1MDB scam ex Malaysian PM Najib Razak guilty मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रझाक यांना ‘१ मलेशिया डेव्हलपमेंट बरहाद’ (1MDB) घोटाळ्याशी संबंधित आणखी एका प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. २००९ ते २०१८ या काळात पंतप्रधान राहिलेल्या नजीब यांना सत्तेचा गैरवापर केल्याच्या चार प्रकरणांत आणि मनी लाँडरिंगच्या अनेक गुन्ह्यांत दोषी ठरविण्यात आले आहे. त्यांना १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असून, २.८२ अब्ज डॉलर्सचा (सुमारे २.५३ लाख कोटी रुपये) दंड ठोठावण्यात आला आहे. ७२ वर्षीय नजीब हे सत्तेचा गैरवापर आणि इतर मनी लाँडरिंगच्या आरोपांखाली आधीच सहा वर्षांची शिक्षा भोगत आहेत. इतिहासातील सर्वांत मोठ्या आर्थिक गुन्ह्यांपैकी एक मानला जाणारा हा 1MDB घोटाळा नेमका काय आहे? सविस्तर जाणून घेऊयात…

1MDB फंड काय होता?

1MDB ही मलेशियाच्या मालकीची एक धोरणात्मक विकास कंपनी होती, जी प्रामुख्याने एक ‘सोव्हेरन वेल्थ फंड’ (सरकारी गुंतवणूक निधी) म्हणून काम करीत होती. नजीब यांनी २००९ मध्ये पंतप्रधान असताना या योजनेची स्थापना केली होती. देशाच्या साधनसंपत्तीचे व्यवस्थापन करणे आणि पैशांची धोरणात्मक गुंतवणूक करणे हा या फंडामागचा मूळ उद्देश होता. तसेच, जागतिक भागीदारी आणि थेट परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली होती.

फंडाच्या बोर्डाचे अध्यक्ष असलेल्या नजीब यांनी याचे वर्णन ‘नवीन कल्पना आणि विकासाचे नवीन स्रोत शोधणारी विकास कंपनी’ असे केले होते. एका प्रादेशिक उपक्रमापासून सुरू झालेला हा प्रवास नजीब यांनी देशभर नेला. या फंडाने ऊर्जा, रिअल इस्टेट, पर्यटन आणि कृषी व्यवसायातील प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली. २००९ मध्ये 1MDBने ‘पेट्रोसौदी इंटरनॅशनल’बरोबर संयुक्त उपक्रम सुरू करण्यासाठी करार केला. या उपक्रमात एक अब्ज डॉलर्सच्या (सुमारे ०.९० लाख कोटी रुपये) रोख गुंतवणुकीसह कंपनीने ४० टक्के वाटा घेतला. सुमारे १.५ अब्ज डॉलर्सची मालमत्ता असलेल्या ‘पेट्रोसौदी’ने उर्वरित वाटा घेतला.

२०१२ मध्ये, नजीब यांनी क्वालालंपूरमध्ये 1MDB च्या ‘टुन रझाक एक्स्चेंज’चे उदघाटन केले. नजीब यांनी दावा केला होता की, या नवीन आर्थिक क्षेत्राचा पहिला टप्पा ८५६.८ दशलक्ष डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करील. त्यानंतर 1MDB ने गोल्डमन सॅक्सच्या माध्यमातून ३.५ अब्ज डॉलर्सच्या रोख्यांची विक्री केली. पुढच्याच वर्षी 1MDB ने आणखी रोखे विकून तीन अब्ज डॉलर्स उभे केले.

मलेशिया आणि अबू धाबी यांच्यातील नवीन धोरणात्मक आर्थिक उपक्रमांसाठी हा निधी उभारण्यात आला होता. २०१३ मध्ये नजीब यांचा सावत्र मुलगा रिझा अझीझ याच्या ‘रेड ग्रॅनाइट पिक्चर्स’ने ‘द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’ हा चित्रपट प्रदर्शित केला. मार्टिन स्कॉर्सेसे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात लिओनार्डो डिकॅप्रिओ मुख्य भूमिकेत होता. या सुपरहिट चित्रपटाच्या शेवटी ‘जो लो’ नावाच्या एका तरुण मलेशियन व्यावसायिकाचे आभार मानण्यात आले होते. हाच ‘जो लो’ पुढे या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार म्हणून समोर आला.

