US Doomsday Missile Test मध्यपूर्व आशियात युद्धाचा भडका उडाला आहे. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण या युद्धाला सुरू होऊन सहा दिवस झाले आहेत. युद्ध सुरू असताना अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेकडून जमिनीवरून डागल्या जाणाऱ्या मिनटमॅन ३ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली आहे. कॅलिफोर्नियातून मध्यरात्री हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (आयसीबीएम) लॉंच करण्यात आले.

अमेरिकन अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे की, या प्रक्षेपणाचे नियोजन अनेक वर्षांपूर्वीच करण्यात आले होते आणि आता घडणाऱ्या घडामोडींशी याचा कोणताही संबंध नाही. मुख्य म्हणजे अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकला होता. डूम्सडे बॅलेस्टिक त्या अणुबॉम्बच्या २० पट अण्वस्त्र घेऊन जाऊ शकतो. काय आहे डूम्सडे क्षेपणास्त्र? ते किती शक्तिशाली? या क्षेपणास्त्राच्या चाचणीने जगाला धडकी का भरली आहे? सविस्तर जाणून घेऊयात…

अमेरिकेकडून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

३ मार्च २०२६ च्या रात्री सांता बार्बरा काउंटी किनारपट्टीवर असलेल्या वॅन्डनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून मिनिटमॅन III क्षेपणास्त्र लॉंच करण्यात आले. या क्षेपणास्त्रात त्याच्या ऑपरेशनल कॉन्फिगरेशनऐवजी दोन चाचणी ‘री-एंट्री व्हेईकल्स’ बसवण्यात आली होती. लॉंचनंतर या व्हेईकल्सनी हजारो मैलांचा म्हणजे अंदाजे ४,२०० मैलांचा प्रवास करून पश्चिम-मध्य पॅसिफिक महासागरातील क्वाजालेन अ‍ॅटोल येथील निर्धारित लक्ष्यावर अचूक मारा केला.

‘एअर फोर्स ग्लोबल स्ट्राइक कमांड’ (एएफजीएससी)ने या प्रक्षेपणाचा उद्देश प्रणालीच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करणे हा असल्याचे सांगितले. एएफजीएससीच्या मते, “शस्त्र प्रणालीची सज्जता आणि अचूकता तपासण्यासाठी आणि ती प्रमाणित करण्यासाठी हा कार्यक्रम राबवला जातो.” अधिकाऱ्यांनी असेही स्पष्ट केले की, ही घटना सध्याच्या जागतिक तणावाशी संबंधित नाही. त्यांनी निवेदनात म्हटले की, ही चाचणी नियमित असून तिचे नियोजन अनेक वर्षे अगोदर करण्यात आले होते.

‘डूम्सडे मिसाइल’ काय आहे?

१९५० मध्ये अमेरिकेला अण्वस्त्र हल्ला झाल्यास वेगाने प्रत्युत्तर देणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीची गरज होती. त्या काळातील सुरुवातीची आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे द्रव इंधनावर अवलंबून होती. त्यासाठी प्रक्षेपणापूर्वी इंधन भरण्याची प्रक्रिया लांबलचक आणि असुरक्षित होती. अभियंत्यांनी घन-इंधन म्हणजेच सॉलिड फ्यूल तंत्रज्ञानाचा अवलंब करून ही उणीव दूर केली, त्यामुळे तयारीचा वेळ कमालीचा कमी झाला आणि हल्ल्यात टिकून राहण्याची क्षमता वाढली.

पहिले मिनिटमॅन क्षेपणास्त्र १९६२ मध्ये सेवेत दाखल झाले. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला आलेले ‘LGM-30G मिनिटमॅन III’ हे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रगत होते. ‘मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल्स’ने सज्ज असलेले हे पहिले अमेरिकन क्षेपणास्त्र ठरले, त्यामुळे एकाच क्षेपणास्त्रातून वेगवेगळ्या लक्ष्यांवर तीन अण्वस्त्रे डागणे शक्य झाले. ‘स्टार्ट’ आणि ‘न्यू स्टार्ट’सारख्या शस्त्र नियंत्रण करारांचे पालन करण्यासाठी सध्याच्या संरचनेत केवळ एकच अण्वस्त्र बसवले जाते. मात्र, जागतिक सुरक्षेचे वातावरण बदलल्यास या क्षेपणास्त्राची पुनर्रचना करण्याची तांत्रिक क्षमता अद्याप कायम आहे.

