Origins and History of Modi Surname : १३ एप्रिल २०१९ रोजी कर्नाटकमध्ये कोलार येथे निवडणूक सभेमध्ये राहुल गांधी यांनी फरार हिरे व्यापारी नीरव मोदी व ललित मोदी यांच्यावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत 'सर्व मोदी हे चोर असतात का?' असा सवाल केला होता. यानंतर संपूर्ण निवडणूक कालखंडात मोदी या आडनावाची चर्चा सुरू झाली होती. राहुल गांधी यांच्या या विधानानंतर भाजपा आमदार परेश मोदी यांनी 'राहुल गांधी यांनी समस्त मोदी समाजाचा अपमान केला आहे,' असा आरोप करत सूरत येथे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या तक्रारीवर सुनावणी होऊन २३ मार्च रोजी न्यायालयाने याप्रकरणी निकाल देत लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ८(३) नुसार राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले. आज ४ ऑगस्ट रोजी मोदी आडनाव बदनामीच्या खटल्यात गुजरात उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मोदी या आडनावामागील इतिहास समजून घेणे सयुक्तिकच नव्हे तर रोचकही ठरावे. मोदी आडनावमोदी हे आडनाव कोणत्याही एका समाजाचे किंवा जातीचे नाही. हिंदू, मुसलमान, पारशी या तीनही समाजांत या आडनावाचा वापर होताना दिसतो. तसेच मोदी हे नाव गुजरातशिवाय राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा या भागांतही वापरात आहे. किंबहुना गुजरातमध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) या गटात येणाऱ्या काही जाती मोदी हे आडनाव वापरतात, तर काही मोदी आडनावधारक हे सवर्ण गटात येतात. मोदी या नावाचा संबंध हा मोदी घांची किंवा तेली घांची या समाजांशी जोडण्यात येतो. पंतप्रधान मोदी हे मोध तेली घांची समाजाचे आहेत. पारंपरिकरीत्या या समाजाचे व्यापारी घाण्याच्या साह्याने तेल काढणे व त्याचा व्यापार करणे यासाठी प्रसिद्ध आहेत. या समाजाचे परंपरागत वास्तव्य गुजरात, राजस्थान भागात आहे. हा समाज उत्तर भारतात बनिया म्हणून ओळखला जातो. आणखी वाचा: विश्लेषण : पुरातन वस्तू कायद्याचे महत्त्व काय? गुजराती भाषेत छोट्या घराजवळ असलेल्या किराणामालाच्या दुकानाला 'मोदी' म्हणण्याची परंपरा आहे. तशीच परंपरा गांधी या आडनावलाही आहे. व्यापाराच्या नावावरून ते काम किंवा दुकान ओळखले जात होते. मोदी या नावाचा मुख्य संबंध हा स्थळाशी आहे. गुजरात येथील मोढेरा या भागातील व्यापारी समाज हा मोढ व्यापारी म्हणून ओळखला जातो. या व्यापारी गटात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, पाटीदार व इतर जातींचाही समावेश होतो. त्यामुळेच या वेगवेगळ्या जातींतील व्यापारी मोदी हे आडनाव वापरून जगभरात व्यापार करताना दिसतात. मोढेरा येथे असलेली मोढेश्वरी देवी ही या व्यापारी वर्गाची अधिष्ठात्री आहे. मोढेश्वरी देवीचे मंदिर हे मोढेरा येथील प्राचीन सूर्य मंदिराजवळ आहे. या मंदिराचा संदर्भ या प्राचीन भारतातील व्यापाराशी असल्याचे पुरातत्त्वीय पुरावे सांगतात. मोढवाणिक समाजराहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर सुरू झालेल्या वादावर परेश मोदी यांनी मोदी हे नाव 'मोदी समाज मोढवाणिक समाजाशी' संबंधित आहे व या समाजाशी संलग्न लोक संपूर्ण गुजरात तसेच भारताच्या इतर भागांत आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी त्या १३ कोटींच्या संख्येने असलेल्या सर्व मोदींचा अपमान केल्याचा आरोप केला. यावर किरीट पानवाला या राहुल गांधींच्या वकिलांनी 'मोदी' नावाचा कोणताही 'ओळखण्यायोग्य आणि निश्चित' असा समुदाय नाही, असा युक्तिवाद केला. मोदी नावाचा कोणताही समाज व जात अस्तित्वात नसल्याचे व मोदी नावाची माणसे ही केवळ मोढवाणिक समाजात नाहीत तर इतर समाजांतदेखील सापडतात, असे युक्तिवादादरम्यान स्पष्ट केले. गुजरात येथे असणारे मोदी आडनावाचे लोक नेमके कोण आहेत?