What Is Sologamy Or Self-Marriage: गुजरातमधील वडोदरा येथे राहणाऱ्या २४ वर्षीय क्षमा बिंदू नावाच्या तरुणीने गुरुवारी (२ जून २०२२ रोजी) जाहीर केलं की ती या महिन्यात स्वत:शीच लग्न करणार आहे. हे लग्न म्हणजे स्वत:वर प्रेम करण्याचा संदेश देण्याचं प्रतिक असेल असंही तिने सांगितलं. यापूर्वी जगातील वेगवगेळ्या देशांमध्ये अशाप्रकारची लग्नं झाली आहेत. मात्र भारतामध्ये अशाप्रकारे स्वत:शीच एखाद्या व्यक्तीने लग्न करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे लग्न ११ जून रोजी होणार असून अशा लग्नांना सोलोगॅमी असं म्हणतात. पण ही स्वत:शीच लग्न करण्याची सोलोगॅमी पद्धत नेमकी आहे तरी काय? यामध्ये लग्न कसं गृहित धरलं जातं? हा प्रकार कधी सुरु झाला? हे आणि असे अनेक प्रश्न स्वत:ची लग्न हे दोन शब्द वाचल्यावर पडतात. याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा केलेला हा प्रयत्न…

सोलोगॅमी म्हणजे काय?
सार्वजनिक कार्यक्रमामध्ये स्वत:शीच लग्न करण्याच्या पद्धतीने सोलोगॅमी म्हणतात. यालाच दुसरं नाव सेल्फ मॅरेज किंवा ऑटोगमी असं आहे. अशा लग्नांना कायदेशीर दृष्ट्या कोणत्याही प्रकारची मान्यता नसते. मात्र या लग्नांचा एक प्रातिनिधिक सोहळा आयोजित केला जातो. अनेकदा अशापद्धतीने लग्न करणारे आमचं स्वत:वर प्रेम असून त्यासाठी आम्ही हे करतोय असं सांगतात. अनेकजण या अशा लग्नांच्या माध्यमातून स्वातंत्र्याची जाणीव होते असंही सांगतात.

हा प्रकार कधीपासून सुरु झाला?
अशाप्रकारे स्वत:शीच लग्न करण्याचा प्रकार सर्वात आधी अमेरिकेमधील लिंडा बाकेर या तरुणीने केला होता. पेशाने दंतचिकित्सक असणाऱ्या लिंडाने १९९३ मध्ये स्वत:शीच लग्न केलं होतं. अशाप्रकारे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये स्वत:शीच लग्न करणारी लिंडा ही पहिलीच व्यक्ती होती. तिच्या लग्नाला कुटुंबिक मित्रांसहीत एकूण ७५ जण उपस्थित होते. या लग्नामध्ये लिंडाने स्वत:लाच ‘आय डू’ (लग्न मान्य आहे) असं म्हटलंय. आजारपण आणि आरोग्यासंदर्भातील समस्यांमध्ये स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच आपण स्वत:चा कायमच सन्मान करत राहू अगदी शेवटच्या श्वासापर्यंत यासाठी लिंडाने स्वत:लाच होकार दिला.

बरं अशापद्धतीने केवळ लग्नचं झालीयत असं नाही तर या सोलोगॅमी लग्नपद्धतीमध्ये घटस्फोटही झालाय. मागील वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये ब्राझीलमधील क्रिस गालेरा या ३३ वर्षीय महिलेने स्वत:शी केलेलं लग्न मोडल्याची घोषणा केली. क्रिसचा हा स्वत:शीच असणारा संसार अवघ्या ९० दिवसांमध्ये म्हणजेच तीन महिन्यांमध्ये मोडला. बरं अशी घोषणा करण्याचं कारण देताना क्रिसने आपण कोणाच्या तरी प्रेमात पडल्याने हे लग्न मोडतोय, असंही स्पष्टीकरण दिलं होतं.

स्वत:शी केल्या जाणाऱ्या लग्नात कोणत्या गोष्टी/ प्रथा होतात?
या लग्नांना असे काही विशिष्ट नियम नाहीत किंवा समाजमान्य प्रथाही नाहीत. दोन व्यक्तींचं लग्न होतं त्याप्रमाणे पारंपारिक पद्धतीने कोणत्याही धार्मिक रितीरिवाजानुसारही हे कार्यक्रम पार पडतात. सध्या अशाप्रकारे लग्न करणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने लग्नांसंदर्भात सेवा पुरवणाऱ्यांकडूनही या लग्नांविषयी वेगवेळ्या संकल्पना राबवल्या जात आहेत. स्वत:शी केलं जाणारं लग्न हे सर्वसामान्य लग्नाइतकच अविस्मरणीय व्हावं यासाठी काही लग्न नियोजन (वेडिंग प्लॅनर) कंपन्यांनी सेवा पुरवण्यास सुरुवात केलीय.

कॅनडामधील ‘मॅरी यूआरसेल्फ’ नावाची कंपनी सल्लागार म्हणून काम करणाऱ्याबरोबरच फोटोग्राफीचं कंत्राटही घेते. तर अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्कोमधील आय मॅरीड मी डॉट कॉम ही कंपनी सोलोगॅमी लग्नांसाठी विशेष किट्स देते. यामध्ये लग्नासाठी लागणाऱ्या वस्तूंचा समावेश असतो. जपानमधील क्युटोमध्ये स्क्रीका ट्रॅव्हल कंपनी दोन दिवसांचं सेल्फ वेडिंग पॅकेजची सेवा देते.

