नव्या संसद भवनाचे उद्घाटन २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या नव्या संसद भवनावरून सुरु असलेले अनेक राजकीय वादंग आपण अनुभवत आहोत. यापैकीच एक वाद म्हणजे या संसद भवनाचा आकार नेमका कशाचे प्रतीक आहे?, हा होय. रविवारी पार पडलेल्या नव्या संसद भवनाच्या उदघाटनानंतर ‘राष्ट्रीय जनता दलाने’ केलेल्या एका ट्विटनंतर या वादाला वाचा फुटली. या ट्विटमध्ये राष्ट्रीय जनता दलाने नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या आकाराची तुलना शवपेटीशी केली. त्यानंतर भाजपानेही त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्याच पार्श्वभूमीवर नव्या तसेच जुन्या संसद भवनाच्या इमारतींच्या आकारामागील नेमके रहस्य काय असू शकते हे जाणून घेणे रोचक ठरणारे आहे. विशेष बाब म्हणजे या दोन्ही संसद भावनांच्या आकारामागे तांत्रिक उपासनेचे मूळ लपलेले आहे हे येथे प्रकर्षाने नमूद करणे भाग पडते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवे संसद भवन

नवे संसद भवन षष्ठकोनी असल्याने, या संसद भवनाची तुलना ‘कॉफीन’ म्हणजेच सामान्यतः मुसलमान व ख्रिश्चन या धर्मांमध्ये मृतदेह दफन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शवपेटीशी केली. परंतु, या इमारतीचे स्थापत्य रचनाकार बिमल पटेल यांनी या संदर्भात स्पष्ट नमूद केल्याप्रमाणे ‘संसद भवनाचा आकार षष्ठकोनी नसून त्रिकोणीच आहे, तीन त्रिकोणाच्या संयुक्त आकारातून आजच्या नव्या संसद भवनाचा आकार तयार झाला आहे. तसेच त्रिकोणी आकार हा भारतातील अनेक धर्मपंथांमध्ये पवित्र मानला जातो. नवे संसद भवन हे ‘श्री यंत्रांच्या’ आकारातून प्रभावित झालेले आहे.’ त्यामुळेच भारतीय परंपरेतील श्री यंत्राची भूमिका येथे जाणून घेणे समयोचित ठरणारे आहे.

आणखी वाचा : विश्लेषण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या राजदंडावर नंदीसोबत लक्ष्मी कशासाठी?

श्री यंत्र

श्री यंत्र हे भारतीय धार्मिक परंपरेतील प्रसिद्ध यंत्र आहे. भारतातील अनेक घरांत दररोज या यंत्राची पूजाविधीसह उपासना करण्यात येते. मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी पिवळ्या कागदावर लाल रंगात असलेल्या ज्या आकृतीची पूजा महिला वर्ग आवर्जून करतो त्याच आकृतीला ‘श्री यंत्र’ असे संबोधले जाते. एकूणच लक्षात येण्याचा भाग म्हणजे श्री यंत्राचा शक्ती म्हणजेच देवी उपासनेशी खूप जवळचा संबंध आहे. प्रत्यक्ष श्री यंत्रात नऊ एकात एक गुंतलेले त्रिकोण असतात. यातील चार कोन शिवाचे प्रतिनिधित्त्व करतात, तर उरलेले पाच शक्तीचे. या यंत्राला ‘नवयोनी’ यंत्र असेही म्हटले जाते. याच यंत्रापासून इतर यंत्राची निर्मिती झाल्याचे मानले जाते. त्रिकोण व वर्तुळ यांच्या संयोगाने तयार होणारे हे यंत्र कमळाचा आकार धारण करते. हेच कमळ सर्जनाचे म्हणजेच नव निर्मितीचे प्रतीक मानले जाते. श्री यंत्राचा थेट संबंध हिंदू तंत्र साधनेशी आहे. तंत्र विद्येतील ‘श्री विद्या’ या भागाशी हे यंत्र संबंधित आहे. पारंपरिक धारणेनुसार श्री यंत्र हे त्रिपुरा सुंदरी देवीचे प्रतिनिधित्त्व करते. या यंत्राचा प्रत्येक भाग वेगवेगळ्या मुद्रा, शाक्त संप्रदायातील योगिनी, तसेच त्रिपुरा सुंदरीच्या विशिष्ट रूपाशी संबंधित आहेत. या यंत्राच्या नऊ थरांमध्ये विराजमान असलेल्या या देवतांचे वर्णन तांत्रिक पंथाशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये करण्यात आलेले आहे. हे ‘श्री यंत्र’ जगत् अंबेच्या योनीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच ‘श्री यंत्रा’ला जगाच्या उत्पत्तीचे मूळ मानण्यात येते. पुरुष व प्रकृती यांच्या साहचर्यातून या विश्वाची निर्मिती झाली. हेच पुरुष व प्रकृती, शिव व शक्ती यांच्या स्वरूपात श्री यंत्रात विराजमान झालेले आहेत.

