What is Third Man Syndrome?: एका बर्फाच्छादित वाळवंटात एकटा माणूस उभा आहे. त्याचं शरीर आजूबाजूच्या प्रचंड थंडीने थरथरत आहे, ऑक्सिजन कमी होत चाललं आहे, पाय पुढे टाकण्याची ताकद उरलेली नाही… आणि नेमक्या त्याच क्षणी कोणी तरी शांतपणे शेजारी चालत असल्याचा भास होतो. ते कोण आहे हे दिसत नाही. फक्त ऐकू येतो तो आवाज, कधी तरी जाणवते ती त्या आभासी व्यक्तीची फक्त उपस्थिती. तो घाबरवत नाही..उलट धीर देतो. तो थांबायला सांगत नाही ..पुढे चालायला सांगतो. हा अनुभव एखादी काल्पनिक कथा नाही. हा अनुभव म्हणजे Third Man Syndrome आहे. असे एक रहस्य, जे गेल्या शंभर वर्षांपासून शास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि जगभरातील लोकांना थक्क करत आले आहे.
Third Man Syndrome म्हणजे नेमके काय?
Third Man Syndrome (किंवा Third Man Effect) हा एक मानसिक अनुभव आहे. हा अनुभव अत्यंत टोकाच्या परिस्थितीत येतो. ज्यावेळी मानवी आयुष्यात जगण्याची शक्यता जवळजवळ शून्य असते, त्यावेळेस हा अनुभव माणसाला येतो. या अवस्थेत व्यक्तीला स्वतःबरोबर एखादी अदृश्य व्यक्ती असल्याची जाणीव होते, मरणासन्न अवस्थेत असताना ही व्यक्ती मार्गदर्शन करते, धीर देते आणि भीती कमी करून निर्णयक्षमता टिकवून ठेवण्यास मदत करते. विशेष म्हणजे हा अनुभव गोंधळलेला, भीषण किंवा भ्रमासारखा नसतो; उलट तो शांत, स्पष्ट असतो, यामुळे मरणासन्न अवस्थेतेतील व्यक्तीला अत्यंत कठीण क्षणीही मानसिक आधार मिळतो.

अंटार्क्टिकातील मृत्यूशी झुंज: या संकल्पनेची पहिली नोंद
या संकल्पनेची पहिली ठळक नोंद १९१४-१७ मधील अंटार्क्टिक मोहिमेदरम्यान आढळते. या मोहिमेचे प्रमुख Ernest Shackleton यांनी त्यांच्या डायरीत मृत्यूशी झुंज देताना आलेल्या एका विचित्र अनुभवाचे वर्णन केले आहे. ते आणि त्यांचे दोन सहकारी गोठवणाऱ्या थंडीत, अन्नाशिवाय आणि मृत्यूच्या अगदी उंबरठ्यावर, दक्षिण जॉर्जिया बेट ओलांडत पायी चालत होते. त्या अवस्थेबद्दल Shackleton यांनी लिहिले की, “आम्ही तिघे चालत होतो, पण प्रत्येकालाच असे वाटत होते की, आमच्याबरोबर चौथा माणूसही आहे.” या अनुभवाची सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे हा अनुभव प्रत्येकाला स्वतंत्रपणे आला होता, त्या क्षणी कोणीही याबद्दल एकमेकांशी बोलले नव्हते, आणि मोहिमेतून सुरक्षित परतल्यानंतरच सर्वांच्या अनुभवांचे वर्णन आश्चर्यकारकरित्या एकसारखे असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
गिर्यारोहक आणि सैनिकांचे अनुभव: ती अदृश्य व्यक्ती जीव कशी वाचवते?
