतात.
प्रसूतीनंतरचा पहिला आठवडा महत्त्वाचा का?
SCAD आणि गर्भधारणा (Pregnancy) यांच्यातही मोठा संबंध दिसून आला आहे. डॉ. गुलाटी यांच्या मते, SCAD च्या एकूण घटनांपैकी ५ ते १० टक्के घटना या गर्भधारणेशी किंवा प्रसवाशी संबंधित असतात. डॉ. रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्भावस्थेशी संबंधित SCAD च्या ७० टक्क्यांहून अधिक घटना प्रसूतीनंतरच्या पहिल्या आठवड्यात नोंदवल्या गेल्या आहेत. गर्भावस्थेत आणि प्रसूतीनंतर शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते, रक्ताभिसरणावर ताण येतो आणि संप्रेरकांमध्ये तीव्र बदल होतात. संवेदनशील महिलांमध्ये या बदलांमुळे कोरोनरी धमनीची भिंत अधिक नाजूक बनू शकते. प्रसूतीशी संबंधित SCAD ची प्रकरणे गंभीर असू शकतात. इथे लक्षात घेण्याचा मुद्दा म्हणजे, SCAD ची बहुतांश प्रकरणे ही गर्भधारणेशी संबंधित नसतात, त्यामुळे हा फक्त गर्भवतींचा आजार आहे असा गैरसमज करून घेऊ नये.
याकडे दुर्लक्ष करू नये
तरुण आणि तंदुरुस्त असणे हेच कधीकधी निदानातील मोठा अडथळा ठरते, कारण SCAD ची मुख्य अडचण म्हणजे रुग्ण पारंपरिक अर्थाने ‘हार्ट पेशंट’ वाटत नाही. ३० किंवा ४० वर्षांची महिला, निरोगी जीवनशैली, मधुमेह किंवा लठ्ठपणाचा अभाव अशा स्थितीत अचानक छातीत दुखू लागल्यास, सुरुवातीला डॉक्टर किंवा रुग्ण स्वतःही ते ॲसिडिटी अथवा स्नायूंचे दुखणे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. प्रत्यक्षात मात्र SCAD ची लक्षणे ही सामान्य हार्ट अटॅकसारखीच असतात. यात ९० टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये छातीत तीव्र वेदना किंवा अस्वस्थता जाणवते, ECG मध्ये बदल दिसतात आणि रक्तात ‘ट्रोपोनिन’ सारखे कार्डिअॅक बायोमार्कर्स वाढलेले आढळतात. म्हणूनच, एखाद्या तरुण महिलेला हृदयविकाराचे पारंपरिक धोके नाहीत या एकाच कारणावरून तिच्या छातीतील तीव्र दुखण्याकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते.
अँजिओग्राफी करूनही SCAD चे निदान का सुटू शकते?
SCAD चे निदान करताना अँजिओग्राफीमध्ये (Angiography) दरवेळी रक्तवाहिनी फाटली आहे हे स्पष्ट दिसेलच असे नाही. बऱ्याचदा अँजिओग्राफीमध्ये रक्तवाहिनीचा मोठा भाग फक्त अरुंद (Narrow) झाल्यासारखा दिसतो. यामुळे डॉक्टर त्याला सामान्य अथेरोस्क्लेरोसिस (चरबी साचणे) समजण्याची चूक करू शकतात. चुकीचे निदान झाल्यास चुकीचे उपचार केले जाऊ शकतात, त्यामुळे धोका वाढू शकतो.
अतिव्यायाम, ताण किंवा जड वजन उचलल्याने SCAD होतो का?
SCAD ला चालना देणारे काही ‘ट्रिगर्स’ (Triggers) संशोधनात समोर आले आहेत:
- अतिशय जड वजन उचलणे किंवा प्रचंड जोर लावणे.
- अत्यंत तीव्र शारीरिक श्रम.
- अति-तीव्र भावनिक किंवा मानसिक ताण.
