What Is Transmissible Cancer : कर्करोग हा जगातील सर्वात प्राणघातक आजारांपैकी एक मानला जातो. त्यामुळेच या आजाराचे नाव जरी ऐकले तरी अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. गेल्या काही वर्षांत जगभरात कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. चिंताजनक बाब म्हणजे त्यात तरुण-तरुणींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते. या आजारावर प्रभावी उपचार पद्धती शोधून काढण्यासाठी ठिकठिकाणी संशोधन सुरू आहे. यादरम्यान कर्करोग हा एखाद्या संसर्गासारखा एका जीवातून दुसऱ्यात जीवात पसरू शकतो, असा धक्कादायक शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे हा प्रकार केवळ प्राण्यांच्या काही प्रजातींमध्येच आढळून आला आहे, त्याविषयी…

अभ्यासातून नेमके काय समोर आले?

अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवरील ‘मेम्फ्रेमागॉग’ या गोड्या पाण्यातील तलावात असलेल्या ‘ब्राउन बुलहेड कॅटफिश’ या माशांमध्ये संशोधकांना नैसर्गिकरित्या पसरणारा कर्करोग आढळून आला आहे. हा महत्त्वपूर्ण संशोधन अहवाल ‘नेचर’ या प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. या शोधामुळे जिवंत कर्करोगाच्या पेशी एका जीवातून दुसऱ्या जीवाला कशा संक्रमित करतात, या दुर्मीळ घटनेचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांना नवी दिशा मिळाली आहे. याआधी केवळ तस्मानियन डेव्हिल, कुत्रे आणि शिंपल्यांच्या काही जलचर प्रजातींमध्येच अशा प्रकारचा कर्करोग आढळून आला होता आणि आता त्यात कॅटफिश माशांची भर पडली आहे. मात्र, या संशोधनामुळे सर्वसामान्यांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. मानवांमध्ये कर्करोग हा दैनंदिन संपर्कातून पसरत नाही. कर्करोग झालेल्या व्यक्तीला स्पर्श करणे, मिठी मारणे, चुंबन घेणे किंवा त्यांच्यासोबत अन्न खाल्ल्याने कर्करोगाचा संसर्ग होत नाही, असे तज्ज्ञांनी ठामपणे सांगितले आहे.

‘संसर्गजन्य कर्करोग’ म्हणजे काय?

सामान्यत: कर्करोगाची सुरुवात एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या पेशींमध्ये जनुकीय बदल झाल्यानंतर होते. त्यानंतर या पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात आणि कर्करोग हळूहळू शरीरात पसरू लागतो; पण हा आजार त्या व्यक्तीच्या शरीरापुरताच मर्यादित राहतो. मात्र, संसर्गजन्य कर्करोग यापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. या प्रकारात कर्करोगाच्या जिवंत पेशी एका जीवाच्या शरीरातून बाहेर पडून त्याच प्रजातीतील दुसऱ्या जीवाच्या शरीरात प्रवेश करतात आणि तिथेही वाढू लागतात. हा प्रकार ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) किंवा हेपाटायटिस बी व्हायरस (HBV) यांसारख्या विषाणूंशी संबंधित कर्करोगांपेक्षाही वेगळा आहे. अशा प्रकरणांमध्ये विषाणूची लागण झाल्यानंतर अनेक वर्षांनी कर्करोगाचा धोका वाढू शकतो; परंतु एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कर्करोगाच्या पेशी संक्रमित होत नाहीत. संसर्गजन्य कर्करोगाला दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात पसरण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीचा सामना करावा लागतो. तसेच, त्याला नव्या शरीरात स्वत:ची वाढही सुरू करावी लागते आणि जैविकदृष्ट्या ही प्रक्रिया अत्यंत कठीण मानली जाते.

संसर्गजन्य कर्करोगाबाबत तज्ज्ञ काय सांगतात?

