देशात पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढले आहे. देशातील रुग्णांचा आकडा ६,५०० पार गेला आहे. पुन्हा एकदा कोविड-१९ च्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता भारतात एक नवा व्हेरिएंट आढळून आल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. ओमिक्रॉनचा जेएन १ व्हेरिएंट गेल्या काही काळापासून अस्तित्वात आहे, मात्र आता देशात ‘XFG’ नावाचा एक नवीन प्रकार आढळून आल्याने डोकेदुखी वाढली आहे.
कोविड-१९ ला कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूचा अभ्यास करणाऱ्या इंडियन सार्क-कोव्ही-२ जीनोमिक्स कन्सोर्टियम (Insacog) नुसार, आतापर्यंत संपूर्ण भारतात XFG व्हेरिएंटची १६३ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, भारतात आता ६,५०० हून अधिक सक्रिय कोविड-१९ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. गेल्या ४८ तासांत तब्बल ७६९ नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. नवीन XFG प्रकार नेमका काय आहे? यामुळे गंभीर धोका निर्माण होऊ शकतो का? नवीन प्रकाराविरुद्ध लस प्रभावी ठरणार का? त्याविषयी जाणून घेऊयात.

XFG प्रकार आहे तरी काय?
- XFG प्रकार हा SARS-CoV-2 विषाणूचा एक उपप्रकार आहे.
- हा प्रकार मुळात LF.7 आणि LP.8.1.2 या दोन पूर्वीचे प्रकार एकत्र आल्याचा परिणाम आहे.
- XFG सारखे प्रकार सामान्यतः एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी विषाणूच्या दोन वेगवेगळ्या आवृत्त्यांचा संसर्ग झाल्यास उद्भवतात.
- ‘द लॅन्सेट जर्नल’नुसार, XFG कोविड-१९ प्रकारांच्या ओमिक्रॉन कुटुंबातील आहे, जो २०२१ च्या मध्ये पहिल्यांदा कॅनडामध्ये आढळला होता.
- अभ्यासात असेही नमूद केले आहे की, XFG प्रकार मजबूत रोगप्रतिकारक शक्तीलाही मात करण्याची क्षमता दर्शवतो.
- त्यामुळे हा विषाणू जास्त काळ टिकून राहतो आणि अधिक सहजपणे पसरतो.
भारतात XFG चे रुग्ण कुठे आहेत?
‘इन्साकॉग’च्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत XFG प्रकाराचे १६३ रुग्ण आढळून आले आहेत. या विषाणूचे महाराष्ट्रात सर्वाधिक ८९ रुग्ण आढळले आहेत, त्यानंतर तामिळनाडू (१६), केरळ (१५), गुजरात (११) आणि आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे, जिथे प्रत्येकी सहा रुग्ण आढळले आहेत. तेलंगणात अलीकडेच या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. या यादीतील १५९ रुग्ण मे २०२४ मध्ये आढळून आले होते, तर एप्रिल आणि जूनमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले.
हा व्हेरिएंट धोकादायक आहे का?
सध्या तरी व्हेरिएंटविषयी अशी काही स्थिती दिसून येत नाही. सध्या अशी कोणतीही आधारभूत माहिती नाही की, XFG हा प्रकार इतर ओमिक्रॉन उप-प्रकारांपेक्षा जास्त गंभीर आहे किंवा त्यामुळे मृत्यूदर वाढतो. ओमिक्रॉनपासून विकसित झालेल्या बहुतेक प्रकारांप्रमाणे, XFG हा प्रकार सौम्य श्वसनमार्गाच्या लक्षणांशी संबंधित आहे. विशेषतः लसीकरण झालेल्या किंवा कोविड-१९ मधून पूर्वी बरे झालेल्या लोकांना हा व्हेरिएंट लक्ष्य करत आहे. अद्याप तरी जागतिक आरोग्य संघटना (WHO) किंवा भारताच्या आरोग्य मंत्रालयाने XFG ला कन्सर्न व्हेरिएंट (VOC) किंवा व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट (VOI) असे म्हटलेले नाही. याचा अर्थ असा की, या व्हेरिएंटचा संबंध गंभीर साथीच्या आजारांशी, रुग्णालयात दाखल होण्याच्या संख्येत वाढ होण्याशी किंवा लसीच्या परिणामकारकतेशी संबंधित समस्यांशी अद्याप तरी नाही. मात्र, असे असले तरी याबाबत आरोग्यतज्ज्ञ सावध आहेत.
विषाणू अजूनही विकसित होत आहे आणि उत्परिवर्तन विकसित करणारे प्रकार मानवी पेशींच्या आधारे त्यांची क्षमता सुधारतात (विशेषतः स्पाइक प्रोटीनद्वारे). त्यामुळे, हे व्हेरिएंट भविष्यात लाट आणू शकतात. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च'(ICMR) च्या आकडेवारीनुसार, भारतातील सध्याच्या श्वसन विषाणूजन्य संसर्गांपैकी ६६ टक्के संसर्ग कोविडशी संबंधित आहेत. परंतु, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. “कमकुवत प्रतिकारशक्ती किंवा ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी सतर्क राहिले पाहिजे,” असे गांधी मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापक डॉ. किरण मदाला यांनी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले.
XFG प्रकाराविरोधात लस प्रभावी आहेत का?
भारतातील सध्याच्या कोविड-१९ लसी म्हणजेच कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड आणि नवीन बूस्टर शॉट्स या प्रकाराविरोधात प्रभावी ठरत असल्याची माहिती आहे. या लसीमुळे XFG प्रकारामुळे गंभीर आजार आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी असल्याचे मानले जात आहे. आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे आहे, लस घेतली तरी सौम्य स्वरूपाचा संसर्ग होऊ शकतो. विशेषत: लस घेतल्याच्या काही काळानंतर अँटीबॉडी पातळी कमी होत जाते, मात्र लसीकरणाद्वारे विकसित केलेली टी-सेल रोगप्रतिकारक शक्ती प्रभावी राहण्याची शक्यता असते.
करोना रुग्णांची संख्या ६,५०० च्या पार
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते, भारतातील सक्रिय कोविड-१९ रुग्णांची संख्या आता ६,५०० च्या पुढे गेली आहे. त्यातून संसर्गाच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मंत्रालयाने उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पंजाब, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ, कर्नाटक, गुजरात आणि दिल्ली येथे कोविडमुळे ६५ जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या २४ तासांत १,९५७ सक्रिय रुग्ण आणि सात नवीन रुग्ण आढळून आले आहेत. केरळमध्ये सर्वाधिक प्रकरणे आढळून आली आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्य सरकारने लक्षणे असलेल्या व्यक्तींना कोविड-१९ चाचणी अनिवार्य केली आहे. त्यांनी यासाठी मार्गदर्शक तत्त्वेदेखील जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये जनतेला सर्व आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.