एका बाजूला प्रदेशाध्यक्षांच्या गाडीवर हल्ला होतो आणि दुसऱ्या बाजूला ३३ जागांवर विजय मिळतो. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत असे विरोधाभासी चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमआयएम’मधील राजी – नाराजीचा लंबक एवढ्या वेगात कसा फिरला, मुख्य म्हणजे शिवसेनेची घसरण का झाली, आणि यानिमित्ताने भाजपच्या वाढीचे कारणे काय, याविषयी…
बदलते पक्षीय बलाबल त्याचा अर्थ
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत ११५ वॉर्डांपैकी ५७ जागांवर भाजपला विजय मिळाला. बहुमतापासून केवळ एक जागा कमी राहिली. पक्षीय बलाबल वाढले ते फक्त भाजप आणि एमआयएमचे. ‘युती’मध्ये म्हणजे शिवसेना फुटीपूर्वी भाजपने नेहमीच ‘लहान भाऊ’ अशी भूमिका वठवली. पण या वेळी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या जागांमध्ये कमालीची घसरण झाली. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हास १४ जागा आणि मशाल चिन्हास केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले. वाढ झाली ती फक्त भाजपची आणि एमआयएमची.
शिवसेनेच्या घसरणीची कारणे
गेल्या दहा वर्षांपासून ठरावीक कालावधीनंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वाद जाहीरपणे सुरू होते. शिवसैनिकांनीही जाहीर मेळाव्यात सांगून पाहिले, ‘तुमच्यातील भांडणे मिटवा, पक्ष वाढेल’. पण या वादात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातले नाही. एखाद्या मोठ्या नेत्याचा सन्मान राखण्याची कार्यपद्धती शिवसेनेत नसल्याने अपमान होऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या जास्त. अगदी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचीही आठवण सांगितली जाते. शहराचे पालकमंत्री म्हणून सुभाष देसाई यांनी अनेक वर्षे काम पाहिले. पण महापालिकेच्या निवडणुकीत ते किंवा त्यांनी ज्यांना जवळ केले असे कार्यकर्ते दिसले नाहीत. मनुष्यबळ हाताळणी आणि निवडणुकीत लागणारा पैसा याचे व्यवस्थापन याचा मोठा गुंता असल्याचे दिसून आले. सत्ताधारी पक्षास विरोध करणारा शिवसैनिक ‘युती’मध्ये हरवला होता. ‘शिवसेना स्टाईल’ हे शब्द फक्त बाईटपुरते राहिले होते. त्यामुळे विरोधात राहून महापालिकेची सत्ता आपण राखू शकतो, हा विश्वास गमावल्याने ठाकरे गटातून मोठी गळती झाली. सात माजी महापौर ‘मशाल’ चिन्ह टाळून धनुष्यबाणाकडे वळले. १९८६ च्या दंगलीमध्ये ज्यांना शिवसैनिकांनी विरोध केला त्या रशीद मामू यांना उमेदवारी दिल्याने ठाकरे गटाची प्रतिमा ‘मुस्लीम धार्जिणी’ बनवण्यात भाजपला यश आले. परिणामी ठाकरे यांच्या शिवसेनेला फक्त सहा जागांवर समाधान मानावे लागले.
सत्तेतील ‘धनुष्यबाणा’ची घसरगुंडी का?
छत्रपती संभाजीनगरमध्ये समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे, प्रा. रमेश बाेरनारे, अब्दुल सत्तार, प्रदीप जैस्वाल अशी मोठी राजकीय ताकद असतानाही धनुष्यबाणाची महापालिकेत घसरण झाली. कारण समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातील वादही जाहीर झाले. त्यामुळे जंजाळ यांच्या समर्थकांना निवडून आणण्यासाठी शिरसाट यांनी लक्ष घातले नाही. त्यांनी आपला वेळ आपला मुलगा सिद्धांत आणि मुलगी हर्षदा यांना निवडून आणण्यासाठी खर्च केला. निवडणुकीपूर्वी मंत्री शिरसाट यांच्या कार्यशैलीवरून ते बदनाम झाले होते. हॉटेल विट्स प्रकरणी मुलगा सिद्धांत यांचा सहभाग, वर्ग दोनच्या जमीन खरेदीमध्ये कुटुंबीयाचे नाव, औद्योगिक वसाहतीमधील भूखंड यावरून मंत्री शिरसाट यांच्या हाती सत्ता दिली तर काय होऊ शकते, हा संदेश लोकांपर्यंत पोहचला होता. परिणामी धनुष्यबाणाला मतदान म्हणजे अनागोंदीला चालना, असा संदेश शहरी मतदारांपर्यंत पोहोचल्याने शिवसेनेची मोठी घसरण दिसून आली. दुसरे म्हणजे शिवसेनेला नक्की कोणत्या स्वरुपाचा विकास करायचा आहे, हे शेवटपर्यंत मतदारांना कळाले नाही. अगदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणात आम्ही निधी देणार आहोत, एवढा एकच संदेश होता. मग जर निधीच मिळवायचा तर तो भाजप अधिक देईल, हे मतदारांना माहीत होते. परिणामी धनुष्यबाणाला केवळ १४ जागांवर समाधान मानावे लागले.