घोटाळ्याची सुरुवात

ब्रिटिश पत्रकार क्लेअर रीकॅसल ब्राऊन यांनी सर्वांत आधी या फसवणुकीचा पर्दाफाश केला. ‘सरावाक रिपोर्ट’ वेबसाइट चालवणाऱ्या रीकॅसल ब्राऊन यांच्या हाती २,२७,००० लीक झालेली कागदपत्रे लागली होती. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’नेदेखील या कागदपत्रांच्या आधारे वृत्त प्रसिद्ध केले. दोन्ही माध्यमांनी असे वृत्त दिले की, फंडाच्या तिजोरीतून ७०० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ०.६३ लाख कोटी रुपये) थेट नजीब यांच्या वैयक्तिक खात्यात वळवण्यात आले आहेत.

२०१५ मध्ये मलेशिया सरकारने स्वतः या प्रकरणाची चौकशी सुरू केली. जेव्हा या फंडाने बँका आणि रोखेधारकांना द्यावे लागणारे ५५० दशलक्ष डॉलर्स थकवले तेव्हा या घोटाळ्याचे पितळ उघडे पडले. त्यावेळी फंडावर ११ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज होते. त्यामुळे मलेशियन संसदीय समितीमार्फत चौकशी सुरू झाली आणि सरकारला या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करणे भाग पडले.

मात्र, नजीब यांनी देशाचे ॲटर्नी जनरल आणि उपपंतप्रधान मुहिद्दीन यासीन यांच्यासह इतरांची हकालपट्टी करून ही चौकशी थांबवण्याचा प्रयत्न केला. संसदीय चौकशीचे नेतृत्व करणाऱ्या राजकारण्याला उपमंत्री करण्यात आले. नवीन ॲटर्नी जनरलनी नजीब यांना ‘क्लीन चिट’ दिली आणि असा दावा केला की, त्यांना सौदीच्या राजपुत्राकडून ६८० दशलक्ष डॉलर्सची देणगी मिळाली होती.

तपासाला वेग

या प्रकरणाची अमेरिका, स्वित्झर्लंड व जर्मनीसह सुमारे डझनभर देशांमध्ये चौकशी सुरू झाली. २०१६ मध्ये अमेरिकेच्या न्याय विभागाने या प्रकरणी दिवाणी तपास सुरू केला. सुरुवातीला 1MDB मधून ३.५ अब्ज डॉलर्सची अफरातफर झाल्याचा अंदाज होता, जो नंतर ४.५ अब्ज डॉलर्सवर (सुमारे ४.०४ लाख कोटी रुपये) पोहोचला. अमेरिकेच्या तत्कालीन ॲटर्नी जनरल लोरेटा लिंच म्हणाल्या होत्या, “अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या सार्वजनिक निधीचा वापर स्वतःच्या बँक खात्याप्रमाणे केला.” या खटल्यात अनेक आरोपींची नावे होती, ज्यामध्ये एकाचा उल्लेख ‘मलेशियन ऑफिशियल वन’असा होता. नंतर ते नजीब असल्याचे स्पष्ट झाले आणि मलेशियन सरकारनेही त्याला दुजोरा दिला.

अमेरिकेच्या न्याय विभागाने असा दावा केला की, 1MDB हा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी केवळ एक बेकायदा निधी होता. या निधीचा वापर बेव्हर्ली हिल्स, न्यूयॉर्क आणि लंडनमध्ये आलिशान घरे आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी, ३०० फुटी सुपरयॉट, मोने व व्हॅन गॉगची कलाचित्रे, बेव्हर्ली हिल्समध्ये बुटीक हॉटेल, ‘द वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’ चित्रपट तयार करणारी प्रॉडक्शन कंपनी आणि मॅनहॅटनमधील पार्क लेन हॉटेलच्या पुनर्विकासासाठी करण्यात आला.

तसेच, सरकारी अधिकारी, राजकारणी व सरकारी संस्थांचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी आणि त्यांचा सहकारी ‘जो लो’ यांच्यावर गुन्हेगारी कट रचून 1MDB चा निधी हडपल्याचा आरोप करण्यात आला. त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय मनी लाँडरिंग आणि विविध सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचाही ठपका ठेवण्यात आला.

