जीवन संपवण्यासाठी काही देशांत मदत दिली जाते. होय, हे पूर्णपणे खरं आहे. परंतु, यातही काही अटी आहेत. त्या म्हणजे काही आजारी असणार्‍या आणि लवकर मृत्यू होणार्‍या व्यक्ती, अंथरुणाला खिळून असणार्‍या व्यक्ती आदी व्यक्ती जीवन संपवण्यासाठी म्हणून इच्छामरणासाठी अर्ज करू शकतात. स्वित्झर्लंडमध्ये त्यासाठी सुसाईड पॉडदेखील तयार करण्यात आले आहेत. स्वेच्छेने जीवन संपवणार्‍यांना स्वित्झर्लंडमध्ये असिस्टेड सुसाईड म्हटले जाते. जेव्हा स्वित्झर्लंडने हे पॉड लॉंच केले, तेव्हा यावरून वादही निर्माण झाला होता. मात्र, आता पुन्हा हे सुसाईड पॉड चर्चेचा विषय ठरत आहेत. यामागील नेमके कारण काय? ‘सुसाईड पॉड’ नक्की काय आहेत? ते कसे कार्य करते? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सुसाईड पॉड’ पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण काय?

ब्रिटीश जोडपे पीटर आणि क्रिस्टीन स्कॉट जवळजवळ ५० वर्षांहून अधिक काळापासून विवाहित आहेत. आता ते आपल्या मृत्यूची प्रतीक्षा करत आहेत. दीर्घकाळ एकत्र राहिल्यानंतर या दाम्पत्याने स्वित्झर्लंडमधील ‘सार्को सुसाइड पॉड’मध्ये आपले जीवन एकमेकांबरोबर संपवण्याचा निर्णय निर्णय घेतला आहे. कारण क्रिस्टीन यांना नुकतेच रक्तवाहिन्यांसंबंधी स्मृतिभ्रंश झाल्याचे निदान झाले आहे, त्यांचे वय ८४ वर्षे आहे. ऑस्ट्रेलियन न्यूज वेबसाइट ‘News.au’ने दिलेल्या वृत्तानुसार, पीटर ८६ वर्षांचे असून ते एक सेवानिवृत्त आरएएफ अभियंता आहेत. त्यांनी व्यक्त केले की, ते आपल्या पत्नीशिवाय जगण्याची कल्पना सहन करू शकत नाही.

ब्रिटिश जोडप्याला एकत्र सुसाईड पॉडमध्ये त्यांचे जीवन संपवायचे आहे. (छायाचित्र-हॉलो ड्रीम/एक्स)

हेही वाचा : ‘या’ राज्यात फटाक्यांवर पूर्णपणे बंदी; कारण काय? फटाक्यांमुळे शरीराचे किती नुकसान होते?

त्यांनी ‘डेली मेल’ला सांगितले, “आम्ही दीर्घ, आनंदी, निरोगी, परिपूर्ण जीवन जगलो आहोत; परंतु आता आम्ही वृद्धापकाळात आहोत आणि यामुळे फार काही चांगले होईल अशी अपेक्षा करता येत नाही.” ते पुढे म्हणाले, “माझ्या स्वतःची शारीरिक घसरण आणि क्रिस्टीनच्या आजारामुळे होणारा मानसिक त्रास, या दोन्हींची कल्पना माझ्यासाठी भयंकर आहे. निश्चितपणे मी तिची तितकी काळजी करू शकलो नाही, परंतु तिने अनेक लोकांची काळजी घेतली आहे.” पीटरसाठी, त्यांच्या पत्नीशिवाय जगणे अकल्पनीय आहे. त्यांचा मुलगा आणि मुलगीही आपल्या पालकांच्या निर्णयाशी सहमत आहेत. पीटर यांना त्यांच्या भविष्यातील आरोग्य परिस्थितीची चिंता आहे. “मला काळजीत जगायचे नाही, अंथरुणावर पडून राहायचे नाही, याला मी जीवन म्हणत नाही,” असे पीटर म्हणाले. आता स्कॉट्स दाम्पत्य हे ‘सार्को सुसाइड पॉड’ वापरणारे पहिले असतील; ज्यांना काही मिनिटांत जीवन संपवण्याची परवानगी दिली जाईल.

सुसाईड पॉड म्हणजे काय?

