scorecardresearch

विश्लेषण: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या जवळचे अनुब्रता मंडल कोण आहेत? सीबीआयने त्यांना प्राणी तस्करी प्रकरणात अटक का केली आहे

२०१६ पर्यंत भारत-बांगलादेश सीमेवर जप्त करण्यात आलेल्या जनावरांची संख्या एक लाख ६९ हजारांवर पोहोचली. मात्र, या संख्येवरून प्रत्यक्षात किती जनावरांची तस्करी झाली याचा अंदाज लावता येत नाही.

विश्लेषण: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या जवळचे अनुब्रता मंडल कोण आहेत? सीबीआयने त्यांना प्राणी तस्करी प्रकरणात अटक का केली आहे

प्राण्यांच्या तस्करी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तृणमूल काँग्रेसचे नेते अनुब्रत मंडल यांना १० दिवसांची कोठडी सुनावली आहे. सीबीआयने अनुब्रत मंडल यांना आसनसोल येथील विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले. सीबीआयने १४ दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने १० दिवसांची कोठडी सुनावली आहे.

कोण आहे अनुब्रता मंडल?

अनुब्रता मंडल हे टीएमसीचे बीरभूम जिल्हा अध्यक्ष आहेत आणि ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. बीरभूम हा बंगालमधील मंडलचा बालेकिल्ला मानला जातो आणि येथे त्यांनी तृणमूल काँग्रेसलाही बळ दिले. बीरभूममधील विधानसभेच्या ११ पैकी १० जागा टीएमसीकडे आहेत. बंगालच्या राजकारणात मंडल खेळ बदलणारा खेळाडू मानला जातो.

हेही वाचा- विश्लेषण : नितीशकुमार नरेंद्र मोदींविरोधात २०२४ मध्ये पंतप्रधानपदाचा चेहरा असतील का?

ममतांचे निष्ठावंत

अनुब्रता मंडल यांना बंगाल आणि बीरभूममध्ये प्रेमाने ‘केश्तो दा’ म्हटले जाते आणि ते ममतांचे कट्टर निष्ठावंत मानले जातात. जेव्हा त्यांना टीएमसीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आले, तेव्हा असे मानले जात होते की त्यांना पक्षाच्या सुप्रिमोने त्यांच्या निष्ठेचे बक्षीस दिले होते. बंगालमध्ये ‘खेल होबे’ ही घोषणा लोकप्रिय करणारे नेते अनुब्रत मंडल होते. त्यानंतर २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीने प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकली होती.

अनुब्रत यांनी कधीही निवडणूक लढवली नाही

विशेष म्हणजे तीन दशकांहून अधिक काळ राजकारणात असूनही मंडल यांनी कधीही निवडणूक लढवली नाही. तृणमूल काँग्रेसच्या विस्तारात त्यांचा मोलाचा वाटा आहे. मात्र, त्यांच्या वक्तव्यामुळे ते अनेकदा वादात सापडले आहेत. मंडल हे ध्रुवीकरण विधान करणारे नेते म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्यावर पोलिसांना धमकावण्याचे आणि टीएमसी कार्यकर्त्यांवर ‘बॉम्ब फेकण्यासाठी’ भडकवण्याचे आरोप अनेक वेळा झाले आहेत. अनुब्रता मंडलांवर अनेक असामाजिक तत्वांना आश्रय दिल्याचा आरोप आहे. मंडलांच्या बीरभूम परिसरात वाळू उत्खनन, दगड उत्खनन आणि गुरांची तस्करी यासारख्या बेकायदेशीर कामांशी संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

हेही वाचा- विश्लेषण : अब्दुल सत्तारांना टीकेच्या केंद्रस्थानी आणणारा TET घोटाळा नेमका आहे तरी काय? कधी आणि काय घडलं होतं?

मंडल हायपोक्सियाने ग्रस्त

बंगालच्या मुख्यमंत्री ममता यांच्या जवळचे मानले जाणारे मंडल हायपोक्सियाने ग्रस्त आहे, ज्यासाठी ते सोबत ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जातात. या प्रकरणापूर्वी सीबीआयने बंगालमधील मतदानोत्तर हिंसाचार प्रकरणी मंडल यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. यावर अनुब्रत मंडल यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळाला होता.

सीबीआयने 21 सप्टेंबर 2020 रोजी मालदा येथील बीएसएफच्या ३६ बटालियनचे कमांडंट सतीश कुमार यांच्यासह चार आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला. एफआयआरमध्ये कुमार यांच्या कार्यकाळात बीएसएफने २०,००० हून अधिक गुरांची मुंडके सीमेपलीकडे नेण्यापूर्वी जप्त केली होती, परंतु ही जनावरे घेऊन जाणारी वाहने जप्त करण्यात आली नव्हती तसेच या प्रकरणातील आरोपींनाही पकडण्यात आले नव्हते.