बेंगळुरू येथील साक्रा वर्ल्ड रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय कर्करोगतज्ज्ञ डॉ. विजय कुमार श्रीनिवासालू सांगतात की, एचपीव्ही (HPV) आणि एचबीव्ही (HBV) यांसारखे विषाणू संसर्गजन्य असले तरी ते एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे कर्करोगाच्या पेशी पोहोचवत नाहीत. मात्र हे विषाणू शरीरात दीर्घकाळ टिकून राहून सतत दाह निर्माण करतात, जनुकीय अस्थिरता वाढवतात आणि पेशींच्या कार्यप्रणालीत बदल घडवतात. त्यामुळे कालांतराने कर्करोग होण्याचा धोका वाढतो. एचपीव्हीमुळे गर्भाशयाच्या मुखाचा, गुदद्वार, योनी, लिंग आणि घशाचा कर्करोग होऊ शकतो, तर शरीरात दीर्घकाळ हेपाटायटिस बी किंवा सीचा संसर्ग राहिल्यास यकृताच्या कर्करोगाचा धोकाही वाढतो. याशिवाय एपस्टीन-बार विषाणू (EBV) आणि ह्युमन टी-सेल लिम्फोट्रॉपिक व्हायरस-1 हेही कर्करोगाला आमंत्रण देऊ शकतात. मात्र हे विषाणू कर्करोगाचा धोका वाढवत असले तरी कर्करोग स्वत: संसर्गजन्य होत नाही.

कॅटफिशमधील शोधामुळे संशोधक का चकित झाले?

२०१२ मध्ये संशोधकांना ‘ब्राउन बुलहेड कॅटफिश’ या माशांच्या त्वचेवर गूढ काळ्या रंगाच्या गाठी आढळल्या. सुरुवातीला महापूर आणि पाण्यातील प्रदूषणामुळे हे घडत असावे, असा त्यांना संशय होता; पण या गाठींची आणि माशांच्या पेशींची जनुकीय चाचणी केल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आले. संशोधकांना असे आढळले की, प्रत्येक माशामध्ये स्वतंत्रपणे कर्करोग तयार झालेला नव्हता. उलट सर्व माशांमधील कर्करोगाच्या पेशींचे ‘डीएनए’ एकमेकांशी तंतोतंत जुळत होते. म्हणजेच, एकाच माशामध्ये सुरू झालेला कर्करोग पेशींच्या माध्यमातून इतर माशांमध्ये पसरला असल्याचे सिद्ध झाले. हा कर्करोग नेमका कसा पसरतो, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. संशोधकांच्या मते, प्रजननाच्या काळात माशांच्या जवळच्या संपर्कातून हा कर्करोग पसरत असावा. कुत्रे आणि तस्मानियन डेव्हिलमध्येही अशाच प्रकारे संक्रमण होत असल्याचे मानले जाते. तसेच गोड्या पाण्यात सोडल्या जाणाऱ्या कर्करोगाच्या जिवंत पेशींमुळे हा संसर्ग पसरत असावा, अशीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

कोणत्या प्राण्यांना होऊ शकतो संसर्गजन्य कर्करोग?

नैसर्गिकरित्या एका जीवातून दुसऱ्या जीवात कर्करोगाच्या जिवंत पेशी संक्रमित होण्याची उदाहरणे अत्यंत दुर्मीळ आहेत. आतापर्यंत अशा मोजक्याच प्राण्यांमध्ये हा प्रकार आढळून आला आहे. तस्मानियन डेव्हिल या प्राण्यांमध्ये चेहऱ्यावर होणाऱ्या कर्करोगाच्या गाठी भांडण किंवा संयोगाच्या वेळी एकमेकांना चावा घेतल्यामुळे पसरतात. या प्रजातीमध्ये जनुकीय विविधता अत्यंत कमी असल्याने त्यांच्या रोगप्रतिकारक यंत्रणेला दुसऱ्या प्राण्याच्या कर्करोगाच्या पेशी परक्या असल्याचे ओळखणे कठीण जाते. कुत्र्यांमध्ये लैंगिक संबंधांद्वारे पसरणारा कॅनाइन ट्रान्समिसिबल व्हेनेरियल ट्यूमर (CTVT) नावाचा कर्करोग आढळतो. संयोगादरम्यान जिवंत कर्करोगाच्या पेशी एका कुत्र्याकडून दुसऱ्याकडे जातात आणि नव्या शरीरात वाढू लागतात. याशिवाय काही शंख-शिंपल्यांच्या प्रजातींमध्येही संसर्गजन्य कर्करोग आढळतो. हे प्राणी त्यांच्या कर्करोगग्रस्त रक्तपेशी पाण्यात सोडतात. त्यानंतर आजूबाजूचे शिंपले अन्न गिळताना या पेशी शरीरात घेतात आणि त्यांना कर्करोगाची लागण होते. आता ब्राउन बुलहेड कॅटफिश या गोड्या पाण्यातील माशाचाही या अत्यंत दुर्मीळ गटात समावेश झाला आहे.