पीटर आणि क्रिस्टीन स्कॉट लवकरच स्वित्झर्लंडला जातील. स्वित्झर्लंडमध्ये १९४२ पासून स्वेच्छेने मरण्याची कायदेशीर परवानगी आहे. वकिलांनी मृत्यू प्रक्रियेत वैयक्तिक मत आणि स्वायत्तता या तत्त्वांचे समर्थन केले आहे. हे जोडपे सध्या ‘द लास्ट रिसॉर्ट’ या स्विस संस्थेमध्ये नोंदणी करत आहे. याच संस्थेने हे सार्को पॉड विकसित केले आहे. या सार्को पॉडला ‘टेस्ला ऑफ इउथेनिशिया’ म्हणूनही ओळखले जाते. सार्को पॉडमध्ये एखाद्या व्यक्तीचा केवळ १० मिनिटांत वेदनेशिवाय मृत्यू होऊ शकतो. २०१९ मध्ये पहिल्यांदा लॉंच करण्यात आलेल्या या पॉडचा शोध ऑस्ट्रेलियन वंशाच्या फिलीप नित्शके यांनी लावला होता. मरणाच्या प्रक्रियेत होणार्‍या वेदना आणि अस्वस्थता दूर करणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे आणि त्याच वर्षी व्हेनिस डिझाईन फेस्टिव्हलमध्ये या पॉडची स्लीक 3D कॅप्सूल डिझाइन प्रदर्शित करण्यात आली होती.

स्वित्झर्लंडमध्ये १९४२ पासून स्वेच्छेने मरण्याची कायदेशीर परवानगी आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

पीटर स्कॉट हे सार्को पॉडचे नवीन जुळे मॉडेल लॉंच होण्याची वाट पाहत आहेत. हे मॉडेल या वर्षाच्या शेवटी लॉंच होणे अपेक्षित आहे. पीटरने त्यांच्या निर्णयावर भाष्य करताना म्हटले, “आम्हाला माहीत आहे की इतर लोक आमच्या भावना समजू शकत नाहीत आणि आम्ही त्यांच्या भावनांचा आणि मताचा आदर करतो. आम्हाला जे हवे आहे ते निवडण्याचा अधिकार आहे. ब्रिटनमध्ये आम्ही असे करू शकत नाही, हे मला अत्यंत निराशाजनक वाटते.” ब्रिटनमध्ये इच्छामरण बेकायदा आहे. आत्महत्येस मदत करणाऱ्यांना किंवा प्रवृत्त करणार्‍यांना जास्तीत जास्त १४ वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

सुसाईड पॉड कसे कार्य करते?

सार्को पॉडमध्ये अगदी काही मिनिटांत वेदनारहित मृत्यू होतो. परंतु, त्यात स्विस कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. त्या कायद्यात असे नमूद करण्यात आले आहे की, स्वतःचे जीवन संपवू पाहणाऱ्या व्यक्ती चांगल्या मनाच्या असाव्यात आणि स्वार्थी नसाव्यात. 3D-प्रिंट केलेले शवपेटीसारख्या या कॅप्सूलमध्ये नायट्रोजन असते आणि एकदा आतून बटण दाबल्यास हे मशीन सक्रिय झाल्यानंतर ऑक्सिजनची पातळी वेगाने कमी होते. या संपूर्ण प्रक्रियेमुळे व्यक्ती आपली चेतना गमावते आणि १० मिनिटात त्याचा मृत्यू होतो.

हेही वाचा : ‘SpaceX’ची ऐतिहासिक अंतराळ मोहीम ‘पोलारिस डॉन’ काय आहे? ही मोहीम जगासाठी किती महत्त्वाची?

‘एएफपी’ने दिलेल्या वृत्तात असे सांगण्यात आले आहे की, कॅप्सूलमधील वापरकर्त्यांना एक आवाज ऐकू येईल. “जर तुम्हाला मरण्याची इच्छा असेल तर हे बटण दाबा,” असा हा आवाज असेल. आजारपणामुळे बोलू शकत नसलेल्या किंवा शारीरिक हालचाल करू शकत नसलेल्यांच्या कृतीचा डोळ्यांच्या हालचालींवरून अंदाज लावला जाईल आणि हे मशीन सक्रिय केले जाईल. तसेच, संपूर्ण प्रक्रियेच्या दस्तऐवजीकरणासाठी चित्रीकरण केले जाईल. विशेष म्हणजे, एकदा हे मशीन सक्रिय झाल्यानंतर या प्रक्रियेला थांबवता येणे अवघड आहे. फिलीप नित्शके यांच्यावर हे मशीन तयार केल्यामुळे अनेक आरोपही करण्यात आले आहे. परंतु, त्यांचे सांगणे आहे की, पॉड व्यक्तींना इच्छामरणाची निवड करण्याची परवानगी आणि सामर्थ्य देते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is suicide pod how does it work rac
Show comments