लग्नासाठी क्षमाने कपडे आणि दागिन्याचीही खरेदी केली आहे. एवढंच नाही तर ब्युटी पार्लरवालीपासून ते लग्नाच्या हॉलपर्यंत सर्वकाही क्षमाने आधीच बूक करुन ठेवलं आहे. “मला नवरी म्हणून मिरवण्याची फार इच्छा आहे, मात्र मला लग्न करायचं नाहीय. त्यामुळे मी स्वत:शीच लग्न करण्याचा निर्णय घेतलाय,” असं क्षमा सांगते.

क्षमाने पारंपारिक पद्धतीने भारतात ज्याप्रकारे लग्न होतं त्याचपद्धतीने आपलं लग्न होणार असल्याचं स्पष्ट केलंय. यामध्ये सर्व पारंपरिक रितीरिवाजांप्रमाणे होणाऱ्या प्रथा, सिंदूरचा कार्यक्रमही होणार आहे, असं क्षमाने स्पष्ट केलं आहे.

लग्नानंतर दोन आठवडे हनिमून
क्षमा गुजरातमध्ये एका खासगी कंपनीत कामाला आहे. “आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्या व्यक्तीसोबत आपण लग्न करतो. पण माझं स्वत:वर प्रेम आहे म्हणून मी स्वत:सोबत लग्न करणार आहे, असं क्षमा म्हणाली. “हे लग्न म्हणजे कोणत्याही अटीशिवाय स्वत:वर कसं प्रेम करायचं याचं उदाहरण असेल. समाज याबद्दल काय म्हणायचं ते म्हणेल,” असं सांगतानाच क्षमा आपल्या पालकांचा या निर्णयाला पाठिंबा असल्याचंही सांगते. एका मंदिरात क्षमा स्वत:सोबतच लग्न करणार आहे. लग्नानंतर ती दोन आठवडे हनिमूनसाठी गोव्याला जाणार आहे.

अशापद्धतीच्या लग्नांची संख्या का वाढतेय?
‘मॅरी युआरसेल्फ वॅनकुवर’चे संस्थापक असणारे अ‍ॅलेक्झॅण्डर गिल यांनी सीबीसी न्यूजशी केलेल्या चर्चेत या लग्नांसंदर्भात भाष्य केलंय. “आजच्या जगामध्ये महिला स्वत:चा खर्च करुन एकट्या राहू शकतात. त्या स्वत: स्वत:चं करियर बनवू शकतात, घरं विकत घेऊ शकतात, त्यांचं स्वत:चं आयुष्य त्या स्वत: निवडू शकतात. ते त्यांच्या आवडीप्रमाणे मुलांचं पालकत्वही स्वीकारु शकतात. आपली आई किंवा आजीच्या पिढीतील स्त्रिया हे करु शकत नव्हत्या कारण त्यांच्याकडे पर्याय नव्हते. सोलोगॅमीमध्ये स्वत:शीच लग्न केलं जातं. मात्र या माध्यमातून आपल्या डोक्यामध्ये सातत्याने एकटं असण्याची आणि उदास वाटण्याची भवना संपवण्याचा हेतू असतो. एखाद्या विशिष्ट एक्सपायरी डेटच्या आत महिलांनी लग्न नाही केलं तर त्या अयशस्वी आहेत, हे ऐकून आता महिलांना कंटाळा आलाय,” असं अ‍ॅलेक्झॅण्डर सांगतात.

‘क्वकी अलोन’ या पुस्तकाचे लेखिका असणाऱ्या साशा केगन आपल्या पुस्तकात लिहितात, “(स्वत:शीच लग्न करण्याच्या या) पद्धतीमधील अनेक प्रकरणांमध्ये मी ऐकल्याप्रमाणे एक सामान्य थीम आढळून येते, ती म्हणजे एखादी दुसरी व्यक्ती किंवा प्रियकर घेईल त्याप्रमाणे स्वत:ची काळजी घेणे. एखाद्या नात्यामध्ये महिलांना जेवढा त्याग करावा लागतो त्याचा विचार करुन अनेक महिला या त्यागावरील उपाय म्हणून अशा सेल्फ मॅरेजेसकडे पाहतात. इतर कोणासोबत लग्न करण्याआधी स्वत:शी लग्न करा, असा या महिलांचा विचार असतो.”

सोलोगॅमी आणि मालिका…
अशापद्धतीने स्वत:शीच लग्न करण्याच्या संकल्पनेला अनेक लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये स्थान मिळालं आहे. यामध्ये सेक्स अ‍ॅण्ड द सिटी, ग्ली आणि डॉक्टर हू यासारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे. २००३ मधील सेक्स अ‍ॅण्ड द सिटीमधील एका भागामध्ये कॅरी ब्रॅडशॉ हे महिला पात्र स्वत:शीच लग्न करत असल्याचं दाखवण्यात आलंय. युएसए टुडेच्या एका वृत्तानुसार या मालिकेमध्ये दखवण्यात आलेलं हे सोलोगॅमीचं प्रकरण अनेकांसाठी सोलोगॅमीचं उगमस्थान म्हणून ओळखलं जातं.