नजीब यांची सत्ता गेल्यानंतर कायदेशीर कारवाई सुरू

२०१८ मध्ये नजीब यांच्या युनायटेड मलेज नॅशनल ऑर्गनायझेशन (UMNO) पक्षाचा सार्वत्रिक निवडणुकीत पराभव झाला. १९५७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून हा पक्ष मलेशियावर राज्य करीत होता. 1MDB घोटाळा आणि वाढती महागाई ही या पराभवाची मुख्य कारणे होती. त्यानंतर नजीब आणि त्यांची पत्नी रोसमाह मन्सूर यांना देश सोडण्यास मनाई करण्यात आली.
इथूनच नजीब यांच्या विरोधात प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली. नजीब यांच्या अनेक अपार्टमेंटवर छापे टाकण्यात आले आणि पोलिसांनी अनेक चैनीच्या वस्तू, तसेच २८.६ दशलक्ष डॉलर्सची रोख रक्कम जप्त केली.

२०१९ मध्ये नजीब यांच्यावर भ्रष्टाचार, मनी लाँडरिंग आणि सत्तेचा गैरवापर करण्याचे आरोप निश्चित करण्यात आले. मात्र, त्यांनी स्वतःला निर्दोष असल्याचे सांगणे सुरूच ठेवले. नजीब यांच्या पत्नीवरही मनी लाँडरिंग आणि करचोरीचे आरोप ठेवण्यात आले. जुलै २०२० मध्ये 1MDB ची उपकंपनी असलेल्या ‘एसआरसी इंटरनॅशनल’कडून बेकायदा १० दशलक्ष डॉलर्स घेतल्याप्रकरणी नजीब यांना १२ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. २०२१ मध्ये अपील न्यायालयाने हा निकाल कायम ठेवला आणि ऑगस्ट २०२२ मध्ये नजीब यांची तुरुंग वारी सुरू झाली. २०२४ मध्ये त्यांची शिक्षा सहा वर्षांपर्यंत कमी करण्यासह दंडही कमी करण्यात आला.

दरम्यान, 1MDB ऑडिट रिपोर्टमध्ये फेरफार केल्याच्या एका वेगळ्या खटल्यात मार्च २०२३ मध्ये मलेशियाच्या उच्च न्यायालयाने नजीब आणि 1MDB चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुल कांडा यांची सुटका केली. दुसऱ्या एका प्रकरणात, नजीब यांच्यावर अबू धाबीच्या ‘इंटरनॅशनल पेट्रोलियम इन्व्हेस्टमेंट कंपनी’ला देण्यासाठी असलेल्या सरकारी निधीचा अपव्यय केल्याचा आरोप ठेवण्यात आला. गेल्या वर्षी नजीब यांनी या घोटाळ्याबाबत माफी मागितली होती. परंतु, त्यांनी वारंवार असे सांगितले की, 1MDB अधिकारी आणि फरार फायनान्सर ‘जो लो’ यांनी निधीच्या स्रोताबद्दल त्यांची दिशाभूल केली होती.

आपल्या खात्यात जमा झालेली रक्कम सौदी राजघराण्याकडून मिळालेली देणगी आहे, असा समज या लोकांनी करून दिला होता, असा दावा नजीब यांनी केला. परंतु, न्यायाधीशांनी नजीब यांचा हा युक्तिवाद चुकीचा ठरवला. सौदी राजघराण्याकडून देणगी मिळाल्याबाबतची जी पत्रे नजीब यांनी सादर केली होती, ती पुराव्याअभावी फेटाळून लावत न्यायाधीशांनी ती बनावट असण्याची शक्यता वर्तवली. न्यायाधीशांनी स्पष्ट केले, “अरब देणगीचा हा बनाव टिकणारा नाही. हे पैसे प्रत्यक्षात 1MDB निधीतूनच आले होते, हे पुराव्यांवरून स्पष्ट होते.”

या प्रकरणातील मुख्य व्यावसायिक ‘जो लो’ याच्यावर अमेरिकेत गुन्हे दाखल आहेत आणि तो सध्या फरारी आहे. नजीब यांची सत्ता गेल्यानंतर तो थायलंडमधून पळून गेल्याचे सांगितले जाते. त्याची आलिशान बोट बालीमध्ये जप्त करण्यात आली. तो मकाऊ, बँकॉक किंवा तैवानमध्ये असावा, असे दावे केले जात आहेत. मलेशियाने तो चीनमध्ये असल्याचे म्हटले होते; परंतु चीनने हा दावा फेटाळला आहे.