‘द हंड्रेड’ स्पर्धा नक्की काय आहे?: भारतातील ‘आयपीएल’, ऑस्ट्रेलियातील ‘बिग बॅश लीग’ यांच्या धर्तीवर इंग्लंडनेही स्वत:ची वेगळी लीग म्हणजे ‘द हंड्रेड’ स्पर्धा २०२१ मध्ये सुरू केली. याचे वेगळेपण म्हणजे यात १००-१०० चेंडूंचे सामने होतात. नेहमीच्या सहा चेंडूच्या षटकाऐवजी पाच चेंडूंचे षटक टाकले जाते. इंग्लंडमध्ये ही स्पर्धा प्रचंड लोकप्रिय झाली आहे. अन्य देशांतील लीगप्रमाणेच ‘द हंड्रेड’मध्येही परदेशी खेळाडूंचा सहभाग असतो.

भारतीय फ्रँचायझींकडे कोणते संघ?

इंग्लंडमधील कौंटी संघ परंपरेला धरून राहण्यासाठी ओळखले जातात. खासगीकरण नकोच, अशी त्यांची पूर्वी भूमिका असे. मात्र, ‘आयपीएल’ फ्रँचायझींच्या आर्थिक ताकदीपुढे त्यांना नमते घ्यावे लागले. ‘आयपीएल’ फ्रँचायझींनी विविध कौंटी संघांसह करार करताना ‘द हंड्रेड’मधील संघांचीही मालकी मिळवली आहे. सनरायजर्स हैदराबादच्या (सन टीव्ही नेटवर्क लिमिटेड) मालकांनी ‘सनरायजर्स लीड्स’, दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांनी (जीएमआर समूह) ‘सदर्न ब्रेव्ह’, मुंबई इंडियन्स समूहाने ‘एमआय लंडन’ आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या मालकांनी (आरपीएसजी समूह) ‘मँचेस्टर सुपर जायंट्स’ या संघांत भागीदारी विकत घेतली आहे.

पाकिस्तानी खेळाडूंना विरोधच?

आयपीएल’मध्ये २००९ सालापासून पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी आहे. ‘द हंड्रेड’मध्येही पाकिस्तानी खेळाडूंच्या सहभागावर टांगती तलवार आहे. यातील भारतीय संघ-मालक पाकिस्तानी खेळाडूंना करारबद्ध करणार नसल्याची माहिती ‘द टेलिग्राफ’ने मध्यंतरी दिली. ‘द हंड्रेड’मध्ये पाकिस्तानी खेळाडूंनी यापूर्वी सहभाग नोंदवला आहे. आगामी हंगामाच्या लिलावासाठी एकूण २४३ क्रिकेटपटूंची यादी निश्चित झाली. यात १४ खेळाडू पाकिस्तानचे असून ट्वेन्टी-२० संघाचा विद्यमान कर्णधार सलमान अली आघा, शाहीनशाह आफ्रिदी, सैम अयुब, उस्मान तारिक, शादाब खान, हारिस रौफ, नसीम शाह, अबरार अहमद, इमाद वसीम आदींचा समावेश आहे.

भारतीय संघ-मालकांना विरोध का?

गेल्या वर्षीचा पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने राबवलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ यामुळे भारत आणि पाकिस्तान संबंध अभूतपूर्वरीत्या बिघडले. ही कटुता खेळाच्या, विशेषत: क्रिकेटच्या मैदानावरही दिसून येते. आशिया चषक, तसेच सध्या सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणे टाळले. या सर्व पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी खेळाडूंना करारबद्ध केल्यास भारतात त्याचे पडसाद उमटू शकतील अशी भीती ‘द हंड्रेड’मधील भारतीय संघ-मालकांना असल्याचे समजते.

अन्य लीगमधील चित्र कसे?

‘आयपीएल’मधील फ्रँचायझींकडे इतरही देशांतील लीगमधील संघांची मालकी आहे. त्या स्पर्धांतही पाकिस्तानी खेळाडूंना करारबद्ध करणे या फ्रँचायझी बहुतेक वेळा टाळतात. दक्षिण आफ्रिकेतील ‘एसए२०’ लीगमधील सर्व सहा संघ ‘आयपीएल’ फ्रँचायझींच्या मालकीचेच आहेत. त्यामुळे या स्पर्धेच्या आतापर्यंतच्या चार हंगामांत एकाही पाकिस्तानी खेळाडूला करारबद्ध केले गेले नाही. संयुक्त अरब अमिराती येथील ‘आयएलटी२०’ आणि अमेरिकेतील ‘मेजर लीग क्रिकेट’मध्येही ज्या संघांची मालकी ‘आयपीएल’ फ्रँचायझींकडे आहे, त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंकडे दुर्लक्ष केले. मात्र, याला काही अपवादही आहेत. यापूर्वी कॅरेबियन प्रीमियर लीगमधील (सीपीएल) बार्बाडोस रॉयल्स संघाकडून आझम खान खेळला. या संघाची मालकी ‘आयपीएल’मधील राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीकडे आहे. तसेच यासिर शाह, शादाब खान आणि मोहम्मद हसनैन या पाकिस्तानी खेळाडूंनी ट्रिन्बागो नाइट रायडर्सकडून ‘सीपीएल’मध्ये सहभाग नोंदवला. या संघाची मालकी कोलकाता नाइट रायडर्सकडे आहे.

इंग्लिश क्रिकेट मंडळाची भूमिका काय?

‘द हंड्रेड’ स्पर्धेतून पाकिस्तानी खेळाडूंना डावलण्याबाबत ‘ईसीबी’ने ठाम भूमिका घेतलेली दिसते. अशा प्रकारे वेचक निवड प्रक्रिया खपवून घेतली जाणार नाही, असे ईसीबीचे म्हणणे आहे. पण फ्रँचायझींनी तरीही पाकिस्तानी खेळाडूंना करारबद्ध केले नाही, तर ईसीबी नेमके काय करणार हे स्पष्ट नाही. ही केवळ चर्चा असून अधिकृतरीत्या काहीही समोर आले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने ‘ईसीबी’ला कठोर पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. ‘‘ईसीबीने लवकरच काहीतरी केले पाहिजे. ही त्यांची स्पर्धा आहे आणि त्यात असा प्रकार घडता कामा नये,’’ असे वॉनने ‘एक्स’वर म्हटले आहे. ‘द हंड्रेड’मधील अन्य चार संघ मात्र पाकिस्तानी खेळाडूंना कारारबद्ध करण्याबाबत सकारात्मक आहेत. पाकिस्तानी खेळाडूंचा टी-२० क्रिकेटमधील घसरलेला दर्जा हा घटकही निर्णायक ठरू शकतो.