एफआयआरमध्ये कथित गुरे तस्कर मोहम्मद इनामुल हक, रॅकेटचा कथित सरदार अनरुल शेख आणि मोहम्मद गोलम मुस्तफा यांचा समावेश आहे. आरोपींवर IPC कलम १२०B (गुन्हेगारी कट), ४०९ (गुन्हेगारी विश्वासाचा भंग), आणि ४२० (फसवणूक), आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ च्या विविध कलमांखाली आरोप ठेवण्यात आले होते. आरोपींशी संबंधित असलेल्या परिसरात शोध घेण्यात आला. आरोपींनी बांगलादेशच्या सीमेपलीकडून गुरांच्या अवैध व्यापारातून मिळणारे उत्पन्न लपवण्यासाठी बनावट व्यवसायाची माहिती दिली होती.

या प्रकरणी विकास मिश्रा आणि सैगल हुसेन यांच्यासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली. तपासकर्त्यांनी पश्चिम बंगाल पोलिसांच्या किमान सहा अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची चौकशी केली असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. तसेच या प्रकरणात राज्यातील प्रभावशाली व्यक्तींशी संबंधित असलेल्या काही व्यावसायिक एजन्सींचाही सामावेश असल्याचे समोर आले होते.

हेही वाचा- विश्लेषण: आत्महत्या की हत्या? केरळमधील दलित बहिणींचं कथित बलात्कार प्रकरण पुन्हा चर्चेत, जाणून घ्या काय घडलं होतं?

या तस्करी प्रकरणी अनुब्रत मंडल यांचा संबंध काय?

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, मंडल यांचा या प्रकरणाशी थेट संबंध आहे. ते मुख्य आरोपी एनामुल हक याचा अंगरक्षक सैगल हुसेनच्या माध्यमातून संपर्कात होते. सीबीआयकडून वारंवार समन्स बाजवूनही मंडल चौकशीसाठी गैरहजर राहत होते. तसेच ते या प्रकरणात योग्य सहकार्यही करत नव्हते. या प्राण्यांच्या तस्करीत अनुब्रत मंडल यांच्या नावाने सैगल हुसेनने पैसेही गोळा केले होते.

गाई- म्हशींची तस्करी

पश्चिम बंगालचा सीमावर्ती भाग असलेल्या मालदा, मुर्शिदाबाद या कच्च्या मार्गाने दररोज हजारो गायी बांगलादेशात पोहोचतात. जेवढ्या गायींची तस्करी होते, त्यापैकी केवळ पाच टक्केच तस्करी बीएसएफ रोखू शकते, असे सीबीआयचे मत आहे. २०१४ मध्ये बीएसएफने तस्करी केली जाणारी सुमारे एक लाख दहा हजार जनावरे जप्त केली होती. २०१६ पर्यंत सीमेवर जप्त करण्यात आलेल्या जनावरांची संख्या एक लाख ६९ हजारांवर पोहोचली. मात्र, या संख्येवरून प्रत्यक्षात किती जनावरांची तस्करी झाली याचा अंदाज लावता येत नाही.

उत्तर भारतातील प्रत्येक जातीच्या गुरांची किंमत ८० ते ९० हजार रुपये आहे. तर बंगालमधील जातीच्या गुरांची म्हणजे जी गुरे आकाराने लहान आहेत त्यांची बांग्लादेशमध्ये किंमत ४० ते ५० हजार रुपये आहे. ईदच्या काळात या गुरांच्या मांसाला जास्त मागणी असते. त्यामुळे तस्करीदरम्यान भारतात ज्या दराने गुरे खरेदी केली जातात. त्यापेक्षा दुप्पट दर त्यांना बांग्लादेशमध्ये मिळत असल्याचे तपासकर्त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा- स्त्री वैमानिकांचे प्रमाण भारतात सर्वाधिक का?

भारतातून बांग्लादेशमध्ये मोठ्या प्रमाणात प्राण्यांच्या मासांची विक्री

भारतातील राजस्थान, हरियाणा, यूपी, बिहार इत्यादी अनेक राज्यांतून गाई म्हशींची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. बांगलादेशात, याच प्राण्यांचे पॅकेज केलेले मांस निर्यात केले जाते. याशिवाय हे मांस स्थानिक बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात विकले जाते. बांगलादेशातील प्रथिनांचा सर्वात मोठा स्त्रोत हे मांस असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारतातून प्राण्यांची तस्करी एवढी वाढली आहे की बांगलादेशातील डेअरी उद्योग कोलमडून पडला आहे.
सीबीआय आणि ईडीसारख्या केंद्रीय कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींनी यापूर्वी २०१३ च्या ग्रामीण निवडणुका, २०१४, २०१९ च्या लोकसभा निवडणुका तसेच २०१६ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी बंगालमधील पॉन्झी योजनांचा तपास वाढवला होता. या प्रकरणी अनेक तृणमूलच्या नेत्यांना अटक करून त्यांची चौकशी केली होती.

२०२४ च्या लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे गुरांच्या तस्करीच्या तपासाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही या प्रकरणाची झळ बसण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या ४२ जागा जिंकण्यासाठी भाजपा कंबर कसून तयारीला लागली आहे. तर दुसरीकडे आपले वर्चस्व टिकवून ठेण्याचे तृणमूलसमोर मोठे आव्हान आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या