‘मिनिटमॅन III ची’ वैशिष्ट्ये

  • उंची : अंदाजे १८.२ मीटर.
  • व्यास : १.८५ मीटर.
  • वजन : प्रक्षेपणाच्या वेळी ३४,००० किलोग्रॅमपेक्षा जास्त.
  • इंधन : तीन टप्प्यांची सॉलिड फ्यूल प्रोपल्शन प्रणाली.
  • पल्ला : सुमारे १३,००० किलोमीटर
  • क्षमता : यातील ‘मार्क २१’ या री-एंट्री व्हेईकलची क्षमता ३०० ते ४७५ किलोटन एवढी आहे.
  • अचूकता : नेव्हिगेशन प्रणाली, ज्याची अचूकता सुमारे १२० मीटर आहे.

प्रत्येक क्षेपणास्त्र जमिनीखालील एका सुरक्षित ‘सायलो’मध्ये ठेवलेले असते, जे एका लाँच कंट्रोल सेंटरला जोडलेले असते. दोन अधिकाऱ्यांचे पथक २४ तास सज्जतेत असते. जर जमिनीवरील कमांड आणि कंट्रोल नेटवर्क विस्कळीत झाले तर E-6B मर्क्युरी ‘एअरबॉर्न लाँच कंट्रोल सिस्टम’ (एएलसीएस) द्वारे प्रक्षेपणाचे अधिकार हाती घेऊ शकते.

अमेरिकेसाठी ही चाचणी किती महत्त्वाची?

२००५ मध्ये ‘LGM-118 पीसकीपिंग’ क्षेपणास्त्र निवृत्त झाल्यानंतर, मिनिटमॅन III हे अमेरिकेच्या ताफ्यातील एकमेव जमिनीवर आधारित आयसीबीएम आहे. सध्या सुमारे ४०० क्षेपणास्त्रे ‘ऑपरेशनल अलर्ट’वर आहेत, तर अमेरिकेकडे एकूण ४५० क्षेपणास्त्रांचा साठा आहे. ही क्षेपणास्त्रे खालील तीन मुख्य तळांवर विभागलेली आहेत:

१. एफ.ई. वॉरन एअर फोर्स बेस (वायोमिंग)
२. मायनोट एअर फोर्स बेस (उत्तर डकोटा)
३. माल्मस्ट्रोम एअर फोर्स बेस (मॉन्टाना)

मिनिटमॅन III चा खर्च किती?

पाच दशकांहून अधिक काळ सेवेत असूनही, मिनिटमॅन III आधुनिक ठेवण्यासाठी त्यावर मोठे खर्च करण्यात आले आहेत. २००२ ते २०१२ दरम्यान या प्रणालीचे आयुष्य २०३० पर्यंत वाढवण्यासाठी ७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली. मात्र, आता ही प्रणाली निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. अमेरिकन हवाई दल ‘ग्राउंड-बेस्ड स्ट्रॅटेजिक डिटरंट’ (जीबीएसडी) कार्यक्रमांतर्गत याच्या जागी ‘LGM-35A सेंटिनेल’ आणण्याचे नियोजन करत आहे.

ही विशिष्ट चाचणी चर्चेत का आली आहे?

पेंटागॉनने स्पष्ट केले आहे की, या चाचणीचे नियोजन खूप आधी झाले होते, तरीही या चाचणीची वेळ पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाशी जोडली जात आहे. इराणचे नेतृत्व, क्षेपणास्त्र साठा आणि अण्वस्त्र पायाभूत सुविधांना लक्ष्य करणाऱ्या अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांनी हे युद्ध तीव्र होत आहे. हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी मारले गेले. तेव्हापासून इराणने इस्रायल, अमेरिकन तळ आणि या प्रदेशातील इतर देशांवर हल्ले केले आहेत.

अमेरिकेला या कृत्याचा पश्चात्ताप करावा लागेल असा इशारा इराणने दिला आहे. दरम्यान, अमेरिकेने श्रीलंकेच्या समुद्रात इराणची एक युद्धनौका बुडवल्याचा दावा केला आहे. ४ मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार, इराणमध्ये १,२०० हून अधिक, लेबनॉनमध्ये ७० हून अधिक आणि इस्रायलमध्येही अनेक लोक मारले गेले आहेत. अशा अस्थिर वातावरणात, मिनिटमॅन III ची चाचणी अमेरिकेची धोरणात्मक लष्करी सामर्थ्य दाखवणारी आहे आणि त्यामुळेच चिंता व्यक्त केली जात आहे.