यानंतर जगभरातून अशाच प्रकारचे अनेक अनुभव समोर येऊ लागले. एव्हरेस्टसारख्या उंच शिखरांवर चढणारे गिर्यारोहक, एकटे समुद्रात अडकलेले नाविक, भीषण विमान अपघातातून वाचलेले प्रवासी, हिमवादळात अडकलेले ट्रेकर्स आणि वाळवंटात भरकटलेले सैनिक अशा अत्यंत टोकाच्या परिस्थितीत सापडलेल्या लोकांनी एकसारखीच अनुभूती व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, जणू ‘कोणी तरी’ त्यांना पुढे जायला सांगत होते, ते शारीरिकदृष्ट्या एकटे असतानाही मानसिकदृष्ट्या एकटेपणा जाणवत नव्हता, आणि अनेकांनी स्पष्टपणे म्हटले की, जर ते थांबले असते तर त्यांचा मृत्यू निश्चित झाला असता, पण त्या अदृश्य उपस्थितीमुळे ते चालत राहिले आणि त्यांचे प्राण वाचले.
शास्त्रज्ञ काय सांगतात? मेंदूच्या आत नेमके काय घडते?
शास्त्रज्ञांच्या मते Third Man Syndrome मागे मेंदूची एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रगत आपत्कालीन संरक्षण यंत्रणा कार्यरत असते. जेव्हा शरीर प्रचंड थकते, ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते, तसेच भूक, थंडी किंवा वेदना असह्य पातळीवर पोहोचतात, तेव्हा मेंदूवर तीव्र ताण (Extreme Stress) येतो. अशा अवस्थेत सामान्य विचारप्रक्रिया कोलमडण्याचा धोका असतो आणि भीतीमुळे निर्णयक्षमता पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता असते. नेमक्या याच क्षणी मेंदू स्वतःचे संरक्षण करण्यासाठी एक विलक्षण मार्ग अवलंबतो. त्यावेळी मेंदू एक dissociative figure निर्माण करतो, म्हणजेच स्वतःच्याच मनातून बाहेर प्रोजेक्ट केलेली, मार्गदर्शन करणारी आणि आधार देणारी आकृती. ही आकृती व्यक्तीला मानसिक अंतर (dissociation) निर्माण करून देते, त्यामुळे माणूस घाबरून थांबण्याऐवजी कृती करत राहतो आणि जगण्याची शक्यता वाढते.
एकटेपणा आणि मानवी उत्क्रांती: मेंदूची विशेष संरक्षण यंत्रणा
मानव मुळात एकटा जगण्यासाठी नाहीच, तो सामाजिक प्राणी आहे. मानवी उत्क्रांतीच्या दृष्टीने पाहिले तर समूहात राहणे म्हणजे जगण्याची हमी, तर एकटेपणा म्हणजे थेट धोका. त्यामुळे मेंदूमधील social cognition system कायमच “आपल्याबरोबर कोणी तरी आहे” अशी आंतरिक अपेक्षा ठेवून कार्य करते. पण जेव्हा माणूस पूर्णपणे एकटा असतो आणि मृत्यूच्या उंबरठ्यावर उभा असतो, तेव्हा हीच प्रणाली एका वेगळ्या पातळीवर सक्रिय होते. त्या क्षणी “सोबत कोणी तरी असायलाच हवे” असा एक सिम्युलेशन मोड मेंदू सुरू करतो, ज्यामध्ये तो स्वतःच एक साथ देणारे अस्तित्व निर्माण करतो. हा भ्रम नसून, उत्क्रांतीने घडवलेला एक संरक्षणात्मक मानसिक उपाय असतो, जो व्यक्तीला तग धरून राहण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक ताकद आणि दिशा पुरवतो.
हे केवळ Hallucination (भ्रम) आहे की आणखी काही?
हा अनुभव सामान्य hallucination सारखा घाबरवणारा का वाटत नाही, यामागे मेंदूची कार्यपद्धतीच कारणीभूत असते. साधारण hallucination मुळे गोंधळ निर्माण होतो, भीती वाढते आणि वास्तवाची जाणीव ढासळते; पण Third Man Syndrome याच्या अगदी उलट स्वरूपाचा असतो. या अवस्थेत जाणवणारे अस्तित्व शांत असते, मार्गदर्शकाची भूमिका बजावते आणि व्यक्तीला उपयोगी, व्यवहार्य निर्णय घेण्यास मदत करते. म्हणूनच हा अनुभव भीषण किंवा अराजक वाटत नाही. शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर हा मेंदूने तातडीच्या संकटात तयार केलेले एक functional psychological tool आहे. भ्रम नव्हे, तर जगण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक यंत्रणा, जी भीती कमी करून कृतीक्षमतेला चालना देते.