जवळपास दोन-तृतीयांश रुग्णांमध्ये घटना घडण्यापूर्वी तीव्र ताण किंवा अतिश्रम नोंदवले गेले आहेत. महिलांमध्ये भावनिक ताण, तर पुरुषांमध्ये शारीरिक श्रम हे मुख्य ट्रिगर दिसून आले आहेत. ताण किंवा वजन उचलल्याने थेट SCAD होत नाही. पण आधीच नाजूक किंवा संवेदनशील असलेल्या रक्तवाहिनीला या गोष्टींमुळे ‘चीर’ पडण्यास चालना मिळते.
Fibromuscular Dysplasia (FMD)- फायब्रोमस्क्युलर डिस्प्लासियाशी संबंध काय
SCAD रुग्णांमध्ये ‘फायब्रोमस्क्युलर डिस्प्लासिया’ (FMD) ही स्थिती वारंवार आढळते. FMD हा कोलेस्ट्रॉलमुळे होणारा आजार नाही, तर यात शरीरातील मध्यम आकाराच्या धमन्यांच्या भिंतींची रचना जन्मतः किंवा जनुकीय कारणांमुळे असामान्य किंवा कमकुवत होते. SCAD झालेल्या अनेक रुग्णांच्या शरीरातील इतर धमन्यांमध्येही फुगवटा (Aneurysm) किंवा चीर (Dissection) आढळते. यावरून SCAD हा फक्त हृदयापुरता मर्यादित नसून, रक्तवाहिन्यांच्या सर्वसामान्य कमकुवतपणाशी जोडलेला असू शकतो.
SCAD मध्ये लगेच स्टेंट का बसवला जात नाही?
SCAD मध्ये रक्तवाहिनीची भिंत आधीच फाटलेली असल्याने स्टेंट बसवताना ती अधिक फुटण्याचा धोका असतो. रुग्ण स्थिर असल्यास आणि रक्तप्रवाह सुरू असल्यास औषधोपचार व निरीक्षणाचा मार्ग निवडला जातो, कारण ही चीर बहुतांश वेळा आपोआप भरून निघते.
कोलेस्ट्रॉलची औषधे आयुष्यभर लागतात का?
नाही. SCAD चे मूळ कारण कोलेस्ट्रॉल नसल्यामुळे स्टॅटिन (Statins) ची गरज नसते (कोलेस्ट्रॉल वाढलेले असल्यास अपवाद). मात्र, रक्तदाब नियंत्रणासाठी बीटा-ब्लॉकर्स आणि रक्त पातळ करणारी औषधे दिली जातात.
SCAD पुन्हा होऊ शकतो का?
होय. अभ्यासांनुसार SCAD पुन्हा होण्याचा धोका २.४% ते ३०% असू शकतो. त्यामुळे नियमित वैद्यकीय तपासणी आणि रक्तदाब नियंत्रण आवश्यक आहे.
व्यायाम आणि गर्भधारणा शक्य आहे का?
डॉक्टरांच्या सल्ल्याने चालणे किंवा सायकलिंगसारखा हलका ते मध्यम व्यायाम करू शकता. अतिजड वजन उचलणे आणि तीव्र वर्कआउट टाळावेत. SCAD नंतरही सुरक्षित गर्भधारणा शक्य आहे; मात्र हृदयरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञांच्या देखरेखीखाली नियोजन करणे गरजेचे आहे.
तरुण महिलांनी काय लक्षात ठेवावे?
- लक्षणे ओळखा: वय कमी असले तरी छातीत तीव्र वेदना, दाब, श्वास गुदमरणे किंवा थंड घाम आल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या.
- जागरूकता: प्रत्येक हार्ट अटॅक कोलेस्ट्रॉलमुळेच येतो असे नाही; SCAD हेही एक कारण असू शकते.
- सावधानता: निरोगी जीवनशैली असली तरी शरीराने दिलेले आणीबाणीचे संकेत वेळीच ओळखणे हाच सर्वोत्तम बचाव आहे.
