पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर कुंडमळ्यात पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली असून यात अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली असून एनडीआरएफ, पोलिस यांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. सुमारे ३० ते ४० जण नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. रविवारी रात्री उशिरा चार जणांचा मृतदेह आढळून आला. पुणे जिल्ह्यातील तळेगावजवळील कुंडमळा इथे जुना पादचारी पूल इंद्रायणी नदीत कोसळला. वर्षानुवर्षे उभा असलेला हा लोखंडी पूल त्यावेळी शेकडो पर्यटकांनी भरलेला होता.
हा पूल कोसळण्याचे नेमके कारण काय होते? काय चूक झाली असावी आणि ती रोखता आली असती का? या आपत्तीमागील प्रमुख घटकांबाबत सविस्तर या विश्लेषणातून जाणून घेऊ…
पाच मिनिटे पूल हादरला?
सुमार दीडशे ते दोनशे लोकांनी व्यापलेला अरुंद पादचारी पूल दुपारी साडेतीनच्या सुमारास कोसळला. गर्दी असलेल्या पुलाचा एक भाग अचानक कोसळला आणि लोक इंद्रायणी नदीत पडले. एनडीटीव्हीशी बोलताना अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका स्थानिक रहिवाशाने घटनेच्या काही तास आधी पोलिस नियंत्रण कक्षाला गर्दीची सूचना दिली होती. याला प्रतिसाद देत तीन पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गर्दीला तात्पुरते पांगवले. त्यानंतर पोलिस तिथून निघून जाताच लोक पुन्हा गर्दी करू लागले आणि काही वेळाने परिस्थिती हाताबाहेर गेली.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, गर्दी आणि अनेक दुचाकी वाहनांच्या एकत्र आणि जास्त वजनामुळे कोसळण्यापूर्वी लोखंडी पूल जवळजवळ पाच मिनिटे थरथरत होता. त्यावेळी पुलावर असलेल्या अमोलने त्या भयानक क्षणाचे वर्णन केले. “मी पाण्यात १५ मिनिटे झगडलो आणि शेवटी एक पाईप धरून बाहेर आलो”, असे त्याने एनडीटीव्हीला सांगितले. अपघातग्रस्त मदतीसाठी धावा करत असताना स्थानिकांनीच घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली.
जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, “एकूण ५१ लोक जखमी झाले आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसंच या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. चंद्रकांत साळवे, रोहित माने आणि विहान माने अशी तिघांची ओळख पटली आहे. चार मृतांपैकी एकाची ओळख पटू शकलेली नाही.”
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) पथकांनी स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलासह बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू ठेवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपर्क साधत घटनेचा आढावा घेतला आहे.
पुलाचा इतिहास
इंद्रायणी नदीच्या पात्रात असलेले कुंडजाई मातेचे मंदिर आणि त्याच्या बाजूला कुंडमळा तसंच कुंडमळ्याच्या विरुद्ध दिशेला असलेले शेलारवाडी गाव. या दोन्ही ठिकाणांना जोडण्यासाठी तसंच इथल्या शेतकऱ्यांना, स्थानिकांना रोजच्या रहदारीसाठी साधारण ३० वर्षांपूर्वी इंद्रायणी नदीवर हा पूल बांधण्यात आला होता. अनेक वर्षांनंतर सध्या या पुलाची अवस्था अधिकच जीर्ण होती, त्यामुळे वाहतुकीस हा पूल धोकादायक असल्याने त्यावर वाहतूक बंद कऱण्यात आली. या पुलाचे नूतनीकरण व्हावे अशी मागणी स्थानिकांनी वारंवार प्रशासनाकडे केली, त्यानुसार नव्या पुलाच्या बांधकामासाठी गतवर्षी मंजुरी मिळाली होती. मात्र, त्यापुढे पुलाच्या बांधकामाबाबत काहीच हालचाल झाली नाही. प्रामुख्याने पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पूल बंद करण्यात आला होता आणि त्यावर सूचना फलकही लावण्यात आले होते.
जुना लोखंडी पूल
- १९९७ साली पुलाचे बांधकाम करण्यात आले
- पुलाच्या दोन्ही बाजूला सिमेंटचे खांब आणि स्लॅब
- दोन्ही बाजूच्या खांबांना लोखंडी सांगाड्याने जोडले होते
- अनेक वर्षांनंतर लोखंडी सांगाडा जीर्ण झाला
- तात्पुरत्या डागडुजीनंतर पूल रहदारीसाठी खुला केला होता, मात्र पावसाळ्यात वाहतुकीसाठी पूल बंद केला होता.
पूल कोसळण्याचे नेमके कारण काय?