जुने संसद भवन

भारताच्या पहिल्या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन १८ जानेवारी १९२७ रोजी करण्यात आले होते. या इमारतीच्या उभारणीसाठी एडवीन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर या दोन वास्तुविशारदांची निवड करण्यात आली होती. या इमारतीच्या बांधकामासाठी तब्बल सहा वर्षांचा कालावधी लागला होता. या इमारतीची स्थापत्य रचना मध्यप्रदेश येथील योगिनी मंदिरावरून घेण्यात आल्याचे सांगितले जाते. परंतु, हे सिद्ध करणारे कोणत्याही प्रकारचे दस्ताऐवज आज उपलब्ध नाहीत.

चौसष्ठ योगिनी मंदिराची रचना

मध्यप्रदेशमधील मुरैना येथील चौसष्ठ योगिनींचे मंदिर जगप्रसिद्ध आहे. सर्वसाधारण भारतीय मंदिर स्थापत्य शैलीत गोलाकार आकाराची मंदिरे आढळत नाहीत. अपवाद हा फक्त योगिनी मंदिरांचा आहे. भारतात जी काही मोजकी योगिनींची मंदिरे आहेत, त्यातील हे मंदिर विशेष लोकप्रिय आहे. हे मंदिर एकट्टसो महादेव मंदिर म्हणूनही ओळखले जाते, एका वेगळ्या टेकडीवर सुमारे शंभर फूट उंचीवर हे मंदिर उभे आहे, मंदिराच्या प्रत्येक गाभाऱ्यात शिवलिंग असल्यामुळे हे नाव पडले असावे असे अभ्यासक मानतात. मंदिराच्या वर्तुळाकार संरचनेत आतील बाजू ६४ लहान गर्भगृह आहेत. खजुराहो मंदिर समूहाच्या नजीक असलेल्या या मंदिराच्या रचनेचा आधार घेवून भारतातले पहिले वर्तुळाकार संसद भवन बांधण्यात आले असे मानले जाते.

आणखी वाचा : विश्लेषण: मोहम्मद बिन तुघलकला ‘लहरी मोहम्मद’ का म्हणायचे? जितेंद्र आव्हाडांनी थेट नोटबंदीच्या निर्णयाशी त्याचा संबंध का लावलाय?

योगिनी संप्रदाय

भारतीय इतिहासात योगिनी संप्रदाय हा सातव्या ते पंधराव्या शतकात कार्यरत असल्याचे साहित्यिक व पुरातत्त्वीय पुराव्यांवरून लक्षात येते. मध्ययुगाच्या प्रारंभिक इसवी सनाच्या जवळपास सातव्या शतकात योगिनी संप्रदायाची स्थापना झाली, असे अभ्यासक मानतात. योगी व योगिनी या दोन्ही संज्ञा हिंदू, बौद्ध तसेच जैन या तीनही धर्मांमध्ये अर्थभाव बदलून वापरल्या जातात. योगिनींचा संबंध तांत्रिक उपासनेशी आहे. मूलतः हा शाक्त संप्रदाय आहे. देवीच्या वेगवेगळ्या चौसष्ट रूपांची आराधना या संप्रदायात करण्यात येते. मद्य, मांस, मत्स्य, मैथुन, मुद्रा या पंच’म’कारांचा योगिनींच्या उपासना विधींमध्ये समावेश होतो.

मातृकांशी संबंध

या योगिनींच्या उत्पत्तीविषयी अनेक संदर्भ हे पौराणिक तसेच संस्कृत साहित्यात सापडतात, त्यानुसार मूलत: त्यांचा संबध हा मातृकांशी जोडला जातो. पौराणिक संदर्भानुसार आदिशक्तीच्या राग व कोपातून अष्टमातृका निर्माण झाल्या. व याच अष्टमातृकांच्या प्रत्येकी आठ सेविका अशा मिळून ६४ योगिनी तयार होतात. हा एक संदर्भ असला तरी या देवींच्या उत्पत्तीचें वेगवेगळे संदर्भ सापडतात. या देवीचा संबंध अघोरी पूजाविधींशी असल्याने हा संप्रदाय १५ व्या शतकात नामशेष झाल्याचे मानले जाते. किंबहुना विविध अनेक मार्गाने आजही या संप्रदायाशी सलंग्न विविध पद्धती संपूर्ण देशभर विविध समाजांमध्ये अस्तित्त्वात असल्याचे आपण पाहू शकतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the secret behind the shape of new and old parliament buildings svs
First published on: 29-05-2023 at 16:27 IST