गुजरातमध्ये अनेक समाज मोदी या नावाचा वापर करताना दिसतात. त्यामुळे मोदी हे कुठल्याही एक समाजाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. वैश्य, खारवी व लोहण या समाजांमध्ये या नावाचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. त्यामुळे मोदी हे नाव मोढेरा या स्थळाशी निगडित असल्याचे संशोधक मानतात. २०१४ - नरेंद्र मोदी व ओबीसी समाज२०१४ च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी चुकीच्या प्रकारे ओबीसी या जातप्रमाणपत्राचा वापर केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्यामुळे नक्की मोदी या नावाचा व ओबीसी समाजाचा संबंध जाणून घेणे गरजेचे आहे.'घांची (मुस्लीम), तेली, मोड घांची, तेली-साहू, तेली-राठोड, तेली-राठौर' हे सर्व समुदाय परंपरेने खाद्यतेलाचे उत्पादन आणि व्यापाराशी संबंधित कार्यात गुंतलेले आहेत. या समाजांमध्ये परंपरेने मोदी हे आडनाव वापरण्याची परंपरा आहे. या समाजाचा समावेश केंद्र सरकारच्या ओबीसी जातींच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांची घांची ही जात ओबीसींच्या केंद्रीय यादीत मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होण्याच्या जवळपास १८ महिने आधी (७ ऑक्टोबर २००१ रोजी) समाविष्ट करण्यात आली होती. परंतु मोदी नामक कुठल्याही स्वतंत्र जातीचा उल्लेख यात नाही. किंबहुना उर्वरित भारतातील इतर कोणत्याही प्रदेशातील जातीचा मोदी या नावाने उल्लेख नाही. उत्तर भारतात या मोढेरा परंपरेतील काही मोढ व्यापारी गुप्ता हे आडनाव वापरतात. बिहारमधील भाजपाचे सर्वात प्रमुख नेते सुशील कुमार मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा वेगळा खटला दाखल केला आहे. त्यामुळे बिहारमधील मोदी या नावाची स्वतंत्र जात आहे का हा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु केंद्र सरकारच्या यादीत असा कुठलाही संदर्भ नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आणखी वाचा: विश्लेषण: Nirma Powder महाराष्ट्राचे राजकारण व 'दूध सी सफेदी' देणारी निरमा वॉशिंग पावडर मोदी, मोडी लिपी आणि इतिहासमोदी या नावाचा इतिहास मोडी लिपीशी निगडित असल्याचा संदर्भ देतात. मोडी लिपीमध्ये शब्द लिहिताना पूर्वी वापरले जाणारे टांक किंवा नंतर वापरात आलेले पेन उचलले जात नाही. थेट एकमेकाला जोडून अक्षरे लिहिली जातात. प्रामुख्याने प्राचीन भारतात व्यापाराच्या नोंदींसाठी लेखी भाषा- लिपी अस्तित्वात आली हे सिद्ध झाले आहे. मोडीलाही हे गृहीतक लागू होते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. व्यापाऱ्यांना सुवाच्च अक्षर लिहिण्याइतका वेळ नसतो, त्यामुळे एकमेकांना जोडून अक्षरे अस्तित्वात आली, असे तर्कशास्त्र यामागे सांगितले जाते. महत्त्वाचे म्हणजे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी कारवार ते कराचीपर्यंत व्याप असलेल्या मुंबई इलाख्यामध्ये (बॉम्बे प्रेसिडेन्सी) मोडी लिपीचा वापर तत्कालीन अधिकृत शासकीय लिपी म्हणून केला जात होता. किंबहुना म्हणूनच आपल्याकडेही जुन्या नोंदी बहुसंख्येने मोडीमध्ये सापडतात. कराची महानगरपालिकेची अधिकृत लिपीही दीर्घकाळ मोडीच होती.