मानवांना संसर्गजन्य कर्करोगाचा का धोका नाही?

मानवांमध्ये असा कर्करोग का पसरू शकत नाही, याची तज्ज्ञांनी काही प्रमुख कारणे सांगितली आहेत. मानवी शरीरात दुसऱ्या व्यक्तीच्या कर्करोगाच्या पेशी आल्यास रोगप्रतिकार शक्ती त्यांना तात्काळ ओळखून नष्ट करते. याशिवाय प्रत्येक व्यक्तीची जनुकीय रचना वेगळी असते. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या कर्करोगाच्या पेशींना नव्या शरीरात टिकून राहणे जवळपास अशक्य ठरते. तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे- अवयव प्रत्यारोपण करताना दाता आणि रुग्ण यांचे ऊतक जुळवावे लागतात. अन्यथा शरीर त्या अवयवाला नाकारते. कर्करोगाच्या परक्या पेशींनाही याच जैविक अडथळ्याचा सामना करावा लागतो. याबाबत डॉ. विजय कुमार श्रीनिवासालू सांगतात की, मानवी रोगप्रतिकारक शक्ती परक्या पेशी ओळखून त्यांचा नाश करण्यात अत्यंत सक्षम असते. दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरातील कर्करोगाच्या पेशी शरीरात आल्यास त्या ‘परक्या’ म्हणून ओळखल्या जातात आणि लवकरच नष्ट केल्या जातात. मानवांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनुकीय विविधता असल्याने दुसऱ्या व्यक्तीच्या पेशींना शरीरात स्थिरावणे अत्यंत कठीण असते. त्यामुळे स्पर्श, मिठी, चुंबन, एकत्र जेवण, एकाच भांड्यातून पाणी पिणे, खोकला, लैंगिक संबंध किंवा कर्करोगाच्या रुग्णासोबत राहिल्याने कर्करोग पसरत नाही.

या शोधामुळे संशोधक उत्साहित का आहेत?

संसर्गजन्य कर्करोगाच्या पेशी व्यक्तीच्या शरीराबाहेर कशा टिकून राहतात, तसेच त्या रोगप्रतिकारक शक्तीपासून स्वत:चा कसा बचाव करतात आणि अनेक दशके किंवा शतकापर्यंत कशा विकसित होत राहतात, याचा अभ्यास करण्याची संशोधकांना दुर्मीळ संधी मिळाली आहे. या संशोधनामुळे कर्करोगावरील इम्युनोथेरपी अधिक प्रभावी बनविण्यास मदत होऊ शकते. त्याशिवाय रोगप्रतिकारक शक्तीला कर्करोगाच्या पेशी अधिक प्रभावीपणे ओळखून नष्ट करण्याचे नवे मार्ग या अभ्यासातून समोर येऊ शकतात. कर्करोगाची उत्क्रांती, रोगप्रतिकारक शक्तीपासून बचाव करण्याची क्षमता आणि शरीरात पसरण्याची प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठीही हा शोध महत्त्वाचा मानला जात आहे. कॅटफिशमध्ये आढळलेला हा नवा कर्करोग सार्वजनिक आरोग्यासाठी कोणताही धोका निर्माण करत नसल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.