तपास सुरू असताना सुरुवातीच्या मूल्यांकनात अनेक घटक हा पूल कोसळण्यास कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. त्यापैकी प्रमुख म्हणजे ओव्हरलोडिंग आणि जुनाट बांधकाम. हा पूल कधीही पादचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी नव्हताच. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी स्पष्ट केले की, जवळजवळ ३० वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल स्थानिक शेतकऱ्यांसाठी नदी ओलांडण्यासाठी म्हणून बांधण्यात आला होता. मोठ्या गर्दीसाठी किंवा वाहनांसाठी त्याची निर्मिती करण्यात आलीच नव्हती. “हा पूल ३० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या वाहतुकीसाठी बांधण्यात आला होता. मात्र, पर्यटक आणि दुचाकी वाहनांच्या जास्त भारामुळे हा पूल कोसळला,” असे शेळके यांनी एएनआयला सांगितले. लोखंडी पूल ४७० फूट लांब होता आणि तो फक्त चार फूट रुंद होता. यावरून एका वेळी एक दुचाकी आणि दोन पादचारी जाऊ शकतील इतक्याच क्षमतेचा होता.
दरम्यान, रविवारी दुपारी हे लोखंडी पुलाचे बांधकाम पूर्णतः कोसळले होते. अधिकाऱ्यांच्या मते, पुलावर १०० हून अधिक लोक होते, जे बहुतेक पर्यटक होते. एवढंच नाही तर सुमारे सात ते आठ दुचाकीदेखील होत्या. “लोकांनी त्यांच्या स्कूटर आणि मोटारसायकली पुलावर उभ्या केल्या होत्या. धोक्याच्या चिन्हांकडे कोणीही लक्ष दिले नाही”, असे एका प्रत्यक्षदर्शीने एनडीटीव्हीला सांगितले.

गावकऱ्यांनी पुलाच्या दुरुस्तीची मागणी केली अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष
इंद्रायणी पुलावरील दुर्घटनेमागे गर्दी हा एक महत्त्वाचा घटक असला तरी स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, खरी समस्या अधिकाऱ्यांच्या वर्षानुवर्षे दुर्लक्ष आणि निष्क्रियतेमध्येच आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, गावकऱ्यांनी वारंवार अधिकाऱ्यांना त्याचे मूल्यांकन आणि दुरुस्ती करण्याची विनंती करूनही अलीकडच्या वर्षांत पुलाचे कोणतेही स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले नाही. दोन वर्षांपूर्वी स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायतीला पत्र लिहून पुलाची दुरुस्ती करण्याची आणि पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी केली होती. असं असताना कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. अलीकडेच भाजपा आमदार आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दुरुस्तीच्या कामासाठी ८ कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, हा निधी कधीही वापरण्यात आला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी असेही म्हटले की, “हा पूल खूप जुना होता आणि त्याच्या नूतनीकरणाबद्दल चर्चा होत होती, पण दुर्दैवाने ते करता आले नाही. संपूर्ण महाराष्ट्रात असे अनेक पूल आहेत जे जुने आहेत, म्हणजे काही १०० वर्षांपूर्वीचे आहेत; वसाहतवादी काळातील आहेत आणि त्यांची परिस्थितीही जीर्ण झाली आहे.”
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. “या अपघाताची सखोल चौकशी केली जाईल आणि जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली जाईल”, असे ते म्हणाले. राज्यातील सर्व नदी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट आता केले जाईल असे आश्वासनही शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आणि जखमींच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी सरकार घेईल असे आश्वासन दिले.
भारतातील काही मोठे पूल अपघात
भारतातील काही मोठ्या पूल अपघातांबद्दल बोलायचं तर गुजरातमधल्या मोरबी इथे झालेला अपघात हा जीवितहानी बाबतीत सगळ्यात भीषण होता. ही दुर्घटना ३० ऑक्टोबर २०२२ रोजी घडली होती. यामध्ये १३५ लोकांचा मृत्यू झाला होता. रफीगंज रेल्वे अपघात भयानक होता. १० सप्टेंबर २००२ रोजी झालेल्या या अपघातात १३० लोकांचा मृत्यू झाला होता. तिसरा अपघात म्हणजे २१ जुलै २००१ रोजी झालेल्या कडलुंडी नदी पुलावरील अपघात, ज्यामध्ये ५७ लोकांचा मृत्यू झाला होता. २००६ मध्ये बिहारमधील भागलपूर येथे एक पादचारी पूल कोसळून जवळपास ३० लोकांचा मृत्यू झाला होता. ३१ मार्च २०१६ रोजी कोलकातामध्ये बांधकामाधीन विवेकानंद उड्डाणपूल कोसळून २७ जणांचा मृत्यू झाला आणि ८० जण जखमी झाले होते. वाराणसी कॅन्ट रेल्वेस्थानकाजवळही असाच एक अपघात घडला आणि यामध्ये बांधकामाधीन उड्डाणपूल कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला होता