हा अनुभव जीव वाचवतो का?
हा अनुभव प्रत्यक्षात जीव वाचवतो का, याचे उत्तर अनेक प्रकरणांमध्ये स्पष्टपणे होय असे आढळते. विविध संशोधन आणि प्रत्यक्ष अनुभवांच्या अभ्यासातून दिसून आले आहे की, ज्यांना Third Man Syndrome चा अनुभव आला, त्यांनी घाबरून panic न होता तुलनेने शांतपणे निर्णय घेतले, शारीरिक क्षमता अक्षरशः संपून गेलेली असतानाही पुढे जाण्याची हिंमत टिकवून ठेवली आणि थांबणे म्हणजे मृत्यू हे ओळखून कृती करत राहिले. म्हणूनच अनेक जण नंतर असे प्रांजळपणे म्हणतात की, “तो कोणी खरं नव्हताच, पण त्याच्याशिवाय मी जिवंत राहिलो नसतो.” या वाक्यातच या संकल्पनेचे सार दडलेले आहे. ही काल्पनिक साथ असली तरी ती मेंदूने निर्माण केलेली, जगण्यासाठी निर्णायक ठरणारी मानसिक मदत ठरते.
अध्यात्म की विज्ञान: देवदूत की मेंदूचा चमत्कार?
अध्यात्मिक आणि वैज्ञानिक असे या अनुभवाकडे पाहण्याचे दोन प्रमुख दृष्टिकोन आहेत. काही लोक Third Man Syndrome चा अर्थ देवदूत, आत्मा किंवा दैवी रक्षण अशा स्वरूपात लावतात, कारण तो अनुभव अत्यंत आधार देणारा, मार्गदर्शक आणि जीवनरक्षक वाटतो. विज्ञान मात्र वेगळ्या भाषेत तेच सांगते, अनुभव खरा आहे, खोल आणि प्रभावी आहे, पण त्याचे मूळ मेंदूच्या संरचनेत आणि त्याच्या आपत्कालीन कार्यपद्धतीत आहे. त्यामुळे या दोन दृष्टिकोनांमध्ये प्रत्यक्षात संघर्ष नाही. एक अध्यात्म मानवी अनुभवाला अर्थ आणि भावना देते, तर विज्ञान त्यामागील प्रक्रिया आणि यंत्रणा समजावून सांगते. दोन्हीही मानवी अस्तित्वाच्या त्या विलक्षण क्षणांना समजून घेण्याचे वेगवेगळे, पण परस्परपूरक मार्ग आहेत.
Third Man Syndrome आपल्याला मानवी मेंदूविषयी एक अत्यंत महत्त्वाचा धडा शिकवतो. तो केवळ विचार करणारा किंवा विश्लेषण करणारा अवयव नसून, संकटाच्या क्षणी सक्रियपणे संरक्षण करणारी यंत्रणाही आहे. जेव्हा बाह्य आधार संपतो, आशा मावळू लागते आणि परिस्थिती हाताबाहेर जात असल्यासारखी वाटते, तेव्हाही मन सहज हार मानत नाही. उलट, अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा मेंदू जगण्यासाठी नवे मार्ग शोधतो, स्वतःच स्वतःला आधार देतो आणि माणसाला पुढे पाऊल टाकायला भाग पाडतो. त्यामुळे Third Man Syndrome हे मानवी मानसिक ताकदीचे आणि जगण्याच्या अतूट इच्छेचे एक विलक्षण उदाहरण ठरते.
संदर्भ:
- Shackleton, E. South: The Story of Shackleton’s Last Expedition 1914-1917. London: William Heinemann, 1919.
- Geiger, J. T. The Third Man Factor: Surviving the Impossible. New York: Weinstein Books, 2009.