औरंगाबाद झिंदाबाद नि एमआयएम
‘एमआयएम’ने पक्ष संघटनेत मोठे बदल केले. जुन्या २१ नगरसेवकांना उमेदवारी नाकारली. परिणामी प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या विरोधात वातावरण निर्माण झाले. पण पक्ष वाढवायचा असेल तर कार्यकर्ते बदलावे लागतात. नव्यांना संधी द्यावी लागते, हे सूत्र एमआयएमने स्वीकारले. या सूत्रामुळे निर्माण होणारी नाराजी दूर करण्यासाठी असदुद्दीन ओवेसी यांनी सभा घेतल्या. घरोघरी जाऊन ‘इत्तेहाद’ म्हणजे एकजूट या शब्दावर भर दिला. दोन मोठ्या सभा घेऊन देशभरातील मुस्लीम एक झाले नाही आणि ते एमआयएमच्या पाठीशी उभे राहिले नाही तर अल्पसंख्याकांचा आवाज पोहोचणारच नाही, हा संदेश व्यवस्थित पोहोचविण्यात आला. परिणामी मतदानाच्या दिवशी सत्तर वयाची असणारी एक महिला म्हणाली, आम्ही पूर्वी पंडित नेहरुंच्या पक्षाला मतदान करायचो. पण आता ओवेसी यांच्या पाठीशी उभे आहोत. तत्पूर्वी अकबरोद्दीन म्हणाले होते, आम्ही इंदिरा गांधींना मतदान केले, राजीव गांधींना केले, व्ही. पी. सिंग, नरसिंह राव यांना मतदान केले. आम्ही मनमोहनसिंग यांना पाठिंबा दिला होता. पण मुस्लीम समाजाची काही प्रगती झाली नाही. ती व्हावी म्हणून नवा पर्याय म्हणून ‘एमआयएम’ चा विचार करण्याच्या आवाहनास मतदारांनी पाठिंबा दिला. भारतावर आक्रमण करणारे मोहम्मद गझनी होता तसेच शुक आणि होन हेही होते. पण केवळ गझनीवरून मुस्लिमांना नाहक बदनाम केले जाते. आमचा आक्रमकांशी संबंध नाही, अशी मांडणीही ओवेसी करत होते. एका बाजूला युक्तिवाद आणि दुसऱ्या बाजूला ‘औरंगाबाद झिंदाबाद’चे नारे, अशा प्रचारनीतीमुळे ‘एमआयएम’ पक्षामागे मतदार उभा राहिला. आठ दिवसांपूर्वीची नाराजी दूर झाली आणि एमआयएम ला ३३ जागा मिळवता आल्या.
औरंगाबाद ते छत्रपती संभाजीनगर आणि कमळ
तत्कालीन औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेबरोबर युतीमध्ये असणाऱ्या भाजपने शिवसेनेचे सहकार्य घेतले. हिंदुत्वाची विचारधारा चौकाचौकांत पोहोचवली. पुढे पक्ष वाढीसाठी युती तोडली. युतीमध्ये भाजपने ४७ जागा लढवल्या असत्या. युती तुटली आणि भाजपचे संख्याबळ ५७ वर गेले. त्यामुळे महापालिकेतील अनागोंदीस आम्ही जबाबदार नव्हतो, असे म्हणण्यास वाव मिळत असे. आता ती सोय असणार नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये पादर्शक प्रशासनाचा अभाव असल्याचे मुख्यमंत्र्यांनीही मान्य केले होते. तो कारभार बघायला मिळावा, यासाठी मतदारांनी भाजपला पूर्ण कौल दिल्याचे चित्र दिसून येत आहे.
